प्रिय लाडक्या पावसा...,
हेय लाडक्या.... कसा आहेस...??. छानच असशील म्हणा, तरीही विचारलं. बर एक सांग, कसला एवढा राग आलाय तुला. जो रोज एवढा कोसळत आहेस. मला म्हाहित आहे तस. पण तरीही विचारलं. यावेळी जरा जास्तच दुखावलं आहे ना रे तुला या मानवजातीने. म्हणुन असा कोसळतो आहेस. किती वाईट झालीयेत ही माणसं. त्यांना निसर्गाचं महत्त्वच राहिलं नाहीये. दिसतो तो फक्त पैसा. त्या पैशाने घर बांधू शकतात, पण या निसर्गाचं रूप त्यांना नाही टिकवता येत.
बघ ना किती मोहक असा आहे हा निसर्ग जो तू घडवला आहेस. त्यातील प्रत्येक गोष्ट ही तेव्हढीच सुंदर आणि मनाला भुरळ घालणारी आहेत. जस की तुझ्या येण्याने ओसंडून वाहणारे धबधबे, पण लोक एवढी वाईट की मज्जा करायला जातात त्या धबधब्यांवर. पण येताना कचरा करून निघुन जातात आणि तीच लोक उद्या तुला दोष देतात की पावासामुळे सगळीकडे पाणी तुंबले आहे. अस वाटत जाऊन सांगावं पावसामुळे नाही तर तुमच्या मूर्खपणामुळे हे सगळं घडतंय.
कधी कधी तर एवढा राग येतो ना मला, जेव्हा लोकं तुला नावं ठेवतात. म्हणजे ना मला त्यांचा स्वभावच कळत नाही की नक्की त्यांना हवं काय असतं. त्यांना तु हवा असतोस, पण त्यांच्या वेळेनुसार. कस शक्य आहे ते. म्हणजे बघ ना जेव्हा तु येतोस तेव्हा त्यांची होणारी चिडचिड की, "आताच यायचं होत याला", आणि त्यांच्या पिकनिकच्या वेळेत तु आला नाहीस की रडून दाखवणार, "काय यार हा पाऊस यायला हवा होता." आता मज्जा कशी करणार, हे आणि ते नुसती नाटकं.
बर ते जाऊदे. मी काय बोलते लाडक्या. म्हणजे बघ तुला पटतंय का. काही लोकांमुळे तू सर्वांना नकोस ना शिक्षा करूस. काही लोकं असतात ना निसर्गप्रेमी. जे निसर्गाची खुप काळजी घेतात. जे स्वतःच घरदार सांभाळून देखील निसर्गाची काळजी घेतात. निसर्गाला आपलं घर मानतात.
पण काही वाईट लोकांमुळे तु सर्वानाच शिक्षा देतो आहेस. हा आता तुला मी काही दोष देत नाहीये. तुझ्या हातात असत तर तू त्या प्रत्येकाला भिजवल असतस. पण तरीही मी सांगेल की एवढा राग बरा नाही.
तसाही तू हसतानाच छान दिसतोस. त्या गोबऱ्या ढगासारख्या नाकावर राग छान नाही दिसत. अस वाटत कधी कधी भेटुन तुझे ते गाल खेचु, पण नंतर आठवत अस काही मी केलं तर तु माझ्यावर बरसशील आणि मलाच माझं हसु येत. मग लाडक्या नकोस ना जास्त रागावूस. तु आधीच सर्वांना स्वतः रडून आनंद देतोस. नको करून घेऊस एवढा त्रास स्वतःला.
येत जा, पण राग म्हणून नाही तर तुला आवडत ना सर्वाना आनंद द्यायला तसा ये. तुझ्या रागाने खूप गावं बुडत आहेत, त्यातील काही गरीब माणसं, प्राणी सगळे वाढून जातात तर काही मृत्यूमुखी पडतात. हे सगळं तुला आवडेल का...?
बघ विचार कर, निसर्गाची वाट लावतात ती शहरातील शहरी माणसं आणि तुझ्या रागात मधल्यामध्ये अडकतात ते गावातील लोकं, सर्व प्राणी, पक्षी. ज्यांचा काही दोष नसतो.
काही लहान मुलांना ही तुझ्या रागाला सामोरे जावे लागते.
अजून एक म्हणजे; मी तुझ्याकडुन एक गोष्ट छान शिकलीये. दुसऱ्यासाठी जगणं. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता दुसऱ्यांसाठी काही करणं. आपल्याला काही मिळणार नाहीये तरीही दुसऱ्यासाठी काहीतरी करत राहणं त्यातच आपला आनंद मानणारा असा हा तुच. तु आम्हाला प्रेम कसं करायचं ते शिकवतोस, मैत्री कशी निभावावी ते शिकवतो. स्वतः रडून दुसऱ्याला आनंद द्यायला शिकवतोस. मित्रा खुप काही शिकवतोस रे तु.
तु आलास ना की, कांदाभजी खावीशी वाटते. ते गरमा गरम जेवण तुझी आठवण करून देतं. पाऊस म्हटला की येतात त्या ट्रिप्स. निसर्गात रमण, बागडन, मज्जा करणं. बस एक विनंती करते तुझ्याकडे की, जिथे खुप गरज आहे अशा जागेवर ही पडत जा. म्हणजे तिथल्या लोकांना भेट, त्यांचे पाण्याचे प्रश्न सोडव. बाकी तु हुशार आहेसच.
बघ आता विचार कर आणि घे माघार. नकोस ना जास्त रागावूस. हो शांत. मला म्हाहित आहे तु नक्कीच विचार करशील यासर्वाचा. चल आता मी माझं प्रवचन थांबवते.
हे पत्र लवकर वाच हा..
तुझीच चाहती
पाऊसवेडी
◆◆●◆◆