तृष्णा अजूनही अतृप्त - भाग २० Vrushali द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग २०

ती पूर्णपणे त्या शक्तीच्या कह्यात होती. ओमच्या सुचनेप्रमाणे अनय भराभर राखेने रिंगण रेखाटत खिडकीजवळ पोचला होता. आत काय चाललंय ते डोकावून पाहण्यासाठी त्याने सहजच खिडकीची काच ढकलली. आत कसल्याशा हवनाची तयारी मांडलेली होती. एक भलामोठा यज्ञ ढणढणत जळत होता. बाजूलाच एका शैयेवर ती नखशिखांत सजून त्याच्या प्रतीक्षेत उभी होती. त्याच्या प्रेमात चिरविहिरणी होऊन त्याच्या प्रणयात न्हाऊन जाण्यासाठी ती उतावीळ होती. तिचे हे भाव तिच्या नटलेल्या सलज्ज चेहऱ्यावर अनयपासून लपून नाही राहू शकले. एक पती म्हणून त्याच्या आत द्वेषाची आग उफाळून आली मात्र त्याच सोबत मनात तिची काळजीही होती. कदाचित जर त्यांचा प्रणय ही शेवटची पायरी असेल तर तिचा वापर झाल्यावर तिचा अंत निश्चित होता. काळजात भडकलेली आग तिच्या काळजीने तक्षणी विरून गेली. क्षणभर त्याला स्वतःचाच राग आला... ती काय अवस्थेत अडकली आहे आणि मी... शी... खिडक्यांचे गज मोठे असल्याने त्यातून आत घरात सहज जाणे शक्य होते. शर्टच्या बाह्या मागे सारत तिला समजणार नाही अशा बेताने खिडकी ढकलून त्याने आत उडी मारली. कितीही हळुवार आत जायचा प्रयत्न केला तरी त्याच्या बुटांचा आवाज झालाच. त्या आवाजासरशी ती पटकन मागे वळली. तिच्यासाठी तीच एक सावज स्वतःहून चालत मृत्यूच्या दाढेत आल होत. अनय आत आला खरा मात्र स्वतःहून तिच्या तावडीत सापडला. त्याला पाहताच तिने आपलं नाजुकस नाक फेंदारल. अनय काही हालचाल करायच्या आधीच तिने जोराने त्याच्या पोटात गुद्दा मारला. बेसावध असल्याने तो बऱ्याच वेगाने मागे कोलमडून खिडकीला आदळला व त्या धक्क्याने खिडकीच्या काचा फुटून इतस्ततः खाली पडल्या. ती त्वेषाने दात ओठ खात त्याच्या दिशेने रागात चालत येऊ लागली. जास्त पुढे आली तर त्या फुटलेल्या काचा तिच्या पायात घुसतील म्हणून अनय बेचैन झाला. " थांब..." त्याने तिला अडवयाचा प्रयत्न केला. पण तिच्या कानात त्याचे शब्दच शिरत नव्हते. उलट त्याच्या हावभावावरून ती अजुनच चिडली.

काही करून तिला रोखायला हवं. त्याला हातातील मंतरलेल्या राखेची आठवण झाली.क्षणासाठी आपला श्वास रोखून तो सावध होत पवित्रा घेतला. ती जवळ यायच्या आत त्याने पोतडीतील मुठभर राख तिच्या दिशेने उधळली. राखेचा स्पर्श होताच ती जागीच थबकली. तिच्या सर्वांगाला वेदना होऊ लागल्या. असह्य वेदनेने की ओरडू लागली. तिला अनयवर हल्ला करायचा होता मात्र एकच जागी खिळली गेल्यामुळे ती काहीच करू शकत नव्हती. हळू हळू तिच्यावर भारी असलेला करालचा प्रभाव क्षीण होत होता मात्र तिच्या चेहऱ्यावरचे रागीट भाव किंबहुना वेदनेमुळे अजुन तीव्र झाले होते. तिला क्षणाचीही उसंत न देता त्याने लगबगीने तिच्याभोवती राखेच रिंगण रेखाटलं. हवेत राखेची धूळ अजुनही असल्याने ती फक्त गुरागुरण्याशिवाय अजुन काहीच करू शकत नव्हती. राखेच्या रिंगणात तिला एखाद्या बळीच्या बकऱ्यासारखी पडलेली पाहून त्याच्या काळजाला चरे पडत होते. मात्र काही इलाज नव्हता. ही वेळ भावनेच्या भरात वाहून जायची नव्हती. अजुन पूर्ण घराचं रिंगण बाकी होत... बाकी सर्व दैवाच्या हातात टाकून तो पळतच बाहेर निघाला...

अचानक त्याला काहीतरी आठवल... तो जागीच थबकला... जड मनाने पुन्हा तिच्या दिशेने आला... ती जमिनीवर शरीरातील त्राण संपल्यासारखी निर्जीवपणे पसरली होती. साडीचा पदर घसरून पोटावरून खाली पडला होता. कित्येक वेळ आरशासमोर उभ राहून सुबकपणे बांधलेले केस सैलावून चेहऱ्यावर पसरले होते. हात जोरात आपटल्याने तिच्या आवडत्या गुलाबी सोनेरी बांगड्या फुटून त्यांच्या काचा सर्वत्र विखुरल्या होत्या. तिला अश्या अवस्थेत पाहून पुन्हा त्याच काळीज हेलावल. आपल्या थरथरत्या हाताने त्याने तिच्या गुलाबी गालांना स्पर्श केला. तिला स्पर्श करताच त्याला स्वतःचे अश्रू आवरले नाहीत. एका हाताने उगाचच त्याने आसू पुसायचा प्रयत्न केला. त्याच्या आसव पुसण्याच्या प्रयत्नाला न जुमानता एक आसू नकळत तिच्या कपाळावर विसावला. त्यानेही पुन्हा त्याला पुसायचा प्रयत्न केला नाही. कापऱ्या हातांनी बटव्यातील चिमुटभर राख त्याने तिच्या कपाळाला लावली. विस्कटलेल्या बटांना दोन्ही हातानी सावरत तिच्या चेहऱ्यावरून दूर सारल. घसरून खाली पडलेला पदर पुन्हा उचलून पुन्हा तिच्या अंगावर लपेटला. व एकवार तिच्याकडे पाणीभरल्या डोळ्यांनी पाहत पुन्हा खिडकीच्या दिशेने निघाला. एव्हाना बाहेरच वातावरण बरच बदललं होत. असह्य थंडीची जीवघेणी लाट पसरली होती. अंधारभरल्या परिसरातून थंडगार हवेचे झोत खिडकीवर आदळत होते. स्वतःच्या मनाला समजावत त्याने पुढे पाऊल टाकलं मात्र चुकून मगाशी तुटलेल्या काचांवर त्याचा पाय पडला. अचानक वेदना झाल्याने कळवळत त्याने पाय पकडला. परंतु त्या नादात त्याचा तोल जाऊन तो खिडकीवर आदळला. खिडकीची अर्धवट तुटलेली काच अगदी वाट पाहत असल्यासारखी भसकन त्याच्या पोटात घुसली. बाहेरून जोराची किंचाळी ऐकताच मागचा पुढचा विचार न करताच असह्य वेदना होत असतानाही त्याने स्वतःला खिडकीतून झोकून दिलं. पोटातला काचेसहित साचलेल्या बर्फाच्या कुशीत तो अलगद सामावून गेला.