तृष्णा अजूनही अतृप्त - भाग २१ Vrushali द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तृष्णा अजूनही अतृप्त - भाग २१

पहाटेचे साधारण तीन वाजले असावे. हॉस्पिटलच्या आत बाहेर एकदम शांतता पसरली होती. रुग्णांच्या नातेवाइकांना रात्री आत प्रवेश नसल्याने सगळ्याच वॉर्डचा मुख्य दरवाजा बंद होता. दिवसभर माणसांनी गजबजून गेलेले वॉर्डस चिडीचूप पडले होते. वॉर्डबॉईजही सगळ टेंशन झटकून कधीचेचं झोपी गेले होते. पॅसेजमध्ये अगदी नावाला मंद दिवे जळत होते. अंधुकश्या प्रकाशापेक्षा काळोखच जास्त भरून राहिलेला. त्या काळोखात एक सावली हळूच भिंतीच्या आधाराने खुरडत सरकत होती. पावलांचा आवाजही न करता ती सावली तिच्या रुमच्या दिशेने वळली. रात्रीच्या अंधारात दरवाजा जरा कुरकुरलाच. त्या आकृतीने वळून इथला तिथला कानोसा घेतला. दरवाज्याच्या आवाजाने कोणाचीच झोप तुटली नव्हती. त्या आकृतीने हलकेच सुटकेचा निःश्वास सोडला. उघड्या दारातून ती आकृती आत डोकावली. भिंतीवरच कॅलेंडर उगाचच थोड फडफडल. ती आकृती हलकेच आत शिरली. हॉस्पिटलमधल्या त्या सफेद बेडवर तिला अस पडलेलं पाहून त्याचा उर भरून आला. त्या रूमच्या खिडकीच्या फटांतून आत शिरणारे लाईटचे कवडसे तिची राखण करत होते. त्या अंधुक प्रकाशात एक कवडसा हळूच त्याच्या गळ्यातील ओमच्या लॉकेटवर पडला. त्यातील ओमचा खडा चमकू लागला. खड्याची चमक नकळत तिच्या चेहऱ्यावर पसरली. तिचा चेहरा आजही तितकाच निरागस होता. त्याने आपले डोळे मिटून घेतले. काही आठवायच नव्हतं त्याला... परंतु तरीही त्याने भूतकाळातील जपून ठेवलेली ती त्याच्या नजरेसमोर तशीच हसत उभी राहिली... तिची ते गोड हसण नेहमीच त्याच्या काळजाचा ठाव घ्यायचं... डोळ्यासमोरील हसणारी अल्लड ती... फक्त त्याचीच होती.... त्याच्या हृदयाची स्पंदन वाढली. न राहवून त्याने आपला थरथरता हात थोडा बिचकतच तिच्या डोक्यावर ठेवला. काहीतरी झालं त्या स्पर्शाने.... त्याच काळीज हेलावल... डोळे भरून आले... परंतु ही समोर बेडवर अशी पडलेली ती आता दुसऱ्या कोणाचीतरी होती... इतकी वर्ष तिच्या आठवणीत घालवल्यावर एका वळणावर अचानक भेट व्हावी ती ही ती दुसऱ्याची असताना... तिला पाहताच तो आतून हलला होता. पत्त्याच्या बंगल्यासारख त्याच मन क्षणात कोसळून गेलं होत. तिच्या सुखासाठी तो सर्व सोडून गेला होता. आणि ती मात्र.... त्याला आपले हुंदके आवरेनासे झाले. दिवसरात्र जिच्या सुखाची कामना केली होती ती मात्र बेशुद्धावस्थेत आपले शेवटचे श्वास घेत पडली होती... नियतीचा खेळ खेळून झाला होता.. आयुष्य फरफटवून पुन्हा अश्या वळणावर आणून ठेवलं होत की जिथे मागे फिरणं शक्य नाही आणि पुढचा प्रवासही जमणार नाही...पण पुढचा प्रवास गरजेचा होता.. नियतीपुढे त्याचं प्रेम हरणार नव्हतं... नजरेनेच तिचा निरोप घेत त्याने तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले.... शेवटचे... मागे अंधारात मात्र काहीतरी लुकलुकल. कोणीतरी होत त्यांच्यावर नजर ठेवून...

" ओम..." अंधारात एक आवाज घुमला.

" क... कोण..." ओम चपापला. ह्यावेळी इथे कोण असेल आणि....

" मी... अनय..." इतका वेळ मागच्या अंधारात लपलेला अनय त्याच्यासमोर आला.

" तू... इथे.." ओमच्या पोटात गोळा आला. भीतीने त्याचा चेहरा आक्रसला. त्याच्या कपाळावरच्या नसा तरारून फुगल्या. जे सत्य त्याने लपवून ठेवलं होत ते त्याने न सांगताही कोणालातरी समजलं होत.

" तिची काळजी वाटत होती म्हणून आलो इथे... पण तू इथे कसा काय... तू ओळखतोस तिला आधीपासून... कसं...?" अनयच्या मनात खूप प्रश्न होते. ओमला मात्र काय बोलावे ते सुचेना. सत्य सांगावं आणि तिचा संसार तुटला तर.. आणि न सांगावं तर गैरसमज झाले तर..

" ओम प्लीज सांग ना...तू तिला आधीपासून कसा ओळखतोस..." अनय कळवळून ओमला विचारात होता. त्याच्या चेहऱ्यावर उभ राहिलेलं प्रश्नचिन्ह ओमला स्पष्टपणे दिसत होत.

" आपण इथून बाहेर जाऊया का..." ओमला तिथे काही बोलायची इच्छा नव्हती. उगाच अनय चिडला आणि तिला त्रास झाला तर...

" चालेल..." अनयने पुढे होत तिच्या अंगावरची चुरगळलेली चादर नीट केली. ओमला नजरेनेच इशारा करत तो बाहेर निघाला. ओमने एकवार तिच्याकडे वळून डोळेभरून पाहिलं. तिला शेवटचं पाहताना त्याला आसू आवरले नाहीत. डोळ्यांतील भरलेल्या पाण्यात ती धूसर होत गेली.

-----------------------------------------------------------------------

सगळीकडेच पहाटेचा हलकासा काळोख पसरला होता. थोडीशी गुलाबी थंडी अंगावर शहारे आणत होती. घरट्यातून पक्षी उठायला कुरकुर करत होते. झाडेही अजुन झोपेतच होती. त्या रात्रीनंतर बऱ्याच दिवसांनी ते दोघेही हॉस्पिटलच्या औषधी वातावरणातून बाहेर निघाले होते. इतकी प्रसन्न पहाट हे आज पहिल्यांदाच अनुभवत होते. हॉस्पिटलपासून जरा दूर एका मोठ्या ब्रीजवर ते दोघेच उभे होते. ब्रीजच्या दोन्ही बाजूने विजेचे खांब दिमाखात उभे होते. मात्र दोघेही आपल्याच विचारात गुंग होऊन दूरवरच्या अंधारात हरवून गेले होते. ब्रीजखालून खडखड करत गेलेल्या मालगाडीच्या आवाजाने दोघेही भानावर आले.

" अनय..." ओमच मन अजूनही चलबिचल करत होत. त्याला अनयच्या स्वभावाचा अजुनही अंदाज नव्हता.

" ओम... बोल.. मला जाणून घ्यायचंय..." अनयने हाताची घडी घालत ब्रीजच्या कठड्याला टेकत शांतपणे विचारलं.

" अनय.. मी जे सांगतोय तो भूतकाळ आहे.. प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस..." ओमच्या नजरेत अजजी होती. तिच्याबद्दलच प्रेम व्याकुळ होऊन अनयला विनवणी करत होत.

" लहानपणापासून आम्ही एकत्रच वाढलो... एकत्रच खेळलो... तेव्हापासून आमच्यात घट्ट मैत्री होती. एकमेकांशिवाय आमचं पानच हलायच नाही. दिवसभर कितीही भांडलो तरी रात्री नीट बोलल्याशिवाय आम्हाला झोपच यायची नाही. एकदा तर अस झालं की आमचं खूप मोठं भांडण झाल होत. इतकं मोठं की अगदी आमच्या आयानाही त्या भांडणात पडावं लागलं होत..." बोलता बोलता आठवणीत ओम स्वतःशीच खुदकन हसला. त्याच्या डोळ्यांसमोर छोटीशी फ्रॉक घातलेली ती कमरेवर हात ठेवून तावातावाने भांडत होती. " दिवस तर गेला नीट... पण रात्री एकट पडल्यावर तिची आठवण येऊ लागली... साधारण दहा वर्षाचा असेन मी... उगाच तिला बोललो अस होत होत. माझ्याच मनाशी पश्चात्ताप होऊ लागला. जाऊन तिची माफी मागायची होती परंतु इगो... तोच मध्ये येत होता. तिची आठवण तर येत होती मात्र तिच्याजवळ जायचं नव्हतं. रडायला तर येत होत पण रडू शकत नव्हतो. शेवटी रागातच न जेवता रूममध्ये येऊन झोपलो... ती पण जेवली नसावी कदाचित म्हणून मलाही जेवायचं नव्हतं. पोटात भुकेने कावळे तर ओरडत होते व रडून रडून डोकं दुखत होत. पण इगो मात्र मला कमीपणा घ्यायला देत नव्हता. मी तसाच डोकं व पोट दाबून झोपी गेलो. रात्री मात्र अचानक कोणाच्यातरी चाहुलीने झोप उघडली. ती बाजूला जेवणाच ताट घेऊन माझ्याकडे गाल फुगवून रागाने पाहत उभी होती. तशीही खूप गोड दिसत होती. " चल आता जेव.. उपाशी नको झोपू..." मला काही बोलायची उसंत न देता तिने भरवायला सुरुवात केली. मी मात्र तसाच ठोंब्यासारखा तिच्याकडे बघत फक्त तोंड उघडत होत. काय खाल्ल.. किती खाल्ल.. काही आठवत नाही. फक्त मला रागात भरवणारी ती आठवतेय.. तिचा तो निरागस रागावलेला चेहरा.. फुग्यासारखे फुगलेले तिचे गोबरे गाल.. रागाने व पाण्याने भरलेले तिचे डोळे... त्यानंतर नेहमीच ती बोलत गेली आणि मी ऐकत राहिलो. न बोलताच आमच्यात प्रेमाचा अंकुर फुलत गेला. कबुली कोणीच दिली नव्हती परंतु आमच्या डोळ्यातील होकार दोघांनाही समजला होता. मोठे होत गेलो तस प्रेमही बहरत गेलं आणि त्याची खबर तिच्या वडिलांपर्यंत पोचली. आमची जात, आमची गरिबी सगळच आमच्या प्रेमाच्या आड आल. तिच्या वडिलांच्या सामाजिक प्रस्थापुढे आणि तिच्या सुखाच्या काळजीपोटी माझं प्रेम झुकलं. मला काही झाल तरी चाललं असतं परंतु तिला झालेला त्रास मी सहन करू शकलो नसतो. तिच्या वडिलांना आमची मैत्री पसंत नसल्याने नेहमीच त्यांचे वाद व्हायचे आणि बऱ्याचदा तिला मारही पडायचा. मला भीती होती की सामाजिक पत सांभाळण्याच्या नादात ती तर बळी नाही ना पडणार.. त्यापेक्षा मीच दूर निघून जाणं योग्य ठरणार होत... बरेच दिवस ती आजारी होती... मी तिला पाहिलंदेखील नव्हतं.. तिच्या वडिलांनी तिच्याशी संपर्क होऊ दिला नव्हता... माझा जीव कासावीस होत होता... त्या रात्री मी एकटाच होतो घरी. आईबाबा बाहेरगावी नातेवाईकांजवळ गेले होते. तिचे वडील माझ्या घरी आले. मी तिच्या काळजीत विचार करत पडलेलो. तिच्या वडिलाना अचानक माझ्या घरी पाहून मी दचकलोच. नक्कीच काहीतरी वाईट घडणार असा विचार मनाशी चाटून गेला. कसातरी धडपडत मी उभा राहिलो. त्यांच्या नजरेत थोडे खुनशी भाव चमकत होते. मला काहीच बोलायला न देता त्यांनी बोलायला सुरुवात केली. " तू आणि तिच्यामध्ये काय चाललंय हे माहितेय मला... तुम्हाला वाटत असेल की कोणी पाहत नाही परंतु प्रेमात असलेले आंधळे असतात इतर लोक नाही. तुमच्या आमच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे जो कधीही सांधला जाणार नाही. त्यामुळे तू तिच्या आयुष्यातून दूर निघून जा.. " मला त्याच्याशी बोलायचं होत. कळकळून आमच्या प्रेमाची भिक मागायची होती. त्यांच्या शब्दातील धारेने कधीच माझ्या काळजावर वार केले होते. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटलेला. कानाशिल तापून गेलेली. भीतीने एकेक शीर फुगलेली. मानेवरून घामाचे ओघळ वाहत होते. माझे कापणारे हात जुळवायचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी अजुन एक घाव घातला. ' अन्यथा... तुमच्या ह्या दळभद्री प्रेमाचा डाग माझ्या इभ्रतीला लागण्याआधी तिला ह्या आजारातच संपवलं जाईल. व ह्या सगळ्याला तू जबाबदार असशील...' आपल वाक्य पूर्ण करून ते आल्यापावली निघून गेले. मी मात्र तसाच आपलं सर्वस्व गमावून स्थितप्रज्ञ बनून उभा होतो. माझा तर श्वासच हिरावून घेतला गेला. तिच्यासाठी मी आम्हा दोघांचं हृदय पायदळी तुडवून निघून गेलो... कायमचा... तिच्या आठवणींना कवटाळून... तिच्या वडिलांचा तेव्हाचा रुबाब, मानमरातब काहीच नाही राहील आता. त्या दिवशी गुरुजींसोबत त्यांना पाहून दचकलोच. त्यांना इतक्या करुण अवस्थेत पहायची इच्छा नव्हती. परिस्थितीने त्यांची गुर्मी तर उतरवून ठेवली पण नकळत शिक्षा मात्र तिला मिळाली.... " ओम न थांबता बोलतच होता. अनय मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत होता.

" ती माझ्यासोबत कधीच खूष नव्हती... ना लग्न ठरलं तेव्हा.. ना नंतर... मग कधीतरी हे प्रकरण चालू झाल... आणि आमच्यातील नात जवळजवळ संपलच...." अनय भावूक झाला. इतक्या दिवसांतील तिच्या वागण्याचं कोड त्याला आज जावून उलगडल होत. क्षणभरासाठी त्याला स्वतःचीच कीव वाटली आणि आपल्या फुटक्या नशिबाचा रागपण आला. कुठल्या जन्मातील पापाची शिक्षा मिळत होती देव जाणे. एव्हाना चांगलच उजाडलं होत. रस्त्यावर तुरळक वर्दळ चालू झाली होती. ओमची नजर अजुनही कुठेतरी शून्यात होती. त्याच्या डोक्यात काहीतरी चाललं होत. त्याच मन मानत नव्हतं पण बुद्धी कुठल्यातरी निर्णयाप्रत पोचत होती. आपल्या डोळ्यातील पाणी पुसत त्याने मनाशी काहीतरी ठरवल आणि ओमकडे पाहिलं. परंतु ओम तिथे नव्हताच... हा अचानक कुठे गेला आणि कधी.... त्याला काहीच समजत नव्हतं. त्याने कॉल करायला फोन हातात घेतला तर स्क्रीनवर अनेक मिसकॉल झळकत होते.. नक्कीच हॉस्पिटलमध्ये गडबड उडाली असेल... बापरे.. समोरूनच येणारी रिक्षा पकडुन तो हॉस्पिटलच्या दिशेने निघाला.