वाड्यातले दिवस - गहिऱ्या आठवणी .. Arun V Deshpande द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वाड्यातले दिवस - गहिऱ्या आठवणी ..

लेख -

वाड्यातले दिवस .

गहिऱ्या आठवणी . !

ले- अरुण वि.देशपांडे

-------------------------------------------------------------------------------------------------

आताचा मी जेष्ठ नागरिक झालो हे सत्य आहेच ,उद्याची सत्तरी खुणावते आहे ,या आधीच्या पिढीतल्या - सत्तरी "वर्गातल्या

जेष्ठा इतकी बेहाल -अवस्था नाहीये. त्याचे कारण नव्या आणि आधुनिक जीवनशैलीचे राहणे, जे आता अंगात आणि मनात

भिनले आहे, या फायद्यामुळे शरीर आणि मनाने यंग-सिनियर्स " हे नवे गौरव -पीस .मोर-पिसासारखे कौतुकाने मिरवता येते आहे,

अशा अनेकात मी आपण आहे हे नि:संकोचंपणे सांगेन. असो.

तर हे सगळे सांगायचे प्रयोजन आहे -ते म्हणजे ..आताच्या वर्तमानात मी फक्त शरीराने असतो पण ,

मनाने मी कायम ..माझ्या गत-दिनाच्या वैभवात लोळत असतो ,

, तो काळ ,ते दिवस , ती माणसे ..माझ्या अवती-भवती आहेत असा सतत भास होत असतो ..

चला तर माझ्या सोबत ..आज त्या काळात पुन्हा जाऊन , एक छानशी भ्रमंती करून येऊ ....

अगदी माझ्या लहानपणीच्या दिवसापासून सुरु करू या..

१९५१ ..ऑगस्ट महिन्याची ०८ तारीख ..अस्मादिक या भूतलावर अवतीर्ण झाले , गावाचे नाव ..वसमतनगर ..माझ्या मातोश्रींच्या

मावशीचे घर , इथेच त्यावेळी मातोश्रींचा मुक्काम होता ..वसमतनगर .. आधीच्या परभणी जिल्ह्यात असलेले ,सध्या हे गाव

हिंगोली जिल्ह्यातले एक मोठे तालुक्याचे ठिकाण आहे.

त्यावेळच्या वसमत गावात मोठमोठाले वाडे होते , कार्य -प्रसंगाने या वाड्यात जाणे व्हायचे ,जसे मुंज आणि

लग्न-कार्य . यातली काही नावे अंधुकशी आठवतात - मेथेकरांचा वाडा , आगलावे -वाडा , कुरुंदकर वकिलांचा वाडा , कात्नेश्वारकर -वाडा ,

काळ-परत्वे आता सगळेच बदलून गेले असणार .त्यात आता तिकडे जाणे नसते त्यामुळे अपडेट नाहीयेत.

माझे मामा अंबादासराव लोहरेकार ,यांचा स्वतःचा भव्य वाडा - लोह्रेकारांचा वाडा म्हणून प्रसिध्द होता . वाडा -संस्कृतीचा एक लोभस

गुण-विशेष मला सांगावासा वाटतो की ..भव्य दरवाजे असलेले हे वाडे ,सर्वांसाठी सदा उघडे असायचे .. एवढ्ध्ये मोठे दरवाजे "कधीही कुणी येवो

मोकळ्या मनाने येणार्याला वाड्यात सामावून घेत असत .हे दरवाजे उघडतांना कधी कुरकुरले " असे आठवत नाही .

वाड्याचे मालक देखील ..विशाल मनाचे असायचे ,अशी मोठी माणसे आणि त्यांची मोठी मने " त्यावेळच्या पिढीतील तरुणाईने नक्कीच अनुभवली आहेत.

जो यायचा तो सगळ्या सोबत अलगद मिसळून जाणार .अशी सर्वसमावेशक संस्कार -संकृती ..दयाळू ,कनवाळू मनाच्या त्या त्या -वाडयाच्या मालकांच्या सोबतच हळू हळू

अस्तंगत होत गेल्याचे पाहणारे दुर्दैवी साक्षीदार आहोत , हे वेदना माझ्या सारखी तुमच्या मनात आहे,याची कल्पना आहे मला.

आमच्या लहानपणीच्या आणि पोरसवदा वयाच्या त्या दिवसात ..उन्हाळ्याची सुट्टी ,आणि नातेवाइकाकडे होणारे लग्न-कार्य ,अशी दुहेरी धमाल असायची.

सगळ्याचं मोठ्या माणसांना समोर दिसेल त्या .पोराला , पोरीला ..काम सांगण्याची परवानगी घायची गरज कधी पडली नाही..

पोरांचे लाडच करवून घायचे असे नसे,

प्रसंगी "एखादे आजोबा अगर आज्जी ..थोतरीत ठेवून द्यायचे ", अशा रागाव्ण्याने कधी कुणाच्या भावना दुखावल्याचे पाहिल्याचे आठवत नाही.

डिग्री -होल्डर होईपर्यंत .म्हणजे १९७२ पर्यंत .वसमतच्या या वाड्यात माझे सुट्टीचे दिवस एखाद्या रम्य स्वप्न-दिवसासारखे गेलेले आहेत .

आम्ही पोर-पोरी मिळून २०-२५ जण नक्कीच जमत असुत , सिनेमे पाहणे , पत्ते खेळणे रात्री गच्चीवर सतरंज्या टाकून ,आकाशातील चांदण्या मोजीत

गाण्याच्या भेंड्या खेळणे असे चालत असे.

यात एक मोठा आणि महत्वाचा कार्यक्रम असायचा ते पाणी भरणे हा ",त्यासाठी थोड्या अंतरावर असलेल्या विहिरीवर जाऊन ,याला आड " पण म्हणायचे .

आडवार जाऊन उभे राहून , हातातल्या पोह्र्याने शेंदून घागरी भरणे ,हे साधे सुधे काम नाहीये. "पाणी भरणे " म्हणजे काय ? आडावर ज्यांनी पाणी भरले आहे

त्यांनीच हे सागावे

हे आड किंवा विहीर वड्या पासून जवळ नसायचे ..आडावर ..उभे राहून पोहरयाने शेंदून घागर भरून देणारे वेगळे ,आणि

आणि विहीर ते वाड्यात .असे रस्त्यात उभे रहात ,हातातल्या भरल्या घागरी या हातातून -त्या हातात देत जायचे .आणि तीन-तीन तास ..पाण्याचे हौद, टाक्या भरणे

असे हे काम हसत -खेळत पार पडायचे . आजच्या भाषेतले "टीम -वर्क ? आम्ही चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीच आनंदाने करीत होतो.

या जमा झालेलेल्या गोतावळ्यात कोण जवळचे आणि कोण लांबचे ? असे संकुचित विचार कुणाच्या मनात आलेनाहीत , हे सगळे आपलेच आहेत."

असे वाटायचे . आता विचार करतांना एक गोष्ट जाणवते की - नक्कीच

ही जादू बहुदा ..त्यावेळच्या कर्त्या -स्त्रीच्या मनातली आणि बोटातली असावी..

स्वयपाक घरात राबणारे हात अनेक असायचे ..पण या सगळ्यांच्या मनात एकच भावना असायची . खाणाऱ्याला आनंद झाला पाहिजे.

जेवणात जास्त करून भाकरीच असायची ,तिच्या सोबत ,फोडणीचे खमंग वरण , कांद्याची भरडा भाजी - भाकरी , लोणचे, तक्कू , तेल-चटणी - असे खमंग कालवण

आलटून पालटून असायचे . शिळ्या भाकरीचा कुस्करा -लोणचे घालून ..दिला जाई ज्याला "पैजणपाल ", म्हणयचे तर शिळ्या पोळीचा खमंग कुस्करा ,तर कधी

"गुळतूप "घालून केलेला शिळ्या पोळीचा लाडू दुर्मिळ असला तरी ..अचानकपणे बशीत दिला जात असे.

तेल-तिखट -मेतकुट -लावून मुरमुरे .असा कच्चा चिवडा ..समोर आला कि बघता बघता फस्त.

आंबे आले की मग या दिवसात ..रस -पोळी .., भज्जी , कुरडई ,असे रसाळ भोजन .

दिल खुश होण्यास अजून काय हवे असते हो ?

माझे बाल-पण असे अनेक वाड्यात गेलेले आहे .. मानवत , हे गाव परभणी जिल्ह्यातले एक मोठे व्यापरी -गाव म्हणून ओळखले जाते . स्टेट बँक ऑफ हैद्राब्दच्या

मानवत शाखेत हेड- काशियार म्हणून माझ्या वडिलांनी १९५० ते १९६० असे दहा वर्ष काम केले .

व्ही..एच .देशपांडे .या नवा पेक्षा ..बँकेतले "बाप्पा देशपांडे "

याच नावाने त्यांची लाईफ-टाईम सोबत केली.

मानवतच्या वास्तव्यात ली पहिली पाच-सात वर्षे मला आठवत नाहीत .. वयाच्या आठव्या वर्षापासूनच्या त्या आठवणी अजून ही केल्या जातात म्हणून

त्या बर्यापैकी ताज्या आहेत..

मानवतच्या या वाड्याचे मालक .काटकर नावाचा परिवार होता ..आणि या वाड्यात त्यांचे "बालाजी मंदिर होते " खूप मोठ्या प्रशाष्ट वाड्यात अनेक सख्हे -

शेजारी राहायचे . मानवत शहरात .बालाजी -भक्त खूप असावेत ..सकाळ-संध्याकाळ दर्शनाल लोक सतत येत असत . शुक्रवारी खूप गर्दी असे मंदिरात ,

आम्ही पोरं मंदिरात घुटमळत असायचो ..कारण ..शुक्रवारी बालाजीचे भक्त -लोक पेढ्याचा परसाद वाटीत असायचे , हा पेढा ..नामक गोड दोस्त तेव्हापासून

माझा अगदी लाडका फ्रेंड आहे . येका डब्यात परसादाचे पेढे जमवून ठेवत ..असे.

आमच्या घराला माडी होती.. वाड्याच्या मोठ्या दरवाज्याच्या बरोबरवरच ही खिडकी होती,तसा न तास बाहेर पाहण्यात वेळ जायचा.

आईचे महिला मंडळ घरी आले की ,त्या खाली .आणि मी माडीवरच्या खिडकीत बसून राहायचो .किती बोलावले तरी बायकात जाऊन

बसायचे नाही "असे ठरवलेले असे .., खिडकीत अशावेळी माझ्या सोबत माझा लाडका गोड दोस्त..पेढा , असायचा . वेळ असाच जाई.

शेजार -धर्म , कठीण-प्रसंगी आधार , पैश्यांची मदत , लग्न-कार्य प्रसंगी तन-मन-धन अशा स्वरूपातला सहभाग " हे शब्द ..

वास्तवात वावरतांना दैस्त होते ,

आता पुस्तकातून या सगळ्यांची भेट होण्याचे दिवस आले आहेत.

माझे आजोळ ..मामच्या वकिली व्यवसायामुळे जिंतूर , पण आज्जी राहायची ते गाव जिंतूर जवळचे ..वसा हे छोटेसे गाव. .

माझे मोठे मामा ..पांडुरंगराव वसेकर ..जिंतूर या गावच्या सार्वजनिक जीवनातले एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते .सत्तर -ऐंशीच्या दशकात ते सतत

बारा वर्षे जिंतूर पालिकेचे अध्यक्ष होते.

पांडुरंगराव वसेकर - बालाजी मंदिरासमोरचा वसेकर वकिलांचा वाडा -जिंतूर ..पोस्टकार्डवरचा पत्ता मला आज ही पाठ आहे.

१९७८ -१९८० ही दोन वर्षे मी स्टेट बँक हैदराबादच्या जिंतूर शाखेत काम केले . आजोळी -मामाच्या घरीच राहावे अशी मामांची खूप इच्छा होती.

पण नोकरी मुले, येणारे जाणरे , पाह्व्ने -रावले .आले तर " मग मोठ्या ईच्छेने मामच्या परवानगीने समोरच्या गल्लीत असलेल्या ..

यशवंतराव देशपांडे -वकील वाड्यात २ बर्षे राहिलो . मोठ्या दर्वाजात्याच्या पायर्या चढून वाड्याच्या आत आले की .. खाली तीन आणि वर तीन .

असे तीन- तीन खोल्यांचे ब्लॉक होते .. हे सर्व भाडेकरू ..बदली होणार्या नोकरीचे असतील तरच ,या वाड्यातले भाडेकरू होऊ शकायचे.

मी दुहेरी लाभार्थी ..बदली होणारा ,त्यात ..वसेकर वकिलांचा भाचा ..आणि वाडा -मालक वकीलसाहेब .हे पण नात्याने मामाच होते ",गावातील सगळेच

मान्यवर .मग मोठे व्यापारी , डॉक्टर , मामांचे इतर सहकारी वकील ,आणि त्यांचे परिवार सुधा ..वसेकर वकील - साहेबांच्या बहिणाबाईचे भाऊ हे नाते

मनापासून मानायचे . तळणीकर , चारठाणकर , बामानिकर , जिन्तुरकर या परिवारांचे मोठ मोठे वाडे .आणि या सगळ्या परिवाराचा पाहुणचार

आजोळची घरे म्हणून मी लहानपणी घेतला , नोकरीच्या निमित्ताने होतो तेव्हा पुहा घेतला

जिंतूर देखील .मोठमोठ्या वाड्याचे गाव ..कोमटी समाज .व्यापार करणारा .त्यांना "सावकार "म्हणायचे-

कोकडवार , वत्तमवार , चीद्रवार अशा अनेक सावकारांचे मोठे मोठे वाडे जिंतूरचे वैभव आहे.

. नेमगिरी " हे जैन -धर्मियांचे महताव्चे स्थान जिंतूरच्या अगदी जवळ आहे..

वाडे आणि वाडे अशी ज्याची ओळख आहे अशा गंगाखेड गावात ..मी १९८२ ते १९८५ .अशी तीन वर्ष होतो . संत जनाबाईचे हे गाव गोदावरीच्या

काठी असलेले क्षेत्र आहे..इथले .बालाजी देवस्थान अतिशय प्रसिध्द आहे. तिरुपती बालाजी ..गोंविंदा असा जयघोष ..नवरात्री मध्ये गंगाखेडला

मी सलग तीन वर्षे केला . इथल्या देवस्थानात ..देवीचे नवरात्र आणि बालाजीचे नवरात्र असे मोठा उत्सव योग असतो.

गंगेकाठी ..अरुंद गल्ल्या .आणि मोठ्ठाले वाडे .असे दृश्य दिसते.. गोदा घाट, नदी प्रवाह ..संध्याकळी दिसणारे गंगाखेड खरोखर गंगाकाठचे

तीर्थ -क्षेत्र वाटते. मी ज्या वकील कोलोनीत राहायचो ..त्याला .बंगला म्हण्यान्या पेक्षा .किशनराव चौधरी वकिलांचा वाडा म्हणत असतो.

एका गल्लीत प्रवेशद्वार , तर , परसदार ..मागच्या दुसर्या गल्लीत .असा हा वाडा ..याच्या मी आजन्म ऋणाईत आहे.

संत जनाबाईच्या क्षेत्र -गंगाखेडला तर १९८४ मध्ये माझ्या लेखन प्रव्सास सुरुवात झाली

मालक किशनराव चौधरी अतिशय यशस्वी वकील , रसिक मनाचे वकील साहेब उत्तम साहित्यिक - लेखक होते...ते पण मोठ्या आस्थेने

आमच्या नव्या साहित्यिकात येऊन बसत ...त्यांच्या वाड्यात त्यांच्या सहवासात सलग दोन -अडीच वर्षे ..मी कथा लेखन केलेलं

ही आठवण ..कधीच न विसरण्यासाठी आहे.

या आठवणी सांगितल्या त्या अशा गावांच्या आहेत की ,लहानपणी आणि अगदी अलीकडच्या

काळात देखील या ठिकाणी कार्य-प्रसंगांच्या निमित्त माझे जाणे होते ..

आणि मी गावा बाहेर मुक्काम असलेल्या “मंगल-कार्यालयातून “, वेळ काढतोच आणि लोकल नातेवाईका सोबत घेतो

किव्ना नव्या जमान्यातल्या तरुण मित्राच्या सोबत .गावातील ते जुने मोठ्ठे वाडे “ दुरून पाहून

येतो ..एखाद्या मोठ्या जेष्ठ व्यक्तीचे दर्शन घेऊन आल्यासारखे छान वाटत असते .

परभणी “ हे माझे मुळगाव .. इथे मी हैद्राबाद बँकेतील नोकरीमुळे ..१९८६ ते २००६ अशी २० वर्ष होतो .

.श्रीराम नगर “कारेगाव रोड .पाण्याच्या टाकी जवळ .ही आमच्या कोलोनीची ठळक खुण

आहे . इथे मी माझ्या वरदान “ या स्वतःच्या नव्या वास्तूत वास्तव्यास होतो .

आणि क्रांती-चौक – परभणी ..या मध्यवर्ती ठिकाणी .. आमच्या देशपांडे परिवाराचे मोठाले वाडे

आहेत , यातले काही “आता होते “, असे म्हणवे लागते आहे.

परभणी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या क्रांती चौकात ..

लोहगावकर देशपांडे , ताडलिंबेकर देशपांडे , महातपुरीकर देशपांडे ,

परभनकरदेशपांडे , औन्धेकर देशपांडे , सुभेदार –वाडा , वैद्य –वाडा , सरदेशपांडे वाडा ,

असे वाडे आणि परिवार यांचे उल्लेख आणि आठवणी ऐकण्यास मिळतील .

निझामी राजवटीतल्या परभणीचत आणि परभणी जिल्ह्यातील अनेक ताल्कुक्याच्या गावी,

खेड्याच्या गावी असलेले वाडे –वैभव ..पिढ्य न पिढ्या स्मरणात राहील हे नक्की .

ढोबळमनाने सांगायचे झाले तर संपूर्ण मराठवाड्यातच पन्नस वर्षापूर्वी .लहान –मोठ्या सगळ्या गावी ..वाडा – संकृती नांदत होती.

मित्र हो - वाड्यात राहिलो ते दिवस .या दिवसात मी -कायम

शेजार -धर्म , कठीण-प्रसंगी आधार , पैश्यांची मदत , लग्न-कार्य प्रसंगी तन-मन-धन अशा स्वरूपातला सहभाग " हे शब्द ..

वास्तवात वावरतांना पाहिलेले आहेत ,अनुभवलेले आहेत .

आजच्या जेष्ठ पिढीतील बहुतेकांनी आपापल्या लहानपणीचे दिवास आपल्या दोन्ही कडच्या आजोलीच्या गावाततील वाड्यात काढले

आहेत . त्यांना या आठवणी विसरणे कधीच शक्य नाही , उलट ,या आठवणींनी त्याचे मन भरून येईल आणि डोळ्यांच्या कडा

पाणावतील हे सांगणे नकोच.

आज मात्र पुस्तकातून या सगळ्यांची भेट होण्याचे दिवस आले आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

लेख-

वाड्यातले दिवस -

गहिऱ्या किती या आठवणी !

-अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------