कथा -
संकोच ,
----------------------------------------------------------------
मानवी स्वभावाचे विविध रंग पाहून वाटते , “व्यक्ती तितक्या –प्रकृती “असे जे म्हणतात ते
शब्दशः खरे आहे. रागीट स्वभावाच्या माणसाचे एक बरे असते , “स्वतःच्या मनासारखे करवून
घ्यावयाचे असते तेव्हा तो ताड –ताड बोलून स्पष्टपणे बोलण्याच्या नावाखाली दुसर्यांच्या कडून
जे हवे असेल ते मिळवून घेतो “. भिडस्त आणि अबोल स्वभावाचा माणूस जो “इधर का –ना –
उधर का “ अशा गोंधळून गेलेल्या मन:स्थितीत असतो , तो फटकन बोलत नसतो ,मनातल्यामनात
धूमास राहतो “ ,त्याची अशी अवस्था त्याच्या समोर असणार्या व्यक्तीच्या लक्षात नसते .
शिरीषचा स्वभाव असाच भिडस्त , त्याच्या उलट विजयाचा स्वभाव .मोकळा आणि खेळकर ,
पण सोबतच्या शिरीषच्या स्वभावामुळे तिच्या मनाची अवस्था मोठी विचित्र होऊन जाते .
त्याच्या अशा भिडस्त आणि संकोचाच्या प्रभावाखाली राहून की काय , विजयाचा स्वभाव अलीकडे
फार चिडचिडा होत चालालाय असे वाटायला लावणारा एक प्रसंग नुकताच घडून गेलेला ,
तो आठवून विजया अधिकच नर्व्हस होत गेली.
त्यादिवशी सकाळची कामे जरा लवकरच आटोपल्या मुळे तिच्या वाट्याला निवांतपणा आला होता .
खूप दिवसानंतर आवडते पुस्तक तिने वाचायला घेतले होते. त्यावेळी तिच्या मनात विचार आले –
विणकाम , भरतकाम ,वाचन अशा गोष्टी मनाला छान गुंतवून ठेवणार्या असतात “ अशाच गोष्टींची
आपल्याला पहिल्यापासून आवड आहे याचा तिला आनंद होत होता .
यातच दुपार सरली ,संध्याकाळ झाली आणि शिरीष ऑफिसातून घरी आला ,
त्याच्या सोबत काही मित्रपण आलेले दिसले , आणि तिला राग आला ,
पण तो मुकाटपणे गिळून टाकावा लागणार “याची पण सवय होती .
तिला कळून चुकले ..आपले आजचे मार्केटमध्ये जाणे ..पुन्हा एकदा बारगळले आहे.
आलेल्या मित्र-मंडळीसाठी चहा आणि फराळाचे करण्यातच सारा वेळ गेला . शिरीष आणि त्याचे मित्र
अगदी निवांतपणे गप्पा मारीत बसल्याचे विजया पाहत होती . महत्वाच्या विषयावर काही चर्चा असेल
तर ,त्या चालू असणे एक वेळ ठीक होते , पण,हे लोक तर निव्वळ वायफळगपा करण्यात टाईमपास
करीत आहेत .
विजयाला वाटले ..शिरीषने अशावेळी मित्रांना म्हणवे .बाबानो , आमचे आज मार्केटमध्ये जाऊन येणे ,
आणि खरेदी करणे हे खूप महत्वाचे आहे “. आपण या गप्पा पुन्हा केव्हातरी करू या .
पण शिरीष असे काही म्हणू शकत नाही ..त्याला वाटत असते ..
आपल्या घरी आलेल्या मित्रांना ,असे तुम्ही आता जा ..असे कसे सांगायचे ? काय वाटेल मित्रांना ?
या भीतीने शिरीष काही न बोलता ..बळेच त्या गप्पात खोट्या हसऱ्या चेहेर्याने तसाच बसणार .पण,
मोकळेपणाने मित्रांना सांगणे त्याला जमणार नाहीच .
शिरीषचा अस भिडस्त स्वभाव ओळखून त्याचे मित्र त्याचा गैरफायदा घेण्यात काहीच वावगे मानीत नसत .
आता हेच बघाना .
शिरीषराव ..टीव्हीवर एखदा जुना पिक्चर कुठे चालू आहे का बघा बरे , आज आम्ही अगदी निवांत
आलोत . ठरवूनच म्हणा की - तुमच्याकडे पिक्चर पहायचा म्हणून. मग, काय ,
पुन्हा चहा आणि फराळ करावाच लागणार होता .
फिल्म सुरु झाली .. मित्र म्हणू लागले ..काही म्हणा राव – पिक्चर एन्जोय करयला याव तर इथेच .
शिरीषच्या मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीवर पिक्चर पाहण्याची मजा काही वेगळीच ,अगदी थ्री डी effect
सहित .
दोस्तांच्या सोबत आपोआपच शिरीषदेखील पिक्चर पहाण्यात रंगून गेला , आणि आज आपण
विजयाला मार्केटमध्ये घेऊन जाणार होतो याचा त्याला विसर पडला होता . त्याचवेळी आतल्या खोलीत
बसलेली एकटी विजया नाराज मनाने विचार करीत बसली ..की अशा भिडस्त स्वभावावर कोणते
औषध असेल का ?
सतत दुसऱ्यासाठी आपण काही केले पाहिजे “,या भावनेने पछाडलेली माणसे बहुदा भिडस्त स्वभावाची
बनत असावीत .कारण त्या भावनेच्या आधारे ..आपण काहीच नाही केले तर कसे “ ही अपराधीपणाची
भावना त्यांना नकोशी वाटते ,म्हणून समोरचा जे म्हणेल ,जे सांगेल .ते काही विरोध न करता
आपण केले पाहिजे “ ही भावना प्रबल होते .आणि मग अशी माणसे .आपण काही बोललो तर ?
याला काय वाटेल ?’ या भीतीने काही बोलण्यापेक्षा, न बोलता सगळी कामे करीत राहतात .
आपल्या शिरीषचा स्वभाव अगदी या प्रकारात फिट्ट बसेल असाच आहे..
त्याचा स्वभाव कमी होण्या ऐवजी वाढतच जातो आहे ,हे पाहून विजया कधी कधी अगदी वैतागून
बोलून दाखवायची –
अहो , तुमच्या अशा स्वभावामुळे माणसे जोडली जात असतील “, पण यातले कितीजण वेळप्रसंगी
तुमच्या अडचणीच्या वेळी तुमच्या मदतीला येतील ? याचा कधी विचार करता का हो तुम्ही ?
विजयाच्या या बोलण्याचा शिरीषच्या मनावर काहीही परिणाम होत नसे ..तिच्या बोलण्यावर तितक्याच
शांतपणे तो म्हणे –
“विजया ,जाऊ दे , आपण आपल्याला आवडते तसेच वागावे . लोकांचा स्वभाव कसा असेल ?
याच्याशी आपल्याला काय करायचे आहे ?
ज्याचे त्याचे भले-बुरे त्याच्या बरोबर .
आता असे उत्तर मिळाल्यावर या शिरीषवर रागराग करण्यात काहीच अर्थ नाही “हे जाणवून विजया
शांतपणे आपल्याजागी बसून राहायची.
विजयाला तिच्या आणि शिरीषच्या लग्नानंतरचे नव्या नवलाईचे दिवस आठवले –त्या दिवसात शिरीषच्या
स्वभावाचे तिला खूप कौतुक वाटे . दुसऱ्यांना मदत करणे , आपणहून प्रत्येक प्रसंगी काम करण्यासाठी
पुढे असणाऱ्या शिरीष बद्दल ,त्याच्या चांगल्या स्वभावा बद्दल चार लोकांच्या कडून कौतुकाचे चार शब्द
ऐकून विजयाला आनंद व्हायचा .शिरीषचा अभिमान वाटायचा .
तुसड्या स्वभावाच्या माणसांचा विजयाला मनस्वी तिटकारा होता . व्यवहारात आणि वागण्यात अगदी
हिशेबीपणाने वागणारी दुटप्पी माणसे ,ही कधी दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करीत नाहीत .
असे म्हणतात की माणसांची किंमत स्वभावा वरून करावी. दिखाऊ मोठेपणा फसवणारा असतो .
खरा मोठेपणा असतो तो मनाच्या श्रीमंतीवर .
माणसाची निर्मल नजर मनाचा मोठेपणा दाखवीत असते . ओठावर साखर आणि मनात मात्र असतो
कडू कार्ल्यासारखा कडवटपणा “, अशा माणसांची मैत्री काय कामाची ?
विजयाचे हे बोलणे शिरीषला पटायचे . पण जेव्हा बोलून दाखवायची वेळ येते , सांगण्याची वेळ येते “
तेव्हा मात्र .सगळे पालथ्या घड्यावर पाणी “..असा प्रकारच घडतो .
समोरच्याला काय वाटेल ? असा विचार करणारा शिरीष संकोचामुळे बोलत नाही ,गप्प राहतो.
श्रीकांत –हा शिरीषचा जिवलग मित्र आहे .असे स्वताच सगळ्याना सांगत सुटणारा एक परिचित असा
मित्र . त्याच्या स्वभावातील विशेष गुण म्हणजे ..
सगळ्या गोष्टी स्वतःच्या खिशाला चाट न बसता , परस्पर कशा मिळवत राहायच्या यातच हा माणूस
बेरकी असा हुशार होता . निर्लज्जं –सदा सुखी “ असा हा श्रीकांत
सगळीकडे म्हणजे .ऑफिसात ,स्वतःच्या घरात , इतरांच्या घरात ..सगळीकडे उपरा उपरी ..
सगळ अलगद खिशात टाकायचं “हा एकच याचा उद्योग.
बायकांच्या नजरेला समोरचा माणूस कसा आहे ? हे फार चटकन ओळखता येते “असे म्हणतात .
या प्रमाणे श्रीकांत पहिल्यांदा जेव्हा शिरीषच्या घरी आला , त्याच वेळी त्याच्यातील बेरकी आणि मतलबी
माणूस विजयाला जाणवला ,आणि दरवेळी श्रीकांत आला की हे दे , ते घेऊन जातो , असे म्हणून
काही तरी घेऊन गेल्यावाशिवाय श्रीकांत घरी गेलेला नाही “हे विजयाने अनेक वेळा शिरीषला दाखवून
दिले होते. “काम पडेल तेव्हा शिरीषशी किती जवळचे नाते आहे “ असे सांगत श्रीकांतने बिनदिक्कत
शिरीषला त्याच्या घराच्या बांधकामाच्या वेळी हक्काने अनेक कामे करवून घेतली होती .
आणि जेव्हा शिरीषने घराचे बांधकाम सुरु केले .आणि लगेच श्रीकांतने शिरीषकडे येणे-जाणे कमी केले.
शिरीषचे अनेक प्रश्न श्रीकांतच्या मदतीने सोयीस्करपणे सुटले असते . परंतु स्वतःच्या फक्त फायद्याचा
विचार करणाऱ्या श्रीकांतने शिरीश्साठी मदतीचा हात पुढे केलाच नाही. अशा वागण्यामुळे लाख रुपयाचे
नुकसान झाले “ही गोष्ट विजया तर विसरू शकत नव्हती .
शिरीषने मोठ्या हौसेने विजयाला वाढदिवसाची गिफ्ट म्हणून किचनमध्ये भारी कुकिंग रेंज आणून दिली
होती ,भारी डिनर-सेट , बार्बेक्यू सेट , दिला होता . टेरेसपार्टीच्या वेळी या गोष्टीमुले खूप मजा यायची .
श्रीकांतने एकदा टेरेस पार्टीत या सगळ्या वस्तू पाहिल्या .
एकदिवस शिरीषला तो म्हणाला .अरे यार , अपने बडे बॉस सिलेक्टेड स्टाफ को पार्टी देणेवाले है.
या पार्टीची सगळी जबाबदारी माझी आहे. माझ्या सोसायटीच्या टेरेसवर ही पार्टी आहे. त्यासाठी
मला तुमच्या किचनमधील या दोन-चार वस्तू लागतील .
तू तर आपल्या हक्काचा माणूस , दुसर्याकडे हात का बरे पसरायचा मी ?
तुझी वाहिनी –आमच्या बाईसाहेब तर मलाच म्हणाल्या –
अहो—तुम्ही इतर कुणाकडे जायचेच कशाला ? म्हणते मी .
आपल्या शिरीष –विजयाकडे जा आणि जे पाहिजे ते हक्काने घेऊन यायचे सोडून , उगीच काय विचार
करण्यात वेळ घालवताय ?
श्रीकांतच्या अशा लबाड बोलण्याला ,खोट्या प्रेमळपणाला शिरीष नेहमीप्रमाणे भुलणार आणि
तो श्रीकांतला काही नाही म्हणणर नाहीये याची विजयाला खात्री होती.
शेवटी श्रीकांत ज्या वस्तू त्याला हव्या होत्या त्या घेऊन गेलाच . खरी कमाल तर पुढेच झाली..
त्याच्याकडे होणार्या बॉसच्या पार्टीत शिरीषला आमंत्रण असणार “हे तर नक्कीच . पण ,श्रीकांत
असे करणार नाही , कारण पार्टीत . बॉससमोर ,सगळ्यांच्या समोर
शिरीषला सगळ्यांनी चांगले म्हणणे , त्याचे कौतुक होणे .म्हणजे श्रीकांतला कमीपणा येणार .
म्हणून शेवटपर्यंत त्याने शिरीषला बोलावलेच नाही .ऐनवेळी राहूनच गेला यार , असे म्हणून
तोंड लपविले .
हे असे केले ते केलेच . घेऊन गेलेल्या वस्तू परत आणून देण्याचे नाव काढीना हा गृहस्थ .
विजया म्हणाली ..अहो , काय हे , हा श्रीकांत कसाही वागला तरी चालतो तुम्हाला , तुम्हाला
बोलावले नाही त्याने पार्टीला ? हद्द झाली या कृतघ्न माणसाच्या वागण्याची , आणि तुम्ही हेअसे
भोलेनाथ .
आपल्या किचन आणि पार्टीच्या वस्तूसाठी तरी फोन करा जरा या महाराजांना ?
की बोलू सरळ आणि स्पष्ट शब्दात ,म्हणजे नीट समजेल त्या दोघांना .
तिला थांबवीत शिरिष म्हणाला -
हे बघ विजया – तुझे हे असेच असते , थांब जरा .
देतील ना आणून ते , आपल्या वस्तू . मी बोलतो श्रीकांतला
आपण आणून द्या म्हटले तर.. त्या वहिनींना काय वाटेल विजया ?
शिरीषच्या या बोलण्याने विजयाला राहवले नाही -
आलेल्या रागाला आवर घालीत ..ती म्हणाली ..
अहो ,दुसर्या कुणाकडे आपल्या वस्तू अजून राहिल्या
असत्या तर मला काही वाटले नसते ,
पण, या श्रीकांतकडे एक क्षण ही माझ्या वस्तू असणे मला सहनच होणार नाही .
तुम्ही आणि तो श्रीकांत .आणि तुमची मैत्री गेली खड्यात.
मी अशी जाते , आणि दुसर्याला कायम मूर्ख ठरवून मजा करणाऱ्या लबाड माणसाला मी चांगलाच
धडा शिकवून येणार म्हणजे येणार .
तुम्ही बसा घरातच ..विचार करीत ..
याला काय वाटेल..? त्याला काय वाटेल ?
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कथा -संकोच
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------