Andhaarchhaya - 15 - last part books and stories free download online pdf in Marathi

अंधारछाया - 15 - अंतिम भाग

अंधार छाया

पंधरा

शशी

लाकडं जमवायला पोर येत होती. सकाळपासून मी माझी बॅट, स्टंपा आत टाकल्या कोठीच्या खोलीत. बागेतल्या कॉटच्या फळ्या घरात टाकल्या आणि फाटकाशी होतो लक्ष ठेऊन. कुणी पोरं येत नाहीत ना पहायला!

मन आत होते. मावशीपाशी. गेल्या अमावास्येपासून पंधरा दिवसात बोलत नव्हते कुणी फार. दादा रामायणाचे वाचन करीत, ऑफिसमधून आले की. आई मावशीकडून जपाच्या माळा करून घेई. कुणीच कुणाशी गप्पा मारत नव्हते. ना हसून खेळून होते. त्यात आज पौर्णिमा. दादा आईला सांगत होते, ‘आज पुन्हा जपले पाहिजे तिला म्हणून.’

परवा माझ्याच्याने राहाववले गेले नाही. मावशीची गोष्ट मी मित्रांना सांगायला लागलो, स्टेशनवरून फिरून येताना. सुभ्या म्हणाला, ‘भिती वाटतेय, पण फार मस्त सांगतोयस रे तू! लिहून काढ कधीतरी.’

पुरणपोळीचे जेवण झाले. मी सुभ्याकडे पाच तीन दोन खेळायला बसलो. संध्याकाळी रिंग खेळायला आमच्या घरापाशी जमलो. आईने घरात बोलावून सांगितले, ‘आज बाहेर खेळा. आपल्या घराच्या अंगणात नको.’ मग आम्ही सगळे बाहेर गेलो खेळायला मिलच्या चाळीकडे.

संध्याकाळ झाली तसा परतलो मी. लता निमा भिडेकडे गेली होती खेळायला. ती ही परतली. दादांना सुटी होती होळीची. दिवेलागणीला आम्ही सगळे घरी परतलो. हात पाय धुवून मी भक्तिमार्ग प्रदीप काढून स्तोत्र आरत्या म्हणायला लागलो. भीमरूपी, रामरक्षा पाठ होती माझी. लतासाठी पुस्तक काढून म्हणायला बसलो. मावशी होती मधल्या खोलीत. मधल्या दारापाशी एका भिंताला टेकून बसली होती. ओट्यात माळ घेऊन करत होती जप पुटपुटत. रामरक्षा झाली. आम्ही मावशीपाशी बसलो जाऊन.

पाटीवर एकशे तीन आकडा होता. आता पंधरा वीस मिनिटांत मावशीच्या एकशे आठ माळा होणार होत्या. साधारण तीन मिनिटे लागत एक माळ व्हायला. साडे पाच–सहा तास लागत असत, बसले सलग रोजचे तर.

साधारण आठचा सुमार असेल, जेवण करून घेतली. बसलो होतो मावशीच्या शेजारी. चांगली हसत बोलत होती, जेवलो तेंव्हा. आता बसली भिंताशी टेकून, अन एकदम चेहरा बदलला.

डोळे एकटक पाहतोय असे झाले. हात पाय ताठरले होते. बसल्या बसल्या मी दादांना म्हणालो, ‘बेबी मावशीला कसतरी होतय. बघा कशी करतेय!

पटापट सगळे हात धुवून आले. मावशी थोडीशी घुमायला लागल्यासारखी करत होती. बोलत मात्र नव्हती. आम्ही गप्प बसून होतो. दादा म्हणाले, ‘म्हणारे ॐ नमः शिवाय मोठ्याने.’ आम्ही म्हणायला लागतो. चांगला तासभर गेला असेल.

साधारण नऊ असतील झालेले. बाहेर होळ्या पेटवून पोरं मोठमोठ्यांनी बोंबलत होती. अर्वाच्य शिव्या देत होती. मी घरातूनच पहात होतो सगळं. चंद्रही बराच वर आला होता. हळूहळू चंद्राला ग्रहण लागायला लागलेले पाहिले. मग मावशीजवळ येऊन बसलो मी.

आई दादांचा जप चालू होता. मावशीला मधेच गुंगी आली असावी. कारण ती शांत वाटली. थोड्या वेळाने हाताचे आळोखे पिळोखे चालू झाले. एकदम उठून उभी राहिली. आम्हीही उठून उभे राहिलो सगळे.

मावशी ओरडून म्हणाली, ‘थांबा कोणी बोंबलू नका. काय दंगा चालवलाय!’

आम्ही गप्प. आमच्यात चुळबुळ झाली. भस्माचा टिळा आईने लावायचा प्रयत्न केला हात झटकून टाकलान. दादांनी टिळा लावायचा प्रयत्न केला तर त्यांचाही हात धरला आणि झटकून टाकलान. मग आम्ही तांब्यातून पाणी आणले भस्म घालून. त्याचा सपकार तिच्या तोंडावर मारला. ढम्म नाही तिला! डोळे तसेच सताड उघडे! इतक्या जोरात पाणी पडले चेहऱ्यावर तरी पापण्या मुळीच लवल्या नाहीत! दोन चार वेळा मंतरलेले पाणी मारले तरी त्याचे तिला काही नव्हते. एखाद्या खांबासारखी उभी होती ती. आमचा जप सारखा चालला होता.

दादा

जसजशी रात्र आणखी व्हायला लागली तशी बेबी अधिकाधिक रागीट झाली. एक बरे होते, ती व्हायलंट होऊन मारामारी करत नव्हती. तिला बोलते करण्यासाठी जपाचा, भस्माच्या टिळ्यांचा भडिमार चालू होता. शेवटी जेरीला येऊन ती ट्रान्समधून बोलायला लागेल.

उभीच्या उभी ही! तासभर झाला. शेवटी मी अणि मंगलाने तिचे पाय मुडपून बसती करायची प्रयत्न केली पण व्यर्थ गेला.

चंद्रग्रहणाची उच्च सीमा साडेअकराच्या सुमाराला होती. तो पर्यंत तिला जास्तीत जास्त त्रास होण्याची शक्यता गुरूजींनी बोलून दाखवली होती. साधारण अकरा वाजले असावेत. बेबीचा चेहरा खूप निवळल्यासारखा झाला.

बेबी

म्या लई दम धरला पन ह्यास्नी हरवायला यीना. त्यो गुर्जी पडला भारी. माझी आस पुरी व्हयील असं दिसना. म्हनतानं बाप मेल्याचं सांगावं म्हनून पैल्यांदाच बोलले दादासंगट. पन बेबी बोलती तसच बोललो म्या. त्यांना संशय नको म्हनताना. बाप मेला म्हनताना निघालीती पोचवायला पन दादानं आडावलं भनीला.

माझ्या पायाला लई कळा मारत्यात. समदी म्हनत्यात, ‘दे सोडून तिला. ती आता सटकली तुझ्या हातून. काय पायजे ते मागून घे होळीला, गssप सोड तिला आमी बी कंटाळलो हितं...’

मी बी इचार करतो कशापाय़ी ऱ्हाव हित ह्यास्नी सांगून टाकावं समदं. ऐकलं आपलं तर बर हाय. आपली बी आस भागलं. तोंडावर मारत्यात सपकारे त्यांनी माझं तोबाड सुजलय!

मंगला

साडे अकरा झाले. इकडे ही लागली हलायला डोलायला. आधी होती पुतळ्यासारखी. मग एकदम लागली हातपाय हलवायला.

आम्ही पाण्याचे सपकारे मारले तोंडावर तशी ओरडली, ‘मारताय काय मला पाण्याच्या सपकाऱ्याने? ‘मारणारच तू सोडून जातोस की नाही? जो पर्यंत जात नाहीस तोपर्यंत अशीच पाण्याने मारणार तुला.’ मी म्हणाले.

‘दादा कुठं हाय मला बोलयचय त्याच्याशी’

मी ह्यांना बोलावले. बेबी त्यांना म्हणाली, ‘मला हित ऱ्हावून देत न्हाई तर मग मला जाऊ दे.’

हे म्हणाले, ‘वा वा! फार छान! आत्ताच चालू लाग.’

‘माझ्या काही अटी हायत. त्या पुऱ्या झाल्या तरच मी जाय़ीन. न्हाई तर कधीच न्हाई!’

‘अटी? अटी बिटी काही नाही. मुकाट्याने जायचे बघ. तेही आत्ताच्या आत्ता!’ हे म्हणाले.

‘न्हाई न्हाई अटी पुऱ्या केल्या बिगर माला जाताच येनार न्हाई.’ मी ह्यांना म्हणाले, ‘आधी अटीतर ऐकून घेऊ या मग पाहू काय करायचं ते.’

‘तू गप्प बस. मला बोलू दे.’ दादा म्हणाले, ‘काहीतरी मागून बसली तर आपल्याला ते शक्य होणार नाही. तेंव्हा अटी काही ऐकायची गरज नाही.’

बेबी एकदम मधे म्हणाली, ‘न्हाई न्हाई... अटी पुऱ्या करा तुमी. त्या शिवाय मला जाता याच न्हाई!’ ‘अटीबिटी गेल्या उडत. त्यांना आम्ही भीक घालत नाही. पण तू हे सांग, तू कोण? तुझा संबंध काय हिच्याशी? हिला का पछाडलयस? ते तू बोल.’

बेबी विकृत हसली. म्हणाली, ‘संमद सांगतो. पन मी मागीन ते देनर काय? ते सांगा.’

आजी बसल्या होत्या म्हणाल्या, ‘जनार्दना, हो तर म्हण बरे. करायचे का नाही नंतर ठरव.’

बेबी

‘आता सांगावच समदं. आप ली आस तरी पुरी करत्याल.’

‘माजं नाव झुबैदा. मी हाय पुन्याची. तिकडं शिकलगाराची वस्ती हाय तिथं ऱ्हायाचो मी लहानपनी मां गेली. अब्बा संगट मीबी चिमटे झारे बनवायचो. फुडं माजा निका मुबारक झाला. त्यो होत जर्द्याच्या फ्याक्टरीत. काही बरसानां तलाक दिलानं. दुसरी शादी केलीनं. मी फुडं बिडी कारखान्यात विडया वळायला ग्येली. पुना विडी कारखान्यातली नोकरी सोडली. मग एकाच्या कांडप मिशनमधी लागतो. लई कुट्टाकरून तिखाटं बनिवलं. माझी भांडाभांड झाली दाल्यासंगट. त्यो म्हनायचा, ‘तुला पोर व्हईनात.’ म्हनतान एका मांत्रिकाला बोलिवलान, अन माझ्यातलं भूत काढाया लागला. ‘पकडा! पकडा! तिच्या वरल्या सावलीला जाळून टाका’ म्हनायला लागला. म्या फुडं बेशुध झालो. फुडं मला रोग झाला. आजारी पडत पडत एक दिवशी मेलो! आमच्यात मेल्यावर दफन करत्यात. दफना आधी आंगुळ घालत्यात, साबनान शिककाईनं. खायाला कोंबडी कापत्यात. भात खायाला देत्यात. मला काय बी केलं न्हाय. मला रोगानं मारली तशी माजी लई तळतळ झाली. मला मरताना कोनी बी दुवा न्हाई दिला. तवाच म्या ठरिवलं मरताना सगळं ऱ्हायलं ते करून घ्यायाचं म्हनून!’

दादा

बेबीचे बोलणे ऐकले. वाईट वाटले. ‘मग आतास जायला तयार आहेस का?’

म्हणाली, ‘आता जायाला पायजे. पन तुमी माजी आस पुरी करनार न्हवं? तर मी जातो.’

मी मंगलाकडे पाहिले. ती मानेने हो म्हणाली. ‘मी म्हणालो, ठीक आहे. आम्हाला जमेल तितके करू आम्ही. बोल काय अट आहे तुझी?’

‘माला आता आंघूळ घाला. साबनान, शिककाईनं न्हायाला द्या. सव्वाशेराचा भात करा. त्येचात धई, दूद घालून कालवून द्या. अन बेबीच्या हातून हिरीपाशी घेऊन आत टाकायला सांगा.’

मी ऐकून थक्क झालो. आता हिला रात्री बारा आणि एकला न्हायला कोण देणार? बरं भात एक शक्य आहे, पण बेबीला विहिरीकडे जाऊ देणे शक्य नव्हते. तिच्या बोलण्याचा काय विश्वास?

मंगला म्हणाली, ‘आता कोण पेटवणार बंब आणि घालणार अंघोळ? मी नाही बाई करणार हं हे!’

‘का छळतायसा मला! इतकं बी करायचं न्हाई तर मी कशी सोडू हिला?’ बेबी म्हणाली.

‘सव्वाशेराचा भात किती होईल महिती आहे तुला? तो खाता तरी येणार आहे का? तेवढा सगळा विहिरीत टाकायला मी हे मुळीच करणार नाही!’ मंगला म्हणाली.

पुढे बराच वेळ मंगलाचा व बेबीचा वाद झाला. कोपऱ्यातून आजी म्हणाल्या, ‘मंगला कशाला तू वाद घालतेस? असे बघ. ती जाते म्हणतेय ना, घालू तिला न्हायला. यात काय अवघड आहे? भात म्हणावं सव्वा वाटीचा घालते? तेवढ्यावर भागतय का ते विचार.’

‘मला सगळं गैर वाटत होते. बरे हे सगळे करून ती गेली तर ठीक! मनात आलं आत्ताच विचारावं हिला आणखी’

‘तू कशी आणि कुठं पकडलीस हिला? ती बोलेना. आम्ही मंतरलेले पाणी तिच्या तोंडावर मारले. ॐ नमः शिवायचा जप पुन्हा जोरात करायला सुरवात केली. वाटले गेला हिचा ट्रान्स. शशी, लता, मंगला व मी चौघे मारत होते पुन्हा पुन्हा पाण्याचे सपकारे तोंडावर. पण पापणीही लवत नह्ती. निर्विकार दगडी झाले होते तिचे शरीर.

बऱ्याच वेळाने हालचाल झाली. म्हणाली, ‘देतायसा न्हवं खायाला, अंघुळीला?’

मी म्हणालो, ‘हो घालू, पण भात सव्वा वाटीचा घालू! आणि मुख्य म्हणजे ते विहीरीशी जाऊन मी टाकेन. बेबीला नेवू देणार नाही!’

पुन्हा वादावादी झाली. तडजोड म्हणून मंगला म्हणाली, ‘बरं, ह्यांच्या बरोबर बेबीला नेऊ विहिरीशी. पण भात विहीत टाकणार ते हेच!’

कशीबशी हो म्हणाली. मंगला बंब पेटवायला गेली. आजींनी भात करायला तांदूळ वैरले. मी बेबीला म्हणालो, ‘तू कोण ते कळलं, पण बेबीला का पकडलेस? किती दिवस झाले हिला पकडून?

‘किती दीस झाले ते न्हाई आता आटवत. पर हां एक डाव संध्याकाळच्याला चिंचा वेचाया आलीती तवा पासून हेरली मी तिला. पाडली एक डाव ठेचकाळून. चढलो हिच्यात. पर काय बी तरास दिला न्हाई. ती काय खाईल पीईल ते खायाची. तिच्या शाळेच्या पुस्तकाचा मला तरास वाटं!’

‘आता हिला सोडून तू काय करणार?’ मी विचारले. म्हणाली, ‘आता मी काय ऱ्हात न्हाई!’

‘ती काजळाची डबी पाकिटातून गायब झाली ती कुठं गेली?’ मी विचारले.

‘त्यो मास्तरडा हाय त्येनं हीरीत फेकली म्हनाला.’

जास्त विचारण्यात काही अर्थ नव्हता. मी जरा तंबाखूचा बार भरायला उठलो. बाहेर होळीच्या लाकडांची राख धुगधुगी धरून होती. चंद्र ग्रहणचा काल संपला होता. मंद मंद वारा आला. तसे अंगावर रोमांच उभे राहिले. ग्रहण काळानंतर गेली ही तर किती बरं चार महिन्याचा वनवास संपेल एकदचा.

आजी

मंगलाने कडकडीत पाणी तापवलेन. तोवर मी भात तयार केला. ताटात घालून दही-दूध ओतून सरबरीतसा काला केला. वाईट वाटले सगळे हे वाया चालले याचे. शिककाईची पूड पाण्यात भिजत घातली.

बेबीला उठवून मोरीत नेली. मी वरून शिकेकाईचे पाणी घातले. मंगलाने डोक्याला खसाखसा चोळलेन. भडाभडा तांबे घातलेन अंगावरून, डोक्यावरून. तिला तशी मध्यम शुद्ध होती. अंघोळ घालतायत इतपत कळतेय असे वाटले.

पंचाने केस बांधले. टॉवेल घेऊन साडी सोडलीन. कोठीच्या खोलीत आणून साडी नेसायला दिली. मंगलाने भाताचे ताट घेऊन जनार्दनला हाक मारली. मी मनानेच हिरव्या चुड्याच्या बांगड्यातल्या दोन बांगड्या ताटात ठेवल्या. वाटले सवाष्णीला नाही का ठेवत आपल्यात. जाऊ दे, एवढे केलेय आता तिची पिडा संपू दे. म्हणजे सुटली. जनार्दनने तो ताटातला भात बेबीला दाखवला. विहिरीकडे निघाला. मंगलाने बेबीचा हात धरून नेलेन विहिरीकडे. विहीरीतल्या पाण्याचा आवाज ऐकला. जनार्दन, मंगला, बेबी परतल्या घरात. मी मीठमोहऱ्या तयारच ठेवल्या होत्या. ओवाळून टाकल्या सर्वांवरून. म्हणाले, ‘सर्व अरिष्ट जाऊ देत गं बेबी!’ सगळ्यांनी बसून अकरा माळा केल्या. रात्रीचे दोन वाजून गेले असावेत!

बेबीला जवळ घेऊन मंगला झोपली.

डॉ. फडणीस

‘खाडीलकरबाई, हा हिचाच केसशीट आहे ना? कारण गेल्या दोन आठवड्यात तिचे वजन पाच पौंडानी वाढलेय!’ मिस सरोजचा गालगुच्चा घेतला. म्हणालो, ‘आता तुझे गाल सफरचंदासारखे दिसताहेत. काय औषध खाल्लेस?’ मीच डॉक्टर असून मला प्रश्न पडला होता! मिसेस ओक आल्या होत्या बरोबर. त्यांनी सांगितले तिला काही बाधा झाली होती म्हणे! होळीच्या पौर्णिमेनंतर दोन आठवड्यात तिची शारीरिक वाढ इतक्या झपाट्याने झालेली होती की मला सुद्धा केसशीटवरच्या नोंदीत काही चूक असावी असे वाटले क्षणभर!

बेबी

डॉ फडणीसांकडून आले. अक्का दादांना सांगत होती, डॉक्टर काय म्हणाले ते. अन माझा मलाच आनंद झाला. मी सुटले होते सुखरूप. गेल्या आठपंधरा दिवसात किती हुरूप किती उत्साह आला होता. सगळं जगच बदललं होतं माझं.

गुरूजींना भेटायला गेलो तर ते एकदम म्हणाले, ‘अभिनंदन सुटलीस याबद्दल!’ गुरूजी जेवायला घरी आले, तेंव्हा मी किती आग्रहानं घातले एक एक पदार्थ! दादांनी माझ्या हातानी धोतरजोडी दिली त्यांना. ‘रोजच्या रोज माळा करायच्या न चुकता.’ गुरूजींनी आशीर्वाद देताना म्हटले.

घरी जावे आई, काकांना, सुभा, श्रीकांता, सुमन सगळ्यांना भेटावं असं वाटू लागलं अक्काला म्हणाले, तर ती म्हणाली, ‘पुढच्या आठवड्यात जाऊ. मी पण बरोबर येते. पोचती करते काका काकूच्या हवाली. सगळी हकीकत सांगते सविस्तर.’

होळीनंतर ती बाई लांब रेल्वेच्या फाटकापाशी आहे असे वाटे. काही दिवसांनी पार लांब गेली बुधगावच्या वाटेला. असे करत करत ती आठवेनशी झाली, पंधरा वीस दिवसात!

मंगला

बेबीनं देवाला नमस्कार केलानं, आजींना केलानं, ह्यांना केला तशी ह्यांनी आशीर्वाद दिला, डोक्यावरून हात ठेऊन. जवळ ओढली, पाठीवर शाबासकी देत म्हणाले, ‘आता सांभाळून रहा.’ माझ्याजवळ आली तशी ओढली छातीशी. दोघींच्या डोळ्यातून धारा लागल्या होत्या आसवांच्या. म्हणाली, ‘अक्का माझ्यामुळं किती त्रास झाला तुम्हाला! घरातली शांतता नष्ट झाली. शशी लताचे अभ्यास बुडाले!’ मी म्हणाले, ‘बाई, तू बरी झालीस यात सर्व आलं! आता छान अभ्यास कर. पास हो की मग उडवून देऊ बार तुझा!’

पुण्यात टांग्याने घरापाशी उतरलो. तो इंदूताईंनी दारातून पाहिलं आम्हाला. ‘अग्गो बाईsss कोण हीsss बेबी काsss?’ म्हणाल्या. काका काकूंनी पाहिलं आम्ही आलोय ते आणि ते थक्क झाले, बेबीची ही टम्म फुगलेली छबी बघून!

‘शांते, ही आमची बेबी वाटतं? काका म्हणाले चेष्टेने अन मला खूप आनंद झाला. चहा झाला. बसले सगळे अवती भवती. सावकाश हकीकत सांगता सांगता किती वेळ गेला कळलंही नाही.

.....

समाप्त

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED