आजारांचं फॅशन - 4 Prashant Kedare द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आजारांचं फॅशन - 4

दोन दोन म्हणता म्हणता सहा सात पेग झाले पण मन अजून काय भरेना, चार वाजेला सुरु केलेला कार्यक्रम आठ वाजले तरी संपेना.

“ये झालो हँग आता, मी चाललो घरी” अनिल ने शेवटचा घोट घेत आपला विचार किंबहुना निर्णय जाहीर केला.

“अरे थांब आम्ही पण येतोय, आम्ही काय इथं राहायला आलोय का”

घोरणे पप्या अनिलच्या खांद्यावर हात टाकत बोलला.

“ये हे घे माझे पाचशे, तुम्ही इथं राहा, झोपा नाही तर खड्ड्यात जा मी चाललो”

एवढं बोलून अनिल उठला आणि दात कोरत बाहेर येऊन रिक्षा थांबवली आणि सरळ घराकडे निघून गेला.

पुढील दहा बारा मिनिटात रिक्षा अनिलच्या घराजवळ येऊन थांबली, अनिलने रिक्षाचे पैसे दिले आणि सरळ घरात शिरला, अनिलचे डोळे आणि चेहरा लाल झाला होता, केस विस्कटलेले आणि तोंडातून दारूचा गंध घरभर दरवळत होता. मुलं पप्पा आले पप्पा आले करत अनिल कडे धावून आले, सविताने अनिलकडे पहिले आणि निवडत बसलेली मेथीची भाजी बाजूला झटकत ओरडली,

“आले ना आजपण ढोसून, मयताला गेले होते का पार्टीला, आज कुठल्या खुशीत पिले, असतील ते भिकार्डे मित्र कुत्रं पाजायला, फुकटचं प्यायचं अन गावभर हिंडायचं, दुसरं काम काय हे मेल्यानला, पार माझ्या संसाराची राख रांगोळी करून टाकलीय”

अनिल सगळं शांत पणे ऐकुन घेत होता.

“बोलाना नुसताच काय हुम हुम करताय, तोंड काय व्हायब्रेटर वर टाकलंय का? दुपार पासून जेवायला वाट बघतेय पण माणसाचा पत्ता नाही, फोन पण बंद करून ठेवलाय”

“अग बाई बॅटरी संपलीय त्याची”

अनिलने पहिल्यांदा तोंड उघडले,

“हा पितानाच बर बंद होतं ते डबडं, मला शिकवता का, आज ओळ्खते का मी तुम्हाला, म्हणे फोन बंद झाला”

सविताच बडबडन काही सेंकंदांसाठी थांबलं, आणि अनिलने संधीचा फायदा उचलून लढकडत्या जिभेने आपली सफाई देण्याचा प्रयत्न सुरु केला.

“सॉरी ग पण जरा घाबरल्या सारखं झालंत आणि डोकं पण पकडलं होत म्हणून शार्दूल बोलला थोडी थोडी घेऊ, म्हणून थोडीशीच पिलो, तुझी शप्पत एकच ग्लास पिलोय मी”

“माझी शप्पत घेऊन मारा मला आता तेच राहिलंय बाकी, शार्दूल बोलला आणि तुम्ही पिले, तुम्ही काय कुकुलं बाळ हे का, तुम्हाला तुमचं कळत नई का, आपल्याला घर दार आहे दोन सोन्यासारखे लेकरं आहेत, तर त्यांचं काही नई, फक्त ढोसायचं कळत”

सविता अजूनच भडकली.

“अग जे झालं ते जाऊंदे उद्या पासून दारूला हात पण नई लावणार, चल जेवायला वाढ, सकाळ पासून काही खाल्लं नाही”

अनिल सविताला समजावण्याचा प्रत्येक शक्य तो प्रयत्न करत होता पण सविता अजूनच रागात ओरडली.

“अशे लई उद्या बघितलेत मी, मित्रांनी दिल नई का खायला, नुसती दारूचं वतली का घश्यात, गिळायच तर स्वतःच्या हातानी घ्या वाढून, हात दिलेत ना देवानी”

अनिलला कळून चुकलं की आत्ता सविता बरोबर बोलणं म्हणजे फुफाट्याला काडी लावण्यासारखं आहे, तो गुपचूप किचन मध्ये गेला, स्वतःच्या हाताने ताट वाढून घेतले, पटापट जेवला आणि सरळ बेड वर जाऊन आडवा झाला.

सविताने देखील मुलांना खाऊ घातले, आपले काम आटोपले आणि टी व्ही बंद करून झोपी गेली.

दारूच्या नशेत अनिलला देखील कधी झोप लागली हे त्याचे त्याला देखील कळाले नाही, नशेत असला कि अनिलला कसलीही भीती वाटत नसे अथवा झोप न येण्याचा त्रास हि कधी जाणवत नसे

दारूची धुंदी तात्पुरती का होईना पण त्याच डोकं शांत करत असे, पण ते सगळं काही ठराविक वेळे साठी असायचं, काही कालावधीने परिस्थिती आणि अनिल परत पहिल्या सारखे होण्याचे आणि पुन्हा एकदा तेच दररोज सारखं मृत्यूला आणि आजारांना घाबरनं सुरु.