माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 25 - अंतिम भाग Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 25 - अंतिम भाग

२५

धक्कादायक धक्का!

लग्नानंतर एखादा महिना झाला असेल नसेल.. आम्ही हनिमूनवरून परतलेलो.

वै आणि माझी नव्याची नवलाई होतीच. माझे मूलभूत चिंतन मला आजही सांगते.. हनिमूनला फार दूर किंवा महागड्या ठिकाणाची नसते गरज.. नव्या नवऱ्या नि नवरीच्या नवलाईची नशाच पुरेशी असताना अगदी छोटेशी जागाही पुरेशी असते.. पण अर्थात आम्ही दूर मॉरिशसला जाऊन आल्यावर हे मी सांगतोय! असो..

तर आम्ही परतलो होतो.. वै मराठी अगदी आवडीने शिकत होती. आईच्या माहेराशी कनेक्शनमुळे की कोणास ठाऊक पण तिच्या भाषेबद्दल आईने उदार धोरण ठेवले होते. वै च्या मोडक्या मराठीला आई आपल्या तोडक्या इंग्रजीत उत्तर देई. सगळे कसे मजेशीर होते. रोज वै आता आपल्यासोबत आहे याचा निराळाच आनंद होता. मध्येमध्ये सिनेमात फ्लॅशबॅक दाखवतात तशा रागिणीच्या लग्नात आम्ही भेटलो तेव्हापासूनच्या गोष्टी डोळ्यापुढे तरळून जात. आणि या प्रकाराची अजूनच गंमत वाटे. कोण म्हणतो योगायोग होत नाहीत? पण काही योगायोग घडवून आणले जातात हे मला योगायोगानेच कळले!

त्याचे झाले असे की त्यामुळे मी तीन ताड उडालो.. झाले काय की..

एके दिवशी सकाळसकाळी मला जाग आली. सहा वाजले असावेत. रोज मी साताच्या आत उठत नसे. पण आज रविवार.. त्यामुळे झोपून रहावेसे वाटेना. त्यात वै सकाळी उठून जॉगिंगला निघून गेलेली. मी स्टडीरूममध्ये आलो तर तिकडचा लाईट चालू होता. टेबलावर एक पत्र पडलेले. आईच्या अक्षरात. तारीख कालची. रमाकाकूला आईने लिहिलेले पत्र होते ते.. त्यातला मजकूर वाचला की कळेल तुम्हाला काय झाले ते.. आई बहुतेक झोप अनावर झाल्याने ते तसेच सोडून गेली असावी. असे होते ते पत्र..

प्रिय रमास,

आज आता सारे स्थिरस्थावर झाल्यावर तुला हे पत्र लिहित आहे. मी किती आनंदात आहे म्हणून सांगू. आणि त्याचे मोठे श्रेय तुला आहे.

वैदेही अत्यंत चांगली आणि सुशील मुलगी आहे. आजच्या जमान्यात अशा मुली बनवणे देवाने बंद केले की काय अशी परिस्थिती आहे. आमोदला अशी मुलगी मिळेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. एक तर तो कितीही चांगला असला तरी एक नंबरचा बावळट. अर्थात तुला ही ते ठाऊकच आहे. त्यात त्याला म्हणे अरेंज्ड मॅरेजवर विश्वास नाही.. तोच म्हणाला होता एकदा. मुली बघणार नाही म्हणून. आणि लव्ह मॅरेज.. याच्यावर सोडले तर हा कुण्या मुलीला आपली मन की बात सांगेतोवर तिचे लग्न उरकून तिला दोन पोरेही झालेली असतील.. एखादी मुलगी काय तोंड उघडे ठेवले की जांभूळ टपकावे तशी आभाळातून पडणार होती याच्या आयुष्यात? त्यामुळे बुरकुल्यांना नि वैदेहीला जराही कल्पना न देता लग्नाला बोलवण्याची आपली कल्पना भन्नाट आणि आता यशस्वीही.

लग्न जमवण्याचा हा कदाचित असा पहिला रिॲलिटी शो असेल! तुला सांगते पण माझी शेवट पर्यंत मोदकाबद्दल खात्री नव्हती. तो कधीकधी वैदेहीबद्दल उगाच असे बोलायचा की मला वाटायचे सारे मुसळ केरात. पण शेवटी हिंमत करून बेट्याने जमवलेच. रागिणीच्या लग्नाचा हा चांगलाय बाय प्रॉडक्ट.. हो की नाही? महत्त्वाचे म्हणजे इतक्या दुरून आल्यावर वैदेहीस तो पसंत पडला. तसा आहे तो चांगला पण किंचित वेंधळा नि बावळा आहे. वैदेही सांभाळेलच त्याला.

पण हे इथेच नाही संपत.. आता पुढे वाच.. मोदक वैदेहीच्या लग्नात माझ्या मंगूच्या मुलीचे.. म्हणजे अनुयाचे तुझ्या लंडनहून आलेल्या मैत्रिणीच्या मुलाशी जुळते आहे! म्हणजे आपले 'एका लग्नात दुसरे लग्न जुळवा' मॉडेल यशस्वी होत आहे तर! आनंद आहे. सध्या त्यांचे ठरल्याची बातमी आहे. अजून डिटेल्स कळले की कळवीन. बाय.

तू फक्त काकूच नाहीस.. माझी मैत्रीण आहेस याचा किती आनंद आहे सांगू. मोदक आणि वैदेहीला आनंदात बघून आम्ही दोघेही आनंदात आहोत.

आणि हो..

कृत्तिकाला खास थॅंक्स सांग हां. तिने किती मदत केली या प्रकरणात. तिचा पत्ता नाही माझ्याकडे. पण तिला जरूर कळव.

बाकी भेटू तेव्हा बोलूच.. बाय. झोप येतेय तेव्हा थांबते..

तुझी

प्रमिला

सांगा.. तुम्ही ही उडालात ना. म्हणजे हा सगळा घाट आई नि काकू यांनी मिळून घातला? एकूण पत्रावरून वैदेहीस हे सारे ठाऊक नसावे. पण कृत्तिका? म्हणजे ती मुद्दाम मला वैदेहीबद्दलचे इनपुट्स देत होती!

मला विचार करून हसू आले.

प्रेमात पाडून अरेंज्ड मॅरेजची ही पहिलीच घटना असावी आणि शेवटची नक्कीच नसावी आणि आई आणि काकू त्या मॉडेलबद्दल बोलताहेत.. त्यामुळे यापुढेही त्यांचे हे रियालिटी शोज सुरू राहणार असावेत!

वैदेही तितक्यात परत आली. मी ते पत्र मी पाहिले नसावे असे आईला वाटावे आणि त्याच वेळी वै ला पण दिसू नये असे ठेवून दिले. सकाळी आई उठली आणि प्रथम त्या टेबलाजवळ गेली.. ड्रॉवर मधील पत्र हातात घेऊन आपल्या खोलीत निघून गेली. मी शांतपणे आईची धांदल बघत होतो. उगाच एक कीडा म्हणून आईला म्हणालो, ”आई काही शोधतेस का? नाही काल रात्री उशीरापर्यंत लिहित बसलेलीस ना म्हणून विचारतोय..”

*****

उपसंहार

अर्थात

शहाणपणाचे दोन शब्द!

माझ्या मेडिकलच्या अभ्यासात नोट्स काढायची सवय लागली मला. एखाद्या गोष्टीतले डिटेल्स टाळून मुख्य मुद्दे कोणते ते पहायचे आणि त्याची नोंद करून ठेवायची. आता आमच्या लग्नाला झाली सात वर्षे. वैदेही चांगलीच रूळलीय आणि आनंदातही आहे. म्हणजे काकू आणि आईने प्लॅन करून बनवलेली ही अरेंज्ड लव्हमॅरेजची स्टोरी तशी हिट आहे.

पण सुरूवातीला म्हणालो तसे.. हे सांगायचा मुख्य मुद्दा.. नव्या पिढीस मार्गदर्शन! तेव्हा यातून काय किंवा काय काय बोध घ्यावा हे मी सांगितलेच पाहिजे नाही का? तर ते सांगतोच.. नोट्स काढायची सवय अशी उपयोगी पडते (हा मुद्दा एक बाय प्रॉडक्ट म्हणून!)

१.

आई किंवा आणखी कुणी आपल्यासाठी काही स्थळे पाहात असतील तर त्यांना साफ नकार द्या. मुलगी बघून अरेंज्ड मॅरेज ही आऊटडेटेड कल्पना आहे. कल्पना करा वैदेहीआधीच्या आईने आणलेल्या कोणाला मी पाहिले असते तर?

२.

तुमची आई तुम्हाला कुठल्या लग्नात येण्याचा आग्रह करत असेल तर आढेवेढे घ्या पण थोडेसेच. नंतर कष्टाने जाण्यास तयार व्हा! आणि तयार व्हाच!

३.

लग्न समारंभ हे आपले लग्न जमवण्याचे निमित्त ठरू शकते..याची जाणीव ठेवून फक्त डोळे उघडे ठेवून रहावे म्हणजे झाले.. अर्थात याबाबतीत तुम्ही सूज्ञ असालच!

४.

घरीदारी किंवा स्वप्नातही लुंगी नेसून बसू नका. सदा स्मार्ट रहा. वेळ जशी सांगून येत नसते तशी तुमची स्वप्नसुंदरीही सांगून येत नसते..

५.

आरशापुढे का होईना मुलींशी बोलण्याची प्रॅक्टिस करा. एरव्ही तुम्ही ताडताड चालाल आणि फाडफाड बोलाल पण ऐन मोक्यावर ही वाचा तुम्हाला दगा देऊ शकते! त्यामुळे बोलाल तर वाचाल.. हा माझा खास संदेश समजण्यास हरकत नाही.

६.

आणि सगळ्यात महत्त्वाचे.. आपल्या आवडतीच्या मैत्रिणीशी ही दोस्ती करा. आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीतही सर्व मार्ग उघडे ठेवतात.. तसे सारे दरवाजे बंद करून घेऊ नका.. यालाच प्रपोजल डिप्लोमसी म्हणावयास हरकत नाही.. कारण डायरेक्ट प्रपोज करण्याआधी तिच्या मनातील गोष्ट आधी समजू शकते.

तर अशी ही माझ्या अरेंज्ड मॅरेजची लव्हस्टोरी. यातून तरूण.. म्हणजे होतकरू तरूण आणि यंदा कर्तव्य असलेल्यांनी योग्य तो बोध घेतला तर हा प्रपंच यशस्वी झाला.. म्हणजे तुम्ही आपला प्रपंच मांडला तर तुम्ही यशस्वी आणि त्यामुळे हा लेखनप्रपंच ही यशस्वी!

शेवटी काय.. 'दे लिव्हड हॅपीली एव्हर आफ्टर' असा आपल्याही स्टोरीचा परिकथेसारखा शेवट होणे महत्त्वाचे आणि काय!