अंतःपुर - 2 Suraj Gatade द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अंतःपुर - 2

२. अकस्मात आघात (एक्सिडेंटल बफे्)...

सकाळी साडे आठ वाजता शक्तीची बाईक सेंट्रल जेलला लागली. सेंट्रल जेल कळंबापासून पाचशे मीटर व्यासाचा परिसर लॉकडाऊन करून टाकला होता. कोणी आत व बाहेर येऊ जाऊ शकत नव्हतं! जवळ असलेल्या बिल्डिंग्स्, दुकाने पूर्णपणे बंद करण्याचे आदेश आधीच देऊन ठेवले होते, जी दुपारपर्यंत काही खुली होणारी नव्हती... तेथे आलेल्या एसआयटी व जेल अधिकाऱ्यांशिवाय व जेलमधील कैद्यांशिवाय तिथं चिटपाखरू देखील नव्हतं. जेलला लागून हायवे असूनही सगळं चिडीचूप शांत होतं...
बाहेर कोल्हापूर पोलीस अधीक्षक सुशेन मित्र, आयबी डिरेक्टर शौर्यजीत वाबळे, पब्लिक प्रोसेक्युटर जयंत राऊत व वाचस्पती यांच्या कुटूंबाने व 'जनमानस पक्ष' या त्यांच्या पक्षाने संमतीने, एकमताने निवडलेले मुंबई हायकोर्ट ऍटर्नी चारुदत्त ढवळे व रिटायर्ड् सुप्रीम कोर्ट जज मिलिंद फडतरे आदी मोजकी मंडळी जमली होती.
चौकशी नंतर स्टेटमेंटमध्ये, पुराव्यांमध्ये काही फेरफार होऊ नये म्हणून 'जनमानस'चा वकील देखील टीम सोबत ठेवण्याचा 'जनमानस'चा आग्रह सत्ता पक्षाने मान्य केला होता. यामुळे जनतेचा रोष काही प्रमाणात उतरेल व आपली पारदर्शिता दिसून येईल, निर्दोषत्व सिद्ध होईल व किमान आपला मतदार तरी आपल्या जवळच राहील असा सत्ता पक्षाचा समज व विचार. म्हणून विरोधी पक्षाने अविश्वास दाखवून देखील व त्यांनी गंभीर आरोप केलेले असून देखील त्यांची ही जबरदस्ती चालू दिली होती... असे असले तरी ढवळे सत्ता पक्षाच्या विरोधात थोडीच जाणार होता... काही झाले तरी सत्तेचा दबाव हा कितीही कर्तव्यदक्षतेने वागले तरी असतोच...!
महाराष्ट्र एटीएस चीफ सुरेंद्र सुब्रमण्यम देखील या टीमचा एक भाग होते... आणि 'रॉ'ची एक विशेष तुकडी देखील या प्रकरणाच्या शोधासाठी गठीत केली गेली होती, जी स्वतंत्र ऑपरेट होणार होती. दृश्य रूपाने त्यांना यात भाग घेता येत नसल्याने वरील समिती जो काही अहवाल तयार करीत त्याची सत्यता तपासण्यासाठी रॉच्या या टीमकडे रिपोर्ट पाठवण्यात येणार होता. तसेच या प्रकरणाच्या काही इंटरनॅशनल लिंक्स असतील तर त्या तपासण्याची जबाबदारी देखील रॉच्या या टीमवर होती! हा सगळा वृत्तांत कालच्या भेटीत शौर्यजीतकडून शक्तीसेनला देण्यात आला होता.
शक्ती आला तसा शौर्यजीतने सगळ्यांची ओळख शक्तीशी करून दिली. एसपी नवीन असल्याने तो देखील शक्तीला ओळखत नव्हता. नाही तर कोल्हापूर पोलीस मध्येच 'अँटी टेररिसम सेल' व 'डिस्ट्रिक्ट स्पेशल ब्रँच' या दोन्ही डिपार्टमेंटची कामं शक्ती एकटा पहायचा. इतका तो हुशार व कार्यकुशल होता. त्याच्या याच गुणांमुळे तर आयबी चीफ असून शौर्यजीतला त्याची मदत घेण्याची लालसा झाली होती...
त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी कोल्हापूर अँटी टेररिसम सेलचे काही ऑफिसर्स व एटीएसचे काही ऑफिसर्स तेथे गार्ड्स म्हणून सशस्त्र तैनात होतेच. शक्ती आल्यावर त्याला ओळखणाऱ्या अँटी टेररिसम सेलमधील ऑफिसर्सनी तो आता फोर्स मध्ये नाही हे लक्षात न घेता अनायासेच एक्साईमेन्टमध्ये सल्युट ठोकले होते.
शक्तीला पाहून नाही म्हणायला एसपी थोडा उखडलाच होता. 'माझ्या शहरात हा कोण ज्याला इतका मान मिळतोय' हा भाव त्याच्या मनाला चाटून गेला असेल बहुदा... पण त्याने रोष चेहऱ्यावर येऊ दिला नाही!
प्रवेशद्वारातून आत जाताच शौर्यजीत, सुशेन, सुरेंद्र व शक्ती सर्वांनी आपापल्या गन्स जमा केल्या. चौकशी दरम्यान कोणतेही शस्त्र वापरता येत नाही. कारण 'आर्टिकल 20' नुसार गुन्हेगाराला त्याचा गुन्हा कबूल करण्यास बाध्य केले जावू शकत नाही... त्यामुळे सर्वांना हत्यारे तात्पुरती त्यागावी लागली होती. सोबत असलेल्या गार्ड्सना तेवढे त्यांच्या गन्स सोबतच ठेवू दिल्या होत्या. कारण ते व्यक्तीशः इंटेरोगेशनमधे इन्वॉल्व्ह होणार नव्हते. इंटेरोगेशन रूमला सुरक्षा देणं एवढंच त्यांचं काम होतं. आणि त्यासाठी त्यांच्याकडे वेपन्स असणंच आवश्यकच होतं. तरी सेंट्रल जेलमध्ये कोणी मारेकरी येण्याची शक्यता नाहीच्या बरोबरच होती, तरी काळजी घेतली जात होती...
सर्व प्रोसिजर पूर्ण झाल्यावर सर्वांचा मोर्चा हा या कैद्यासाठी तयार केलेल्या खास इंटेरोगेशन रूमकडे वळला. त्याचा रस्ता त्यांना जेलरनेच दाखवला होता.
एसआयटीला इंटेरोगेशन रूमपर्यंत पोहोचवून जेलर माघारी परतला. त्याला या कामाशी काही स्वैर-सुतक नव्हतं. आणि शिवाय तो तिथे नसावा हे त्याने शौर्यजीतच्या नजरेत वाचलं होतं. त्याने शौर्यजीतशी शेकहँड केलं आणि तो आपल्या केबिनकडे संचारला... गार्ड्सनी इंटेरोगेशन रूमच्या भोवती आपली पोजिशन घेतली...
आणि ही एसआयटी इंरेरोगेशन रूममध्ये प्रवेशली. पण समोरचं चित्र पाहून सगळे स्तब्ध झाले. शक्तीवर मात्र काही परिणाम झाला नव्हता. तो मेंटली, इमोशनली या प्रकरणाशी जोडला गेलेला नव्हता. ना त्याच्यावर कसलं प्रेशर होतं हे काम करण्याचं...
समोरचा कैदी अर्धशुद्ध अवस्थेत होता. त्याच्या तोंडून रक्त गळत होतं. त्या कैद्याचा पांढरा शर्ट त्याच्या रक्ताने लालेलाल झाला होता... जणू हाच त्या शर्टचा वास्तविक रंग असावा... शौर्यजीत स्वतःला सावरून तडख पुढे झाला. आणि त्याने त्या कैद्याची मान उंचावून त्याचं तोंड उघडून पाहिलं. कैद्यांने आपली जीभ चावून चावून त्याचे तुकडे केले होते... साहजिक होते त्याला काही बोलायचे नव्हते... पण म्हणून त्याने इतके अत्याचार स्वतःवर करावेत? हो, पण का नाही?! जर जीभ गमावून प्राण वाचणार असतील तर जीभेची आहुती देण्याचे त्याने स्वीकारले होते. आता काही करून त्याला कोणी सत्य सांगण्यासाठी जबरदस्ती करू शकणार नव्हतं!
एव्हाना एटीएस चीफ पण समोर झाला होता...
"आत्ताच कारभार केलाय." एटीएस चीफने त्याला वाटणारी परिस्थिती विदित केली.
"शक्ती! जेलरला हाक मार!" शौर्यजीत अधिकार वाणीने उच्चारला! त्याचा संताप अवर्णनीय होता.
शक्ती बाहेर पळाला. त्याने लगोलग जेलरचं केबिन गाठलं.
"आयबी डिरेक्टरनी आपल्याला बोलवलं आहे." शक्ती जेलर समर वणकुंद्रेला म्हणाला.
हे ऐकताच जेलरला शहारे आले.
"का काय झालं?" जेलरने चिंतेनं विचारलं.
"तुमचा कैदी जखमी आहे!"
"काय?" जेलरला काही कळायचंच बंद झालं...
"हे कसं झालं?" भांबावलेल्या जेलरने शक्तीलाच प्रश्न केला.
"आता ते तुम्ही सांगायचंय!" शक्ती शांतपणे त्याला बोलला,
"चला!" तो जेलरला म्हणाला.
तसा जेलर घाईने इंटेरोगेशन रूमकडे पळाला. शक्ती मागून येतोय की नाही पाहण्याची सूद देखील त्याला नव्हती. आणि तशी तसदी देखील त्याने घेतली नव्हती. हे सगळं त्याच्यावरच तर शेकणार होतं...

गडबडीने आत येणाऱ्या जेलरचा हात दारावर जोरात आपटला आणि तो आल्याची ग्वाही देणारा आवाज झाला. सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. सर्वांच्या चेहऱ्यावर अवीट राग होता. ज्याच्यासाठी एवढी धडपड करत कोणी मुंबई, तर कोणी दिल्ली वरून आलं होतं आणि इथं येऊन पाहतात तर काय? तर हे...!
"या जेलर साहेब या! खूप छान ध्यान ठेवता तुम्ही तुमच्या कैद्यांची!" उखडलेला शौर्यजीत ठसक्याने म्हणाला.
"माफ करा साहेब... हा असं काही करेल याची आम्हाला कल्पना नव्हती..." जेलर माफीच्या सुरात म्हणाला.
"तुम्हाला माहीत होतं ना, की हा किती महत्वाचा दुवा होता!" शौर्यने कठोरतापूर्वक विचारलं.
"सॉरी सर!" जेलर खाली मान घालून म्हणाला.
"काय सॉरी? आता काय आपण याला विचारणार आणि काय हा सांगणार...?" वैतागाने शौर्यजीत पुटपुटला.
"असो याला नेण्याची तयारी करा!" त्याने जेलरला सूचना केली. आणि अचानक त्याला काही स्ट्राईक झालं!
"एक मिनिट!"
जायला निघालेला जेलर त्याच्याकडे वळला.
"येस सर?" जेलरने विचारलं.
"आम्ही येण्याआधी किंवा याला अटक केल्यापासून याला कोणी भेटायला आलेलं?"
"नो सर!"
"मीच काल याला भेटून गेलो होतो." एसपी सुशेन मित्र मधेच बोलला.
"मग तुम्ही कोणी नाही का म्हणालात?" शौर्यजीतने जेलरवर आवाज चढवला.
"एसपी सरांवर संशय कसा घेणार? पण ते सोडून कोणीच आले नाही म्हणून नाही म्हणालो...!" जेलर चाचरत बोलला.
"तुम्ही इथे का आला होतात?" त्याच्याकडे दुर्लक्ष करत शौर्यजीतने एसपीला प्रश्न विचारला.
"इथली व्यवस्था लावण्यासाठी. मग म्हंटलं आलोच आहे तर याला पण पहावा... म्हणून..." कचरत एसपी बोलला.
"तुम्ही याच्याशी काही बोललात?" शौर्यने एसपीचचं इंटेरोगेशन चालू केलं.
"नाही. फक्त याला बघितलं आणि निघालो." एसपीने स्वतःला शंकेतून मुक्त केलं.
"तुमच्या येण्यानेच तो सतर्क झाला असेल... याला इथं हलवलं म्हंटल्यावर त्याच्या लक्षात आलं असेल, की याची चौकशी होणार. म्हणून याने हा प्रताप केला..." शौर्यजीत नाराजीने स्वतःशीच बोलल्यागत बोलला.
"सॉरी सर..." एसपी खजील होत म्हणाला.
"नो नीड! तुमच्या येण्यामुळे काही झाले नाही. इंटेरोगेशन रूम बघून त्याने हे केलंय त्याला काही बोलायला लागू नये म्हणून. तुम्ही याला भेटला नसतात, तरी इंटेरोगेशन होणार म्हंटल्यावर याने हेच केलं असतं.
"आता एक करा!" शौर्यजीत जेलरकडे वळाला,
"ही गोष्ट बाहेर कळता काम नये! नाही तर आम्हीच सत्य बाहेर पडू नये म्हणून हे केलंय असं अपोजिशन, मीडिया आणि जनता देखील म्हणायला कमी करायची नाही..." शौर्यजीतने जेलरच्या माध्यमातून सर्वांनाच ताकीद दिली.
हे शक्तीच्या पटकन लक्षात आले कारण सूचना देत असताना शौर्यजीतने अपोजिशनच्या वकीलावर करडी नजर टाकली होती! वकीलही काय ते समजला होता...


जणू काही झालेच नाही असा त्या कैद्याला तयार करायचा होता. त्याच्या अंगावरील रक्ताळलेले कपडे काढून टाकायचे होते. त्याच्या तोंडातून वाहणारे रक्त बंद करायचे होते. त्याच्यावर उपचार व त्याची अंघोळ... उपचारासाठी डॉक्टर देखील पाचारून आणले होते.
यात बराच वेळ जाणार होता. इकडे सगळेच काळजीत. सर्वांत जास्त शौर्यजीत! कारण त्याला या एसआयटीचा प्रमुख म्हणून पाठवण्यात आलं होतं! आणि याला आधी मुंबई व तेथून दिल्लीला एस्कॉर्ट करण्याची जबाबदारी देखील शौर्यजीतवरच होती.
तो शक्तीसोबत बाजूला उभा सिगरेटचे झुरके घेत होता. काय करावे सुचत नसल्याने डोके खाजवत होता...
"तुझ्याकडे काही प्लॅन?" त्याने सिगरेट धरलेल्या हातानेच डोके खाजवत शक्तीला विचारलं.
"सध्यातरी नाही!" शक्ती चेहरा थंड ठेऊन म्हणाला. त्याला कशाचाच काही फरक पडला नव्हता.
बाकीच्यांची दुसऱ्या एका बाजूला कुजबुज चालू होती... कैद्याच्या अशा अवस्थेत त्याच्याकडून आता कसलीच माहिती मिळू शकणार नव्हती... आत्ता तर त्याला कोणीच बळजबरी करू शकणार नव्हतं...
"बॅक टू स्केअर वन..." निराशेने शौर्यजीत म्हणाला आणि राहिलेलं थोटूक त्याने जमिनीवर आदळलं.
शक्तीने शांतपणे ते थोटूक उचलून कचरापेटी शोधून त्यात टाकलं. शौर्यजीतची अवस्था तो समजून होता म्हणून त्याने 'स्वच्छतेचं ग्यान' देणं टाळलं. आणि तोही जाणून होता, की शौर्यजीतने मुद्दाम असं केलं नसतं. शक्तीची कृती पाहून शौर्यजीतला देखील आपली चूक लक्षात आली.
"सॉरी!" जवळ आलेल्या शक्तीला तो म्हणाला.
"इट्स ओके!" शक्ती त्याला सांत्वना देत बोलला.
इतक्यात जेलर पळत आला. सर्वांनी कान टवकारले.
"सर प्रोटेक्टिव्ह विहेकल तयार आहे." जेलर शौर्यजीतला म्हणाला.
"गुड!" आणि शौर्यजीतने एग्झिटचा रस्ता पकडला.

एग्झिट जवळ सर्वांची हत्यारे जाची त्याला परत केली गेली. सर्व ठीक आहे का बघून ती आपापल्या जवळ ठेवत असतानाच शौर्यजीत इथून पुढचा एक्शन प्लॅन समजावून सांगत होता...
"एस्कॉर्ट विहेकलमधून मी, एटीएस चीफ, दोन गार्ड्स, आणि हे शक्तीसेन जातील. बाकी सर्व मागून गाडींतून येतील. नो नीड टू वरी. त्या कार्स देखील हेविली प्रोटेक्टेड् आहेत."
ही ताकीद मुख्यत्वे रिटायर्ड् जज, विरोधी पक्षाचे वकील यांना होती.
"आपल्याला हवे असल्यास आपण आपापल्या हॉटेल्स वर जाऊन नंतर देखील येऊ शकता. सध्यातरी करण्यासारखे काही नाही. असे केल्यास आपण अधिक सुरक्षित रहाल. चॉईस इज युअर्स!"
"ठीक आहे. आम्ही आधी हॉटेल्सला जातो. तुमच्यावरील भार देखील कमी होईल!" रिटायर्ड् जजनी सर्वांच्या वतीने निर्णय घेतला.
कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही यावरून हे सर्वांनाच मान्य असल्याचं शौर्यजीतनेही गृहीत धरलं. आणि मग शौर्यजीत सोबत जे जाणार होते ते सोडून सर्व आपापल्या ठिकाणी रवाना झाले...
मग शौर्यजीतने त्याचा मोर्चा गार्ड्सकडे म्हणजे एटीएस ऑफिसर्सकडे वळवला,
"आपण प्रोटेक्टिव्ह विहेकलला सर्व बाजूनी घेरून चलावं!"
"येस सर!" ऑफिसर्सचा म्होरक्या म्हणाला.
"मला वाटतं एवढा लवाजमा नेण्याऐवजी फक्त तू, मी आणि तो असॅसिन एवढेच कार मधून जावू! अशाने कुणाला संशय देखील येणार नाही!" शक्ती सुचवत म्हणाला,
"आफ्टर ऑल डिसीजन इज युअर्स!" त्याने निर्णय शौर्यजीतवर सोडला...
"आय थिंक यु आर राईट!"
त्या कैद्याला बाहेर आणला गेला. तो आता असा दिसत होता, की जणू त्याला काहीच झाले नव्हते. तरी तो शुद्ध हरपलेल्या अवस्थेत होताच... आपला सगळा भार त्याने त्याला धरलेल्या गार्ड्सच्या अंगांवर टाकला होता... आणि यामुळे चालण्यास त्याच्यासह त्याला आधार देणाऱ्या दोघांनाही कष्ट पडत होते...
त्याला चारी बाजूनी गार्ड करून एग्झिट पॉईंट मधून बाहेर काढण्यात आले.
हा मुख्य प्रवेशद्वारच; जो कोल्हापूर - गारगोटी रोडला लागूनच आहे.
बाहेर हेवी विहेकल, काही गाड्या उभ्या होत्या. रिटायर्ड् जज व दोन्ही वकील कधीच निघून गेले होते.

"टार्गेट इज अप्रोचिंग!"
"थिस इज द टाईम. ही वेळ चुकवली तर पुन्हा चान्स मिळणार नाही!" सेंट्रल जेल समोरच्या एका बिल्डिंगवर घात लावून बसलेल्या असॅसिनच्या सुचनेनंतर त्याच्या कानात असलेल्या वायरलेसमध्ये वरील सूचना देणारा आवाज घुमला.
तो त्याच्या यूएस मेड 'बॅरेट एम 107' स्नाईपर रायफलच्या स्कोप (बॅरेट ऑप्टिकल रेंजिंग सिस्टम) मधून वाचस्पतीच्या खुन्यावर नजर लावून होता.
"हो. पण टार्गेट क्लिअर नाही!" तो म्हणाला.
"असू दे. टेक दि शॉट्स!" वायरलेसमधून पुन्हा आवाज घुमला.
आणि त्या स्नाईपरच्या गोळ्या धडाडू लागल्या...
इकडे झाडाची पाने गळून पडावीत तशी कैद्याचे टार्गेट क्लिअर होईपर्यंत त्याच्या भोवतीचे गार्ड्स व त्या कैद्याच्या आजूबाजूचे गोळ्या लागून जमीन पाहू लागले...
प्रोटेक्टिव्ह विहेकलच्या छताच्या कागदासारख्या चिंध्या करत गार्ड्सना जिथे गोळी लागेल तिथले त्यांचे शरीराचे भाग शरीरापासून वेगळे होऊन पडू लागले...
सुरक्षित राहिलेले सर्व सावध झाले. त्यांच्या गन्स कधीच हाती आल्या होत्या... शक्ती शौर्यसह सगळे गोळ्या येत असलेल्या दिशेचा वेध घेऊ लागले. पण कोणालाच अंदाज येत नव्हता. अचानक शक्तीजवळ असलेल्या शौर्यजीतला तो कैद्याच्या दिशेने सरकल्याने प्रोटेक्टिव्ह विहेकलच्या आरपार येत रायफलची '.50 बीएमजी' गोळी हिट झाली आणि तो खाली कोसळला. त्याच्या हाताच्या चिंधड्या उडाल्या होत्या. रक्ताचे व मांसाचे तुकडे शक्तीलाही भिजवून गेले. त्याला सांभाळण्यासाठी शक्ती त्याच्याजवळ खाली बसला. यामुळे तो अनायासे असॅसिनच्या रेंजपासून दूर झाला...
शौर्यजीतचा उजवा हातच गोळी लागून तुटून पडला होता. त्याला प्राणाचे कोणतेच संकट नव्हते. पण होणाऱ्या वेदना प्राणांतिक कष्ट देऊन जात होत्या...
"खालीच रहा!" शक्तीने शौर्यजीतला ताकीद दिली.
आणि त्याचं वाक्य पूर्ण होतं ना होतं तोच वाचस्पतीचा खुनी डोक्यात गोळी लागून बॉलिंग गेमचा बॉल लागून पिन पडावी तसा मागे डोक्यावर आदळला. पण तत्पूर्वी कलिंगडाच्या चिंध्या व्हाव्या तसं त्याचं डोकं फुटून त्याचं विस्कळीत मगज रक्ताच्या शिंतोड्यासह सर्व बाजूंना उडाला व त्याला संरक्षण देण्यासाठी पुढे आलेल्या गार्ड्सना रजस्नान घालून गेला...
मके विकटावेत तसे त्याचे दात दाही दिशांनी उडाले होते...
पडताना आधारासाठी त्याला हातांचा उपयोग देखील करता आला नव्हता. त्याचे हातात हतकडी जी होती...

तो जागीच ठार झाला होता. स्कोपमधून याची खात्री करून मग मारेकरी त्याची रायफल तेथेच सोडून बिल्डिंग उतरू लागला... त्याच्या हाती लेदर गल्व्ह्ज् असल्याने त्यावर ठसे राहण्याची त्याला भीती नव्हती. शिवाय ओझे सोबत घेऊन पळण्यासाठी तो मुर्खही नव्हता...
जे वाचले होते त्यांनी गाड्यांमागे कव्हर घेतले होते. पण त्या ह्युमंगस गोळी समोर त्या कव्हरचाही काही उपयोग नव्हता. त्या गाड्यांचाही यकश्चित कागदाप्रमाणे छेद घेण्यास ती राक्षसी गोळी सक्षम होती, पण काम झाले होते. म्हणून गोळ्यांचा वर्षाव देखील थांबला होता. आता त्या मारेकऱ्याचं लक्ष एकच होतं; तेथून सुखरूप पसार होणं...
"जखमी झालेत त्यांना हॉस्पिटलला घेऊन जा!" सुखरूप वाचलेल्यांना शक्तीने इन्स्ट्रक्शन दिली आणि तो पुढे झाला.
त्याचा हात पकडून शौर्यने त्याला ते भलते धाडस करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पण शक्तीने त्याचा हात बाजूला झटकला आणि तो पुढे झाला. त्याला माहित होतं, कैदी मेलाय याचा अर्थ मारेकऱ्याचं काम झालं आहे. तो आता गोळीबारी करणार नाही. त्याचं पहिलं चित्त आता येथून निसटण्याचं असेल आणि हेच शक्तीला होऊ द्यायचं नव्हतं. हायवेच्या कडेला जाऊन त्याने सगळीकडे निरीक्षण केलं.
समोरच्याच एका बिल्डिंगमधून एक व्यक्ती घाईने बाहेर पडलेली त्याला दिसली. हा कैद्याला मारायला आलेला मारेकरीच होता. त्याने संशय येऊ नये म्हणून स्वतःचा कायापालट केला होता. गल्व्ह्ज् कधीच खिशात कोंबले होते. लेदर ब्लेझर उलटे करून घातले होते. जितके सोफेस्टिकेटेड् दिसता येईल तितके दिसावे असा त्याने प्रयत्न केला होता. पण त्याच्या या चतुराईचा काही उपयोग झाला नाही. त्याची घाई त्याची कुकृत्याची ग्वाही देऊन जात होती आणि हे शक्तीने बरोबर हेरले होते. शिवाय पूर्णतः नाकेबंदी केलेल्या या आवारात एक व्यक्ती एका बिल्डिंग मधून पळत येणं हा दुसरा कोणता संकेत असणार होता...?!
असॅसिनने जशी त्याची टूव्हीलर गाठली तशी ती लक्षात घेऊन शक्ती त्याच्या बाईककडे पळाला.
"काळजी घे आलोच!" शक्ती ओरडून शौर्यला म्हणाला.
"मूर्खपणा करू नको थांब!" शौर्य मागून ओरडत होता.
पण हे ऐकू न ऐकल्यासारखे करत आपल्या बाईकवर राईड होऊन शक्ती कोल्हापूर मुख्य शहराकडेकडे रवाना झाला...

शक्तीची 'सुझुकी हायाबुसा' बाईक रस्त्यावर गोळीच्या वेगाने धावत होती... आणि त्याची नजर गरुडासारखी त्या मारेकऱ्याचा वेध घेत होती...
हायवेच्या खालच्या रस्त्याला त्या असॅसिनची 'कावासाकी निंजा एच 2' धावताना त्याला दिसली. त्याच्या बाईकच्या स्पीडला देखील थांग नव्हता. असणार तरी कसा? आपण सापडलो तर काय होईल याची पुरेपूर कल्पना त्याला होती... आज जसे त्याने एकाला उडवले, तसा उद्या दुसरा कोणीतरी येऊन त्याला उडवून जाईल हे तो जाणून होता... आणि म्हणूनच काही केल्या त्याला पोलिसांच्या हाती लागायचं नव्हतं!
हायवेवर धावणाऱ्या शक्तीच्या गाडीचा वेग अजूनच वाढला. त्याची नजर आता त्या मारेकऱ्यावर स्थिर झाली होती. आता काही केल्या तो त्याला आपल्या नजरेच्या टप्प्यातून निसटू देणार नव्हता!
मारेकरी ज्या रस्त्यावरून गाडी हाकतो आहे तो समोर जाऊन याच हायवेला मिळतोय हे शक्तीला ज्ञात होतं. त्याला पकडण्याची ही नामी संधी होती जी शक्तीला गमवायची नव्हती... त्याने स्पीड आणखी वाढवला... पण तरी खालून जाणारी गाडी अजूनही पुढेच होती...
शक्तीने अजून वेग वाढवला. त्याला पकडता आले नाही तरी त्याला धकड देऊन पाडावे हा त्याचा विचार होता...
शेवटी जिथे दोन रस्ते एकत्र येतात तिथे शक्तीची बाईक पोहोचली. त्या मारेकऱ्याची बाईक देखील जवळच पोहोचली होती. पण शक्तीची त्याला धडक बसणार इतक्यात लगोरीतून खडा सुटावा तसा तो मारेकरी बाईक घेऊन निसटला. शक्तीची हिट वाया गेली होती. त्याने आपली बाईक बाजूच्या उतारावरून खाली जाण्यापासून वाचवली व मूठ वाढवून तो पुन्हा त्या असॅसिनच्या मागे गेला...
शक्तीची मग सहनशीलता संपली आणि त्याने शौर्यजीतने देऊ केलेली '500 एस अँड डब्लू मॅग्नम स्नब नोस' (स्मिथ अँड विल्सन) रिव्हॉल्व्हर बाहेर काढकी. याची एक '50' कॅलिबर गोळी असॅसिनच्या डोक्याच्या चिंधड्या करायला पर्याप्त होती... ६०० - ७०० किलोचं अजस्त्र अस्वल देखील ठार करण्याची याच्यात क्षमता होती, मग साधारण माणसाची काय कथा? या कार्टेजची पावर तो मारेकरीही जाणून होता. म्हणून तर तो शक्तीच्या गोळी पासून स्वतः वाचवण्याचा पुरजोर प्रयत्नात होता!
त्याने वापरलेल्या 'एम 107' रायफलची 50 बीएमजी व 'शक्तीची ही '500 एस अँड डब्लू मॅग्नम'ची या '50 कॅलिबर'च्या बुलेट्स दिसायला व वजनाला सारख्या नव्हत्या, तरी दोन्हीची डिस्ट्रक्शन पावर खूपच होती.
म्हणून तर त्याने वाचस्पतीच्या असॅसिनला मारायला 50 बीएमजी बुलेट वापरली होती!
शक्ती असॅसिनचा वेध घेण्याच्या प्रयत्नात होता... पण वाहनांची रहदारी असल्याने त्याला ते जमत नव्हतं. आणि त्याला दुसऱ्या कोणाला इजा देखील करायची नव्हती... चीड येऊन शक्तीने त्याची मॅग्नम पुन्हा होलस्टरमध्ये सारली. एव्हाना तो असॅसिन खूप दूर निघून गेला होता... आणि म्हणून पर्यायाने शक्तीला त्याचा वेग अजून वाढवावा लागला... स्पीडोमीटरचे काटे बाहेर पडतील की काय असे वाटत होते इतक्या वेगाने त्याची बाईक पळत होती... आणि हीच अवस्था असॅसिनच्या गाडीची सुद्धा होती...

असॅसिनची दुचाकी शिये व कसबा बावडा या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाला लागली... १७ किमीचं हे अंतर मुख्य शहरातून रहदारीतून येत असल्याने सुमारे ३५ - ४० मिनिटांचं... पण असॅसिनने ते अगदीच कमी वेळात पार केलं होतं... त्यामुळे शक्तीलाही त्याच वेगाने हे अंतर चिरावं लागलं होतं!
असॅसिनच्या बाईकचा वेग कमी होत ती थांबली. आत्तापर्यंत तो शक्तीला चकवण्यात यशस्वी झाला होता, म्हणजे असं त्याला वाटलं होतं... त्यानं जेव्हा मागे वळून पाहिलं, तर शक्ती मागे होताच! असॅसिनने मग गाडी खाली पंचगंगेकडे घेतली. गाडीचा वेग कमी करत तो गाडीवरून उडी मारूनच उतरला. ती महागडी कावासाकी मातीत आपटली व धुळूचे लोट उडवत काही पुढं जाऊन आडवी स्थिरावली.
असॅसिन त्याच्यासाठीच तयारीत असलेल्या मोटरबोटीत चढला. मोटरबोट असॅसिनला पाहिल्यावरच बोटमनने चालू करून ठेवली होती. आणि ती मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पश्चिमेला मार्गक्रमित झाली...
शक्ती पुलावर पोहोचला. त्याला बोट जाताना दिसत होती. तो गाडीवरून उतरून कठड्यापाशी आला. तो हताशपणे पाहत होता. दुसरं तो काय करू शकत होता?... पण नाही! एक उपाय होता...!
असॅसिनची बोट एका बोटीला क्रॉस करून गेली. शक्तीने मॅग्नम काढून हवेत फायर केलं. तो आवाज इतका मोठा होता, की त्या मोटरबोटीतील मासे पकडणाऱ्या नाविकाने आवाजाच्या दिशेने पाहिलं. शक्ती हातात पैसे उंचावून उभा होता. आणि तो त्या नाविकाला जवळ येण्यास खूण करत होता. नाविकाची नाव शक्तीच्या दिशेने वळली. पण ती पुलाखाली येइपर्यंत शक्तीला धैर्य नव्हते. त्याने रिव्हॉल्व्हर होलस्टर मध्ये लॉक करून पुलावरून थेट पाण्यात सूर मारला व पाण्याच्या सरफेसला येऊन तो त्या बोटीच्या दिशेने पोहू लागला. बोट त्याच्या दिशेने येत होती. शक्ती व बोट काही १५ - २० फुटांवर आल्यावर शक्तीने बोटीला वळवण्याचा इशारा केला तशी नाविकाने बोट वळवली.
शक्ती बोटीत चढला. पैसे नाविकाच्या खिशात कोंबत,
"मघासच्या बोटीच्या मागून चला!" शक्ती तातडीने म्हणाला.
ओले असले तरी ते 'पैसे' होते! आणि लक्ष्मीचे दास तर सगळेच! मग का नाही नाविक शक्तीचे ऐकणार?
आता शक्तीची बोट असॅसिनच्या बोटीचा पाठलाग करत होती... पण इतक्यात ती बोट बरीच पुढे निघून गेली होती. म्हणून शक्तीने नाविकाला बोटीचा वेग वाढवण्यास सांगितला... बोट फुलस्पीडला धावू लागली...

एका पॉईंटला असॅसिनची बोट दृष्टीगोचर झाली! असॅसिन मागेच डोळा लावून होता. त्याला शक्ती एका बोटीतून येत असलेला दिसला. त्याने त्याच्या बोटमनच्या खांद्यावर शक्तीवर नजर रोखतच टॅप केलं. बोटमन काय ते समजला. आपलं बोट चालवण्यावरचं ध्यान न हलवता त्याने त्याच्या ब्लेझरमध्ये लपवलेली पिस्टल काढून असॅसिनला हँडओव्हर केली. असॅसिनने शक्तीच्या बोटीवर फायर केलं. शक्तीची बोट याच्या पिस्टलच्या रेंजच्या बाहेर असल्याने गोळ्या शक्तीच्या बोटीपर्यंत पोहोचत नव्हत्या. पण घाबरलेल्या शक्तीच्या नाविकाने त्याचा देह पंचगंगेत झोकून दिला होता. लोक लक्ष्मीपेक्षाही विष्णूचे (जीवनाचे) दास अधिक असतात... आणि याचाच प्रत्यय या नाविकाने दिला होता.
आता मात्र शक्तीला मोटरबोट स्वतः चालवण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याने बोटीचे स्टेअरिंग हातात घेतले. आता मात्र शक्ती त्या असॅसिनला अजिबातच सोडणार नव्हता. शक्तीने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर व पिस्टल दोन्ही बाहेर खेचल्या. त्याने आधी असॅसिनच्या बोटमनला रिव्हॉल्व्हरची 50 कॅलिबरची गोळी घालून ठार केलं. त्याचवेळी असॅसिनने चालवलेली गोळी देखील त्याने वाकून डॉज केली होती.
असॅसिनच्या नाविकाचे छिन्न विच्छिन्न झालेले शरीर अर्धे स्टेअरिंगवर पडले होते, तर अर्धे पाण्याच्या पृष्ठभागावर घासत होते. त्यामुळे पाणी फवाऱ्यासारखे असॅसिनला भिजवत होते...
शक्तीने मोटरबोट स्पीडने पुढं घेत 'केल-एल 30' पिस्टलच्या दोन गोळ्या दागल्या. एक असॅसिनच्या उजव्या मांडीवर व दुसरी पिस्टल असलेल्या उजव्या हातावर!
असॅसिनच्या हातून त्याची पिस्टल गळून पडणार होती, पण सैल झालेली ग्रीप त्याने पुन्हा घट्ट करून पिस्टल हातच ठेवली. याला आताच असा मारून शक्तीला मिळणारी संभावित माहिती गमवायची नव्हती. म्हणून शक्तीने त्याला फक्त जखमी करण्याची रहमत त्याच्यावर दाखवली होती.
बोटमन मरून पण असॅसिनची मोटरबोट पाणी कापतच होती. म्हणून मग तिला थांबवण्यासाठी शक्तीने मोटरबोटच्या मोटरीवरच 50 कॅलिबर दागली. इंजिन एक्सप्लोड् झालं. आगीचे व काळ्या धुराचे लोट उठले. मोटरबोट काही अंतर कापून थांबली. शक्तीची मोटरबोट मागून येतच होती. असॅसिनच्या बोटीला मागून लावत त्याने त्याच्या बोटीचं इंजिन बंद केलं व असॅसिनच्या बोटीवर उडी घेतली. शक्तीने त्या असॅसिनच्या कॉलरला मागून धरून त्याला उठवलं.
त्याचा चेहरा नीट पाहिला आणि स्वतः आणलेल्या बोटीवर गुडघ्यांवर पाडला. चिवट असॅसिनच्या हाती अजूनही त्याची पिस्टल होती. आता मात्र ती असॅसिनच्या हातून सुटून डेकवर पडली. तसा असॅसिन देखील डेकवर उपडा पडला.
शक्तीने रिव्हॉल्व्हर होलस्टरमध्ये बंद करून त्याच्या मोटरबोटचं इंजिन चालू केलं व त्याची बोट पुढे धावू लागली. मग शक्ती पुन्हा असॅसिन समोर येऊन उभा राहिला.
शक्तीच्या पिस्टलमधून आणखी एक गोळी बाहेर पडली, ती असॅसिनच्या डाव्या पायात!
"आरटीओ ऑफिस, शक्तीसेन बोलतोय. माझी सुझुकी आणि एका क्रिमिनलची कावासाकी बावडा पुलावर आहे तेवढी प्लिज ताब्यात घ्या. नंतर कलेक्ट करतो." शक्ती अगदी सहज म्हणजे कॅरमची सोगटी उडवावी तशी गोळी उडवत फोनमध्ये बोलला होता.
मग शक्तीने असॅसिन डेकवर चाचपून उचलू पाहत असलेली त्याची पिस्टल उचलून स्वतःजवळ ठेवून घेतली.
शरीरातील रक्त वाहत जात असल्याने आता असॅसिनने शक्तीला मारण्याचा विचार त्यागला आणि तोच शांतपणे स्वतःच्या गरम रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला; निरभ्र आकाशाकडे बघत... पण काहीवेळाने त्याचे डोळे अंधारमय होऊ लागले... सूर्य देखील काळा भासू लागला... खूप रक्त गेल्याने तो मूर्च्छित होत चालला होता... उष्ण रक्त शरीरातून निघून आणि त्यात तो स्वतः निजला असून त्याला आता थंड भासू लागलं होतं... पण ही शीतलता थंड पडत चाललेल्या त्याच्या शरीराची होती... की... की पंचगंगेच्या उडणाऱ्या शीतल शिंतोड्यांची...
आणि ही बोट पश्चिमकडून शहराच्या दिशेने प्रवास करू लागली...