अंतःपुर - 5 Suraj Gatade द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अंतःपुर - 5


५. द्वि राक्षस समोरासमोर ( डेव्हिल मिट्स डेव्हिल)...

त्या रात्री शक्ती पुन्हा त्याच नाईटक्लबमध्ये त्याच जागी बसला होता. जशी काही ही जागा आज त्याच्यासाठीच रिक्त ठेवण्यात आली होती. आजही त्याने मिटिंग आहे सांगून ऑर्डर देण्यास टाळाटाळ केली होती! आजही डॅनियल काल सारखाच, पण शक्तीच्या आधी येऊन शक्तीसाठी राखून ठेवलेला सोफ्याच्या डाव्या बाजूला मागे एका कोपऱ्यात त्याच्या अत्यंत सूंदर अशा गर्लफ्रेंड सोबत बसला होता. पण आज ती मुली वेगळी होती.
जशी वेटरने त्या व्यक्ती म्हणजे डॅनियलला ऑर्डर सर्व्ह केली, तसा डॅनियल आपल्या जाग्यावरून उठला. दोन ग्लास उचलून तो शक्तीच्या दिशेने आला. एक ग्लास शक्तीच्या समोर टेबलवर ठेवला व त्याच्या दिशेने सारला.
"आय डोन्ट ड्रिंक!" शक्ती त्याच्याकडे बघत म्हणाला.
"चांगलं करता! मे आय?" डॅनियल म्हणाला.
"ऑफकोर्स! वि आर इन अ फ्री कंट्री!" शक्ती बोलला.
शक्तीने आपले पाय खाली घेतले व तो सावरून बसला.
"डु यु रिअली बिलिव्ह इन दॅट?" डॅनियलने हसून विचारलं.
"डेफिनेट्ली!" शक्ती त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाला.
"हाय! आय एम डॅनियल. डॅनियल गार्सिया!" डॅनियलने आपली ओळख दिली.
"आएम सोमेश राजमाने!" शक्ती मान हलवून म्हणाला.
ड्रिंक पित डॅनियल शक्तीच्या डाव्या हाताला असलेल्या एका हाफ सोफा चेअरवर बसला!
"मी विचारू शकतो? का?" आपल्याच हातातला ग्लास शक्तीकडे उंचावून त्याच ग्लासकडे नजर टाकत डॅनियलने न पिण्याच्या कारणाची शक्तीला पृच्छा केली.
"कारण कामं मार्गी लावायला मला शुद्धीत राहणं आवश्यक आहे!" शक्ती डॅनियलकडे कटाक्ष टाकत म्हणाला.
"पित नाही तर इथं काय करताय?" डॅनियलने मागे सरकून बसत डावा पाय उजव्या पायावर अधांतरी घेत विचारलं.
"एक मिटिंग आहे!" शक्ती म्हणाला.
"कुणासोबत?"
"माहीत नाही!"
"कुणी बोलावलंय?"
"नाही!"
ती व्यक्ती हसली.
"तरी तुम्ही भेटायला आला आहात?"
शक्तीने मग काही न बोलता रायफल केस उघडली. आत 'बॅरेट एम 107' रायफल! खरी!
मागे टेकलेला आणि उजव्या गुडघ्यावर डावा पाय घेऊन मागे रेललेला डॅनियल आश्चर्याने सोफ्याच्या टोकावर झाली.
"तू...?"
"वाचस्पतीच्या खुन्याचा खुनी!"
"पण त्याला तर..."
"ज्याला तुम्ही मारला तो कोणी दुसरा होता."
"आत्ता माझ्याकडून काय हवं आहे?"
"पैसे!"
"पण एसपीने तर या रायफल आणि त्या बाईक सोबत पैसे दिले होते!"
"काम हवंय. त्या कामाचे पैसे मिळतीलच नाही का?" शक्ती कुटील हसला व त्याने डोळा मारला.
शक्तीच्या धिटाईपुढे डॅनियल प्रभावित झाला होता. म्हणजे तसं त्यानं दाखवलं तरी होतं. तो मनसोक्त स्मित करत मागे रेलला.
"काल नेलेल्या मुलीचं काय केलंस?" डॅनियलने विचारलं.
"माझ्याकडे सुरक्षित आहे. आणि आता ती माझ्याकडेच राहील!" शक्ती बेरकी नजर करून म्हणाला. पण त्याच्या या दृष्टीत धमकी नव्हती.
"ऑफकोर्स ऑफकोर्स! कीप हर एज माय फ्रेंड्ली गिफ्ट!" डॅनियल खुश होत चिअर्ससाठी हात उंचावून म्हणाला.
शक्तीने मात्र ग्लास पुढं केला नाही. तो पित नव्हता ना... डॅनियलच्या हे लक्षात आलं. मग त्यानेच शक्तीसाठी ठेवलेला ग्लास डाव्या हाती घेतला आणि आपणच दोन्ही ग्लास एकमेकांना टकरवून चिअर्स केलं!
शक्तीला मात्र त्याला पाहून किळसवाणं वाटत होतं!
एका दमात दोन्ही ग्लास रिचवून डॅनियल उठला. आपल्या खिशातील मोबाईल काढून त्याने शक्तीसमोर टेबलवर ठेवला आणि एग्झिटकडे चालू लागला...
"वॉट आबाऊट थिस गन अँड दि बाईक?" शक्तीने जाणाऱ्या डॅनियलला विचारलं.
"कीप दोज् एज एन अप्रिसिएशन!" डॅनियल मागे न बघताच पुढं चालत बोलला.
त्याची ती मैत्रिण देखील त्याला जॉईन झाली...

क्लबच्या बाहेर, डॅनियलने सोबतच्या मुलीला पैसे देऊ केले.
"टेक अ कॅब!" तो तिला म्हणाला.
आणि तो आपल्या लाल रंगाच्या कन्वर्टीबल 'बीएमडब्ल्यू झी4' कार मध्ये बसून निघाला...
शक्ती बाहेर येऊन त्या गाडीकडे पाहत उभा होता...
त्याने गाडी दूर गेलेली पाहून एक फोन लावला, तो जतीनला!
"डॅनियल गार्सिया नांवाच्या माणसाची कुंडली काढ!" त्याने ऑर्डर सोडली आणि फोन बंद केला.

डॅनियलच्या गाडीत डॅनियल सुद्धा कोणाशीतरी बोलत होता. त्याच्या नेव्हीगेशन स्क्रिनवर हिमांशूचं नांव फ्लॅश होत होतं...
"ऑथेंटीसिटी क्रॉस चेक कर!"
आणि त्याने कॉल हन्ग अप केला!

कोण कुणाच्या प्लॅनमध्ये फसत चाललं होतं... कोण कुणावर कुरघोडी करत होतं... कोण वरचढ ठरणार होतं? शक्ती की डॅनियल? हे कळायला मार्ग नव्हता...!


शक्तीच्या हॉटेल जवळच थांबलेला हिमांशू त्याच्या कार मधून उतरला आणि हॉटेलकडे चालता झाला!

रिसेप्शनिस्ट जवळ घाईने आला.
"हाऊ कॅन आय हेल्प यु सर?" तिने विचारलं.
"वॉन्ट सम इन्फॉर्मेशन!" तो तिला म्हणला.
"नो सर वी कान्ट शेअर! वि आर् नॉट एबल टू." ती स्मित करत म्हणाली.
"यु विल!" कोटाच्या आत होलस्टरला लटकत असलेली पिस्टल कोट थोडा बाजूला करून दाखवत हिमांशू हसून तिला म्हणाला.
मुळातच क्रूर चेहरा असलेल्या हिमांशूकडे ती गन बघून ती रिसेप्शनिस्ट जणू हिमांशूला संमोहित झाली.
आणि का नाही होणार... मृत्यूपेक्षा मोठं संमोहन दुसरं कोणतं असू शकतं, आणि विरोधाभास म्हणजे ते संमोहन असून सुद्धा हे शाश्वत सत्य आहे, ज्याला कोणालाच सामोरं जावंसं वाटत नाही. मग त्याला ती बिचारी रिसेप्शनिस्ट तरी कशी अपवाद असणार होती?!
"बोला..." ती घाबरत म्हणाली.
मृत्यू समोर बघून तिला मातृभाषा आठवली होती.
"रूम नंबर सव्वीसमध्ये जी व्यक्ती थांबली आहे तिची माहिती!" तोही मराठीत बोलला.
तिने घाबरतच मग होकारार्थी मान हलवली.
"त्याचं नांव काय आहे?"
तिने कॉम्प्युटरमध्ये सर्च केलं.
"स... सोमेश राजमाने!" तिने अडखळत एका झटक्यात सांगून टाकलं.
"काही प्रूफ?" हिमांशूने विचारलं.
"हो. त्यांच्या आधार कार्डचं स्कॅनिंग आहे इथं."
"दुसरं काही?"
"त्यांनी क्रेडिट कार्डने पेमेंट केलं आहे. तेही त्याच नांवाचं आहे!"
"प्रिंट्स दे!"
हिमांशूचा हुकूम पूर्ण होण्याआधीच तिने काय ते समजून त्याची तामिली केली होती. कॉम्प्युटरवर प्रिंटचा ऑप्शन क्लिक केला होता.
कर्... कर्... आवाज करत दोन प्रिंट्स प्रिंटरमधून बाहेर पडल्या. तिने त्या हिमांशूला हँडओव्हर केल्या.
"यांच्याबद्दल कोणालाही कळता कामा नये! नाही तर!"
पुढं काही बोलण्याची हिमांशूला गरज नव्हती. रिसेप्शनिस्ट काय ते समजून चुकली होती. तिने घाबरूनच 'नाही' अशा अर्थाने मान डोलावली आणि अवंढा गिळला.
"गुड!" त्या प्रिंटेड कागदांची घडी करून खिशात कोंबत हिमांशू तिला म्हणाला आणि त्याने हॉटेल सोडले...

बाहेर आल्या आल्या त्याच्या चारचाकीकडे जात त्याने डॅनियलला फोन लावला.
"डॅन, ही इज ऑथेंटिक! नम्याची इन्फॉर्मेशन आणि त्याने सांगितलं सगळं खरं आहे! तो खरंच सुशेनने अपॉईंट केलेला असॅसिन आहे!"
"ओके. बट कीप एन आय! अंडरस्टँड?" दुसऱ्या बाजूने डॅनियलने सूचना केली.
"हो!" हिमांशू गाडीचं दार उघडत म्हणाला.
गाडीत बसून दार जोराने ओढून घेतलं.


शक्ती रंकाळ्यावर उभा होता. त्याला जतीनचा फोन आला. तलावाच्या शांत पाण्याकडे पाहतच शक्तीने कॉल घेतला. तो कोणाचा आहे हे पाहण्याचीही तसदी त्याने घेतली नव्हती. कारण फक्त जतीनचाच फोन येणं त्याला अपेक्षित होतं!
"बोल!" तो मोबाईलमध्ये म्हणाला.
"बहोत ग़लत जा रहा है बॉस तू!" पलिकडून जतीन म्हणाला.
"का काय झालं?"
"डॅनियल हा सरळ माणूस नाही!"
"ते माहीत आहे. मुद्याचं बोल!"
"त्याचा काहीच डेटा नाही. ही इज लाईक ए वॉकिंग घोस्ट!"
"मी पण तर जिवंत मुडदाच आहे!" शक्ती त्याला म्हणाला.
"ही हसण्याची गोष्ट नाही! तू ज्यांच्याशी डील करतोय ते लोक मला बरोबर वाटत नाहीत. कशाचं काही ट्रेस होत नाहीए! ना त्या रायफलचं ओरिजिन समजतंय. ना या डॅनियलचं!" पलिकडून जतीन काळजीने बोलत होता.
"हं!" शक्ती फक्त हुंकारला.
"शेवटी एकच सांगेन, रिटर्न अलाईव्ह... डोन्ट डेअर टू डाय ऑन मी यु बास्टर्ड्!"
"डोन्ट वरी आय विल नॉट!"
"मी तुझी काळजी करत नाही! तू मेलास तर माझे पैसे कोण देणार?"
जतीनने हे मुद्दामच म्हंटलं आहे हे शक्ती जाणून होता. चेहऱ्यावर टेन्शन असून हसू त्याच्या चेहऱ्यावर उमटलं.
"नाही मरणार! मला गरज लागेल तुझी!" शक्तीने कॉल कट केला.
आणि तो अथांग असा रंकाळा बघण्यात गुंग झाला...
त्याला त्याच्या बायकोची गार्गीची आठवण येत होती. नम्याला भेटल्यापासून तो गार्गीच्या आठवणींचा धांडोळा घेत होता, पण त्या आठवणींत सूर मारून त्या ढवळण्याची उसंत त्याला मिळाली नव्हती. म्हणून तो येथे आला होता.
गार्गीसोबत आपल्या किशोरवयात न जाणो किती वेळ त्याने इथं घालवला होता. दोघे किती खुश होते त्यावेळी. भविष्याची कसलीच चिंता नसायची दोघांना. वेळ आणि जग त्यांच्यासाठी विरून गेलेलं असायचं.
शक्तीला पोलिसांत चांगली नोकरी लागली. त्याच्या मेहनतीला यश आलं होतं. दोघांनी घरातल्यांना विश्वस्त घेऊन एकमेकांसोबत राहण्याचं वचन पाळण्यासाठी लग्न देखील केलं होतं...
असं म्हणतात, की लग्नानंतर युगुलाचं प्रेम कमी होतं. कारण प्रियकर प्रियसीचं नवरा बायकोत रूपांतर झालेलं असतं. जे मिळवायचं ते मिळवलेलं असतं म्हणून कदाचित त्या व्यक्तीबद्दल आसक्ती लोपत असावी. पण शक्ती व गार्गी या संभवांना अपवाद होते. दोघे तितकेच एकमेकांना प्रेम देत होते, किंबहुना पूर्वीपेक्षा अधिकच ते एकमेकांच्या प्रेमात होते. दोहों मधला परपसर स्नेहभाव वृद्धीगत झाला होता.
आपल्या किशोरवयीन आठवणींना उजाळा देण्यासाठी दोघे लग्न झालं तरी वेळ काढून अधून मधून इथं यायचे. वेळ घालवायचे...
आणि दहा वर्षांच्या त्यांच्या सुखाच्या संसारात त्यांना ज्या गोष्टीची अपेक्षा होती, ती पूर्णत्वास आली... दहा वर्षांच्या प्रयत्नाने प्रतिक्षेत असलेल्या शक्ती आणि गार्गीच्या संसाररूपी नंदनवनात पारिजात फुलला.
गार्गीने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. पारिजात; सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पतरू म्हणून त्या मुलीचं 'पारिजात' असं नामाभिधान करण्यात आलं. दुसरं कारण म्हणजे शक्तीला तिला 'परी' म्हणून हाक मारता येणार होती.
त्याने आपल्या मुलीचे लाडाने हेच नांव ठेवले होते...
आपल्या मुलीची आठवण होताच तिला घेण्यासाठी शक्तीचे हात आपसूकच अनावधानाने उंचावले गेले, पण त्याच्या हस्तांना त्याच्या मुलीच्या वास्तवाचा स्पर्श झाला नाही म्हणून त्याची कल्पना भंग पावली! आणि तो भावावर आला!
सारी चित्रं शक्तीच्या डोळ्यांसमोरून धावत होती. त्या चलत्-चित्रांच्याच वेगाने त्याच्या डोळ्यांतून अश्रूबिंदू ओघळत होते...