Antahpur - 4 books and stories free download online pdf in Marathi

अंतःपुर - 4

४. मोहिनी (फेम फेटल)...

दुसऱ्या दिवशी शक्तीची फोर व्हीलर कोल्हापूर एसपी ऑफिसच्या बाहेर होती. तो मोबाईलवर बोलत होता...
"मिहीर, वाचस्पतींच्या खुन्याला मारायला वापरलेली स्नाईपर रायफल सापडली?"

एसपी ऑफिसर मध्ये वर्किंग डेस्क, मिहीर नांवाचा डीवायएसपी शक्तीच्या प्रश्नांना उत्तर देत होता...
"हो सर."
"काय मी पाहू शकतो?" शक्तीने पलिकडून विचारलं.
"नक्कीच सर! मी येतो घेऊन तुमच्याकडे!" मिहीर एक्साईमेन्टमध्ये म्हणाला.

"ठीक आहे तर, मी खालीच आहे. ये!" शक्तीने कॉल कट केला.
आणि तो मिहीरच्या येण्याची वाट पाहू लागला...
शक्तीची गाडी एसपी ऑफिसच्या कंपाऊंडला लागून असलेल्या फुटपाथजवळच उभी होती. मिहीर रायफल असलेली केस घेऊन धावत ऑफिस उतार झाला होता. तो झटकन येऊन शक्तीच्या बाजूला बसला...
गाडीत बसल्या बसल्या मिहीरने रायफलची केस मांडीवर ठेवत शक्तीशी हँडशेक केला.
"गुड मॉर्निंग सर! गुड टू सी यु!" तो हसत म्हणाला.
"गुड मॉर्निंग. वाईट वाटत असेल नाही?" शक्तीने हात बाजूला घेत मिहीरला विचित्र प्रश्न केला.
"का सर?" मिहीर स्माईल चेहऱ्यावर आणून विचारता झाला.
"तू पकडलेला मारेकरी असा मेला... तुझ्या कष्टावर पाणी फेरलं गेलं. आणि याला कारणीभूत एसपीच होता." शक्ती त्याला चाचपत बोलला.
हे ऐकून मिहीर अजूनच खुलला. म्हणाला,
"हॅ! आपल्या कामात असं चालायचंच त्यात नाराज काय व्हायचं? छोटी लढाई हरली, तरी युद्ध अजून शेष आहे! आणि ते आपण जिकणार ही खात्री आहे!" मिहीर शक्तीच्या कोरड्या डोळ्यांत मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला. मिहिरने डोळे मात्र तजेला होते. कारण त्याला स्वतःवर विश्वास तर होताच, पण शक्तीसोबत असल्याने तो कैक पटीने वाढला होता...!
"गुड!" म्हणत शक्ती ओठ लाबडे करत हसला. त्या हसण्यात जीव नव्हता, पण मिहीरबद्दल कौतुक नक्कीच होतं!
"काय नवीन एसपीची नियुक्ती झाली?" रुक्ष चेहरा ठेवूनच शक्तीने पुढं विचारलं.
"तातडीने. सांगलीचे एसपी इमर्जन्सी पाहून इकडे पाठवण्यात आले आहेत!"
"सर्वांत अनुभवी आहेत. त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. तरी त्यांच्यावर लक्ष ठेवा!" शक्तीने विचार करत सूचना केली.
"हो सर!"
"या परिस्थितीत कोणावरही अंधविश्वास ठेवणं जोखमीचं जाऊ शकतं!" शक्ती ताकीद करत बोलला.
"हो..." मिहीरही विचारपूर्वक उद्गारला.
त्याने केस उघडून ती रायफल शक्ती समोर धरली.
"फॉरेन्सिक टेस्ट झाली?" त्या रायफलवर हात फिरवत शक्तीने विचारलं.
"झाली. पण काही सापडले नाही!" मिहिरने खुलासा केला.
"आपल्याकडील डाटाबेस, रेकॉर्ड्स चेक केले? या बंदुका कोण वापरतं किंवा ट्रेड करतं काही?"
"आपल्या भागात तर कोणी नाही!"
"तेही बरोबरच म्हणा. आपल्याकडे देसी बंदुकाच जास्त खरीदल्या - विकल्या जातात. घेणाऱ्याला स्वस्त पडतं आणि विकणाऱ्याला प्रॉफिट पण होतो." शक्ती म्हणाला.
"मला इन्वेस्टीगेशन, फॉरेन्सिक आणि अटॉप्सी रिपोर्ट्स मिळू शकतील?" शक्तीने मिहीरकडे मागणी केली.
"सॉरी सर! त्याचा निर्णय तर नवीन एसपीच घेऊ शकतील... मी याबाबत काहीच करू शकत नाही. तुम्ही त्यांच्या ओळखीचे नाहीत म्हणून ते तुम्हाला को-ऑपरेट करण्याची शक्यता कमीच आहे. ही रायफल पण मी त्यांच्या नकळत घेऊन आलोय." मिहीर माफीच्या सुरात म्हणाला.
"समजू शकतो!" शक्तीने मिहीरला आश्वासित केलं.
मग शक्तीने त्या रायफलचा फोटो घेतला. आणि कोणाला तरी व्हाट्सएप केला. आणि मग त्याच व्यक्तीला फोन लावला...
"जतीन! तुला एक फोटो पाठवलाय व्हाट्सएपला. एक रायफल आहे. त्याची जरा माहिती काढ. लगेच!"
"ओके!" पलिकडून आवाज आला आणि फोन कट झाला.
शक्ती आणि मिहीर मग जतीनच्या फोनची वाट पाहू लागले...

शक्तीचा मोबाईल घणाणला... शक्तीने तातडीने पहिली रिंग पूर्ण होण्याआधीच तो कॉल रिसिव्ह केला.
"बोल!" तो अधीरतेने म्हणाला.

तिकडे जतीन त्याच्या पीसीवर त्या रायफलची माहिती वरवर पाहता स्क्रोल करत होता. हा जिथे बसला होता ती जागा अत्यंत पसाऱ्याने भरली होती... सगळीकडे कॉम्पुटर पार्टस विस्कटलेले होते. कसल्या कसल्या वायरींचा गुंताच्या गुंता त्याच्या खोलीभर पसरला होता. यावरून तो कॉम्प्युटर इंजिनिअर वगैरे असेल अशी स्पष्टता होत होती. पण तो साधा कॉम्प्युटर दुरुस्ती करणारा माणूस नव्हता. कारण त्या पार्टस सोबतच बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या गन्स विघरुन पडल्या होता...
"'बॅरेट एम 107' असं नांव आहे त्या रायफलचं! बॉस, ही स्नाईपर रायफल नाही!"
"मग?" गोंधळून शक्तीने विचारलं.
"मी या रायफलची कंपनी बरेटचं सेल लिटरेचर वाचलं, त्यात कुठेच स्नाईपर असा उल्लेख नाही!"

"तुला म्हणायचं काय आहे?" शक्ती गोंधळून विचारलं.

"ही गन लाईट प्रोटेक्टिव्ह विहेकल्स, प्रोटेक्टिव्ह शेल्टर्स डिस्ट्रॉय करण्यासाठी वापरली जाते. या रायफलच्या वापरावरून तू हा अंदाज नक्कीच लावू शकतोय, की हे लोक किती क्रूर असतील!
"ही रायफल अमेरिकेत बनवली आहे आणि अमेरिकन आर्मी याचा मोठ्या प्रमाणात वापर करते! बाकीची माहिती मी तुला मेसेज करतो." बत्तीस वर्षांचा अर्धवट पांढऱ्या दाढीची खुरटे वाढलेला डोळ्यांवर फायबरचा चष्मा चढवलेला स्थूल शरीरी जतीन कानाला असलेल्या हेडफोनच्या माईकमध्ये बोलला.

"ते मला ऑनलाईनही समजलं असतं!" शक्ती म्हणाला.

"ओ! तर तुला आतली बातमी पाहिजे!" जतीन हसून म्हणाला.

"त्याशिवाय मी तुला का फोन केला असता?!"

"मेसेज करतो!" जतीन हसून म्हणाला.
आणि कॉम्प्युटरवर काही सर्च करण्यात गुंतला...

"अमेरिकन मेड रायफल आहे!" शक्ती मिहीरला म्हणाला.
"म्हणजे अमेरिका यात इन्वॉल्व्ह आहे?! गॉड...! असं असेल, तर इट्स एन इंटरनॅशनल कॉन्स्पिरिसी अंगेंस्ट इंडिया!"
"असू शकतं! भारतीय राजकारणात डायरेक्ट हस्तक्षेप करता येत नाही म्हणून हे केलेलं असू शकतं! पण असंही नाही की ही अमेरिकेत बनते म्हणून फक्त अमेरिकन आर्मी वापरत असेल. सो इतक्या लवकर निष्कर्ष काढणं योग्य नाही! तू माहिती घेत रहा. सगळी फोर्स यामागे लावावी लागली तरी चालेल! सध्या एकच लक्ष्य आहे! या प्रकरणाचा छडा!"
"नो डाऊट! यासाठी नवीन एसपीशी संघर्ष करावा लागला तरी चालेल!" मिहीर उत्तेजित होत म्हणाला.
"नाही! त्यांना विश्वासात घे! मला वेळोवेळी रिपोर्ट करत रहा!" शक्तीने सुलभ मार्ग सुचवला.
"आपण म्हणाल तसं!" मिहिरने सुझाव मान्य केला.
"आता तू निघ! ही रायफल माझ्याकडे असू दे."
"पण सर..."
"मी तुझा संकोच समजतोय. पण मी याचा गैरवापर नाही करणार. विश्वास ठेव!"
"तसं नाही सर पण, पुराव्यातून रायफल गायब आहे हे एसपींना समजल्यावर मी त्यांना काय उत्तर देऊ?"
"डोन्ट वरी! तसं काही झालं तर त्यांचा माझ्याशी फोन जोडून दे. मी काय ते सांगतो त्यांना!"
"मग आत्ताच बोला ना?" मिहीरने इंसिस्ट केलं.
"आत्ता नको. ते घेऊ जाऊ देणार नाहीत. रायफल एकदा का माझ्या ताब्यात आली, की त्यांना नाकारता येणार नाही!"
"फाईन!" मिहीर नाराजीनेच म्हणाला. पण तो शक्तीला मना देखील करू शकत नव्हता.
त्याने शक्तीचा निरोप घेतला,
"चालेल सर! येतो मी!" ती रायफल केस मागील सीटवर ठेवत तो गाडीतून उतरला.
"येतो!" म्हणून तो ऑफिसकडे निघून गेला...
शक्तीने ती रायफल त्या उघड्या केसमध्ये बंद केली आणि त्याची गाडी वळली...

गाडी चालवतच त्याने ब्लुटूथ मोबाईलशी जोडला आणि तो कानावर प्लेस केला. पुन्हा एक कॉल...

"अरे थोडा तरी टाईम देना यार!" जतीन कळवळा.
कॉम्प्युटरवर माहिती गोळा करणं त्याचं चालूच होतं...

"त्यासाठी फोन नाही केला!" शक्ती गाडी चालवत ब्लुटूथमध्ये बोलत होता...
"ऐक!" आणि तो काही सूचना देत गेला...
"तशीच दुसरी रायफल मिळेल?"
"ऑर्डर करता येईल, पण डिलिव्हरीला वेळ लागू शकतो."
"मग त्या रायफलची रेप्लिका मिळेल?"

"होईल! पण वेळ लागेल!"
"किती?"
"दिवस तरी जाईल."
"संध्याकाळपर्यंत. मेक इट फास्ट!"
"तू बॉस असल्यासारखा ऑर्डर करतोयस!" जतीन त्याला खिजवत म्हणाला.

"ठीक आहे काहीच करू नको! पण मग अटकेला सामोरे जायला तयार रहा! लोकल पोलिसांसोबत सायबर सेल आणि इंटेलिजन्स सुद्धा तुझं स्वागतच करतील!"
"ओ! तर आता ग्रेट शक्तीसेन ब्लॅकमेलिंगचा आधार घेणार आहेत तर...!" बाजूच्या बाऊल मधील चिप्स तोंडात टाकत जतीन बोलला.

"फालतू बडबड करण्यात वेळ घालवण्यापेक्षा सांगितलेलं काम कर!"
"ओके. पण मला अजून काही फोटोज् लागतील."
"ठीक. त्यापेक्षा ती रायफल मी तुला हॅन्डओव्हर करतो. ती स्कॅन कर! आणि पुन्हा माझ्या घरी पोहोचव."
"तू नसशील तर?"
"बाहेरच सोड!"
"गुड!"
"वजन, लांबी रुंदी अगदी तंतोतंत. मला मिलीमीटरचं देखील अंतर नको आहे. रायफलवर स्क्रॅचेस असतील तर तेही यायला हवेत. मी केस पाठवतोय त्याचीही रेप्लिका तयार कर! वेल पॅक्ड् करून घेऊन ये!
"आणखी एक! मला सोमेश राजमाने नावाच्या फेक आयडीज् बनवून हव्या आहेत! त्याचं बँक अकाऊंट शोधून त्याचं फेक क्रेडिट कार्ड पण बनव. एसपी सुशेन मित्रचा डेटा सर्च केला तर तुला सोमेश राजमाने मिळेल!" शक्तीने जतीनच्या कामात वरील कामं अधिक केली.
"तू नांवानांव काम वाढवत..."
जतीनचं पुढं काही न ऐकता शक्तीने ब्लूटूथचं बटन दाबून कॉल कट केला आणि त्याने ब्लुटूथ काढून डॅशबोर्डवर फेकला.
त्याची गाडी मार्गक्रमण करतच होती...


ती थांबली ती शौर्यजीत असलेल्या हॉस्पिटलला! गाडी पार्किंगला सोडून तो हॉस्पिटलमध्ये प्रवेशकर्ता झाला. आणि इतक्यात कोणी तरी येऊन लॉक केलेली शक्तीची गाडी खोलली आणि रायफल केस घेऊन तो माणूस निघून गेला...

काही वेळातच शक्ती शौर्यजीतसमोर उभा होता. शौर्यजीतचं फलाहार घेणं चालू होतं.
"काही खाणार?" शौर्यने ऑफर केलं.
शक्तीने मान हलवूनच नाही म्हंटलं.
"आएम एंटेरिंग इन टू द सँग्क्युअरी! ब्लेस मी लक!" शक्ती चेहरा स्ट्रेट ठेऊन म्हणाला.
"तुला शुभेच्छांची गरज केव्हा पासून पडायला लागली शक्तीसेन! यु विल डू गुड! मला माहित आहे!" शौर्य हसत म्हणाला.
"डिस्चार्ज?"
"अजून तरी नाही!"
"वहिनी येणार आहेत?"
"नाही! आणि मी काही संगितंल नाही. तूही सांगू नको. मी मुंबईत कामानिमित्त बराचवेळ आमच्याच तिथल्या घरी राहणार आहे असं तिला येतानाच सांगितलं आहे. त्यामुळे तिला सांगण्याची गरज नाही. मला तिला काळजीत पाडायचं नाही. बरा झालो, की मीच तिच्या समोर जाईन..." थोडा हेल्पलेस होत शौर्य बोलला.
"सॉरी यार..." शक्तीने खंत व्यक्त केली.
"का?" खुदकून शौर्यने विचारलं.
"मोठ्या आशेने तू माझ्याकडे मदत मागायला आलास, पण मी तुला प्रोटेक्ट करू शकलो नाही..." शक्तीने अपराधबोध व्यक्त केला.
"तू नसतास तरी असंच काहीसं झालं असतं. माझी जीवही गेला असता. कुणी सांगावं. तुझी काही चूक नाही. आणि मी माझ्या प्रोटेक्शनसाठी तुझ्याकडे आलो नव्हतो. मला तुझ्याकडून जे अपेक्षित आहे ते तू करतो आहेस यासाठी मीच तुला धन्यवाद द्यायला हवेत!" तोंडाजवळ नेलेलं आख्खं सफरचंद बाजूला करत शौर्य निरागस स्मित करत शक्तीला बोलला!
यामुळे तर शक्तीला शांत वाटण्यापेक्षा अधिकच लाजल्यासारखं झालं.
"मी तुझी सोय माझ्या घरी केली असती, पण जर लोक आपल्या मागावर असतील, तर तिथं हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून तुला तिथं शिफ्ट करत नाही. त्याबद्दल माफ कर!"
"इट्स ऑल राईट. तुझं म्हणणं योग्य आहे!"
"पण डोन्ट वरी. मी तुझी सोय करतो काही तरी. तुला इथं सोडणं पण मला सुरक्षित वाटत नाही!" शक्ती म्हणाला.
त्याने पकडलेला असॅसिन इथं याच हॉस्पिटलमध्ये मेला होता आणि तेही इथं संपूर्ण हॉस्पिटलला सर्व बाजूंनी प्रोटेक्शन असताना हे तो विसरला नव्हता.
पण याबाबद्दल तपास करण्यात त्याला वेळ घालवायचा नव्हता. ये काम पोलीस व इंटेलिजन्स करू शकत होतं... करत होतं...
शिवाय मुख्य सूत्रधार शोधला, तर या सगळ्याची उत्तरं आपसूक मिळणार होती म्हणून शक्तीने असॅसिनच्या मृत्यूकडे लक्ष दिले नव्हते! आणि बहुदा त्याला या उत्तरांमध्ये काही स्वारस्यच नव्हतं...!

इकडे एसपीच्या केबिनमध्ये नवीन अपॉईंट झालेला एसपी सारंग गोखले मिहीरला झापत होता...
"विद्युत म्हणाला, की तू मोस्ट इम्पॉर्टन्ट एव्हीडेन्स असलेली रायफल कुठे घेऊन गेलास आणि परत आणलीच नाहीस! काय केलंस रायफलचं?" एसपी सारंग मिहिरला जाब विचारत म्हणाला.
'या विद्युतला विद्युत गतीनं चोंमडेपणा करायची काय गरज होती?' मिहीर मनातल्या मनात विद्युतला शिव्या घालत म्हणाला आणि...
"सर... ते... मी..." मिहीर मोठ्याने बोलताना अडखळला.
"मी ते काय? किती बेजबाबदारपणा आहे हा? लोक तुम्हाला नाही मला नांवं ठेवतील! म्हणताय जॉईन होऊन एक दिवस नाही झाला आणि याने मोठा एव्हीडेन्स गमावला! पुराव्यांसोबत छेडछाड केल्याचे आरोप लागतील माझ्यावर!" गोखले शिरा ताणवत ओरडला.
मिहीर खाली मान घालून उभा राहिला होता. त्याची खामोशी सारंगच्या डोक्यात अजूनच तिडीक उठवून गेली!
"बोला!" तो ओरडला.
"फॉर्मर असिस्टंट पुलिस इन्स्पेक्टर शक्तीसेन अमर नाईक ती आपल्या सोबत घेऊन गेले आहेत..." एका श्वासात मिहीर बोलून गेला.
"फॉर्मर! म्हणजे आता तो फोर्समध्ये नाही! अं?" गोखलेनं राग शांत न होऊ देता विचारलं.
"नाही सर!"
"मग तुम्ही एवढा महत्त्वाचा पुरावा एका सामान्य व्यक्तीच्या हाती दिलाच कसा?" टेबलवर हात आपटत सारंग गरजला.
"ही इज ट्रस्टवर्दी सर!"
"माय ऍस! मी जरा बाहेर काय गेलो तुम्ही तर गोंधळच घालून ठेवलात. जरा मला इथं स्थिर व्हायला तरी वेळ द्यायचात!" सारंग गोखले ओरडला.
"सॉरी सर..." पुन्हा खाली पाहतच मिहीर बोलला.
"तुमचं सॉरी नकोय मला. ती रायफल हवी आहे! आताच्या आता त्याच्याकडून ती रायफल परत घ्या!" आवाज वाढवून सारंग खेकसला.
मिहीर जागचा हलला नाही. त्याची काहीच कृती नाही पाहून सारंग जास्तच रागावला...
"तो कोण आहे त्याला फोन लावा. आत्ताच्या आत्ता! मी बोलतोय!" सारंगने ऑर्डर सोडली.
घाबरून मिहीरकडे पर्याय उरला नाही. त्याने शक्तीला कॉल केला व रिंग होण्याचीही वाट न पाहता मोबाईल सारंग समोर धरला.
"सर..."
सारंगने मिहीरकडून तो मोबाईल जवळजवळ हिसकावूनच घेतला. एव्हाना पलिकडून फोन उचलला गेला होता...

"हॅलो बोल मिहीर!" अजूनही शौर्यजीत समोर बसलेला शक्ती मोबाईलमध्ये बोलला.
"मी मिहीर नाही. न्यू अपॉईंटेड् एसपी बोलतोय!" पलिकडून उखडलेला आवाज!
"हा बोला सर!"
"तुम्ही मिहीरकडून नेलेली रायफल परत आणून द्या. नाही तर मला तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याशिवाय पर्याय नाही!" सारंगने अक्षरशः धमकी दिली.
"माफ करा सर. वाचस्पतींच्या खुनाची जी एसआयटी आहे त्याचे हेड आयबी डिरेक्टर शौर्यजीत देशमुख यांना ती रायफल पहायची होती. म्हणून घेऊन आलो होतो..."
"ए मी कवा तुला ती रायफल आणायला..." शौर्य बोलत असताना त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधी शक्तीने त्याच्या तोंडावर हात ठेवून त्याला गप्प केले आणि इशारा करून काही विशेष नाही असं तोंड विचित्र करून सांगितलं.
'पलीकडे मूर्ख माणूस आहे' असा त्याच्या संकेतांचा अर्थ होता. तो समजून शौर्य हसला. तो ओळखत असलेला शक्ती आता त्याच्या रंगात येत होता. त्यानं बाजूच्या ट्रेवरचं केळं उचललं. ते तो दातांनीच सोलू लागला.
"सर माझ्यासमोरच आहेत. आपण बोलू शकता!"
शक्तीने मोबाईल शौर्यजीत समोर धरला. शौर्यजीतने 'काय?' असं इरिटेट भावाने इशाऱ्याने विचारलं.
'बोल!' शक्ती पण इशाऱ्यानेच बोलला. तरी त्याचे ओठ हाललेच. त्याने मोबाईल शौर्यच्या कानाला लावला.
"येस! मी आयबी डिरेक्टर. मला जरा ती रायफल बघायची होती म्हणून मागवली होती. हॉस्पिटलमध्ये असल्याने काही अपडेट्स नाहीत म्हणून आपल्या जॉइनिंगबद्दल समजलं नाही म्हणून ती रायफल अशी मागवावी लागली!" शौर्यने उगाचच थाप मारली.
त्याला पूर्ण बोलूही न देता शक्तीने मोबाईल स्वतःच्या कानाला लावला.

"असं का? ठीक आहे सॉरी. पण प्लिज ती रायफल लवकर हेडकॉर्टरला जमा करा." चाचरत सारंग गोखले बोलला.

"काळजी नको सर. शौर्यजीत सरांचं परीक्षण पूर्ण झालं, की मी ती स्वतः आपल्याला पोहोचवतो!" शक्ती मोबाईलमध्ये म्हणाला.
"ओके थँक्स!"

म्हणत सारंगने फोन कट केला व मिहीरला परत केला.
"पुन्हा अशी चूक नको! मला विचारल्याशिवाय किंवा सूचित केल्याशिवाय काही निर्णय घ्यायचा नाही!" सारंगने ठणकावले.
"येस सर!" मिहीरची मान आणि नजर अजूनही खालीच!
"चला निघा!" सारंगमे आदेश दिला.
हे मिहीरच्या मनासारखं झालं. कधी एकदा या केबिनमधून बाहेर पडतोय असं त्याला झालंच होतं... तो क्षणाचा विलंब न लावता केबिनमधून निसटला.

हॉस्पिटलमध्ये शक्ती मात्र आता गंभीर झाला. त्याने घड्याळ पाहिलं होतं. चार झाले होते. तो तडख उठला.
"काय झालं?" शौर्यनं विचारलं.
"टाईम हॅस कम टू एन्टर इन टू द सँक्च्युअरी!" आपला मिश्किलपणा एका क्षणात झटकून शक्ती बेरकी बनला होता.
"येतो!" तो म्हणाला आणि त्याने शौर्यजीतचा वॉर्ड त्यागला!
शौर्यजीत मात्र चेहऱ्यावर काहीशी चिंता घेऊन जाणाऱ्या शक्तीसेनकडे पाहत राहिला...

शक्ती त्याच्या गाडीतून उतरला आणि घराकडे चालू लागला... दारात दोन रायफल केस पडल्या होत्या. अगदी हुबेहूब!
शक्तीने दोन्ही उचलल्या आणि एक त्याने घरात ठेऊन दिली. दुसरी सोबत घेऊन तो गेटमधून बाहेर पडला.
त्याने रिक्षा केली. ती रिक्षा शक्तीने सांगितलेल्या मार्गावर धावू लागली...

संध्याकाळी चार पंचेचाळीसला शक्ती आरटीओ ऑफीसरशी काही बोलला. खांद्याला ती रायफल केस होतीच! दोघांनी हँडशेक केला आणि शक्ती बाईक घेऊन निघाला. पण त्याची नाही; त्याने पकडलेल्या आणि हॉस्पिटलमध्ये मारलेल्या गेलेल्या असॅसिनची 'कावासाकी निंजा एच 2'!

मग ती कावासाकी आली एसपी ऑफिसला त्याने मिहीरला फोन केला. काही वेळातच मिहीर खाली आला. पण एकटा नाही. सोबत नवीन एसपी सारंग गोखले होता.
"ही तुमची रायफल!" शक्तीने खांद्याला आडवी टाकलेली केस काढून एसपी समोर धरली.
"थँक्स! पण पुन्हा जर काही मदत लागली तर सूचित करा. असं परस्पर काही करू नका." सारंगने स्मित करत ताकीद दिली. हे बोलत असताना त्याने मिहीरकडे पण एक कटाक्ष टाकला होता.
"हो सर!" शक्ती म्हणाला.
एसपी निघाला.
"सॉरी सर!" मिहीर शक्तीला म्हणाला.
सारंग हसत असला तरी त्याने शक्तीला धमकावलं होतं. म्हणून मिहीरने माफी मागितली.
"इट्स ऑल राईट!" शक्ती हसून बोलला.
मिहीरने मग नजरेनेच जाण्याची परवानगी घेतली आणि तो ऑफिसकडे पळाला.

शक्ती आपल्या घरी परतला. त्याची बाईक सुझुकी हायाबुसा गेटच्या आत लागली होती.
शक्ती कुलूप काढून घरात प्रविष्टला. सोफ्यावर पडलेली रायफल केस त्याने घेतली. त्या जागी बसला आणि त्याने ती केस मांडीवर घेऊन ती उघडली. रायफल हाती घेताच खाली त्याला त्याने बनवायला सांगितलेले खोटे आयडी कार्ड्स दिसले. फेक वोटर आयडी, खोटे आधार कार्ड, खोटे क्रेडिट कार्ड, खोटे पासपोर्ट, खोटे पॅन कार्ड एवढंच काय पण खोटे रेशन कार्ड पण बनवले गेले होते. हे जतीनचं परफेक्शन होतं. पण शक्तीला याचं काहीच कौतुक नव्हतं!
रेशन कार्डची शक्तीला तूर्तास गरज वाटली नाही म्हणून त्याने ते टी-पॉयवरच टाकून दिलं. बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स त्याने आपल्या वॉलेट मध्ये ठेवून घेतले. आणि रायफल निरखून पहायला सुरवात केली.
काहीवेळाने त्याच्या मोबाईलची मेसेज ट्यून वाजली...
शक्तीने मेसेज वाचू लागला. तोच त्याला कॉल आला. त्याने तो रिसिव्ह केला...

"रायफल आवडली?" आपल्या कॉम्प्युटरवरच नजर लावून आपल्याच कामावर खुश असलेल्या जतीनने फुशारकीने विचारलं.
"हो! आणि ती आपल्या ठिकाणी पोहोचली सुद्धा! पण पुन्हा मला ट्रॅक करायची हिंमत करू नको!" शक्ती पलिकडून धमकावत म्हणाला.
"बरं. तुला पाठवलेली माहिती पाहिलीस?" जतीनने विचारलं.
"हो. तू सांगितलंस एम 107 आणि माहिती पाठवलीस एम 82 ची पण. मॅटर काय आहे?"
"तू अजून पूर्ण वाचलेलं दिसत नाही. ब्रिफमध्ये सांगतो ऐक! जवळजवळ एकोणसाठ देश एम 82 या रायफलचा किंवा या रायफलच्या मॉडीफाईड् व्हर्जनचा त्यांच्या आर्मीमध्ये उपयोग करतात. आपल्या मुंबईतील फोर्स वन कमांडोज् आणि पॅरा एसएफ कमांडोज् तुझ्याकडे असलेल्या एम 107 चाच उपयोग करतात!"
"पर्टिक्युलर हीच?" शक्तीने खात्रीसाठी विचारलं.
"हो. युएस मिलिटरीने एम 82 पासून ˈस्टॅन्डर्डाइझ़् केलेली ही एम 107 ते वापरतात."
"एम 82 आणि एम 107 मध्ये फरक काय आहे?"
"नॉट सो मच. १९८२ ला एम 82 हे मॉडेल कंपनीने डेव्हलप केलं म्हणून याला नाम एम 82 नांव ठेवलं. जेव्हा अमेरिकेन आर्मीने २००२ ला या विकत घेतल्या, तेव्हा त्यांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार काही बदल करून घेतले आणि याचं एम 107 असं नामकरण केलं!"
"थोडक्यात जास्त फरक नाही!" शक्तीने वैतागाने विचारलं.
"असं म्हणू शकतो!" जतीन म्हणाला.
"माझ्याकडे नेमकी कोणती आहे? एम 107?"
"बरोबर!"
"देन वाय आर यु मेकिंग इट सो कॉम्प्लिकेटेड्?" शक्ती थोडा चिडला.

पण शक्तीला चिडवायला कायमच जतीनला मजा येत असायची...
"बिकॉज देअर इज नथिंग इजी गेटिंग इन थिस वर्ल्ड् माय बॉय!" शक्तीला खिजवण्यासाठी जतीन मस्करीत बोलला.

शक्ती रायफल मांडीवर घेऊन जतीन काय बोलतोय ते ऐकत होता...
"म्हणजे रुलिंग पार्टीवरील संशय बळावतोय. कारण केंद्र आणि महाराष्ट्र दोन्हीकडे 'लोककल्याण'चीच सत्ता आहे!" शक्ती जतीनच्या मस्करीकडे लक्ष न देता विचार करत म्हणाला.
"हो!" जतीनने शक्तीचा तर्क कदाचित योग्य असेल असा शिक्कामोर्तब केला.

"मी तुला बिल पण पाठवलं आहे. तेवढं पे कर! इन टूडेज् वर्ल्ड्, इन्फॉर्मेशन इज मनी! दुसरं थ्रीडी प्रिंटर बाळगणं खर्चिक आहे. सो पे मी वेल!" चिप्स चावत जतीन म्हणाला.
"बघू!" शक्ती पलिकडून म्हणाला.
"आणखी एक! ही रायफल बनवणाऱ्या 'बॅरेट फायरआर्म्स मॅन्यूफॅक्स्चरिंग' कंपनीचा डाटाबेस मी चेक केला आहे. पण इल्लीगल ट्रेडिंग दिसत नाही."

"याचा अर्थ ज्या देशांना या रायफल्स् विकल्या आहेत त्यांनी ही गोष्ट घडवून आणण्याची शक्यता देखील आहे. पण एकोणसाठ देशांमधून इन्वेस्टीगेशन नॅरो करणं थोडं कठीण आहे!" शक्ती विचारातच होता.

"मी ते करू शकतो! बट वेगळे चार्जेस पडतील!" जतीन हावरट हसत म्हणाला.

"राहूदे मी बघतो!" शक्तीने फोन कट केला. रायफल पुन्हा केसमध्ये ठेवून दिली.
एवढ्यात शक्तीच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली.
शक्तीने मेसेज बॉक्स उघडून पहिला. त्यात लिहिलं होतं,
'अमेरिका, युक्रेन, न्यूझीलंड, भारत, जर्मनी' आणि त्या खाली बोल्ड अक्षरात लिहिलं गेलं होतं...
'पैशांची वाट बघतोय!'
पैशासंबंधी जतीनची मस्करी आहे हे शक्तीच्या ध्यानात आले. तरी त्याचे काम झाले होते. जतीनच्या मदतीने एकोणसाठ वरून शोध पाच देशावर येऊन थांबला होता...!
त्याने वॉलक्लॉकवर नजर टाकली. घड्याळात आठ झाले होते. शक्ती उठला. त्याला खाण्यापिण्याची काहीच सूद नव्हती. हे काम झाल्याशिवाय तो आता स्वस्थ बसणार नव्हता!
ती रायफल केस उचलून त्याने पाठीला लावली आणि तो घरातून बाहेर पडला...


तो उभा होता त्याच्या जिवलग प्रिय मित्र शौर्यजीत समोर. केस त्याच्या पाठीला होतीच. शौर्यजीत शांत-दैवत झोपला होता. औषधांची गुंगी असावी हे शक्ती समजला. तरी त्याला जागं न करता शक्ती पुटपुटला...
"आता पुन्हा भेटू न भेटू! काळजी घे!"
त्याने खोली सोडली. बाहेर आल्यावर त्याने एक चावी तेथे संरक्षणासाठी असलेल्या गार्ड्ला देऊ केली.
"मिणचे सावर्डेत माझं एक घर आहे. मुल्ला गल्ली. नाईकवाडा! सरांची तिथं व्यवस्था करा. दुसऱ्या कुणाला याबद्दल कळता काम नये! कळलं?"
"होय सर!" गार्ड् म्हणाला.
"गुड! येतो!"
आणि शक्ती जीवघेण्या मिशनवर निघाला...! परतेल, की नाही त्यालाही माहीत नाही...! पण त्याने स्वतः निवडलेला हा मार्ग होता... आता मागे फिरणे नाही!!!


शक्ती घेऊन आलेली कावासाकी 'सिराज नाईट क्लब'ला लागली होती. तो रायफल केस पाठीवर घेऊनच आत शिरला.
एक मोठा सोफा अक्वायर् करून तो बसला होता. दोन्ही हात गोलाकार सोफ्याच्या आर्मरेस्ट वर पसरून पाय समोरच्या टी-पॉयवर त्याने पसरले होते. ती रायफल केस त्याच्या पायांपाशीच टेबलवर पडली होती.
नाईट क्लब खूपच प्रशस्त होता. इथं येणारे लोक श्रीमंत कॅटेगरीतले असणार हे कोणीही ओळखू शकलं असतं.
डिस्को लाईट्स वेगवेगळे रंग टाकत क्लबभर फिरत होत्या. समोर एक अत्यंत सूंदर मुलगी वय साधारण सत्तावीस-अठ्ठावीस, शृंगारीक गाणं म्हणत होती. तिच्या सूंदरतेचं वर्णन करण्यात शब्दही अपुरे पडतील. विश्व-सूंदऱ्यांनाही लाजवेल अशी तिच्या सौंदर्याची मोहिनी होती. भले भले संन्यासी तिच्या सौंदर्याच्या मोहात पडतील यात शंका नव्हती. अंग भरून कपडे असलेली ती, तरी तिचं सौंदर्य लपता लपत नव्हतं...
तिच्याभोवती व ड्रिंक्स घेणाऱ्या पुरुषांच्या आजूबाजूला विशी-तिशी दरम्यानच्या बऱ्याच ललना त्या सूंदर मुलीच्या सूंदर गाण्यावर नाच करत होत्या...
आणि तथाकथित उच्चभ्रू पुरुष त्या मुलींना रिझवण्याचा प्रयास करत होते. सोबत 'सोमरसा'चे ग्लास अन् ग्लास रिचवले जात होतेच. सिगरेट्स, हुक्का यांच्या धुरांचा नंगानाच पण चालू होता...
या वासनांध लोकांना पाहून शक्तीला मोठं हसू आलं... जीवनाला खरी गती न मिळाल्याने यांच्या झालेल्या दुर्गतीवर त्याला कीव वाटत होती...
या लोकांमध्ये काही किशोरवयातली मुले देखील होती... शक्तीला त्यांच्या भविष्याची चिंता वाटली... कारण हेच या मानवजातीचे भविष्य होते आणि तेच असे अंधारमय...
"साहेब काय आणू?" एका सोफेस्टिकेटेड् वेटरने विचारून त्याची तंद्री भंग केली...
"नंतर ऑर्डर देतो!"
"ओके सर. पण इथं बसण्याचे पण चार्जेस लावले जातात." ऑर्डरसाठी उघडलेली हातातील डायरी बंद करत वेटर म्हणाला.
"नो वरी. एक महत्त्वाची मिटिंग आहे. तसाही वेळ लागणार आहे!"
"ओके सर!"
तो वेटर निघून गेला.

क्लब बाहेर एक पॉश कन्वर्टीबल गाडी 'बीएमडब्ल्यू झी4' येऊन लागली. त्यातून एक व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंड सोबत उतरला. तो क्लबच्या दिशेने चालत येत असतानाच त्याची नजर प्रवेशद्वारासमोर उभ्या काळ्या रंगाच्या 'कावासाकी निंजा एच 2' वर पडली. जरा पुढं मान करून त्याने गॉगल काढून ती बाईक निरखून पाहिली. काही काळ तो घुटमळला. आणि एक स्मित त्याच्या चेहऱ्यावर तरारलं.
त्याने पुन्हा गॉगल चढवला व आपल्या दोन मैत्रिणींसोबत नाईटक्लबात गेला.

आत आल्या - आल्या त्याची नजर समोरच सोफ्यावर पसरून बसलेल्या शक्तीवर पडली. त्याच्या पायांच्या बाजूला ती रायफल केस होतीच.
आत प्रवेशल्या प्रवेशल्या त्या व्यक्तीने एक नजरभर शक्तीला पाहिलं. शक्ती दरवाज्यावरच नजर लावून होता त्यामुळे साहजिक त्या व्यक्तीची व शक्तीची नजरानजर झाली. आपण त्याच्याकडेच पाहतोय असा शक्तीला संशय येऊ नये म्हणून मग त्या व्यक्तीने सिगार पेटवली. यावेळी क्लबमधलीच एक मुलगी येऊन त्या व्यक्तीला सामील झाली आणि तो सोबतच्या त्या दोन्ही मुलींच्या कमरेत हात घालून त्यांना घेऊन एका टेबलपाशी गेला. ते कोपऱ्यात होतं. पाठीमागून शक्तीला सहज पाहता येणार होतं आणि शक्तीने डावीकडे मान वळवल्याशिवाय तिथलं काही दिसू शकणार नव्हतं. पण ते टेबल फुल होतं. पण जास्त काळ नाही. त्या व्यक्तीने तो टेबल निवडला आहे हे बघताच भारतीय वंशाचा, पण अमेरिकन एक्सेंट असलेला मॅनेजर पळत आला आणि त्याने तिथं बसलेल्या दोन बिझनेसमन टाईप लोकांना उठवलं आणि त्यांना दुसरं टेबल देऊ केलं आणि त्या व्यक्तीला ते टेबल मोकळं करून दिलं.
'बी कंफटेबल सर!' असं तो पुटपुटलेला शक्तीला जाणवलं. गाणं चालू असल्याने त्याला तिथलं संभाषण ऐकू येणार नव्हतं. म्हणून त्याला इन्स्टिक्टवरच अवलंबून राहवलं लागणार होतं.
त्या व्यक्तीने स्वतःला त्या टेबल लगतच्या सोफ्यावर झोकून दिलं आणि दोन्ही सूंदऱ्या त्याच्या दोन्ही बाजूला विसावल्या. वेटर धावत ऑर्डर घेण्यासाठी सज्ज झाला होताच. ती व्यक्ती त्याला ऑर्डर देऊ लागली...
दरम्यान मॅनेजर उठवलेल्या दोघांची माफी मागत दुसऱ्या टेबलकडे घेऊन गेला होता... शक्ती पण मग गाणं गाणाऱ्या मुलीकडे पाहून गाण्याचा आनंद घेऊ लागला!

परंतु काही मिनिटांतच तेथील सगळ्यांचा रसभंग झाला. एक अति उत्साही युवक त्या गाणाऱ्या मुलीकडे गेला आणि तिच्याशी असभ्य वर्तन करू लागला. तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करत समोर नाचू लागला. हे स्पष्ट होतं, की त्या मुलीला ते रुचत नव्हतं. पण तरी ती दुर्लक्ष करून गाण्याचा प्रयत्न करत होती... मॅजेनर दुरून पाहत होता. कदाचित हस्तक्षेप करण्याची त्याच्यात हिंमत नसावी...
पण एक क्षणाला शक्तीलाच ते असह्य झालं. आणि तो त्या स्टेजकडे चालू लागला. त्याने त्या अश्लील वर्तन करणाऱ्या त्या मुलाला हाताला धरून अडवलं.
पण त्याची ही कृती त्या मुलाला राग देऊन गेली. त्या मुलाने पॅन्टला खोवलेली आपली पिस्टल खेचली. पण शक्तीसमोर तो बच्चा होता! शक्तीचा हात त्याच्या अंगावर कधी पडला आणि कधी त्याची पिस्टल त्याच्या हातून शक्तीच्या हाती गेली हे त्याला कळालंच नाही. शक्तीने त्याला डान्स फ्लोअर दाखवला! तो खूप जोरात आपटला होता, काही क्षण त्याला आपण नक्की कुठे तेच समजलं नव्हतं.
एवढं पाहून देखील त्या मुलाचे मित्र काही समजले नाहीत. ते उठून शक्तीच्या दिशेने धावले.
शक्तीने त्यांच्या पायात फ्लोअरवर फायर केलं. 'पुढे येऊ नका!' हे सांगणारा तो संकेत होता.
आपण यौवनाला शहणपणाच्या गोष्टी समजत नाहीत! त्याला मुक्त जंगली गव्याप्रमाणे सत्-असत् न जाणता उधळायचे असते! मस्तवाल हत्तीसारखं सगळं कुचलायचं असतं...
त्या तरुणांनीही तीच चूक केली आणि शक्तीवर हल्ला केला. पण त्यांचा जोर शक्तीवर चालला नाही!
दुसऱ्याच क्षणी चारही जण त्यांच्या मित्राप्रमाणे जमीन चाटत होते. आता मात्र मॅनेजर पुढं झाला. या रोजच्या गिऱ्हाईकांना हटकण्यापेक्षा या नवीन माणसाला रोखणं त्याला जास्त सोपं वाटलं असावं. पण त्याच्या याच वागण्यावर शक्तीला राग आला. खिशातून नोटांचं बंडल काढून त्याने त्या मॅनेजरच्या छतीवर दाबलं. जणू झालेल्या नुकसानाची भरपाईच नाही, तर तो त्या सूंदर मुलीची किंमत देखील त्याला वळती करत होता.
"जर हिचं रक्षण करू शकत नाही, तर हिच्याकडून सर्व्हिस करून घेण्याचा देखील तुम्हाला अधिकार नाही!" शक्ती रागाने म्हणाला.
आणि तिला हाताला धरून खेचत तो त्या सोफ्यापाशी गेला जिथं तो पूर्वी बसला होता. रायफल केस त्याने उचलली आणि तो त्या मुलीला खेचतच बाहेर घेऊन गेला!
हे पाहत असताना एक अनामिक स्मित त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटलं. आतापर्यंत तो मोठ्या उत्सुकतेने पुढची घटना पाहत बसला होता. वेळोवेळी सर्व्ह केलेलं ड्रिंक घेत होता...

बाहेर, शक्ती कावासाकीवर राईड झाला. आणि तो त्या मुलीने मागे बसण्याची वाट पाहू लागला. तीही काही पर्याय नाही पाहून नाईलाजाने बसली. कावासाकी त्या रोडवर धावू लागली...


शक्ती तिला घेऊन एका थ्री-स्टार हॉटेलला घेऊन आला. काऊंटरवर सोमेश राजमानेचं आधार दाखवून, त्याच्याच फेक क्रेडिट कार्डने पेमेंट करून एक रूम बुक केली.
"आपलं लगेज सर?" रिसेप्शनिस्टने विचारलं.
"नाही!" तो रुक्ष म्हणाला.
"गुड नाईट सर!" सूंदर रिसेप्शनिस्ट तितकंच सूंदर स्मित करत म्हणाली.
पण शक्तीने दुर्लक्ष करत,
"थँक्स!" म्हंटलं.
आणि रिसेप्शनिस्टने दिलेल्या रूममध्ये त्या मुलीला नेण्यासाठी तो तिला हाताला धरून लिफ्टची दिशेने घेऊन गेला.
लिफ्टकडे जात असतानाच एक बेलबॉय शक्तीच्या जवळ आला. त्याच्याकडून ती रायफलची केस घेऊ लागला.
"नो इट्स ऑलराईट!" शक्ती त्याला म्हणाला.
तसा तो बेलबॉय मागे सरकला.
"सॉरी सर!"
"डोन्ट बी. फक्त काही फ्रेश टॉवेल्स, डबल एक्सेल साईझ जर्किंन आणि ट्रॅकपॅन्ट रूम सव्वीसला पाठवा. आणि हो! एक मेड मॅडमसाठी पाठवून द्या. मॅडमना काय हवंय ते त्या तिला सांगतील. ओके?" शक्ती त्याला पाकिटातून पैसे काढून देत म्हणाला.
"ओ... ओके सर!" बेलबॉय शक्तीने सांगितलेल्या कामाला पळाला.

शक्तीने रूम उघडली. त्याने त्या मुलीला आत जाण्यास फोर्स केलं आणि मागून रूममध्ये एंटर होऊन त्याने रूम लॉक करून घेतली.
"मला वाटलं तू मला तुझ्या घरी घेऊन जाशील..." ती मुलगी चेहरा स्ट्रेट ठेऊन म्हणाली.
कदाचित तिला शक्तीच्या हेतूवर शंका आली असावी...
"तुला असं का वाटतंय की मी याच शहरात राहतो?" शक्तीने देखील चेहरा सरळ ठेऊन विचारलं.
"म्हणजे नाही रहात का?" तिने विचारलं.
"नाही! फ्रेश हो काही खायचं असेल तर ऑर्डर कर आणि झोपून जा!" तो तिला म्हणाला आणि त्याने ती रायफल वॉर्डरोबमध्ये ठेऊन दिली.
"मला का वाचवलंस?" तिने रूक्षपणे विचारलं.
"का? वाचवायला नको होतं?" त्याने तिच्याकडे वळत विचारलं.
"हं!" ती आपल्या दुर्दैवावरच हसली,
"हे तर रोजचं आहे! काय इथून पुढं रोज वाचवायला येरणार आहेस?"
"आता तुला ते काम करण्याची गरज नाही!"
"आणि मग करू काय?"
शक्ती गप्पच राहीला.
"उत्तर नाही ना? मग ज्या सल्ल्यांचं समाधान देऊ शकत नाही असे सल्ले पण देऊ नयेत!" ती थोडं कठोरच बोलली.
आणि जायला तिने दार उघडलं. शक्ती विजेच्या गतीने पुढं झाला आणि त्याने दार लावले आणि तो दाराला सटून उभारला.
"तू कुठंही जायचं नाहीस!" तो तिला बजावत म्हणाला.
"क्लबच्या मॅनेजरला काही पैसे दिले, तर असे समजू नका की तुम्ही मला खरेदी केलं आहे!" ती आवाजात अजूनच कठोरता आणत म्हणाली.
"स्त्रीवर तिच्या इच्छेविना कोण अधिकार गाजवू शकतो? आणि मला तशी अपेक्षाही नाही!" तो म्हणाला,
"मला फक्त तुला मदत करायची आहे..."
हे ऐकून ती मुलगी मागं झाली... एका खुर्चीत अक्षरशः पडली. अचानकच तिला रडू कोसळलं. पण ते दाबून ती फक्त आसवं गाळू लागली. आवाज दाबता येतो... डोळ्यांतून स्रवणारं पाणी कसं अडवणार...
तिची अवस्था पाहून शक्ती देखील गंभीर झाला. तो बेडवर बसला. तिच्याकडे बघत... डोळ्यांत तिच्याविषयी अत्यंत करुणा...
"नांव काय तुझं?" तिला सावरण्यासाठी वेळ देऊन त्यानं तिला विचारलं.
"नम्या..." ती पुटपुटल्या सारखी बोलली.
"आदरणीय!" शक्तीच्या तोडून तिच्या नांवाचा अर्थ बाहेर पडला.
जिच्या नांवाचाच अर्थ 'सन्मानास पात्र' असा होतो, तरीही तिची ही अवस्था पाहून शक्तीला हळहळल्यासारखं झालं.
'तिच्या सद्यपरिस्थितीला तिचं नांव किती विरोधाभासी आहे'... असं क्षणभरासाठी शक्तीच्या मनात येऊन गेलं...
काहीवेळ ते काहीच न बोलता आहे तिथंच, आहे त्याच अवस्थेत थांबून होते. आणि बेलने खोलीतील शांतता भंग केली.
शक्तीने दार उघडलं. दारावर कोणी आहे हे लक्षात घेऊन दाराकडे न बघताच नम्या सावरून बसली. अश्रू पुसून घेतले.
दारावर बेलबॉय होता. टॉवेल्स आणि शक्तीने सांगितलेली कपडे तो घेऊन आला होता. ती त्याने शक्तीच्या हातात ठेवली.
"मेड थोड्यावेळात येईल." बेलबॉय म्हणाला.
"थँक्स!" शक्तीने कृतज्ञता व्यक्त केली.
बेलबॉय स्माईल करून निघून गेला. शक्तीने दार बंद केलं. त्याने नम्यावर नजर टाकली. त्याने टॉवेल्स व कपडे गादीवर टाकले आणि तो बसून राहिला.
ती सावरून बसली असली तरी ती तिच्या दुःखी विचारातून बाहेर आली नव्हती ते त्याने ताडलं. असह्य होऊन तो उठला. त्याने त्याचा ब्लेझर वॉर्डरोबला अडकवलं. हालचाल झाल्याने स्वाभाविक नम्याची मान शक्तीकडे वळली होती.
शक्तीच्या शोल्डर होलस्टरला दोन्ही बाजूला अडकवलेल्या त्याच्या मॉन्स्टर गन्स नम्या पाहत होती. त्या गन्स झाकण्यासाठी शक्तीने अंगात जर्किंन चढवलं.
"प्लिज कुठं जाऊ नको!" तो नम्याला म्हणाला.
आणि दरवाजा बाहेरून लावून घेऊन तो खाली गेला.
"माझ्या रूममध्ये काही चांगलंस खायला पाठवा!" रिसेप्शनिस्टला सांगून शक्ती हॉटेल बाहेर पडला...


त्याने एका लोकल दुकानातून वडापाव घेतला. प्यायला एक जलजीराची 200 मिलीची छोटी बाटलीही विकत घेतली. टाईमपाससाठी काही तरी हवं होतं.

शक्तीच्या हॉटेल रूमबाहेर एक मेड उभी होती. तिनं नॉक केलं,
"रूम सर्व्हिस!" ती म्हणाली.
आतून काहीच उत्तर नाही!
"रूम सर्व्हिस!" अजून मोठ्या आवाजात ती बोलली.
पुन्हा उत्तर नाही. मग काहीवेळ दरवाजा उघडण्याची वाट बघून ती निघून गेली...

खाण्याचं पॅकेज घेऊन शक्ती एका उद्यानात गेला. रात्र झाल्याने ते बंद होतं. उडी मारून त्याने भिंत पार केली होती. मोबाईल काढून त्याने सीसीटीव्ही एप चालू केलं. त्याच्या हॉटेलरूम मधील चित्र त्याला मोबाईल स्क्रिनवर दिसू लागलं... त्याने अडकवलेल्या ब्लेझरमध्ये तो मायक्रो कॅमेरा माऊंट केला होता... वॉर्डरोब बेडच्या उजव्या बाजूला अगदी समोर असल्याने त्याला सगळा व्ह्यू क्लिअर मिळत होता.
वडापाव व जलजीराचा आस्वाद घेत तो रूम मधील हालचालींवर लक्ष ठेवून बसला.
मोबाईलमध्ये त्याला नम्या बेडवर निजलेली दिसत होती. म्हणून मग त्याने थोडावेळ मोबाईल बाजूला केला. त्याने मानेवर लटकत असलेला कॉड मोबाईलशी कनेक्ट केला आणि त्याचे दोन्ही इयरबड्स कानात घातले. ज्यायोगे तिथं काय घडलं, तर ते त्याला ऐकू येत रहावं.
आणि हाती असलेलं त्याचं खाणं तो खाऊ लागला... मिशन पूर्ण होईपर्यंत डायट बियट सगळं तो विसरणार होता...
वडापाव खात असतानाच त्याला काही आवाज ऐकू आल्यासारखं झालं. संभवत: वॉर्डरोब उघडला गेला होता. त्याने कान टवकारले. मांडीवर उपडा ठेवलेला मोबाईल उचलून पाहिलं. त्याची शंका खरी ठरली. कारण कॅमेरा मिस्प्लेस झाला होता. वॉर्डरोब उघडल्याशिवाय किंवा ब्लेझरला हॅट लावल्याशिवाय ब्लेझर हलणं शक्य नव्हतं! शक्ती काळजीपूर्वक पाहत होता.
नम्या हॉटेलच्या लँडलाईनवरून बोलत होती...
"हो मी सेफ आहे! नाही त्याने मला हातही लावला नाही." तिला फोनवर बोलताना शक्ती त्याच्या मोबाईलमध्ये पाहत होता.
पण ती कॅमेऱ्याच्या मध्य टप्प्यात नसल्याने तिची छवी अर्धीमुर्धी दिसत होती. शक्ती निरखून पाहत होता व त्याहीपेक्षा लक्षपूर्वक ऐकत होता... सोबत घेतलेला वडापाव आणि जलजीरा संपवणं चालूच होतं.
"माझं ऐकणार आहेस का? तू मोबाईलमध्ये दाखवली होतीस तशीच रायफल यांच्याकडे आहे! हो काही चूक नाही!"
"काय? गन? नो! डॅनियल तुला माहीत आहे मला तसलं काही बाळगायला आवडत नाही. एक तर हे सुद्धा मी तुझ्या आग्रहासाठी करते आहे!" पलिकडून जे बोललं जाईल त्याला प्रत्युत्तरादाखल ती बोलत होती...
"ठीक आहे! सेफ्टीसाठी मी ठेवून घेईन. पण वापरणार नाही! हिमांशूला पाठवून दे." थोडं थांबून ती वैतागाने म्हणाली होती आणि तिने रिसिव्हर डायलपॅडवर ठेवला.
शक्तीला संताप येण्याऐवजी तो हसला. त्याचा कसला तरी अंदाज खरा ठरला होता...
त्यानं खाणं संपवून पॅकेजेस् कचरापेटीत टाकून दिली. प्लास्टिकसाठी असलेल्या वेगळ्या भांड्यात जलजीऱ्याची बाटलीही टाकली आणि तो आला तसा भिंतीवरून उडी टाकून उद्यानाच्या बाहेर पडला.

तिकडे हॉटेलमध्ये हिमांशू नांवाचा इसम शक्तीच्या रूमचा दरवाजा ठोठावत होता. नम्याने लगबगीने येऊन दार उघडलं. आणि आधी डावीकडे उजवीकडे पाहून शक्ती आसपास नसल्याची खात्री करून घेतली आणि तिने हिमांशूकडे पाहिलं.
हिमांशूने लपवून एक पिस्टल तिला हँडओव्हर केली.
"डॅनियलने त्या माणसाकडून होता होईल तेवढी माहिती मिळवण्याला सांगितली आहे. इंटेलिजन्सला काय समजलंय यावरून पुढील खेळी ठरवायची आहे."
"म्हणून याला जिवंत ठेवलंय?"
"हो! रादर सगळ्यांनाच!"
"ओके! निघ! तो आला आणि तुला बघितलं तर प्रॉब्लेम होईल!"
"जातो, पण लक्षात ठेव! त्याने मिसबिहेव्ह करायचा प्रयत्न केला तर हीचा उपयोग करायला घाबरू नको! डॅनियल सांभाळून घेईल!" त्याने सूचना केली.
"हं!" ती नाराजीने हुंकारली.
तसा तो घाईने पण सावधानतेने निघून गेला.

रात्री खूप वेळभर बाहेर घुटमळून मध्यरात्री तो आपल्या हॉटेलला पोहोचला. आपल्याकडील किल्लीने त्याने नकळत दार उघडलं. आणि आत आला. समोर पाहतो, तर नम्या शांत झोपली होती.
तो बेडला वळून तिच्यासमोरील सेटीवर बसला. झोपेत ती साक्षात सौंदर्यमूर्ती असणारी ती ललना अधिकच निरागस दिसत होती...
पण हिच्या या निरागसतेमध्ये शक्ती अडकणार नव्हता. नाही तर त्याने आधीपासूनच दक्षता बाळगली नसती. त्याने त्याच्या होलस्टरमध्ये अडकवलेली केल-टेक बाहेर खेचली! ती तिच्यावर एम केली. एक डोळा झाकून घेतला. बोट ट्रिगरवर दाब चढवू लागलं आणि एका पॉईंटला...
त्याने बोट रिलीज केलं. ट्रिगरवरचा दाब हटला होता. झटक्याने ट्रिगर पूर्ववत झालं होतं. गोळी सुटली नव्हती! तिला त्याला असंच मारावसं वाटलं नाही.
हिमांशू नांवाचा व्यक्ती नम्याला गन देऊन जाणार होता हे शक्तीने ऐकले होते.
तो जाग्यावरून उठला. त्याने गनसाठी सर्च केलं. तिने सेफ्टीसाठी गन घेतली होती याचा अर्थ तिने ती जवळच ठेवली असणार या तर्काने त्याने ती विसावलेल्या बेडवरच गनसाठी शोधाशोध केली.
तिने गन गादी खाली ठेवणं शक्य नव्हतं. शक्तीने काही गैरवर्तन केलं तर ती हाताशी असावी म्हणून ती अगदीच जवळ ठेवेल. पण मग नक्की कुठं?
शक्तीला जास्त विचार करायला लागला नाही, की शोधावंही लागलं नाही! त्याच्या अपेक्षेप्रमाणे तिने गन उशाला उशीखाली घेतली होती.
शक्तीने काळजीपूर्वक ती आपल्या ताब्यात घेतली आणि तो पूर्वीच्या जाग्यावर आता नम्याच्या गनने तिच्यावर नेम लावून तो बसून राहिला...

नम्याने डोळे उघडले. समोरचं चित्र स्पष्ट व्हायला तिला वेळ लागला. पण जसं ते स्पष्ट झालं; तसं तिला दिसलं, की शक्ती तिच्यावरच गन पॉईंट करून बसला आहे. ती सावध झाली. गडबडीने तिचा हात तिच्या उशाखाली गेला. तिथं काही नव्हतं. ती वेड्यासारखी इतस्थत: तिची गन शोधू लागली. बेडशीट व पांघरूण तिनं अक्षरशः विस्कटलं होतं.
तिची धडपड काही काळ शक्तीने मजा घेत पाहिली आणि...
"ए जरा डोळं उघड! ही तुझीच आहे!" शक्ती इरिटेटेड् चेहऱ्याने म्हणाला,
"आता सांगा आपण इथं का आलात?" शक्तीने गन वर करून थेट तिच्या कपाळावर नेम धरत विचारलं.
ती गप्प होती...
"कुणी पाठवलंय?" त्याने विचारलं.
ती गप्पच राहिली.
"हा डॅनियल कोण आहे?"
ती गप्पच!
"आणि तो हिमांशू?"
ती पुन्हा शांतच... मरणाची भीती मात्र तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती, ती अधिक अधिक गडद होत चालली होती...
"चला! जर तुझा उपयोगच काही होणार नसेल, तर तुला जिवंत ठेवून तरी काय उपयोग?" त्याने स्वतःची केल-टेक काढून त्याला कंप्रेसर लावायला सुरवात केली.
शक्तीचं हे वाक्य ऐकून तर तिच्या चेहऱ्यावरची भीतीची छटा अधिकच गडद झाली.
"मला तुला मारायचं नव्हतं!" ती चाचरत म्हणाली.
"माहीत आहे. पुढं बोल!"
"त्यांनी मला हे करण्यासाठी फोर्स केलं!"
"हे पटत नाही. पुढं!"
"मी खरं सांगते! डॅनियल; तो काही माझा बॉयफ्रेंड नाही..."
"मग?"
"त्याने मला खरेदी केलं आहे!" ती डोळ्यांत आसवं घेऊन ओरडली! कडांना साचलेलं पाणी गालावर ओघळलं...
"माझ्या सुरक्षेची त्याला काही पडलेली नाही. तो माझी काळजी घेतोय कारण तो मला त्याची प्रॉपर्टी समजतोय!" ती चिडून म्हणाली.
हे ऐकून शक्तीला धक्का बसला! त्याने गन बाजूला केली. रिसिव्हर उचलला.
"ऑरेंज ज्यूस रूमवर पाठवून द्या!"

काहीवेळातच दोघे डायनिंग टेबलपाशी होते. रूम सर्व्हीसबॉयने आणून दिलेल्या ज्यूसच्या व्हेसल मधून शक्ती नम्यासाठी आणि स्वतःसाठी ग्लास भरून घेताना नम्याला ऐकत होता...
"माझ्या लहानपणीच माझे आई-वडील वारले. मी ज्या अनाथाश्रमात रहात होती, त्या अनाथाश्रमाच्या सुपरवायझर कदाचित मी सोळा वर्षांची होण्याचीच वाट पहात होती. जशी मी सोळा वर्षांची झाले, तिने मला एका वेश्येच्या हाती विकले..." बोलताना तिच्या डोळ्यांतून अश्रू घरंगळले.
पण तिची पापणी देखील लवली नाही. ती खोल कुठं तरी शून्यात बघत होती...
शक्तीने ज्यूसचा ग्लास तिच्या समोर धरला. तो घेण्याची सूद तिला नव्हती. म्हणून त्याने तो तिच्या समोर ठेवला.
मागील खिशात पाकीट असल्याने असेच बसता येणार नाही म्हणून त्याने ते काढून डायनिंग टेबलवर टाकले. त्यांतील वस्तूंनी पाकीट जाडजूड झाल्याने ते टेबलवर पडल्यावर उघडले गेले. त्यात एका चार-पाच वर्षांच्या मुलीचा पासपोर्ट साईझ पोटो होता. त्या फोटोवर नम्याची नजर पडली. तिने रुक्ष डोळ्यांनी काही क्षण तो फोटो एकटक पाहिला.
"हा डॅनियल कोण आहे आणि तुझी व त्याची ओळख कशी झाली?" शक्तीने तिची तंद्री भंग केली.
भानावर येत नम्याने शक्तीकडे पाहिलं.
"त्या वेश्येने मला तिच्याकडे ठेवून घेतलं. जायला दुसरी जागा नव्हती. बाहेर पडलं तरी जगाच्या वासनेपासून आपण वाचणार नाही याची जाणीव त्या कोवळ्या वयात झाली होती. म्हणून मग मी ते प्राक्तन स्वीकारलं..." ती शक्तीकडे बघून म्हणाली. तिचं बोलणं चालूच होतं...
"आठ-दहा वर्षे तिथं राहिले. या दरम्यान माझ्यासाठी ती अक्का झाली होती... अक्कानंच या काळात मला गाणं नाचणं शिकवलं. याच काळात तिच्या येणाऱ्या गिऱ्हाईकांना..."
शक्तीने तिला पुढं बोलू दिल नाही. तिचा हात घट्ट दाबून त्याने तिला गप्प केलं.
ती जे सांगते आहे ते खरं आहे, की खोटं हे त्याला माहित नव्हतं! पण जरी ही कल्पना असली तरी ही भयाण कल्पना त्याला ऐकायची नव्हती.
आणि जर खरंच वास्तव असेल, तर हे सत्य वदनं तिच्यासाठी किती कठीण असेल हे तो समजून होता. त्याने तिला वाक्य पूर्ण करू दिल नाही. नम्याचा दाटून आलेला कंठ शक्तीने जाणला होता.
"वर्षभरापूर्वी हा हिमांशू डॅनियलला आमच्याकडे घेऊन आला होता. त्याला मी आवडले. त्याने अक्काकडे माझी मागणी केली. तिने मला त्याला सुपूर्द करण्यास नकार दिला. सोपवणार तर कशी होती ती, मी तिच्यासाठी सोन्याची अंडी देणारी...
"मग डॅनियलने तिला खूप मोठी अमाऊंट ऑफर केली. आधीच लोभी असणारी ती, ती ऑफर नाकारू शकली नाही..."
काही वेळाने स्वतःला सावरून एक दीर्घ श्वास तिने घेतला. अश्रूंनी बारीक झालेले डोळे तिने मोठे केले. यामुळे तिच्या कपाळावर आठ्या तयार झाल्या.
शक्ती हे ऐकताना सुन्न होता. त्याला नम्या सारखंच आपलं दुःख सांगून रिकामं होण्याचा मोह देखील झाला. पण काही क्षणच. कारण लगेचच त्याने तो आवरला होता!
"घे, ज्यूस घे!" तो तिला म्हणाला.
नम्याने ज्यूसचा ग्लास उचलला. तिने ज्यूचा एक सीप घेतला. तिची नजर पुन्हा वॉलेट मधल्या त्या मुलीच्या फोटोवर गेला.
"ही मुलगी..." तिने वाक्य पूर्ण न करताच विचारलं. आणि ते करण्याची नम्याला गरजही वाटली नव्हती. एव्हढ्या वरूनच शक्ती काय ते समजणार होता.
"माझी मुलगी! रेवा!"
"कुठे असते?"
"मेलीये! माझ्या एका रायव्हलने माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला संपवलं!" तो जराही विचलित न होता जूसचा घोट घेत निर्विकार म्हणाला.
"तुला जराही पश्चाताप वाटत नाही?" नम्या मात्र विचलित झाली होती!
"हं! रिग्रेट? अजिबात नाही! कामात हे कॉम्प्लिमेंट्री आहे! कामाचाच भाग! आमच्या कामात भिला; तो संपला! ज्याने माझ्या कुटुंबाला संपवलं; मी त्याचा समूळ वंशनाश केलाय!" शक्ती भावनाशून्यतेने म्हणाला.
जणू त्याच्यासाठी माणसं मारणं हे चिलटं चिरडल्यासारखं असावं... आणि त्याचा हाच भाव नम्याच्या शरीरातील प्रत्येक अणूमध्ये कातर भरून गेला...
"तुला सत्य जाणून घ्यायचं आहे ना?" तिने आपली भीती लपवण्याचा प्रयत्न करत स्वतःला शांत दाखवत शक्तीच्या डोळ्यांत रोखत विचारलं.
शक्तीने फक्त मान हलवली.
"इंद्रदत्त वाचस्पती यांना का मारलं हे मला माहित नाही. पण डॅनियलचा या मागे हात होता हे नक्की आहे. त्याने हे स्वतः केलं, की कोणाच्या सांगण्यावरून हे पण मला माहित नाही!" तिने मुद्दाच निकालात काढला.
"माझ्याबद्दल काय काय माहीत आहे त्याला?" शक्तीने ज्यूस पितच विचारणा केली.
"विशेष काही नाही. तो तुला टेस्ट करत होता."
"म्हणजे मी नक्की कोण ते त्याला माहित नाही?"
"नाही पण त्याला संशय आहे, की तू पोलिसांसोबत आहेस!"
शक्ती खुदकला.
"आणि म्हणून माझी माहिती काढायला त्यानं तुला माझ्याकडे पाठवलं?" शक्तीने हसत विचारलं.
नम्याने क्लुलेस मान हलवली.
"तू पोलीस आहेस?" तिने शक्तीच्या नजरेला नजर देत विचारलं.
"नाही!" चेहऱ्यावर हास्य घेऊन शक्ती तिला म्हणाला.
"मग तू यांच्या मागे का लागला आहेस?"
"मी कोणाच्याही खूनाचा तपास करत नाही! इन्फॅक्ट वाचस्पतीच्या मारेकऱ्याला कळंबा जेल बाहेर मीच संपवलं आहे!" शक्तीने खोटा बॉम्ब फेकला.
पण तो फुटला बरोबर!
"तू?" नम्याने आश्चर्यकारक उदगार काढले!
"हो!"
"मग डॅनियलला हे कसं माहीत नाही?"
"कारण मला एसपी सुशेन मित्रने अपॉईंट केलं होतं. डॅनियलने ही जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती. मी जॉब डॅनियलचाच मार्गी लावला, पण आमच्यात इंटरमेडीएट हा सुशेन मित्र होता. मला पैसे, बाईक व रायफल त्यानेच पुरवली होतीत!"
"म्हणजे डॅनियलची तुझ्या बद्दलची शंका..."
"गौण आहे!" शक्तीने तिचं वाक्य पूर्ण केलं. ती कदाचित दुसरा कोणता तरी शब्द वापरली असती, पण अर्थबोध हाच होता!
"मग तू आता डॅनियलच्या मागावर का आला आहेस?"
"मला पर्मनंट जॉब हवा आहे. माझा रेग्युलर इम्प्लॉयर सुशेन तर मेला; आता मी जगणार कसा?"
"तुला डॅनियलचा पत्ता कसा मिळाला?"
"सुशेनने शेवटच्या क्षणी बोलता बोलता मला सांगितलं होतं. की त्याने ज्याच्याकडून जॉब घेतला आहे, तो त्या बार मध्ये येत असतो. म्हणून मी चान्स घ्यावा म्हंटलं. भेटला तर कामाबद्दल बोलता येईल हा विचार!"
"मग सुशेनच्या सांगण्यावरून हॉस्पिटलमध्ये मेला तो?"
"तो मला पकडलेला ऑफिसर होता! मला कधीच पाहिलं नसल्यानं आणि सुशेनच्या इन्फॉर्मेशनवरून डॅनियलच्या माणसांनी मी समजून त्या ऑफिसरला संपवलं! आम्ही दोघं एकाच वॉर्डमध्ये होतो. सुदैवाने मला चेकअपला नेलं होतं, तेव्हा मर्डर अटेंप्ट झाला. म्हणून माझ्या जागी वॉर्ड एकटाच असलेल्या ऑफिसरला मी समजून मारण्यात आलं! मी नक्की कसा दिसतो हे माहीत नसल्याने मारेकऱ्याचा हा गोंधळ झाला होता...
"ही गोष्ट जेव्हा मला समजली तेव्हा मी सुशेनपाशी पोहोचलो. मीच त्याला मारणार होतो. मला पकडला गेल्याने त्याचं नांव बाहेर येईल या भीतीनं त्यानं माझा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता. आणि डॅनियलला माझी टीप दिली होती. पण मी स्वतःला वाचवलं आणि त्याच्या समोर उभा राहिलो. मला बघून तो इतका घाबरा की स्वतःच आत्महत्या केली! त्याला माहित आहे, आमच्या धंद्यात गद्दारीची सजा; मौत! मग तो सख्खा बाप का असेना!"
"तू डेव्हिल आहेस!" ती शक्तीच्या क्रूरतेवर विषण्ण होत म्हणाली.
"हा!" सोमेश हे छद्मनाम धारण केलेला शक्ती अट्टहास करत हसला व म्हणाला,
"तो तर मी आहेच! आणि जर तुझ्या डॅनियलने मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न केला, तर तोही लवकरच सुशेनला भेटेल; नरकात!"
"तू मला..." तिला वाक्य पूर्ण करण्याचं धाडस झालं नाही...
पण तिचा मतितार्थ समजून शक्ती पुन्हा हसला.
"तू अजून जिवंत नसतीस!"
हे ऐकून तिने सुटकेचा निःश्वास सोडला... पण काय ती खरंच शक्तीच्या कचाट्यातून सुटणार होती...
हे काळच सांगेल...!

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED