स्पर्श - भाग 25 Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्पर्श - भाग 25

जेव्हापासून जाणत वय झालं तेव्हपासून ऐकत आलो होतो की इथे हजारो वर्षांपासून पुरुषांनी स्त्रियांवर फक्त अत्याचार केले आहेत ..जर विचार केला तर हे खरं आहे पण आज याच पुरुषाला एका स्त्रीला अस्तीत्व मिळवून द्यायचं होत आणि तिच्या प्रत्येक पावलावर मी साथ देण्यासाठी तयार झालो ..कधीच वाटलं नव्हतं की ती पुन्हा एकदा कॅनडाला परत येईल पण ती आली ..एकदा लग्न करून आली होती तेव्हा सर्वच तिच्या सोबत होते पण यावेळी येताना तिला जगण्याचीही इच्छा नव्हती ..तेव्हा मानसीला जग किती सुंदर असत हे दाखवणं गरजेचं होतं ..आयुष्यात दुःख कुणाला नसतात पण जो या दुःखांशी संघर्ष करतो आणि त्यांना हरवतो त्यालाच जीवन जगण्याचा अधिकार असतो हे तिला दाखवायचं होत ..

किनारो पे बैठे
नौका पार नही होती
कोशीष करणे वालो की
कभी हार नही होती ..

इथे आल्यापासून तिने शिक्षण जवळपास सोडूनच दिलं होतं ..दिवसभर पुस्तकात गुंतून बसणं तिला आवडत गेलं ..तिला खर तर इंडिपेंडेंट बनवायचं होत पण सध्या तिची स्थिती तेवढी चांगली नव्हती त्यामुळे मानसिक दृष्ट्या सक्षम बनविण्यावर जास्त भर देऊ लागलो ..मागील काही दिवसात ती तणावात फारच बुडाली होती त्यामुळे सर्वात आधी ट्रिटमेंट सुरू केली ..तिला दर रविवारला ट्रिटमेंटला घेऊन जायचो आणि सुरुवातीला अवघळणारी मानसी डॉक्टरांसमोर एकदम बिनधास्त वागू लागली ..असच एकदा डॉक्टरकडे घेऊन गेलो ..मी बाहेर उभा होतो आणि डॉक्टरांनी तिला विचारल , " मानसी तुला एक स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली तर काय करशील .." आणि त्यावेळी तिने उत्तर दिल , " आजपर्यंत एकत आले होते की फक्त प्रेम असा एक आनंद आहे ज्याच्या स्पर्शाने व्यक्ती बेभान होऊन जगू लागतो ..प्रेम मला नक्कीच मिळालं पण ज्या स्पर्शासाठी संपूर्ण जग इतक आतुर असतो तो स्पर्श मला अनुभवायचा आहे ..इंद्रधनुष्यातील सातही रंग स्वतःवर उधळून घ्यायचे आहेत ..लग्नानंतर जेव्हा एक पुरुष आणि स्त्री मधुचंद्राच्या रात्री एकमेकांचे होऊन जातात आणि त्यांच्यात कुठल्याही दुराव्याला जागा नसते तो तो रंग मला स्वतात सामावून घ्यायचा आहे ..आवडत्या व्यक्तीच्या ओठातून तो गुलाबी पाकळ्यांचा रंग शोषून घ्यायचा आहे..एका वाक्यात सांगायचं म्हणाल तर ज्या स्पर्शातून संपूर्ण जगाची उत्पत्ती होते तो स्पर्श मला जीवन बनवून घ्यायचा आहे आणि तेही माझ्या लेस्बियन पार्टनरसोबत .."

संपूर्ण जग जेव्हा तिला विचित्र मानायच तेव्हा बिचारी ती कोमेजून गेली होती पण आज ती जेव्हा बेभान होऊन जगत होती तेव्हा तो विचित्रपणा कुठेतरी हरवला होता ..तिने निसर्ग नियमाला स्वीकारल आणि तिलाही स्पर्श या शब्दाचा अर्थ कळून चुकला होता ..जेव्हा एखाद्या पुरुषाच आकर्षण स्त्रीकडे असते आणि तो जशी स्पर्शाची व्याख्या करतो तशीच तिनेही व्याख्या केली होती ..आणि आपण समाज तिने निसर्ग नियम तोडून आपण मानवांनी तयार केलेल्या नियमात बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतो ..आज पुन्हा एकदा मी मानसीकडून प्रेमाचे विविध रंग शिकत होतो आणि मानसीबद्दल अभिमान वाटत होता ..इतर स्त्रियांप्रमाणे तीही पतीकडून होणारा शारीरिक अत्याचार सहन करू शकली असती पण तिने सांगितलं की हा अत्याचार आता मला सहन होत नाही आणि खरच सुरुवातीला जरी वाईट वाटलं तरी कळून चुकलं की तो शारीरिक आनंद हा फक्त पुरुषालाच सुखावू नये तर तो स्त्रीलाही सुखावणारा असावा ..

ती आता हळूहळू खुलू लागली होती ..डॉक्टरांशी तिचा सतत संपर्क सुरू असल्याने तो मानसिक तनाव देखिल हळूहळू कमी होऊ लागला होता ..मानसी दिवसभर पुस्तकात रममाण व्हायची आणि रात्री आम्ही गप्पा मारत बसायचो ..जुने दिवस आठवून तिला त्याच क्षणात नेऊन जगण्याची आशा तिच्या मनात निर्माण करू लागलो ..सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ती आता स्वप्न पाहू लागली होती ..ज्या शालेय , तरुण वयात तिच्या स्वप्नांवर बंधने घालण्यात आली होती त्याच साऱ्या स्वप्नानी आता झेप घ्यायला सुरुवात केली ..एखादं पुस्तक वाचताना त्यातलं पात्र ती लक्षात ठेवत असे आणि त्या पात्रासारखं जगता येण्याची स्वप्ने पाहू लागली ..मानसी लेस्बियन आहे हे सिक्रेट फक्त आमच्या दोघांत होत ..आई - बाबांना नक्कीच सांगायचं होत पण त्यासाठी मानसीने स्वतःच्या पायावर उभ राहणं गरजेचं होतं ..तिला घरचे कसे रिऍक्ट करतील याची सतत भीती वाटत असायची पण मला माहित होतं की आईने तिला पाहताच झप्पी दिली असती ..शिवाय मलाही तिच्यासोबत हे काही क्षण जगता येणार होते म्हणून मी त्यांना सांगण्याची वाट पाहू लागलो ..

मानसी घरात बसून - बसून बोर झाली होती हे मला जाणवत होतं म्हणून एक दिवस पुन्हा लेक लुईस ब्लाफ नॅशनल पार्कची सैर करण्याची तयारी सुरू झाली ..तिला तिकडे जाण्याबद्दल सांगितलं आणि ती स्वताच जाण्याची तयारी करू लागली ..तस पाहता प्रत्येक वेळी मलाच गाडी चालवावी लागत असे पण यावेळी ती जबाबदारी मानसीने घेतल्याने मी फारच खुश होतो ..या संपूर्ण काळात फक्त मानसीच तणावात होती अस नाही तर मीही होतो फक्त तिची स्थिती माझ्यापेक्षा जास्त खराब असल्याने मला त्यातलं काहीच दाखवता येत नव्हतं..आज ती गाडी चालवत होती आणि मी बाहेरील निसर्गाचा आनंद घेण्यास सज्ज झालो ..बाहेर ढग दाटून आले होते आणि कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली ..मुळात आम्हाला त्या पावसात चिंब भिजूनच आमचा आनंद साजरा करायचा होता ..मधातच रिमझिम पाऊस सुरू झाला आणि हिरवागार निसर्ग आणखीनच बहरला ..कुठेतरी दूरवर पक्षि आपल्या घरट्यात जाण्यास आतुर होते व आपल्या मुलांना घराकडे येण्यासाठी आवाज देत होते आणि त्यांचा तो मंजुळ आवाज मनाला सुखावून जात होता ..कधी त्या रिमझिम पावसाच्या धारा चेहऱ्यावर येऊन पडायच्या आणि मनातला कोपरा नि कोपरा सुखावून जायचा .पहिल्यांदा अस होत होत की मी स्वताला हरवून बसलो होतो आणि ती माझ्याकडे पाहत होती ..आणि मी मात्र त्या धुंदीत स्वताला झोकून देत होतो ..काहीच वेळात तो पार्क आला..गाडीतून उतरलो ..त्या रिमझिम पावसाने वातावरण संपूर्णतः रोमँटिक केलं होतं ..तर संपूर्ण रानात विविध पक्षांचे आवाज घुमू लागले ..आम्ही त्या रिमझिम पडणाऱ्या पावसाचे थेंब चेहऱ्यावर घेऊन पावसाचा आनंद लुटत होतो ..मागील काही दिवसाचा काळ हा आमच्या दोघांसाठीही खूप कठीण गेला होता ..नाही म्हटलं तरी दोघेही फार तणावग्रस्त झालो होतो तेव्हा हा निसर्गच आता आम्हाला त्या सर्व तणावातून बाहेर काढु शकणार होता ..आम्ही एक शब्दही न बोलता त्या निसर्गाचा आनंद लुटून घेत होतो ..काही वेळ तसाच गेल्यावर आम्ही त्या झिलच्या किनाऱ्यावर पोहोचलो ..झिलमधील पाणी बऱ्याच प्रमाणात वाढलं होत ..तिने आपल्या पायातल्या सॅंडल काढल्या आणि आपल्या पायांनी ती पाण्यासोबत खेळू लागली ..तिच्या पैंजनाचा आवाज पुन्हा त्या वातावरणाला आणखीनच रोमँटिक बनवत होता ..मीही तिच्याजवळ जाऊन बसलो आणि मानसी मला म्हणाली , " अभि तुला माहिती आहे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर चूक कोणती ? ..तुझ्याशी लग्न ..एखाद्या दुसऱ्या मुलाशी लग्न केलं असत आणि मी त्याला हे सर्व सांगितलं असत तर त्याने संपूर्ण जगाला ओरडून सांगितलं असत आणि माझ्या इज्जतीचे धिंडवडे उडवले असते ..पण देवाला हे मान्य नव्हत म्हणून त्याने तुला आयुष्यात पाठवलं ..जेव्हा - जेव्हा तुझ्याबद्दल विचार करते तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ..ती ही की देवाने सर्वाना समान बनविल ..मग सर्वच पुरुष सारखेच ..काही समाज काय म्हणेल म्हणून आपल्या मुलीला मरण्यासाठी सोडून देतात तर काही तुझ्यासारखेही आहेत जे समाज काय म्हणेल यापेक्षा एक व्यक्ती जीवन जगावी म्हणून धधपड करतात ..खर तर ती व्यक्ती मेली काय , जिवंत असली काय याने काहीच फरक पडणार नाही पण तुला पडतो ..खर सांगू हे सर्व संस्काराचे खेळ आहेत ..माणूस नक्कीच सारखे आहेत फक्त काहीना चुकीचा विचार सोडायचा नाही तर काहींना स्वताला त्रास देऊनही माणसांना जपता येत ..अभि खूप खूप धन्यवाद माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि मला माझं अस्तित्त्व शोधण्यास मदत करण्यासाठी .." ..आज कितीतरी दिवसांनी तिला मी अस भरभरून बोलताना पाहत होतो ..आज तर मानसीचा मूड खूपच छान होता ..तिच्या आवडीचे सर्व गाणे ती मला स्वतःच्या आवाजात एकवत होती आणि तिच्या स्पर्शाप्रमाणे मी तिच्या आवाजातल्या कशीषला देखील मनाच्या अथांग सागरात कुठेतरी लपवून ठेवू लागले ..कारण हेच काही क्षण होते जे मला सदैव तिची आठवण करून देणार होते ..त्या पावसाचा आनंद तर घेतला पण फारच भिजलो होतो ..त्याच अवस्थेत आम्ही घरी पोहोचलो ..
खूपच जास्त भिजलो असल्याने दोघाणीही केस टॉवेलने पुसून घेतले ..मी लगेच कपडे चेंज करून बसलो ..हॉलमध्ये बसलोच होतो की माझा फोन रिंग करू लागला ..हॉलमध्ये बघितला तर कुठेच फोन दिसत नव्हता त्यामुळे घाईघाईने बेडरूममध्ये शिरलो ..आत जात नाही की मानसी अर्धवस्त्रावर दिसली ..ती माझ्याकडे पाहत होती तरी काहीच तिने कुठलीच हालचाल केली नाही ..तीच जरी मी आकर्षण नसलो तरी ती माझं आकर्षण नक्कीच होती ..याआधी ती अशी दिसली असती तर मी तिला स्वतात सामावून घेतल असत पण यावेळी परिस्थिती वेगळी होती ..मी कसतरी मागे पलटुन गॅलरीमध्ये पोहोचलो ..कुठल्यातरी विचारात गुंतलोच होतो की मानसी मागून येत म्हणाली , " असा पळून का आलास ? स्वतःचा मोबाइल तरी घेऊन यायचं होत .." आणि मी शांत होत म्हणालो , " महत्त्वाचा कॉल नव्हता ग म्हणून नाही घेतला .."

थोडा वेळ शांततेत गेला आणि मानसी म्हणाली , " अभि केव्हापर्यंत असाच एकटा राहशील ..मला घटस्फोट देऊन दुसरं लग्न करून टाक .." आणि मी तिच्याकडे पाहत म्हणालो , " मानसी मला तुला काय म्हणायचं आहे ते सर्व कळत आहे आणि काळजी नको करू मी लग्न करणार आहे ..मलाही आता आयुष्य एकट्याने जगणं होणार नाही पण आधी तू सेटल हो मग बिनधास्तपणे लग्न करेल ..त्याची काळजी नको करू .."

ती पुन्हा एकदम शांत होत म्हणाली , " अभि तू मला आता त्या स्थितीत पाहिलं तेव्हा काही क्षणांसाठी ते भाव निर्माण झाले न तुझ्यात ..मला माहित आहे तू तुझ्या मनातलं कधीच सांगत नाहीस पण तुझ्यासोबत राहून थोडफार तुला ओळखायला लागले ..तू मला आयुष्यभराचा आनंद दिला आहेस आता माझी वेळ आहे ..मला नाही माहीत मला आताही तुझा स्पर्श आवडेल की नाही पण आज फक्त तुझ्यासाठी मी हे माझं शरीर तुला अर्पण करायला तयार आहे ..अभि तू जिच्यावर प्रेम केलंस तिला स्वतात सामावून घेऊन स्वतःलाही थोडा फार आनंद दे ..आजही मी तुझी बायको आहे सो मी घेईल स्वताला सांभाळून "

मी तिच्याकडे पाहू लागलो ..आता माझा एक निर्णय त्या टिपिकल पुरुषात आणि माझ्यात काय फरक आहे ते सांगणार होता ..मी तिच्या शब्दात वाहवत जाणार होतो की तू चुकीची आहेस अस समजावून संगणार होतो.. हेच पाहायचं होत ..भावना प्रेमावर जिंकणार होत्या की ते निरागस प्रेम जिंकणार होत ज्याला शरीराची भूक मान्य नव्हती हवं होतं ते तीच मन जपन ? ..मी काही क्षण विचारात गुंतलो आणि काहीच वेळात माझं उत्तर येणार होत..

क्रमशः ..