Shapit Kalakar books and stories free download online pdf in Marathi

शापित कलाकार


त्या दुपारी मेघा जराशी घाईतच दिसत होती. सकाळचा नवऱ्याचा डबा, दुपारचे जेवण, कपडे-भांडी, घर आवरणं सगळं झालं होतं. तरीही नवऱ्याने फोनवर 'संध्याकाळी कामातले मित्र घरी जेवणासाठी येणार आहेत' असे सांगितल्यापासून मेघाला काय करू आणि काय नको असे झाले होते.

मेघा तशी एक उत्तम गृहिणी होती. घर टापटीप ठेवण्याची तिची आवड लहानपणापासूनची होती. इतकेच काय तिची रंगांबाबतची निवडदेखील उत्कृष्ट अशी होती. घरातील भिंतींचा रंग, पडद्यांचे रंग त्यावरची नक्षी अतिशय बारकाईने विचार करून तिने निवडले होते, कपाटात कुठली वस्तू कुठे असावी, कशी असावी, कोणत्या दिशेच्या भिंतीवर कोणते चित्र लावायचे, फेंगशुईच्या वस्तूंचा घर सजवण्यासाठी कसा वापर करावा या कला तर एखाद्या वास्तुविशारदाप्रमाणे तिला अवगत होत्या.

घरातली एकूण एक कामे मेघा करायचीच. पण त्यातूनही तिने आपल्या आवडीप्रमाणे मन गुंतवून घराचा एकएक कोना कल्पकतेने सजवला होता. घर म्हटले की फक्त चार भिंती थोडेच येतात, घरातल्या माणसांसकट एकएक निर्जीव वस्तूही त्या घराचाच भाग असते. मग अश्या वस्तू जागच्याजागेवर असणे, त्यातही एखादी नवी कल्पना लढवून कमीतकमी जागेत पाहणाऱ्याला आकर्षक वाटेल अश्याप्रकारे त्यांची मांडणी करणे, मेघाचे हे आवडते छंद होते. तिच्या म्हणण्याप्रमाणे स्वतःच्या घराची काळजी स्वतःच नको का घ्यायला.. घरालाही भावना असतात, त्यालाही वाटत असेल आपण सर्वांना आवडावे असे.

मेघाने जो छंद जोपासला होता त्यामुळे घरात नेहमीच सुंदर वातावरणनिर्मिती असायची. संध्याकाळी जेव्हा नवरा घरी यायचा तेव्हा स्वच्छ, नेटके घर प्रसन्न अनुभव द्यायचे. कामातला शीण कुठल्याकुठे पळून जायचा. त्याच्यासाठी हे नेहमीचे होते. त्याला वाटायचं घर चांगल्या भागात घेतल्याचे हे फळ आहे.

आज नवऱ्याचे मित्र घरी येणार म्हटल्यावर खमंग जेवणाचा बेत मेघाने आखला होता. मेघा स्वयंपाकही उत्तम बनवायची. 'तुझ्या हाताला फार छान चव आहे' असे म्हटले जाते, पण खरेतर असे काहीच नसते. स्वयंपाक करताना मन लावून आपल्या प्रियजणांसाठी प्रेमाने करायला घेतलेले पदार्थ उत्तमच बनतात. मेघाने बनवलेली चपाती, भाकरी गोलच व्हायची, कारण तिच्यासाठी ते काम नसून कला होती. तसेच नवऱ्याच्या आवडीनिवडी जपून त्याच्यासाठी बनवलेले पदार्थ रुचकर आणि चविष्ठ तर असावेच पण त्यातून त्याच्या उत्तम स्वास्थ्यासाठीही लाभ व्हावा यासाठी मेघा विशेष काळजी घायची.

सायंकाळीचा कार्यक्रम छानपैकी उरकलाच होता. जेवणानंतर आता मित्रांची मैफिल संपत आली होती. नवऱ्याच्या मित्रांनी घराची आवर्जून स्तुती केली होती. जेवणासाठी आमंत्रण दिल्याने नवऱ्याचे आभारही मानले होते. मेघा सारंकाही ऐकत गालातल्या गालात हसत होती. निरोप देण्यासाठी ती बाहेर आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे हास्य प्रसन्न करणारे होते.

"मित्रा, तुझे घर बाकी मस्तच आहे.. खूप आवडले यार.. " एक मित्र म्हणाला.

"अरे.. आपल्या कंपनीची मेहेरबानी.. महागड्या भागात घर घेतले की तिथे अगोदरपासूनच सर्व सोयीसुविधा असतात.. " नवरा हसून म्हणाला.

"कंपनी विशेष काय करते रे आपल्यासाठी.. ती स्वतःचा फायदा पाहते.. तू मेहनती आहेस त्याचेच हे फळ.." पहिला मित्र म्हणाला.

"जेवण पण फारच आवडले यार.. कसले रुचकर पदार्थ होते.. चव अजून जिभेवर आहे.. वहिनी कोणते मसाले वापरता.. माझ्या बायकोला पण सांगतो मी.. " दुसरा मित्र आभार व्यक्त करू पाहत होता.

"थँक्स यार, ते काय रे.. महागडे मसाले घातले की बनते जेवण चांगले.. आजकाल सगळे मसाले तयार मिळतात.. " नवरा उत्तरादाखल म्हणाला.

मेघाला कसेसेच झाले, तिच्या मनात विचारांची वादळं घोंगावू लागली.

नवऱ्याचे मित्र आले तसे निघून गेले. तिच्या मसाल्यांचे गुपित ती त्यांना सांगू शकली नाही.

"घराच्या जागेपेक्षा घरातील इतर गोष्टींमुळे त्याला शोभा येते.. जागा महाग असो की स्वस्त, घर आपण ठेऊ त्यावर त्याचं घरपण दिसतं ना.." तिने त्याला प्रेमाने विचारले.

"घरातल्या बाकी गोष्टी सहज विकत घेता येतात.. महागड्या जागी घर घेणं सगळ्यांना जमत नाही.. खूप मेहनत केली आहे मी तेव्हा कुठे माझं स्वप्नातलं घर मी घेऊ शकलो.." त्यांच्या बोलण्यात आणि नजरेत पुरुषी अभिमान आला होता.

"तुझं घर.." ती पुटपुटली पण त्याच्यापर्येंत तिचे शब्द पोहोचले नाहीत. तो कामातल्या दगदगीने थकला होता. तिचे हात मात्र सकाळपासून यंत्राप्रमाणे हालचाल करूनही अजून थकले नव्हते. नोकरी करणाऱ्या माणसांचे काम दिसून येते. त्यांची दगदग समोरच्याला जाणवते. घरातली कामे कधीच दिसून येत नाहीत वा त्या कामांनी थकायलाही होत नसावे.

घरातल्या कामांपासून नोकरी करणाऱ्या स्त्रिया तरी कुठे चुकलेत. असे वाटते रोजगार क्षेत्रात पाय ठेवला म्हणजे स्त्रियांना खूप सारे फायदे झाले, परंतु वास्तव हे आहे की रोजगार फक्त त्यांची आधुनिक काळातील गरज आहे. त्यांची पूर्वीची जी कामे होती ती आजही तशीच आहेत. रोजगार मिळाला म्हणून सर्वच स्त्रियांनी घरातली कामे करणे सोडले नाही.

डोळ्यांसमोर पडलेला भांड्यांचा पसारा इत्यादी उरकून मेघा सरळ झोपायला आली. नवरा मित्रांसोबतच जेवला होता, थकव्यामुळे तो लौकर झोपायला गेला. एकट्याने जेवण्याची तिची तयारी नव्हती. किंबहुना आज तिची जेवण्यावरची इच्छा उडाली होती. रात्र कूस बदलण्यात हळूहळू पुढे सरकत होती. विचारचक्र सुरू होतं, जे एकेका गोष्टीची आठवण करून देत होतं, मन सुन्न करत होतं.

तिला माहेरचं घर आठवलं. किती आवडीने ती स्वतःची, आईबाबांची खोली सजवायची. कितीकिती वेळ कलाकुसर करत तिने छानछान वस्तू बनवल्या होत्या. नवीन नवीन कल्पना वापरून घरात आनंदमय वातावर्निर्मिती करणाऱ्या गोष्टी आणल्या होत्या. पण लग्नाच्या काही दिवस आधी तिला वास्तवाची जाणीव झाली होती की जे घर ती इतके दिवस मनापासून सजवत होती ते तिचे नव्हतेच, ते तिच्या बाबांचे घर होते.

शिवाय नवऱ्याचे घर ते आपले घर हा भ्रम ही आजच्या घटनेमुळे दूर झाला होता. आपलं सर्व कौशल्य पणाला लावून जपलेल्या छोट्या छोट्या गोष्टी तिच्या कधीच नव्हत्या. असं वाटते, ती मनापासून करत असलेली प्रत्येक गोष्ट निव्वळ वेळ घालवण्याचा एक प्रयत्न असावा. तिच्या गोल गोल भाकरीचंही विशेष कौतुक कधी होत नाही कारण कितीही केलं तरी भाकरी पोटातच जाणार आहे, प्रदर्शनात ठेवण्याजोगी नाहीच.

पदार्थ कितीही रुचकर झाला तर त्यात काय विशेष..! म्हणजे तिने वापरलेल्या मसाल्यांमुळे जेवण रुचकर होते. तिचं त्यात विशेष असं काहीच नव्हतं. घर महागड्या जागेवर घेतले म्हणून छान वाटत होते. या दिशेने छान वारा येतो, त्या दिशेने सूर्यप्रकाश येतो परंतु तो वारा अथवा सूर्यप्रकाश असह्य होऊ नये यासाठी तिने केलेल्या प्रयत्नांना कुठे विशेष महत्व लाभते.

म्हणूनच बाईचं स्वतःच असं घर नसतं. तिने कितीही ते सावरण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचं श्रेय तिच्या वाट्याला येत नाही. स्त्री अशी कलाकार आहे जिची कला दिसण्यात येत नाही. आपल्या माणसांची काळजी घेणं, त्यांना हवं नको ते पाहणं, पाहुण्यांचे स्वागत करणं, रोजची न चुकणारी कामं वेळेत पूर्ण करणं, नाती जपणं अशी कितीतरी अगणित कार्यें ज्यात कधी दिखावा नसतो, तर तिची मेहनत असते. स्वतःला झोकून एखादे काम उत्कृष्ट करण्याची ती कला असते.

शिवाय या कलाकाराला आपल्या कलेपासून होणाऱ्या लाभाची चिंता नसते. या कलेच्या मोबदल्यात पैसाही नको असतो. प्रेमाचे, कौतुकाचे काही शब्द तिला जोमाने आपली कला जपण्यासाठी आधार देत असतात. पण असा योग क्वचितच या कलाकाराच्या वाट्याला येतो, जेव्हा तिच्या घरातल्या कामाची दखल घेतली जाते.

अशी जगातली सर्वश्रेष्ठ कला जोपासून प्रत्येक स्त्री आपलं आयुष्य जगत असते. माफ करा, 'आपलं' असं सुद्धा नाही म्हणू शकत. तिचं आयुष्य तरी तिचं स्वतःचं कुठं असतं..?


समाप्त

निलेश देसाई

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED