"कालपर्यंत सर्व छान होतं मग आज अचानक असं काय झालं", मनात राहून राहून विचारांच काहूर माजलेलं. डोकं हळूहळू सुन्न होत चाललं होतं. "असं कसं होऊ शकतं, अगदी कालचीच रात्रसुद्धा प्रेमाच्या वर्षावात आम्ही न्हाऊन गेलेलो". "सगळं काही आलबेल होतं तरीही का...?"
"च्या आयला, डोक्याचा भुगा होत आहे....? "का माझी मेंदूची नस फाटणार तर नाही ना..." सर्रर्रर्र्र... अंगातनं काटाच गेला...." "अर् नको, त्यापेक्षा मी आत्महत्या करतो"
"मी जातेय......." तिचे शब्द कानांच्या ओबडधोबड एकेका पाकळीवर आदळत स्वतःचेच प्रतिध्वनी निर्माण करत अजूनही कानावरच रेंगाळत होते. आणि ते ऐकत ऐकत माझ्या मनातही तशीच वादळं घोंघावत होती.
"ती....." वर्ष पण झालं नव्हतं आमच्या लग्नाला.. मस्त चालला होता आमचा सुखी संसार.. ज्यात रग्गड नसला तरी मजा मारण्याइतपत तर नक्कीच पैसा होता. सर्वकाही दोघांच्या मनासारखेच चालले होते. सात महिन्यांपूर्वीच लव्ह मॅरेज झालेलं अन् आज हे असं....
काही कळायला मार्ग नव्हता. मी तिच्याकडे पाहीले, माझ्याकडेच चेहरा करून झोपलेली. 'किती निरागस चेहरा... गालावर आलेल्या तीच्या केसांचा झूबका मी मागे केला. पून्हा वर छताकडे डोळे करून मी माझ्याच विचारात हरवलो. "नाही, मला आता कारण शोधावेच लागेल की नेमकं ही मला सोडून का जातेय." माझ्या विसरभोळेपणामूळे कदाचित.. पण नाही.." , "मी तितकाही काही विसरत नाही फक्त शंभरातल्या चारपाच गोष्टी सोडल्या तर..." "अरे हो, पण त्याच चारपाच गोष्टी महत्वाच्या असतात..." मी स्वतःच प्रश्न आणि उत्तर खेळत होतो.
अचानक आठवलं, मी जरा जास्तच काळजी करायचो तिची. अन् नेमकं हेच तीला आवडायचं नाही. म्हणजे समजा ती कुठे नवीन अनोळखी जागी गेली आणि तीचा मोबाईल नाही लागला तर माझा जीव वरखाली होतो. अन् घरी आल्यावर तीला जाब विचारला तर बोलायची.. "एवढं काय त्यात..", "झाला मोबाईल बंद..".. ओल्या हातांनी लाईट लावणे, ट्रेनमध्ये दरवाज्याजवळ उभे राहणे इत्यादी इत्यादी. असे बरेच किस्से असायचे. असो तीला माझ्यातल्या या गोष्टीचं कौतुकही वाटायचं आणि रागही यायचा. कधीकधी चिडायची "किती समजावतोस रे..! मी काय लहान आहे का?" कधी प्रेमाने बोलायचीही, "तू जितका मला जपतोस तितकीही मी लहान नाही.." "पण तूझ्याशी लग्न करून मला माझं लहानपण पुन्हा अनुभवायला मिळतय."
ते ऐकून मध्येच माझ्यातला बाप जागा व्हायचा. हो.. आहेच माझ प्रेम तिच्यावर तितकं. ती नजरेआड झाली की जीव कासावीस होतो.. नाही करमत तिच्याशिवाय.. नकळत तिला दुखू-खूपू नये म्हणून तळमळतं मन. ती नाहीतरी बराच हलगर्जीपणा करते स्वतःबाबतीत. जेवण बनवताना तेलच काय हातावर उडवेल, भाजीसोबत बोट काय कापेल. मग काय मलाच नको का घ्यायला तिची काळजी..
असाच मी तीला जपण्याचा शक्य तितका प्रयत्न करतो.. ओहह् हेच कारण असू शकेल.... एखाद्याला आवडतं कुणी आपली काळजी केलेली.. पण ते जास्त झाले की मग कुठेतरी टोचायला लागतं. आणि मला वाटतेय माझ्याबरोबर तेच झालेय.. मी जरा जास्तच तर नाही करत ना कधी कधी.. तीने सांगितलेल्या आणि माझ्या मनाप्रमाणे तीचे नूकसान करणार्या (तीच्या मनाप्रमाणे एकदम क्षुल्लक) छोट्याशा गोष्टीही मला मोठ्या वाटतात.
पण आजचं सगळंच वेगळं होतं. ती मला सोडून जाणार.. म्हणजे सर्व संपल.. तीने सांगितल्यापासून मनाची ही चलबिचल चालू होती. आणि सुरूवातीपासून ते आतापर्यंत जे काही तूम्ही वाचलेय ते धडाधड एक संपले की दूसरे माझ्या डोक्यात अग्नीवर्षावासारखे आदळत होते.
मन भरून आलं होत.. तीला उठवावे आणि सांगावे की "नको जाऊस मला सोडून.. मला गरज आहे तूझी..." पण गाढ झोपेत असलेल्या तीला उठवणं मला जमणारं नव्हतं. एकतर उगाचच तीची झोपमोड झाली असती, आणि दूसरं म्हणजे माझं मन मोकळं करायला तिला उठवणं स्वार्थीपणाचं ठरलं असते. डोळ्यांत गंगा यमुना आणण्याइतपतं फिल्मी भाव नव्हता पण भावना खर्या होत्या म्हणून झेलमला आज इथेच उगम मिळणार होता...
ती उठल्यावरचं बोलू असे म्हणत डोळे बंद केले.. अगदी घट्ट.... मनात आता कसलाच विचार नको... बास्स.. जे काही आहे ते उद्या सकाळीच बोलायचे. शक्य तितका ताण डोळ्यांवर आणला, दोन्ही कानावर हात ठेवला.. स्वतःचाच आवाज अजूनही कानावर येत होता... पण आता त्याचबरोबर आणखीही काही ऐकू येत होते.. अस्पष्ट आवाज.. हळूहळू मोठा होत चाललेला.. अगदी खरं.... तिचाच होता तो आवाज...
"काय करतोयस.................." हे स्पष्ट ऐकू आले.. कारण हे शब्द कानावर पडायला आणि चेहर्यावर पहील्या पावसाचे दवबिंदू पडायला एकच वेळ साधून आली होती. गालावर हलके स्मित पसरले अगदी नकळत.. काहीच माहीत नसताना.. डोळे उघडले, तीच्या ओल्या केसांतले दवबिंदू तिने पून्हा माझ्यावर उडवले... खडबडून जागा होणार तोच ती म्हणाली, "मला कल्याणपर्यंत सोडायला येणार आहेस ना.. ट्रेन सुटेल, आवर पटापट.."
अख्खा एल्ईडी डोक्यात पेटला.. अन् करंट त्याच्या नेहमीच्याच वेगाने वरून खाली पूर्ण अंगातून वाहून गेला. तीचं तिकीट एक महीना आधी मीच ऑनलाईन बुक केलं होतं. दहा दिवस तिच्या आईकडे राहून येणार होती. गेला आठवडाभर दिवस मोजत होतो. जसजसा दिवस जवळ येईल तसतसं मनात तेच विचार.. वेडा मी... अगोदरच तिच्याबाबतीत थोडा हळवा आणि प्रोटेक्टीव्ह. "उद्या" ती जाणार म्हणून काल दिवसभर डोक्यात ती.. ती... आणि तीच... ती जाणार हे मेंदूने चांगलेच लक्षात ठेवले.. "ती जाणार" या कर्ता आणि क्रियापदांमधे बिचारा मेंदू इतका अडकला की "तीच्या आईकडे" कर्म विसरला... बाकी काल रात्रीचं स्वप्नातलं महाभारत तूम्ही जाणताच.....
( हे 'त्याच्या झोपेतल्या बर्याचशा स्वप्नात" ले एक स्वप्न होते. हे काल्पनिक असू शकते किंवा नाही, पण त्या मागचे मन, जाणीव, समज आणि भावना खर्या आहेत. कोणाला कंटाळवाणे वाटले असेल वा आवडले असेल तुमच्या भावना नक्की पोहोचवा.)
- निलेश..
© https://www.marathistory.online/
Email Address: desai.nilesh199@gmail.com