To ki Ti books and stories free download online pdf in Marathi

तो की ती - तो की ती

खरंतर अजूनही मी कोणी लेखक नाही, ही माझी पहीलीच कथा २०१७ मध्ये पहील्यांदा प्रतिलिपीवर प्रकाशित झाली. वर्षभर कळत नकळत सुखद धक्के देऊन या कथेवरील अभिप्राय मला लिहीण्यास प्रेरीत करून गेले. त्या सर्व वाचकांचे मनापासून खुप आभार ज्यांनी सुरूवातीच्या काळात मला प्रोत्साहन दिले. या कथेचा विषय कोणाला आवडेल किंवा नाही आवडणार. कोणाला नाही आवडला तर क्षमा असावी.          

           नेहमीप्रमाणेच आजही तो लवकरच बेडवरून उठला. भरभर अंघोळ करून त्याच्या आवडत्या जागी गेला. ड्रेसींग टेबल, होय त्याची ही फेवरेट जागा होती.

समोरच्या आरशात स्वतःला न्याहाळत त्याने पाऊडर, फाऊंडेशन इत्यादी उरकले. निघताना होठांवर हलकीशी फीकट रंगाची लिपस्टिक पसरवली. आरशात पाहून स्वतःला स्मितहास्य देत पींक रंगाचा स्कार्फ डोक्यावर घेऊन पाहीले. लगेच तो स्कार्फ काढून पून्हा बॅगेत ठेऊन आणि बॅग पूढे छातिशी घेऊन तो निघाला ऑफिसमध्ये जायला. इतके सर्व करूनही आपले स्त्रीरूप जगासमोर येऊ नये याची थोडीफार काळजी त्याने घेतली होती.

'नयन' - दिसायला स्मार्ट, गोरापान.. बारीक सडपातळ शरीरयष्टी. चेहर्यावर समोर येणारे लांब मऊ केस... त्याची पर्सनालीटी एकदम चाॅकलेट हिरोला साजिशी अशी होती. ऑफिसमध्ये म्हनुनच जेव्हा तो जाॅईन झाला तेव्हापासून अनेक मुलींच्या नजरा त्याच्यावर होत्या. काहींनी प्रयत्न करूनही पाहीले पण जितके आकर्षण त्याच्या दिसन्यात होते, तितक्याच काही बाबी रहस्यमय वाटत होत्या.

नयन मात्र कोणाच्याही अध्यात मध्यात राहायचा नाही. बोलण्याबद्दल फक्त दोन चार मित्र. बाकी त्याचे आयुष्य फारसे स्वतःमध्येच होते. यामागे कारण तसेच होते. नयनचे मन, गूण जरी वरवर पुरूषी दिसत असले तरी त्याच्या आत एक स्त्री दडलेली होती. नटने, मूरडने, लाजने, आरशात स्वतःला सारखे न्याहाळत बसने या गोष्टींनी नयनचे अंग मोहरून यायचे. त्याला सजायला, नटायला खुप आवडायचे. साडी, ओढणी या गोष्टीबद्दल त्याला विलक्षण आवड होती. घरी कोणी नसताना तो आपली आवड बर्याचदा पूर्ण करून घ्यायचा. पण या बाबतीत त्याने कोणालाही कधीही काहीही सांगितले नाही. समाज, आईवडील-बहीण, नातेवाईक काय सांगणार आणि कसे समजावे सर्वांना.

बरेच प्रश्न नयन समोर होते. शेवटी त्याने ठरवले कोणालाही काही सांगायचं नाही. आपण आपली आवड आपल्यापर्यंत ठेवून आपल्यामध्येच खुश राहायचे. म्हणूनच तो रोज हलकासा मेकअप् जो इतरांना सहजासहजी कळून येणार नाही अशाप्रकारे करून ऑफीसला जायचा. घरी कोणी नसले की साडी, ड्रेसेस घालून हौसेने कॅटवाॅक करायचा. जेवण बनवणे हा देखील त्याचा आवडता छंद. पण तोही त्याने घरात कधी समोर येऊ दिला न्हवता. अश्याच सर्व काही गोष्टी असूनही त्याने अजून पूढच्या आयुष्याचा विचार केला होता. स्वतः स्त्री मनाचा असल्यामुळे साहजिकच त्याच्यात भिती, दया, करुणा, लाज या गोष्टी जरा जास्तच सामावलेल्या होत्या.

त्यामुळे आयुष्य कसे जगायचे याबाबतीत त्याने पूर्ण खोलवर जाऊन विचार केला होता. यासर्वात एक गोष्ट मात्र नयनला माहीती होती की जरी त्याच्या आत एक स्त्री असली तरी तो एक पुरूष होता..

आणि त्यामूळे जेंडरचेंज वगैरे असल्या भानगडीत न पडता व कोणालाही आपल्यामुळे त्रास होऊ नये या बाबींचा नयनने विचार केला होता. तसेही सेक्स या विषयात त्याला तितकासा इंटरेस्ट नव्ह्ता. मुलांसोबत रीलेशन त्याच्या विचारांत अजिबात नव्हते. आणि आकर्षण त्याला मूलींमध्येच होते. पण त्यात अजूनतरी त्याने लक्ष घातले नव्हते.

आपल्या जीवनात येणारे मग ते कोणीही असो त्याला आपल्याबाबत सर्व काही सांगायचं हे नयन ने ठरवले होते.

स्त्री मनाचा नयन मुलगी समोर आली की ईतर मुलांसारखा बावरून जायचा पण खर्या मनातल्या भावना तो कधीच समोर येऊन द्यायचा नाही, कारण मग सर्व कथा समोर मांडावी लागली असती. या विचारांनी नयन कोणा मुलीच्या मागे लागला नाही.

स्त्रीयांबद्दल त्याच्या मनात प्रचंड आदर होता. रोजच्या जीवनात आसपासच्या परिसरात स्त्रीयांना जरूर तेथे मदतीला धावणे, कोणाला अभ्यासाला मदत करणे, इथपासून ते शेअर ऑटोमध्ये एखादी मुलगी बाजूला येऊन बसली तरी नयन अंग चोरून बसायचा. समोरून कोणी आकर्षक मुलगी येत असेल तर कितीही पाहायची ईच्छा असूनही नयनची नजर खाली जायची. मुलींमध्ये पाहायचेच तर फारफार त्यांचे ड्रेस, मेकअप, सॅंडल यापलिकडे त्याची नजर जायची नाही.

टिव्ही, वर्तमानपत्रमधील बलात्कार, विनयभंग अश्या बातम्या नयनला विचलीत करायच्या. आणि कोणी इतके निष्ठूर कसे असू शकते इतके ती गोष्ट नयनला लागायची.

नयन हा असा आहे. कदाचीत तुमच्या आमच्यातलाच किंवा थोडा वेगळा. आज नेहमीप्रमाणेच ऑफिसला गेला. इथे काॅलसेंटर मध्ये नयनला जाॅईन होऊन चार महीने झाले होते. तसे नयन चोवीस वर्षांचा होत अन् सोबतचे सर्व वीस-बावीसचे. पण आपल्या देखणेपणा मुळे नयनचे वय कमीच वाटायचे. असे ऐकले आहे की या जगात प्रत्येक व्यक्तीसाठी कोणीतरी दूसरे जन्माला आले आहे.. तो दूसरा व्यक्ती जो त्याला शेवटपर्यंत साथ देईल. चला पाहू काही विशिष्ट परिस्थितीतदेखील जगातील काही वेगळ्या माणसांसाठी वरील नियम लागू होतो का?


             नेहमीप्रमाणे नयन ऑफिसला आल्यावर आपल्या डेस्कवर जाऊन बसला. आपल्या कंप्युटरवर लाॅगीन करून आलेले काॅल्स अटेंड करू लागला. त्याच्या आवाजात नेहमीप्रमाणे सौम्यपणा होता. कस्टमर कितीही रागात असला तरी नयनच्या शांत आणि लाघवी स्वभावामूळे त्यांचा राग शांत व्हायचा. नयन आपल्या कामात मग्न होता पण कोपर्यातून एक नजर मात्र त्याच्यावर लक्ष ठेवून होती.

सीमा... नुकतीच आठ दिवसांपूर्वी जाॅईन झाली होती. अजून तिचा ट्रेनिंग पीरियड संपला न्हवता. पण सिनीयर्सचे लाईव्ह रेकाॅर्डींग अनुभवन्यासाठी एक तास तिला भेटायचा. सीमा कोड्यात पडलेल्या नजरेने नयन कडे सुरूवातीपासूनच पाहायची. आजही तिची नजर नयनवरून हटत न्हवती. आज तसा सीमाने मनाशी निर्धार केला होता की काही झाले तरी आज काहीनाकाही करायचेच. कदाचित् सीमाला नयनबद्दल कळून आले असावे. म्हणूनच त्याच्याबद्दल विचारावेसे असे तिला वाटत असावे.

ल॔चब्रेक साठी दूपारी दोन वाजता नयन उठून कॅन्टीनमध्ये जाऊ लागला. त्याच्या मागावर असलेल्या सीमाने तो कॅन्टीनमध्ये पोहोचायच्या आतच त्याला गाठले.

त्याचा हात पकडून सीमा बोलली, "तूला काही विचारू का? हं म्हणजे पर्सनल आहे..."

खरंतर नयन अशा अचानक झालेल्या प्रश्नाने बावचळला होता. आपले काही हीला कळले तर नाही ना, किंवा आज आपला मेकअप जास्त तर झाला नाही ना असा विचार करत नयन चेहरा उगाचच पूसू लागला. किंचीतशी लाज मनात यायला लागली. आता काय करायचे. या मुलीने कोणाला सांगितले तर काय होइल असे एक ना शंभर प्रश्न नयनसमोर आले. आणि त्याहूनही मोठा प्रश्न हा होता ही आहे तरी कोण?...

इतके दिवस कधी ऑफिसमध्ये दिसली नाही. तसेही आपण कधी कोणालाही नीटसे पाहीले आहे.

नयन काहीच बोलत नाही हे पाहून सीमानेच सुरूवात केली..

"हाय.. मी सीमा.. अजून ट्रेनी आहे. आठ दिवसांपूर्वीच जाॅईन झालीय इथे. तूला पाहीले तिथपासून तू मला आवडायला लागला आहेस. तूझा होकार यावा अशी अपेक्षा आहे....."

धडाधड कानावर पडलेल्या या वाक्यांनी नयनला काय बोलू हे सूचत नव्हते.

पण वेळ मारून नेण्यासाठी नयन म्हणाला..

"आपण ऑफीस सुटल्यानंतर भेटू या का? "

सीमा ने होकार देताच नयन जेवायला निघून गेला. नयन ने पाहीले होते की त्यांच जे काही संभाषण चालू होते त्यावर एक दोन कोपर्यातून बारीक लक्ष आणि कान लागून होते.

संध्याकाळ होईपर्यंत सीमा बैचेन होत होती. त्याने लगेच का सांगितले नाही आपल्याला. संध्याकाळ पर्यंत वाट पाहायला का लावली. त्याला नक्की काय सांगायचं असेल, तो नकार तर नाही ना देणार. खुप काही असे सीमाच्या मनात चालले होते. एक मात्र नक्की की त्याची कोणी गर्लफ्रेंड नसावी नाहीतर मला कशाला भेटला असता संध्याकाळी. सीमा आपल्याच विचारात गुंतत होती.

सीमा दिसायला छान होती पण तिचा चेहरा फारसा गंभीर असायचा त्यामुळे मुलीच्या चेहर्यावर जे गोड स्मितहास्य असावे तसे तिच्या चेहर्यावर नसायचे. सीमाला विविध विषयांवर वाचायची खुप आवड होती. जीवनाच्या अनेक पैलूंवर तिने वाचन केले होते. आणि म्हणूनच ति कमी वयातच मॅच्यूअर्ड झाल्यासारखं वागायची. आपल्या ग्रुपमध्ये ती लिडरप्रमाणे पुढं असायची. स्ट्रेट-फाॅरवर्ड बोलणे, बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहणे. बिनधास्त राहून मनातले व्यक्त करणे. अश्या बर्याचशा बाबी सीमाच्या प्लस पाॅईंट मध्ये येत होत्या. तिचे राहणीमान, कपडे, हावभाव यांतून तिचा आत्मविश्वास झळकत असायचा. नयनला प्रपोज करताना तिला हाच स्वभाव कामी आला होता. आता सीमा ऑफिस सुटण्याची वाट पाहत होती. नयन काय बोलणार याविषयी तिला उत्सुकता होती.

इकडे नयन संध्याकाळी काय सांगायचं याची तयारी करून बसला होता. नाही म्हणायला त्यालाही सीमा आवडलेली. पण तिला जेव्हा आपल्याबद्दल कळेल तेव्हा ती कसे रीअॅट करेल याचाच विचार नयन करत होता. तिच्यातला निर्भिडपणा त्याला विशेष भावला होता. सीमाला कसे सर्वकाही सांगायचं या विचारसत्रात नयन असताना ऑफिस सुटन्याची वेळ जवळ आली. आज वेळ जरा लौकरच गेला असे म्हणत नयन आवरायला लागला...


नेहमीच पहील्या भेटीत माणूस ओळखता येत नाही. काही लपवून ठेवलेल्या भावना दुसर्याने जाणून घेणं खरंच खूप सुखावह असते


            लाॅगआऊट करून नयन नेहमीप्रमाणे वाॅशरूमकडे गेला. पण आज रोजच्यासारखे रेंगाळत न बसता पटापट उरकून तो बाहेर आला. खाली मेन गेट वर पोहचण्यासाठी त्याला आणखी पाच मिनिटं गेली. गेटच्या बाहेर त्याची नजर गेली अन् डोक्यात प्रेशर आले. सीमा बाहेरच तिच्या ग्रुपसोबत नयनची वाट पाहत उभी होती. नयन थोडा जवळ येताच समोरून सीमा पुढे आली. सीमाकडे पाहून त्याने स्मितहास्य दिले. सीमाने त्याला "हाय" म्हटले. आपल्या ग्रुपचा निरोप नजरेनेच घेऊन सीमा नयनसोबत जाऊ लागली. शांत राहून दोघेही हळूहळू उगाचच कुठेतरी चालू लागले...

"कुठे जायचं..?" नयनने प्रश्न केला.

जो सीमाला अपेक्षित नव्हता. तिने एक क्षण त्याच्याकडे पाहीले अन् काहीतरी विचार करून बोलली..

"जिथे तू मनमोकळेपणाने माझ्याशी बोलू शकशील, तिथे जाऊया.."

प्रेमातल्या डावपेचामध्ये अगदीच अनुभवशून्य असलेल्या नयनने एखाद्या सिनेमातल्या सीनसारखे विचारले..

"काॅफी..?" ....

किंचित हसून मानेनच सीमाने होकार देला. संध्याकाळी सहा वाजता ते दोघे काॅफीशाॅप मध्ये पोहोचले.

नयनने खाली मानेनेच घड्याळ पाहीले.. आठ वाजायला पाच मिनीटं बाकी होती. थंड झालेला काॅफीचा तिसरा कप संपवून नयनने खाली ठेवला. त्याची नजर सीमाच्या नजरेस नजर देत नव्हती. सीमाही कुठेतरी शून्यात हरवली होती. मागच्या दोन तासात तिने जे काही ऐकले होते, त्याबद्दल कधी कल्पनाही तिने कधी केली नव्हती. टेबलवर शांतता पसरली होती. या प्रसंगाला कसे सामोरं जायचं हा विषयच कधी आपण ऐकला नाही.... सीमा विचार करत होती.
सीमा गप्प आहे हे पाहून नयनला कसेतरी वाटत होते. तिचे काहीच न बोलणे हा आपल्याला नकार आहे हे नयनच्या मनात आले होते.

थोडा वेळ गेल्यावर नयनच शेवटी बोलला.. "तुम्हाला भेटून छान वाटले, मी निघतो.."

"हं.., सीमा भानावर येऊन त्याला पाहू लागली अन् म्हणाली...

"आपण काही दिवस असेच भेटूया का..? नाही म्हणजे सुरूवातीला मी असा काही विचार केला नव्हता पण आता माझ्या मनात तूला जाणून घ्यायची इच्छा आहे."

नयनने होकार देतच म्हटलं "ठीक आहे पण आता निघायला हवं."

बाहेर आल्यावर एकमेकांना निरोप देऊन ते दोघे आपापल्या घरी निघून गेले. निघाल्यापासून सीमाच्या डोक्यात फक्त नयनच होता. हा असा कसा असू शकतो, कसाही वागू शकतो, मुलगा असूनही याच्या आवडीनिवडी मुलीसारख्या कश्या असू शकतात. या सर्व बाबींचे सीमाला आश्चर्य वाटत होते पण तितकेच कुतूहलदेखील होते. तसा त्याच्या वागण्याबोलण्यात एकप्रकारचा सभ्यपणा आहे आणि स्वतःचं मत व्यक्त करण्याआधी तो समोरच्याचं ऐकून घेतो.. इतरांना आदर देतो.. अरे.. हा तर मलाही 'तुम्ही' म्हणत होता. अन् मी त्याला अरेतूरे करत होती..

घरी येऊन रात्री जेवण उरकून सीमाने झोपायलाही घेतले पण अजून नयन काही तिच्या डोक्यातून जात नव्हता. इकडे नयनने मनाला पूर्ण समजावले होते की जे काही तिने ऐकलेय त्यावरून कोणीही मुलगी त्याच्या आयुष्यात येण्यास तयार होणार नाही. आज पहील्यांदाच आपण कोणापाशी व्यक्त झालो पण यातून जे काही निष्कर्ष समोर येत आहेत, ते पाहता यापुढे कोणाला काही सांगायलाच नको. तरीही तिला भेटायला भेटेल ही कल्पना सुखावह आहे.. माझ्याबद्दल जिला सर्वकाही माहीत आहे अशा व्यक्तीची सोबत थोडी का होईना पण भेटेल......

दूसर्या दिवसापासून सीमा आणि नयन रोज भेटू लागले. एक महीना गेला.. एव्हाना सीमा अन् नयन मध्ये छान दोस्ती झाली होती. त्याच्या स्वभावातले बरेचसे पैलू सीमापूढे आले होते. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यात मेलइगो जराही नव्हता. बाहेर फिरताना जाण्याच्या ठिकाणापासून ते इतर सर्व गोष्टींमध्ये डिसीजन मेकर सीमा होती. कोणीतरी आपल्यावर हक्क गाजवण्याऐवजी स्वतःला आपल्या हवाली करत आहे आणि त्याबदल्यात आपल्याकडून काही अपेक्षाही ठेवत नाही. आणि आॅटोरिक्शात माझ्या बाजूला अंग चोरून बसलेला नयन कधी माझ्याशी प्रतारणा करू शकनार नाही.

सारंच कसे अकल्पित आणि छान सुरू आहे. "बस्स.. आता जेव्हा नयन समोर येईल तेव्हा त्याच्यापूढे आपले मन मोकळे करायचे, हो प्रथम मी फक्त रीलेशन बद्दल विचार केला होता पण आता लग्नासाठीच बोलायचे. थोडा वेगळा आहे तो पण हाच तो वेगळेपणा आहे जो माझ्या होणार्या जोडीदारामध्ये असायला हवा. जर त्याच्या एवढ्याशा आनंदापुढे मला आयुष्यभर त्याच्याकडून हवा तो आदर हवी ती मोकळीक आणि माझे नंतरच्या आयुष्यातले स्वातंत्र्य मिळणार असेल तर हो मला ते मान्य आहे" सीमा मनातच बोलत होती.

नयनचे वागने, बोलने सीमाला भावले होते अन् तिच्या चावट विनोदांवर त्याचे लाजणे तर तिला वेगळाच आनंद देऊन गेले होते. जर अश्या माणसाच्या आयुष्यात फक्त काही क्षूल्लक गोष्टींमुळे कोणी आले नाही तर विनाकारण त्या माणसातील निर्विकार आणि खर्या भावना कधी कोणापुढं येऊ शकणार नाहीत. नाहीतरी कुठे असतात अशी माणसं जी कोणत्याही मुखवट्याविना समोर येतात.

त्यादिवशी नेहमीप्रमाणे तो तिला भेटायला आला. आज तो बराच शांत वाटत होता. समोर अथांग समुद्र होता. लाटा वेगाने पुढं येत होत्या पण त्या दोघांपासून थोड्या अंतर ठेवून मागे जात होत्या.

नयनने सीमाकडे पाहून विचारले,

"आपल्याला थांबवायला हवे हे, नाही का?" "असे किती दिवस आपण भेटायचे, बाकी काही नाही पण तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा त्रास होइल मला.." "मी नाही म्हणालो तरी नकळत तुमच्यात गुंतत चाललो आहे." जमेल तसे आसू लपवत नयनने जे मनात आले ते सांगून टाकले.

सीमाने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला अन् हसू लागली... नयनला कळत नव्हते की हसतेय का.. शेवटी तीच हसत म्हणाली, "तू अगदी टिपीकल हीरोइनचा डायलॉग मारलास..."

नयन लाजून उभा राहीला अन् दूसरीकडे पाहू लागला. सीमा याच संधीची वाट पाहत होती.

"नयन..." सीमाचे शब्द कानावर पडताच त्याने मागे वळून पाहीले अन् आश्चर्याने तो सीमाकडे पाहत राहीला..

सीमा एक गुडघा खाली टेकवून हातात रींगची उघडलेली डबी त्याच्यापूढे करून बसली होती.. चेहर्यावर स्माईल आणत सीमा बोलू लागली..

"आठवड्यातून तीन दिवस तूझे असतील, चार माझे असतील.. आपल्याला घरात दोन वार्डरोब लागतील मी ते अरेंज करेन. ड्रेसींगटेबल शेअर करू.. तुझं प्रेम कधी कमी होणार नाही ठाऊक आहे मला. मीही तुझे सर्व हट्ट पुरवेन. टीफीन मीच बनवत जाइन दोघांचा, नाश्ता मात्र तुझ्या हातचाच खाईन.. लग्न करशील माझ्याशी..."

डोळ्यात आलेल्या अश्रूंना न लपवता नयनचे दोन्ही हात स्वतःच्याच ओठांवर आले.. मनातल्या आनंदापुढं शब्दही जड होऊ लागले त्याने मानेनचं होकार दिला अन् खाली सीमाजवळ बसत तिचे हात हातात घेतले. सीमाच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते.

"या जगात प्रत्येक व्यक्तीसाठी कोणीतरी जन्माला आले आहे जसे माझ्यासाठी तू..." "आपण आपलेच वेगळे विश्व बनवूया जिथे तू तूझ्या मनासारख राहू शकशील, तेव्हा तेवढ्या वेळेपूरता आपला जगाशी काही संबंध राहणार नाही"- सीमा.

तिच्या मनातलं ओळखून नयन म्हणाला, "हो, अन् आपल्याशिवाय ही गोष्ट कोणालाही कळणार नाही.."

पूढचे काही क्षण शांततेत गेले. समोरून एक मोठी लाट येऊन त्या दोघांच्या नकळत त्यांना भिजवून गेली. सीमाने आपली ओढणी नयनच्या पाठीवरून पसरवत पुढे घेतली.. नयन शहारला..

या अन् असल्या भावनांची किंमत आजवर फक्त नयन जाणून होता. आज तीचे मोल सीमालाही दिसले होते नयनच्या नयनांत...


समाप्त

निलेश देसाई

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED