Maitri, Facebook aani prem books and stories free download online pdf in Marathi

मैत्री, फेसबूक आणि प्रेम

"कसला क्युट दिसतो ना गं तो.. तुला सांगते स्नेहा, असं वाटतं.. सगळं सोडून त्याचं होऊन जावं.." निता पीसीवर फेसबुक चालू करून माझ्याशी बोलत होती. त्याचा प्रोफाईल फोटो पाहत.. हल्ली तिचं हे दररोजचंच झालेलं.. कशी ओळख झाली काय माहीत यांची. फेसबुकवरची मैत्री.. किती दिवस टिकेल शंकाच होती. आणि वर निता म्हणजे अगदी कहरच..

"अगं पण तु का नसत्या भानगडी मागे लावून घेतेस.. तुला एक बॉयफ्रेंड जमत नाही का गं.." मीही जरा रागातच बोलले.

"अरे तू नही समझेगी मेरी जान.. कमब्खत दिल भवरें की तरह उडता है मेरा.. आ जाते है पसंद कुछ चेहरे तो क्या करें..!" निताने फिल्मी डायलॉग मारला.


मला तर अक्षरशः राग आलेला तिचा. पण मी काहीच बोलले नाही. थोडावेळ थांबून मी तिथुन निघाले.


निता.. अजबच कॅरेक्टर आहे हिचं.. स्वतःचा एक बॉयफ्रेंड आहे तरीपण फेसबूकवर फेक अकाऊंट सुरू करून नविन नविन मुलांशी फ्रेंडशीप करायची, प्रेमाच्या गप्पा मारायच्या, मग भेटायचं.. आणि त्या मुलांना तरी काय आहे.. त्यांना आयतंच भेटतंय सगळं.. मग मागे का हटतील....

निताच्या विचारचक्रातच मी कधी घरी येऊन पोहोचले मलाच कळले नाही.

निता माझी बालमैत्रिण.. एकदम घट्ट अशी आमची मैत्री. तशी ती आहेच खुप प्रेमळ.. अगदी लहानपणापासून.. पण ऑर्कुट वर एकाशी मैत्री झाली. त्याचं रूपांतर पुढे प्रेमात झालं.. मला अनिल अजिबात आवडायचा नाही. दिसण्यात निता पुढे तो अगदी काहीच नव्हता. बरं वागणं तरी ठिक असावं तर ते पण नाही. सारखा फक्त नितावर शंका घेऊन असायचा.


सुरूवातीला तर ती बिचारी सगळं सहन करायची. नंतर नंतर तो हातही उगारू लागला. तीला खरंतर त्याच्या सोबतचे नाते संपवायचेही होते. तरीही मन अडकलेले तीचे त्या चार वर्षांच्या नात्यात.. पण हल्ली त्याच्या अश्याच वागण्यामुळे निता कंटाळुन आता खरोखरच त्याच्या नकळत इतर मुलांशी बोलायची.


मी सहसा ऑफिसवरून घरी जाताना निताला भेटून जायचे.. असंच फेसबूकवर काल एकाशी ओळख झाली तिची. त्याचाच फोटो दाखवत होती ती मला.. खरं सांगायचं तर हा तिसरा फोटो होता तीने मला दाखवलेला. या अगोदरही तिने दोघांशी ऑनलाईन फ्रेंडशीप ठेवली होतं. फक्त ऑनलाईनच हा.. प्रत्यक्षात मात्र एक दोनदाच भेटली असावी त्यांना तेही मैत्रीपुरतं.


आणि आता हा तिसरा.. पहील्या दोघांच्यावेळी तर मला फारसे काही वाटले नव्हते. पण आज मी निताशी थोडं तुटकंच बोलले.. अजून एक.. नितावर मघाशी मला राग येण्याचं कारणही बहुतेक हाच नविन मुलगा असावा. सुमेध नाव त्याचं. दिसायला एकच नंबर.. अगदी शाळेत असल्यापासूनचं माझं क्रश अमिर खान.. त्याच्यासारखीच चेहरेपट्टी.. गोरापान.. त्याचा फोटो पाहताक्षणीच मला माझ्या आयुष्यातली पोकळीक जाणवू लागली.

अहं.. मी पण कीनई, काहीही विचार करते..

पुढचे दोन दिवस ऑफिसमध्ये काम जास्त असल्यामुळे निताकडे जाणं काही जमलं नाही. पण या दोन दिवसात सुमेधला फेसबूकवर शोधून काढलंच. त्याची प्रोफाईल झाडून पाहीली.. थॅन्क् गॉड.. सिंगल होता तो.. दिवसभर वेळ नाही भेटला पण अख्खी रात्र त्याचे सर्व फोटो पाहण्यात गेली माझी.. बाईऽऽ.. एवढी का मी वेडी झाली त्याच्या पाठी..


मला तसं पूर्वीपासून प्रेमप्रकरणे वगैरे यात कधी इंटरेस्ट असा नव्हताच.. पण सुमेधला पाहील्यापासून खुप बदलत चाललं होतं माझं मन.. मध्येच कुठल्याही क्षणी त्याचा फोटो नजरेसमोरच्या वलयात यायचा. रस्त्याने चालताचालता अचानक त्याची आठवण यायची. अरे.. देवा.. हे काय होत आहे माझ्यासोबत..


अवघ्या दोनच दिवसात मी त्याचा इतका विचार करू लागले होते. ते एक मृगजळ आहे हे समजून सुद्धा.. मी आजपर्यंत प्रत्यक्षात आलेले सर्व प्रस्ताव धुडकावले होते. हा तर फेसबूकवर.. मग काय बोलता.. आणि त्यात निताही त्याच्यावर फिदा.. तरीही मन मानायला तयार नव्हते..

तिसर्या दिवशी संध्याकाळी निताच्या घरात पाय ठेवताच ती मला अक्षरशः आत खेचूनच घेऊन गेली.


"अगं सुमेधने माझा फोटो मागवला होता पाहायला.." निता उत्तेजित होऊन सांगत होती.


"मग.." मी काहीसं त्रासिक होऊन विचारले.


"मग काय.. मी पाठवला त्याला.. पण आपल्या दोघांचा फोटो.. म्हणाले त्याला.. ओळख यातली मी कोण आहे ते.." - निता.


"काय...?" आता आश्चर्यचकित व्हायची पाळी आली माझी. "अगं पण का.." मी निताला असं करण्याविषयीचं कारण विचारलं.


"का.. माहीत नाही.. पण मला वाटलं.. गंमत करू.. पण याचा उलटाच परीणाम झाला गं स्नेहा.." निता काकूळतेने म्हणाली.


"काय झालं असं.." - मी ऊत्सुकतेने विचारले.


"त्याने प्रपोज केला.." - निता.


"व्हाट....!" निताचं म्हणणं ऐकून मला खरंच रडायला यायचं बाकी राहीलेलं, इतकं बेकार फिल होऊ लागले.

तरीही निताच्या चेहर्‍यावर समाधान दिसत नव्हतं.

"हा ना यार... प्रपोज केला.. पण तु समजून... त्याला तुझा फोटो आवडला.. मीही म्हटलं अजून थोडी गंमत करू म्हणून.. म्हणून हो हो करत गेले.. आणि त्याने टाकला बॉम्ब मग.. मला तू आवडतेस अन् काय ना काय.." निता नाराजीतच बोलत होती.

एव्हाना मलाही थोडे हायसे वाटायला लागले होते. पण तरीही आता पुढे काय होणार याची काळजी होती. मी निताला अजून माझ्या मनातले काही सांगितले नव्हते. खरं सांगायचं तर माझी मलाच खात्री नव्हती.


"पुढे काय करणार आहेस आता.." मी निताच्या मनातलं काढून घेण्याचा प्रयत्न केला.


"माझी बुद्धी भ्रष्ट झालेली.. मी माझाच फोटो द्यायला हवा होता फक्त.. तु तसंही त्याच्यात इंटरेस्ट घेणार नाहीस.. मला माहीत आहे... बघु काय करायचे विचार करते मी.." निता थोडीशी चिंतेतच होती.


"अगं पुढे काय म्हणजे.. जरी सुमेधला तु सगळं खरं सांगितलंस... आणि तो तयारही झाला.. तरी तुझा आताचा बॉयफ्रेंड अनिलचं काय.. त्याला काय सांगशील?" - मी निताला परीस्थितीची जाणीव करून देत विचारले.


"अम्म्... माहीत नाही.. आय मीन्.. अनिलला यातलं काही सांगायचा विचार नाही माझा.. सुमेधला भेटून फोटोबद्दल प्रत्यक्ष सांगेन सर्व.. दॅट्स ईट.." - निता काहीच झाले नसल्याच्या आविर्भावात बोलत होती.

मला मात्र ते खटकत होते. निताकडून निघाल्यावर मी माझा निर्णय केला. रात्री जेवण करून झाल्यावर मी मोबाईल घेतला. निताच्या फेक अकाऊंटचा आयडी पासवर्ड माहीत असल्याने तिचं अकाऊंट चालू करायला फारसे कष्ट पडले नाहीत.

सगळ्यात अगोदर सुमेधबरोबरची तिची चॅटींग पाहीली. अगदी सुरूवातीपासूनची.. सगळा प्रकार लक्षात आला.. निता मॅसेजसमध्ये सुमेधशी जरा जास्तच फ्लर्टींग करायची.. तो मात्र बुजरा वाटत होता.. तिच्या मॅसेजेसना त्याच्या स्माईलीचं उत्तर असायचे फक्त.. शेवटचा मॅसेज पाहीला.. अपेक्षेप्रमाणे नितानेच त्याला केलेला.. फोन नंबर मागण्यासाठी.. सुमेधचा त्यावर काही रीप्लाय आला नव्हता अजून.. बहुतेक कामात असावा.. तो सेकंड शिफ्ट मध्ये असायचा हे मॅसेजेसमधून कळलं होतं मला..


झोप तर खुप आलेली पण आज या विषयावर कुरापत करायचीच असे ठरवले होते मी. आणि मी तसंच अगदी करायला घेतलं. सर्वप्रथम निताच्या फेक अकाऊंटचा पासवर्ड चेंज केला. आणि शांत झोपायला घेतले. रात्री साधारण बारा वाजता सुमेधचा मॅसेज आला. त्यानं नंबर दिला त्याचा...


निताने चुकून केलेल्या त्या गंमतीकडे सुमेधने सत्य मानून कुच केलं होतं.. पण ते पूर्णसत्य नव्हतं.. बस्स.. मला त्याच गंमतीचा आणि सत्याचा मेळ घडवून आणायचा होता.


"हाय.. निघालास का घरी.." - मी.


"हो.. आताच.. तुला राग तर नाही ना आला.. मी तुझा फोटो पाहून थोडं घाईतच विचारले त्याबद्दल.." सुमेध.

सुमेध आणि निताची चॅटींग आता मीच पूर्ण करत होते. माहीत नव्हतं.. याचा अंत कुठे असेल ते.. पण थोडं का होईना.. मन स्वार्थी बनू पाहत होतं.


"नाही रे राग नाही आला.. पण इतक्या अचानक तू विचारलेस.. अजून आपण एकमेकांना भेटलोही नाही.. आपल्या आवडीनिवडी वगैरे काहीच माहीत नाही.. मग कसं ना.. काही बोलणार मी..!" मीही मनात जे आलं सांगितले.


"हो.. तुझंही बरोबर आहे.. पण मी समोर आलो असतो तर हे सर्व नसतो बोलू शकलो.. कधी जमलंच नसतं.. प्रपोज करणं.." सुमेध.


"मला वाटतं आपल्याला त्याअगोदर भेटून एकमेकांना वेळ द्यावा लागेल.. नाही का..?" मी बिनधास्त बोलून मोकळे झाले.


"अर्थातच.. माझ्या मनातलं बोललीस तू.." सुमेध.


"डन्.. मग.. पण एक अट आहे माझी.." मी अजूनही सावध राहत म्हणाले.


"बोला.. काय अट आहे.. जमले तर मान्य करेनच.." सुमेध.


"आपल्या मैत्रीदरम्यान तुला फेसबूक बंद ठेवावे लागेल.. आपले हो की नाही एकदा नक्की झाले तर तु पुन्हा तुझं अकाऊंट वापरू शकतोस.. पण तोपर्यंत आपल्यात बाकी कोणी नको.. आणि त्यासाठी तुझा फेसबूक अकाऊंट तुला माझ्या हवाली करावा लागेल.." मी त्याच्या उत्तराचा अंदाज घेतच त्याला कसेबसे विचारले.


यातून दोन गोष्टी निश्चित होणार होत्या.. एक तर मी त्या अकाऊंटशी काही वेडंवाकडं करणार नाही असा त्याचा माझ्यावरचा विश्वास.. आणि दुसरं म्हणजे स्वतःच फेसबूक अकाऊंट माझ्याकडे दिलं असतं तर माझा त्याच्यावरचा विश्वासही वाढला असता.


सहसा असं झालं नसतं.. पण आम्ही दोघेही त्या रात्री एकमेकांमध्ये इतकं गुंग होऊन गेलेलो की एकमेकांसाठी काहीही करू शकलो असतो..


सुमेधने जराही आढेवेढे न घेता मला आयडी पासवर्ड दिला. आणि माझा त्याच्यावरचा विश्वास द्विगुणीत झाला.


रात्री दोन वाजेपर्यंत त्याच्याशी चॅटींग चालूच होती माझी. जितके होईल तितके त्याच्याबद्दल माहीती काढली. त्याच्या सांगण्यात सुसूत्रता होती. सुमेधशी चॅटींगवर बोलताना खुप आपलेपणा जाणवू लागला. त्याच्या मॅसेजमधून हे कळत होतं की त्याला मुलींशी बोलण्याचा अगदीच अनुभव नाही. एकूण त्याचं व्यक्तीमत्व मला जेन्युअन वाटलं.


या रात्रीने खरंच मन सुखावून गेले होते. एका अनोळखी व्यक्तीशी मी इतकावेळ चॅटींग करत होते. झोप कुठल्याकुठे पळून गेली होती. उलट फ्रेश वाटत होतं.. मनातली आजपर्यंतची सगळी मरगळ निघून गेल्यासारखं..


रात्री झोप कधी लागली कळलेच नाही मला..


सकाळी सहाला जाग आली.. तेव्हा पाहीले.. सुमेधचे तीन चार मॅसेज होते.. ऑफिससाठी आवरायला दोन तास होते माझ्याकडे.. पण महत्त्वाचं काम अजून करायचं होतं मला.


सुमेधच्या अकाऊंटचा पासवर्ड बदलला. नंतर त्याच्या अकाऊंटमधली प्रायव्हसी सेटींग पण बदलली. त्याच्या अकाऊंटमधून निताच्या फेक अकाऊंटला ब्लॉक केलं. आणि शेवटचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निताच्या अकाऊंटमधून कालची सर्व चॅटींग डिलीट करून टाकली. यासगळ्यामागे प्लानिंग हीच होती की निता आणि सुमेध मध्ये काही कॉन्टॅक्ट राहू नये.


सगळं आटोपून थोडावेळ शांत बसले. कालची रात्र आणि आजचा कारणामा.. हे सर्व करताना खुपच थ्रिल वाटत होतं.


या दिवसानंतर साधारण एक महीना आम्ही भेटत राहीलो. सुमेध राहायला दुसर्या जिल्ह्यांत होता. त्यामुळे आमचं भेटणं तसं आठवड्यातून एकदा दोनदाच व्हायचं. फोनवर बोलणं मात्र अगदी रोज व्हायचं. पहील्याच भेटीत त्याच्यातला साधेपणा मला भावला होता. महीन्याभरानंतर त्याच्या आईवडीलांना भेटवण्यासाठी घरीही घेऊन गेला तो मला.. म्हणजे मैत्रीण म्हणूनच..


त्यादिवशी मला सोडायला येताना त्याने विचारलं, "लग्न करशील माझ्याशी..?"


नाही म्हणण्यासारखे माझ्याकडे काहीच कारण नव्हते. आणि याच एका क्षणासाठी मी नाही नाही ते पराक्रम केले होते. तरीही मनात निताबद्दल वाईट वाटत होतं. मी सुमेधला एक महिन्यापूर्वीचा सगळा प्रकार जसाच्या तसा सांगितला.


"आता खरंतर तुच उत्तर दे.. मी जे केलं ते योग्य की अयोग्य..?" - मी.


माझं म्हणणं ऐकून सुमेध हसत सुटला... खुप वेळ हसला.


"अगं वेडाबाई.. बरे झाले ना.. तु हे सगळे केलेस नाहीतर एव्हाना निताशी माझा ब्रेकअप पण झाला असता.. आणि मी मजनू बनून भटकत फिरलो असतो.." सुमेधचं हसणं अजून थांबले नव्हते.


मी त्याला हलकी चापट मारत म्हटले.. "तसं नाही रे.. पण ती माझी मैत्रीण आहे.. म्हणून वाईट वाटतेय.."


"अगं मुळात मला तुझा फोटो आवडला होता.. आणि तुझा फोटो पाहून मी प्रपोज केलेला.. आणि आज तुच माझ्या सोबत आहेस.. मग यात चुकीचं काय आहे.. आणि जे काही तु केल आहेस त्यातून चांगलंच निष्पन्न झालेय.. तु बाकी ग्रेटच आहेस.." सुमेध मला समजावत म्हणाला.


त्याचा हा पॉईंट मला पटला.


"स्नेहा, तु मला मिळवण्यासाठी इतकी धडपड केली आहेस, ते जाणल्यावर तर मी आणखीनच तुझ्या प्रेमात पडलो आहे.. आणि आता तर मी ठरवलेच आहे.. लग्न करेन तर तुझ्याशीच.. अर्थात तू हो म्हणशील तरच.." सुमेधने पुन्हा लग्नाचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला.


"अरे हो.. तुझ्याशी लग्न करण्यासाठीच तर एवढी धडपड केली मी.." माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता.


निताशी इतक्या दिवसांत मी भेटणं टाळलंच होतं. आणि तीने नकळत केलेल्या चुकीमुळे मला माझ्या आयुष्याचा जोडीदार मिळाला होता.


निताला स्वतःहुन सांगायचे नाही असेच आम्ही ठरवले होते. जेव्हा कळेल तेव्हा कळेल. तिला कळाल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल, हे माझे मलाच माहीत नव्हते.. पण मलातरी असे वाटतेय, मी जे केले ते योग्यच होते..


"शेवटी युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं.."


समाप्त..


© https://www.marathistory.online/

Email Address: desai.nilesh199@gmail.com

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED