भावना आणि वासना Nilesh Desai द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भावना आणि वासना



हल्ली टिव्ही, वर्तमानपत्र, फेसबूक, व्हाट्सअप जिथे पाहावं तिकडे अश्या काही बातम्या पाहायला मिळतात की मनातल्या शांत, संयमी विचारांतही खळबळाट सुरू होऊ लागते. हा लेख लिहीण्याअगोदर दोन वेगवेगळ्या कथांवर लिहीणे सुरू केले होते. पण रोज दिसण्यात येणार्या, मन सुन्न करून टाकणार्या काही घटनांमुळे कथा लिहीण्यातलं स्वारस्यच हरवून गेल्यासारखं वाटत होतं.

काहीतरी आत खदखदतयं, ते बाहेर काढावं असं मनापासून वाटलं म्हणून आणि थोडंसं मनातलं मी कुणालातरी सांगावं म्हणून लिहून काढलं.

नेमकं त्या मुद्दयाला हात घालून त्या घटनेवर लिहीणारे बरेचसे आहेत.. रोज शेकडो पोस्टस् फेसबूकवर येत आहेत.. लिहीणारे लिहीतायत ही तितकंच जीव तोडून..

मी काय वेगळं आणि त्याहून स्पष्ट असं लिहावं.. किंबहुना त्या घटनेतलं आठ वर्षांचं ते बालपण समोर आलं की सगळी इंद्रिये सुन्न होऊन जात आहेत.. मन धजावतच नाही मग काही तिच्याविषयी लिहीण्यास..

मी शेवटचं कुणावर कधी रागावलो होतो हे पुसटसही आठवत नाहीयं.. पण काही दिवसांपासून सध्याचा बलात्काराचा विषय जेव्हा जेव्हा आठवतोय तेव्हा डोळ्यासमोर तापवून लाल झालेला लोखंडी रॉड आणि त्या गुन्हेगारांचे पुठ्ठे दिसत आहेत... (माफ करा ही ओळ ठेवायची की नाही यावर बरंच विचारमंथन केलं आहे.)

एखाद्याला घडवण्यामागे अर्थातच एक हसतंखेळतं कुटुंब आवश्यक असतं. त्याहून पुढे गेलं तर मानवी मनाच्या विकासासाठी हजारो निरनिराळ्या शाखा उपलब्ध असतात. त्यातील जी शाखा आपण निवडतो त्यावर आपली मानसिकता वाटचाल करू लागते. त्या शाखा कोणत्याही रूपात असू शकतात जसे की गुरू, मित्र, पुस्तके इत्यादी. त्यातही पुढे चांगले-वाईट, योग्य-अयोग्य असे फाटे फुटतात.

जी शाखा आपण निवडतो तीचा प्रभाव आपल्या व्यक्तीमत्वावर पडतो.

भावना आणि वासना यांत फरक किती असावा..? म्हणजे भावनेतून निर्माण झालेल्या वासनेला खरंच भावना म्हणावं का..? किंवा वासनेत दडलेल्या भावनेला खरंच वासना म्हणावं की तीच्या मूळ रूपातली ती भावनाच असावी..? का वासना ती वासनाच... आणि भावना ती भावनाच...?

या प्रश्नांचा आढावा घेताघेता मला उत्तरांची उकल होत गेली. पण तरीही ती सर्वांना अगदी त्याच पद्धतीने लागू होईलच याबद्दल तितकीशी खात्री मला नाही. कुणाचे विचार भिन्न असू शकतात.. कुणाची कहानी भिन्न असू शकते..

अशाच एका मानसिकतेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न... जी चांगल्या पुस्तकांमुळे घडली..

एक मुलगा होता. त्याचा उल्लेख 'तो मुलगा' असाच ठीक वाटतोय, नाहीतरी नावात काय ठेवलंय. तर तो मुलगा.. शाळेत असेपर्यंत ज्याला शरीरसंबंधांची तितकीशी जाणीव नव्हती.. त्याला सभोवताली तसं काही अनुकूल वातावरणंच नव्हतं.. किंवा.. घरातले संस्कार उच्च दर्जाचे होते.. किंवा असंही म्हणू शकता, की पठ्ठ्या घरात असला की बघेल तेव्हा हातात शाळेतलं वा इतर कुठलं तरी गोष्टीचं पुस्तकच घेऊन दिसायचा. शाळेतल्या पुस्तकांची घोकंपट्टी करायची कधी गरजच पडली नाही.. पण तरीही वर्गातला तिसरा नंबर कधी सोडला नाही.

असो.. दहावीत असताना, कसल्यातरी जनजागृती उपक्रमात त्या मुलाने भाग घेतला.. आणि तिथे त्याची आणि 'कंडोम'ची पहीली भेट झाली. पण कंडोम आणि त्या संबंधित विषयांनी त्या मुलापर्यंत पोहोचण्यास फार उशीर केला होता. कंडोमचे उपयोग कळले पण आपलं वय नाही त्यावर संशोधन करायचं हे त्या अगोदर पुस्तकांमुळेच समजले होते...

आतापर्यंत बालकथेपासून सुरू झालेलं त्या मुलाचं विश्व नवनवीन पुस्तकांतून मानसिक सुदृढ झालं होतं. शिवचरीत्र, महाभारत याच वयात वाचलं गेलं. आणि पौगंडावस्थेतून जाताना त्याचं मन आता प्रेम भावनेच्या त्या नाजूक टप्प्यावर येऊन पोहोचलं होतं.

कुठल्याच पुस्तकांत हे वाचलं नव्हतं की बलात्कार कसा करावा.. म्हणून तसलं काही करण्याचा विचार शिवलाच नाही कधी.. मुळात मुलगी पटवावी तरी कश्यासाठी ह्याच गोंधळात अजून अडकलेला तो..

शाळेत नुकतीच चार-पाच मित्रांची प्रेमप्रकरणं चालू झाली होती. एक दिवशी असंच एका मित्राच्या बढाईखोर स्वभावाची त्या मुलाला चीड आली. बोलता-बोलता चॅलेंज लागलं.. मित्र बोलला, "तु पटवून तर दाखव एकतरी पोरगी.." त्या मुलाकडून चॅलेंज अॅसेप्ट् पण झालं..

"प्रेमप्रकरण का करावं...?" "काय केल्यावर समोरून होकार मिळेल..?" "ती हो म्हणाल्यानंतर पुढे काय करावं..?"

या सगळ्या प्रश्नांची ठाम अशी उत्तरं नव्हती त्या मुलाकडे..

पण हा.. एक मात्र नक्की मनाच्या खोलात रूजलेलं.. अर्थातच

"ती हो म्हणाल्यानंतर.."

तीच्या होकाराचा ग्रीन सिग्नल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत 'ती माझी' ही भावना मनी उद्भवनार नाही.
ही शिकवण वाचलेल्या काही पुस्तकांनीच त्या मुलावर बिंबवलेली होती.

सहा दिवसात ज्याच्याशी चॅलेंज लावलेलं त्याच मित्राची गर्लफ्रेंड या मुलाला "हो" म्हणाली.. अहो आश्चर्यम.. कसं झालं.. काहीच कल्पना नाही बुवा.. त्या मुलाने फक्त जीव ओतून एक कविता लिहीली.. आणि कवितेची अखेर गोड प्रश्नाने केली.. बाकी सगळं दैवाची किमया आणि योग जुळून येणं.

तर अश्याप्रकारे त्या मुलाचंही प्रेमप्रकरण वाजतगाजत सुरू झालं. अख्ख्या शाळेतल्या मुलांमध्ये चर्चासत्रं सुरू झाली. मुलगी नव्या बाॅयफ्रेंडमध्ये हरवलेली.. आणि नवा बाॅयफ्रेंड (तो मुलगा) अजूनही उत्तराच्या शोधात...

" पुढे काय....?"

'आ' वासून हा एकच प्रश्न डोळ्यासमोर..

त्या मुलाने उत्तर शोधलं.. त्याच्या बुद्धीला पटेल असं.. कविता लिहीणं सुरू केलं.. प्रेयसीवर.. दहावीतली प्रेयसी.. आयुष्यातली पहीलीच.. कसले शहारे उठायचे अंगावरती तेव्हा, जेव्हा ती दिसायची.. तीचं बोलणं नुसतं मनात साठून राहायचं.. पाऊस थांबला तरी नाही का खिडकीच्या काचेवरचं त्याचं अस्तित्व.. ओघळतं ओघळतं.. थोडावेळ तरी तसंच राहतं..

का न सुचावं काव्य मनी,

जाहलो ते सुखी बहरुनी,

सफल आम्ही या जीवनी,

जे सखी सोबती होऊनी...

तीनं आपणहुन आमचं होणं यातलं सौख्य कसं कुणी विश्लेषण करून सांगावं..

आणि प्रेमात पडलेलं त्या मुलाचं मन.. कविता तर सुचणारंच होत्या..

पण कवितांच्या पल्याड काही ते मन जाऊ पाहेना.. त्या मुलाची समज प्रेम म्हणजे एकत्र ट्युशनला जाणे-येणे, गप्पा मारणे, थोडं इकडे तिकडे फिरणे याच्यापुढे जाईना.. गोष्टी कळत गेल्या हळूहळू पण तरीही मन धजावेना किंबहुना नैतिकता मध्ये येऊ घातलेली..

दोन महीने 'बिच्चार्या' गर्लफ्रेंडनी तग धरला.. शेवटी गेली त्या मुलाला सोडून..

कारणमीमांसा करता करता त्याला एका मैत्रीणीकडून कळाले की दोन महिन्यांत त्या मुलाने गर्लफ्रेंडसोबत 'काहीच' केले नाही.. त्या मैत्रीनीने पुढे जाऊन हेही विचारलं.. "कीस पण नाही केलंस का..?"

"व्हॉट द हेल..."

यावर त्या मुलाची पहीली प्रतिक्रिया अगदी हीच होती..

'तिच्या सोबत असणं, हे प्रेम नाही का..?'

'तिच्यासोबत गप्पा मारणं, हे प्रेम नाही का..?'

'तिच्यावर कविता करणं, हे ही प्रेम.. नाहीच का..?'

आणि जर 'काही' करायचंच आहे, तर त्याला वयाची काही मर्यादा नाही का...?

त्यानं प्रयत्न केला तिला एकदा विचारायचा..

"मी काही चुकीचं वागलो का तुझ्यासोबत..?" शांतपणे त्याने विचारले.

"सोड ना तो विषय.. तु नाहीस माझ्या टाईपचा.." ती बोलायचं म्हणून बोलून गेली.

"मग... कश्या टाईपचा आहे मी..?" त्याने कुतुहलाने विचारले.

त्याच्या डोळ्यांत प्रश्नार्थक भाव होता. तिच्या नजरेतून 'मी' कसा आहे ते पाहण्याचा..

"तु अगदीच बोअरींग आहेस.." वैतागुन तीनं उत्तर दिलं.

तो काहीच न बोलता तिथुन निघून गेला.

त्या रात्री जेवण नीट गेलं नाही. एकांतात जाऊन तो खुप रडला. मनात एक क्षण आलं की बाकी मित्रांसारखं व्हावं आपणही.. 'लडकी है खाओ पिओ मजा करो' एका मित्राचं वाक्य आठवलं. लगेच पुढच्या क्षणी 'लडकी, बस, ट्रेन..' चा डायलॉग आठवला...

मुलगी समोरून तयार होती. बाकी काही मध्ये उरलेच नव्हते. भावनेवर हळूहळू वासनेचा विळखा होऊ पाहत होता. त्याने झोपायला घेतलं. झोप लागत नव्हती..

कुस बदलताना समोर ठेवलेली पुस्तकं दिसली. मनातले विचार मल्टीपल होतहोत वाचलेल्या काही पुस्तकांची पानं डोळ्यासमोर चाळू लागले.

पुढच्या दिवसापासून नित्य नियमानेच सगळं काही घडत होतं. काल रात्री मनात आलेला विचार पुन्हा मनाला शिवला नाही.

त्यानंतरचे काही दिवस काय चूक काय बरोबर याची पडताळणी करण्यातच गेले. मला खरंच तसं वागायला हवं होतं का? हाही प्रश्न पडला.. खरंच भावनेपेक्षा वासना महत्वाची होती का? भावनेला काहीच महत्त्व नव्हतं का..?

ही प्रश्नं तेव्हातरी अनुत्तरित राहीली.. थोडासा मनस्ताप वगळता बाकी त्या मुलाच्या आयुष्यावर काही फरक पडला नाही..

सहा वर्षे निघून गेली.. एव्हाना पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं.. दोघेही बावीस-तेवीशीच्या आसपास. ती आणि तो दोघेही जवळच घर असल्याकारणाने एकमेकांबद्दल थोडीफार माहीती मिळतच होती. मध्यंतरी तीची दोन चार अफेयर झालीत. पण ती फिसकटल्यानंतर तीही हळूहळू मॅच्युअर्ड होत गेली. सध्या ती सिंगलच होती.

त्याची गाडीही या सहा वर्षात प्रेमाच्या एक-दोन स्टेशनवर थांबून पुढे वाटचाल करत राहीली. पण अजूनही तो त्या स्पर्शाविना..

एके दिवशी योगायोगाने बसमध्ये त्या मुलाची आणि एक्स् गर्लफ्रेंडची भेट झाली.. त्याच्या बाजूची सीट रिकामी असल्याने पटकन जाऊन ती तीथं बसली.. अनावधानाने एक्स् गर्लफ्रेंडकडून बसताना मांडीला मांडी घासली गेली. आपसुकच त्या मुलाचं अंग आकुंचन पावलं..

एक्स गर्लफ्रेंडनं त्या मुलाकडं पाहीलं.. नजरानजर झाली.. त्याच्या नजरेतले भाव तीनं ओळखले...

थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.. जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या. फोन नंबर एक्सचेंज झाले. तिचा स्टॉप जवळ आला तशी ती उतरायला निघाली. अलविदा, गुडबाय झाल्यावर ती उभी राहीली.. पुढे जाऊन थोडीशी घुटमळली.. पुन्हा मागे आली.. हलकेच झुकून त्याच्या गालावर किस केली..

"सॉरी फॉर द पास्ट.. यु हॅव ए नाईस् हर्ट.." तिचे शब्द त्याच्या कानावर पुटपुटले...

ती उतरून गेली.. पण त्या मुलाच्या चेहर्यावर प्रसन्नता होती. नाहीतरी ते अजाणतेपणाचं प्रेम होतं.. प्रेम गेलं तर गेलं.. पण आजचा तिच्या नजरेतला त्याच्याबद्दलचा आदर.. आणि ते शब्द.. खरंच त्या भूतकाळातल्या बालिश प्रेमापेक्षा कितीतरी अधिकपटीने मनातल्या भावनांची तृप्तता करणारे होते.

भूतकाळात भावनांची मर्यादा त्या गर्लफ्रेंडकडून ओलांडली गेली होती. पण त्याचं वासनेत पर्यावसन झाले होते की नाही ते तिचं तिलाच ठावूक.. आणि दुसरीकडे भावनांना महत्व देणार्या त्या मुलाच्या मनी वासनेनं जन्म घेण्याचा एकदा प्रयत्न केला होता पण तो फळाला आला नाही...

बसच्या विंडोतून बाहेर पाहत पाहत त्याला जूने दिवस पुन्हा आठवले...

झाडं, बिल्डिंगस्, रस्ता सगळं भरभर मागे पळत होतं. पहीलं प्रेम डोळ्यासमोर येऊ लागलं होतं.

मोबाईल वाजला.. तिचाच मॅसेज होता..

"will you marry me..?

तो एक क्षण स्क्रीनकडं पाहत राहीला. दहा-बार सेकंद गेली असतील, त्यानं स्क्रीन ऑफ केली. पुन्हा विंडोबाहेर पाहू लागला..

झाडं, बिल्डिंगस्, रस्ता सगळं तसंच पुन्हा मागे जात होतं.. पहीलं प्रेमही डोळ्यासमोर आलं होतं..
तेही बाकी गोष्टींसोबत मागे जाऊ लागलं..

सहा वर्षांनी का होईना पण भावनेचा विजय झाला होता.

कुणाला प्रश्नही पडू शकतो, सहा वर्षात त्याला काय भेटलं..? ना गर्लफ्रेंड, ना स्पर्श.. मग असं काय अचिव्ह केलं त्यानं..? करीयर, शिक्षण या बाबी तर ठिक आहेत पण तरीही 'ती' ही महत्वाची बाब आहेच की.. ती गोष्ट तेव्हा केली असती तर काय नुकसान झालं असतं त्याचं..? आणि मग असा काय फायदा झाला त्याला या सहा वर्षात..?

उत्तर सरळसोपं आहे फक्त ते आकलन करण्याइतपत विचार सुदृढ असणं आवश्यक आहे.

सहा वर्षात त्या मुलाला 'दोन क्षणांचं सुख' आणि 'चिरकाल टिकणारा आनंद' यातला फरक कळून आला होता. भावना आणि वासना यांत फरक इतकाच आहे.. भावना फिल करता येतात, त्यातला गोडवा वेगळाच असतो. वासना फिल करता येत नाहीत कारण त्यावर आगाऊपणा आणि आततायीपणा यांचा प्रभाव जास्त असतो. सर्वात महत्वाचं भावना अंतर्मन सुखावून नेतात, वासना बाह्यर्ईंद्रीयांपुरतीच मर्यादित राहते.

भेटतंय म्हणून वेळेआधीच जर अधाशीपणा केला असता तर आयुष्य एका वेगळ्या दिशेनं जायची शक्यता नाकारता येत नव्हती. 'चटक' जी काही असते ती अशीच असते.

असो, या लेखात मी कुठेही मॅच्युअर्ड प्रेमातील संबंधाना चुकीचं म्हटलेलं नाही. इव्हन 'लीव्ह-ईन' लाही माझा विरोध नाही. ज्याची त्याची सुबुद्धी, त्याने त्याप्रकारे वागावं.

या लेखाच्या शिर्षकावर येताना मला एक क्षण वाटले की जर पुस्तकांमुळे मला जीवनाची दिशा मिळाली आहे तर पुस्तकाशी संबंधित काही शिर्षक असावे.. पण दुसर्याच क्षणाला हा विचारही आला की मानवी मनाहुन प्रबळ असे दुसरे काही नाही. खरेच हे आपले मनच तर आहे जे 'भावना आणि वासना' नियंत्रित करतं.

पुस्तकं ही दिशा दाखवणारी शाखा आहे, पण आचरण तर मानवी मनावरती अवलंबून आहे. आणि पुस्तकही तर एखाद्या मानवी मनाचेच प्रतिबिंब आहे.

'छोड ना यार.. काय करायचं त्या विषयावर खोलवर विचार करून..' काहीसं आपल्या मनात असलं आलंच असेल... परंतु हे दुर्लक्षही वाढत्या बलात्कारांच्या कारणांपैकी एक असू शकते. आपल्या अवतीभवतीचं एक मन कमीतकमी आपण घडवू शकतो. त्याला योग्य ती दिशा दाखवू शकतो. अगदीच मी काही करू शकत नाही असे म्हणण्यापेक्षा पुस्तक, मित्र, गुरू यांसारखीच एक शाखा बनून एखाद्याचा व्यक्तीमत्व विकास करू शकतो.

सर्वात शेवटी, हा लेख कोणत्याही रेटींगसाठी मी लिहीला नाही. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती प्रमाणे प्रत्येकाचे अनुभव, मतं नक्कीच वेगवेगळी असू शकतात. मी मनात जसं आलं तसं लिहून काढलं. त्यामुळे अगदी 'नो स्टार' ही स्वागतार्ह आहे.

- निलेश देसाई