हवेत उडणारी मुलगी Nilesh Desai द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हवेत उडणारी मुलगी

काल बर्याच वर्षांनी सर्कस पाहायचा योग आला. झाले असे की, गेल्या आठवड्यात माझा लाडका भाचा ईशांत.. शाळेतून एक डिस्काऊंट कुपन घेऊन आलेला. शहरात 'अमर सर्कस' नावाची सर्कस आली होती अन् त्याचे पन्नास टक्के डिस्काऊंट कुपन शाळेत विद्यार्थ्यांना वाटण्यात आले होते. सात वर्षांचा माझा भाचा सर्कस पाहण्यासाठी खुप उत्सुक होता.

सर्कस पाहण्याच्या उत्साहापेक्षा त्याने काहीतरी फायद्याची गोष्ट आणली आहे, हा भाव त्याच्या चेहर्यावर होता. मोठी माणसं नाही का, भाजी वगैरे घेताना दोन पाच रूपये घासूनघासून कमी केले की घरी येऊन रूबाबात सांगतात.

अगदी तसेच काहीतरी ईशांतच्या चेहर्यावर होतं. असो, रविवारचे मी त्याला सर्कस दाखवायचे कबूल केले. तसेही संक्रांत असल्याने घरी हळदीकुंकुचा कार्यक्रम होता. घरी ओळखीच्या बायकांची लगबग होती. म्हणून मग मी आणि ईशांतने आमची संध्याकाळ 'अमर सर्कस' पाहण्यात व्यतीत केली.

जाण्याआधी मला वाटलेले की माझ्यासाठी सर्कस आता थोडी बोरींग होईल. पण सर्कस चालू होऊन जसजशी त्यांची थीम चेंज होत गेली तसतशे त्यांचे एकएक प्रयोग पाहण्यात मजा वाटू लागली. दोन बुटके विदूषक, रबरी अंगाचा मुलगा(तो थोडा जास्तच लवचिक आहे), संगीताच्या तालावर आपला लयबद्ध नृत्याविष्कार करणार्या सुंदरी, सहा निरनिराळ्या प्रजातिंचे डाॅगी आख्खा रिंगण लोकांची करमवणूक करत फिरत होते.

बाजूला ईशांत मस्तपैकी पाॅपकाॅर्न खात सर्कसचा आनंद उपभोगत होता. आणि मीही माझ्या लहानपणाच्या उंबरठ्यावर अगदी येऊन पोहोचलोच होतो, फक्त दरवाजा उघडायचे बाकी होते. पण मला फारकाळ ताटकळत नाही राहावे लागले. समोर सर्कसमध्ये लाईटस् ऑफ झाल्या अन् एका सुंदर तरूणीची इन्ट्री झाली. सर्वांना अभिवादन करत तिने आपली कर्तबं मांडायला सुरुवात केली. वर लटकवलेल्या दोन रेशमी कपड्यांनी आधार घेऊन ती हवेतच एक एक कसरत करत होती. हवेत फिरता फिरता तिचा चेहरा माझ्या स्टॅडला सामोरा आला...

जणू तिने धक्का दिला, आणि दरवाजा उघडला.. हो माझ्या बालपणाचा (आणि बालिशपणाचाही).

मी सहावीत होतो तेव्हा. असंच फ्री तिकीटावर मला माझा शेजारी सर्कस पाहायला घेऊन गेलेला. आम्ही राहायला तेव्हा विक्रोळीला होतो आणि सर्कस भांडूपमध्ये. त्यावेळी तिकडे जाणारी एकच ६०३ नंबरची बस ठराविक अंतराने मिळायची. बसने आम्ही दोघे सर्कसच्या ठिकाणी गेलो. त्या सर्कसचे नाव नक्की आठवत नाही. मी सर्कशीतल्या प्रयोगांचा मनमुराद आनंद लुटत होतो. माझ्या शेजार्याने मध्येच आम्हा दोघांसाठी कॅन्डीही घेतली.

आयुष्यात प्रथमच सर्कस पाहण्याचा विलक्षण हर्ष माझ्या मनात होता. त्यात भरीस कॅन्डी मग मी ती खाताना आजूबाजूला बसलेल्या समवयस्क मुलांकडे ऐटीत पाहत होतो. त्यातल्याच एकाने मग त्याच्या आईकडे कॅन्डीसाठी भोकांड पसरवले. असो अश्या गमतीत असतानाच समोरच्या लाईट्स बंद झाल्या.

निळ्या रंगाच्या टाईट कपड्यात साधारण दहा वर्षांची एक मुलगी रिंगणात आली. रिंगणाच्या छपराखाली खुपश्या तारा बांधलेल्या आणि त्यांनाच लटकवलेल्या चार ओढण्या. या मुलीने दोन हातात दोन ओढण्यांची टोकं पकडली अन् हवेत झोका घेतला. हवेत उडतच ती वेगवेगळ्या कर्तबी लीलया दाखवू लागली. मी डोळे फाडून तीच्याकडे पाहत होतो. "ही तर चक्क उडतेय...." - अवाक् झालेला मी मनातच पुटपुटलो. तीच्या हरएक हालचाली सपासप वार करत होत्या माझ्यातल्या विचारशक्तीवर. आश्चर्य, कौतुक, रोमांच आणि भीती (ती पडेल की काय याची) सगळ्याच भावना एकाचवेळी मनात आल्या होत्या.

पाच मिनिटं हा चमत्कार मी पाहीला. लाईट्स ऑन झाल्या आणि आता तिची निरोप घेण्याची वेळ आली. सगळीकडे नजर फिरवत लोकांना अभिवादन करत ती माझ्या स्टॅंडकडे वळली. मी खुर्चीतून उठून जोरात हात हलवून तीच्या अभिवादनाला उत्तर दिले, तिने हात हलवतच डोळा मारला आणि निघून गेली. बास्स काळीज घायाळ केलं तिनं या हरकतीने. तिला त्याचवेळी पळत जाऊन पकडावं अस खुप मनात आले. पण शेजारी बसलेल्या माझ्या शेजार्याला काय सांगायचं म्हणून नाही गेलो.

घरी येईपर्यन्त माझा शेजारी काय न काय महाभारत सांगत होता आणि मी पोवाड्यातला कोरस बनून "जी..जी.." करत होतो. माझ्या डोक्यात राहून राहून तीच हवेत उडणारी मुलगी येत होती. अभिवादन करत होती, डोळा मारत होती. घरी पोहचून गचागच कायतरी खायचे म्हणून खाल्ले. आणि बाहेर पडून मैदान गाठले. तिथे एक कोपर्यातली जागा पकडली अन् पुढचा विचार करू लागलो. या दरम्यान माझ्यातल्या विचारांची आपापसांत चांगलीच खडाजंगी झाली ती पुढीलप्रमाणे....

"इतक्या लोकांतून तीने मलाच का डोळा मारला." "खरंच मी आवडलो असेन तीला?" "प्रश्नच नाही उगाचच डोळा मारेल का ती." "मी पाहीले तीने सर्वांना अभिवादन केले पण मला पाहूनच फक्त डोळा मारला." "काहीतरी बात नक्कीच आहे आपल्यात." "कदाचित यामुळेच ती माझ्यावर पाहताक्षणीच फिदा झाली असेल.."

"जाऊ दे, काहीही कारण असू दे.. तिने मला डोळा मारला म्हणजेच तिने तिच्या माझ्यावरच्या प्रेमाची कबूली दिलेय." "ती थोडी मोठी वाटतेय पण माझ्यापेक्षा. मग काय झालं चालतं तेवढं." "मम्मीच बोलली होती एकदा, सचिन तेंडुलकरची बायको पण त्याच्यापेक्षा मोठी आहे म्हणून." "मग त्यात काय." "शाळेचं कायं.. आणि आत्ता लग्न...?" "अरे नाहीतरी घरी बोलतातच की आता ह्याच लग्न केल पाहीजे म्हणून." (घरातलं शेंडेफळं म्हणून त्यांनी केलेली अन् मला त्यावेळी न समजलेली चेष्टा). "आणि त्या दिवशी तात्यांनी (काकांनी) पण डाफरलं की तुझं लग्न करायचं वय आलं तरी छोटीछोटी काम येत नाहीत."

खुप विचार केला आता उठून कामाला लागलंच पाहीजे." "आता माझी पाळी आहे, तिला जाऊन घरी आणायचं आपल्या." "बास्स आपल्याला बाकी काय माहीत नाही. घरी काय कोण नाही बोलणार नाही." "सर्कशीतली आहे ती अन् ते पण उडणारी मुलगी." "मम्मीपप्पा तिला बघुनच खुश होतील आणि जेव्हा ती मला धरून उडेल तेव्हा ते पण खुश होतील आम्हाला उडताना बघुन." "बरं झालं ती मोठी आहे ते. माझं वजनपण कमी असेल तिच्यापेक्षा. मग मला धरून उडायला तिला जास्त त्रास होणार नाही." "ठरलं उद्याच जाऊन तिला घरी आणायचं."

रात्रीचे नऊ वाजायला आले असतील मी मैदानातून निघून घरी आलो. दुसर्या दिवशी दुपारी शाळा सुटल्यावर घरी आलो. पटापट आवरून खेळायला जातो सांगून निघालो. कुठेकुठे साठवून ठेवलेला बारा रूपयांचा खजिना हाल्फचड्डीच्या खिश्यात भरला होता. एकटाच जायचे असं ठरवूनच चाललो. याअगोदर एकटा कधी ऐरीया सोडून बाहेर गेलो नव्हतो. पण तरी बिनधास्त होतो बायको आणायला जायचे म्हणून. चालत चालत एरीया संपला आणि बस स्टॉप आला. अगदी थोड्याच प्रतिक्षेनंतर बस आली. तीच ६०३.. लक्षात होते कारण ती एकच ६०३ नंबरची बस भांडूप ईस्टला जायची. बसमध्ये शिरलो, नशिब गर्दी नव्हती. शेवटची खिडकीची सीट पकडून शांत बसलो.

तेवढ्यात खाटखुट करत कंडक्टर जवळ आला. रोज प्रवास करत असल्याच्या आविर्भात मी एक एक रूपयांची पाच नाणी त्याच्यापुढे केली. तिकीट फाडून त्याने मला संपूर्णतः न्याहाळले आणि त्याच्या जागेवर जाऊन बसला. साधारण वीस मिनिटात मी स्टॉपवर उतरलो, बस पुढे निघून गेली. तिथून चालत दोनच मिनिटावर मैदान होते जिथे सर्कसचे खेळ होत होते. रस्त्यावर लावलेल्या सर्कसच्या पोष्टरवरील विदूषकाला मी तोंड वाकडे करून चिडवू लागलो. तुझी मैत्रीण मी पळवून नेणार असे मनातच त्याच्याशी बोलत होतो.

चालत चालत मी ईच्छित स्थळी पोहोचलो. पाहतो तर काय... तंबू उखडलेला, एका ट्रक मध्ये बांबू, ताडपदरी आणि काय काय साहीत्य भरलेले. पाच-सहा जण उरलेलं किडूकमिडूक घेऊन ट्रकमध्ये टाकत होते. मी नुकताच तंद्रीतून बाहेर आलेल्या बुजगावण्यासारखा त्यांना पाहत होतो. काहीच न बोलता गप्प ठोंब्यासारखा एकेकाच्या हालचाली टिपत होतो. त्यांचे सामान भरून ट्रक निघायला लागला तसा मी पळत जाऊन एकाला विचारले, "सर्कस कुठे गेली." तो शांतपणे म्हणाला.. "दुसर्या जागी .. नेरूळला." मी तयारीत असल्यासारखाच पुढचा प्रश्न केला.. "अन् बाकीची माणसं..?". "ती सकाळीच गेलीत.." तो उत्तरला.

खिन्न मनाने मी तिथून निघू लागलो.. नेरूळ माझ्या आवाक्याबाहेरचे होते. डोळ्यांत पाणी भरून यायला लागले होते... पुन्हा परतीच्या रस्त्यावर त्याच पोष्टरवरच्या विदूषकाला पाहीले.. तो विदूषक माझ्या अवस्थेवर हसत होता. त्याच्यावरून नजर फिरवून मी झपाझप पाऊलं टाकू लागलो. बस स्टॉपवर आलो. बस आली तसा निघालो. पाच रूपयांचे तिकीट काढले. बसमधली वीस मिनिटं खुप वाईट मनस्थितीत गेली. उतरून तडक घरी आलो. उरलेले दोन रूपये रिकाम्या खजिन्याच्या पेटीत पुन्हा ठेवले. थोडसं खाऊन खेळायला गेलो.

"मामू, चल सगळे निघाले.... ईशांतने हात ओढून सांगितले. मी भानावर येत समोर पाहीले. सर्कशीचा खेळ संपला होता. ईशांतला घेऊन मी गर्दीतून वाट काढत बाहेर आलो.

घरी पोहोचेपर्यंत मनाला विचारत होतो, त्यावेळच्या माझ्या वयाची तुलना करता, असला प्रसंग मी इतकी वर्षे कसा काय विसरलो होतो. अन् नेमका हा मेंदूच्या कोणत्या कोपर्यात दडून बसला होता. हा प्रसंग आजपर्यंत ना घरी माहीत पडला ना कधी कोणासमोर मांडला. कदाचित त्यामुळेच तो माझ्या आठवणींतही धुसर होऊन गेला. असो, ईशांतला सर्कस दाखवण्याच्या निमित्ताने मलाही माझी लहानपणीची सर्कस आठवली. आणि हो तीने प्रेक्षकांमध्ये पाहून डोळा मारला होता.

निलेश.

© https://www.marathistory.online

Email Address: desai.nilesh199@gmail.com