छेडीत जाऊ आज प्रीत.. Nilesh Desai द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

छेडीत जाऊ आज प्रीत..

"निदान भरलेला टीफिन तरी उचलून बॅगेत ठेवत जा..... कसलाच कामात मदत करत नाहीस.." तीच्या डोळ्यात निखार्यांची लाली व मुखात कामाची दगदग आणि नवर्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. सकाळी सकाळी बायकोचं असं रौद्ररूप पाहून मोहन चांगलाच बावचळला होता. नक्की हिला झालेय काय.. हे कळायला थोडा वेळ लागणार होता. म्हणूनच नजर खाली करून त्याने किचनमध्ये प्रवेश केला. तोपर्यंत साक्षीची बडबड चालूच होती. मोहन थोडा घाबरतच टिफीन उचलायला खाली वाकतोच तेवढ्यातच शरणागती पत्करलेल्या हरणावर झडप घालणार्या वाघिणीसारखी साक्षी समोर आली. त्याचा हात पकडून त्याला स्वतःसमोर अक्षरशः फिरवले अन् पुन्हा डरखाळ्या फोडू लागली.

"तुला हजारवेळा सांगितलेय तुझं कोणत्या मुलीशी बोलणं मला सहन होणार नाही.. मी म्हणतेय काय गरज काय होती तुला तिला भेटायची...? आणि तेही ऑफिसच्या बाहेर..? काय म्हणे तर कामानिमित्त बोलण्यासाठी जातायत.."


मोहन शांत राहून शब्दांचे वार झेलत होता. त्याला पाऊस खुप आवडायचा. पाऊस सुरू झाला की स्वारी पावसाचे असंख्य थेंब अंगावर घ्यायची. स्तब्ध उभा राहायचा मग तो.. जणू पाऊसाच्या हवाली करून द्यायचं स्वतःला. एक वेगळाच आनंद मिळायचा त्याला त्यात.


आताची परीस्थितीही थोडीफार अशीच होती. पावसासारखीच साक्षी बरसत होती. अन् आमचा हीरो तीच्या शब्दांच्या अगणित सुया टोचून घेत होता. नेहमीसारखंच स्तब्ध.. पण यावेळी पावसाऐवजी तीच्या हवाली केलेलं स्वतःला... आणि हो यात एक वेगळाच मनस्ताप मिळत होता त्याला. म्हणजे मघाच्या टिफीनपुराणामागे हा हेतू होता तीचा..

पाहूया नेमकं घडलंय काय ते... त्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल... चला तर मग..

कालचा दिवस :-

काल मोहनला घरी यायला तब्बल एक तास उशीर झाला. झालं असे की ऑफिस सुटतानाच त्याची रेखा नावाच्या क्लाईंटशी गाठ पडली. बाहेर येता येता क्लाईंटने मोहनला कॉफीची ऑफर दिली. अहं.. तसलं काही अजिबात नव्हतं दोघांच्याही मनात.. ऑर्डर घेणेदेणे संदर्भात दोघांच्याही फायद्याच्या गोष्टी बस्स.. बाकी काही नाही. त्यातच हा एक तास भुर्र्कन उडून गेला. तसा मोहनला घरी जायला कधी उशीर व्हायचा नाही. नेहमीचा सातचा ठोका ठरलेलाच त्याचा. पण आज आठ वाजलेच त्याला. घरी पोहोचून शुज काढताच साक्षीनं पाणी दिलं. पाणी प्यायला ग्लास वर करणार तोच तीनं प्रश्न केला.. "उशीर कसा झाला...?"


मोहनने सांगितलं सगळं काही जे घडलं ते. साक्षीनं ही मग छान मूडमध्ये येऊन रेखाबद्द्लची माहीती विचारली. मोहन आणि रेखामधले सर्व संभाषण, रेखाने घातलेले कपडे, तिचं दिसणं आणि बरंच काही मोहनरावांनी जेवढं माहीत होतं तेवढं विश्लेषण करून सांगितलं. अर्थात साक्षीने तीला मोहनच्या कामात खुप इंटरेस्ट आहे असं दाखवतच हे सगळं खोदून काढलं. आणि मोहनने कर नाही तर डर कशाला अश्या अविर्भावात सर्वकाही मांडलं. नेमका इथेच सगळा घोळ झाला...


दोन वर्षे झाली असतील साक्षी आणि मोहनच्या प्रेमविवाहाला. दोघं एकदुसर्याला पुरेपुर जाणणारे. अगदी मनकवडेच ते एकमेकांपुरते. मोहन दोन स्वभावाचा.. एक अख्ख्या जगासाठी स्मार्ट, हजरजबाबी अन् चपखल. कोणाच्याही तावडीत सहसा न सापडणारा. दुसरा अगदी उलट साक्षीसाठी. बाहेरच्यांसाठी अंगावर चढवलेली चतूर कोल्ह्याची कातडी घरात पाय ठेवताच काढून ठेवायचा तो. शंकाच नाही की तो साक्षीला घाबरून असायचा. दुसरीकडे साक्षी... बेधडक, तडक, प्रेमळ, रागीट असे सगळेच भाव प्रसंगाला अनुसरून मोहनवर बरसवायची. बाकी सर्वांसाठी मात्र ती फक्त मायाळू होती.


तुझ्याशिवाय करमेना सारखाच दोघांचा जीव होता एकमेकांवर. त्याला माहीत होतं की ही माझ्यावरच्या तीच्या प्रेमामुळेच कधीकधी रागावते. आणि तीलाही माहीत होतं माझ्याशिवाय या मोहनवर कुणाचीही मोहीनी होणार नाही. पण तरीही तीला राग यायचाच .. कारण स्पष्ट होतं...


आज : -

"माझा तुझ्यावर विश्वास आहे पण आजकालच्या मुली भस्सकन अंगावर येतात रे.... उद्या तुझा कोणत्या मुलीने विनयभंग केला तर..?" बॅगेत टिफीन भरत साक्षी अजूनही थोड्या त्रासिक आणि तितक्याच चिंतीत स्वरात म्हणाली. मोहनने सुरूवातीपासूनच शस्त्रास्त्रे टाकली होती मग भांडण्यात काही अर्थच उरला नव्हता. म्हणूनच एव्हाना तीचा राग कमी कमी होत चाललेला.

"अगं काही काय बोलत आहेस..." मोहन. आता मात्र तो चांगलाच वैतागला होता. खुप झाले आता.. अरे काही सेल्फ रिस्पेक्ट असतो की नाय राव... मोहन प्यारे उचल बॅग आणि नीघ इथून. "चाललो मी..." म्हणत मोहन घराबाहेर पडला.


'सर्व खपतं मला. हीचा राग, संताप सगळं सगळं मी मुकाट्याने ऐकून घेतो. पण हिचं असे हेल्पलेस होऊन गेलेलं नाही आवडत मला. ओरडत होती तिथपर्यंत ठिक होतं कशाला शेवटचं वाक्य सुनाऊन इमोशनल व्हायचं. मला चालते ती वाघिणीसारखी, असं हरणासारखं तिचं अगतिक होणं नाही आवडत मला. अन् ते पण कश्यासाठी.. हे भगवान... उठाले.. मी.. रेखा.. विनयभंग.. हाटट्... काहीही बोलते ही रागाच्या भरात..'


"तीला चांगलंच माहीत आहे मी नाही तसा तरीही आपलं काहीही.. ऊगीचच.. अर्रे रताळ्या... तीचं सोड.. तुला काय एवढं बाबू चव्हाणाच्या वस्तार्यासारखं हालायची गरज होती.. तू कशाला सत्यवादी हरीशचंद्र बनायचा प्रयत्न करतोस मला कळत नाही अजिबात... सांगायचं न काहीही.. काम जास्त होतं.. नायतर रवीबरोबर कामासाठी बाहेर गेलेलो.. काहीही.. सांगायचं की.. .. आयला ह्या रवीचं बराय राव.. एक्सट्रा मॅरेटियल अफेअर्स.. तेही दोनदोन.. अन् आम्ही.. आपल्या मनात काय नसून पण माझीच बायको तिच्या खयालांत मुलींना जबरदस्ती खेचून आणून माझा विनयभंग करवते..."


दुपार होईपर्यंत मोहनच्या मनात त्याच विचारांची चक्र फिरत होती. जेवणाची वेळ झाली तसा टिफीन घेऊन तो कॅन्टीनमध्ये निघाला. 'नको.., तिथं सतरा जणं आपला चेहरा ओळखुन थट्टा करतील.. त्यापेक्षा आज इथंच केबिनमध्ये बसतो..' मनात ठरवून मोहनने टिफीन उघडला. चपातीबरोबर आवडत्या मसुरच्या भाजीचा घास घेतला.. 'उमम्.. कायपन बोल तु बाकी, बायको जेवण मस्त बनवते आपली.' खाताखाता तिसर्या डब्ब्याकडे लक्ष गेल् त्याचं. 'अरे, हा तिसरा डबा कसला..' उघडून पाहीला, 'उपमा..!' 'हात् त्याच्या.. सकाळी नाश्ता कुठं केलास तू घरी..' 'अशी आहे माझी साक्षी.., किती प्रेम करते माझ्यावर.. घरात सकाळी झालेल्या प्रसंगानंतर मी नाश्ता करायचा विसरलो पण तीने टिफीनसोबत नाश्ताही दिला.' 'मी मुर्खासारखा बाकीचं विसरून तोच विषय दिवसभर आठवत राहीलो अन् तीने एवढं घमासान करूनही आपलं काम चोख ठेवलं.'


'मी नेहमी ठरवतो की माझे दिवसभरातले मुलींसोबतचे प्रसंग साक्षीला नाही सांगायचे. पण मनात कोणतं ओझं ठेवून तिच्यासमोर जाणं नाही जमत मला. आणि ती.. होतं असे कधीकधी.. वैतागत असेल ती ही तेच तेच काम करून किंवा माझ्याशी दिवसभर बोलता येत नाही म्हणून.. किंवा तिच्यासाठी असलेला माझा वेळ मी इतर कोणाला देऊ नये म्हणून.. तसं ती बरीच पझेसिव्ह आहे माझ्याबाबतीत.. किंवा.....'

'एक मिनीट.... अरर् हा सिग्नल तर नाही ना.... ओह.. गॉड.. शिट...' आता मात्र मोहन आपल्या तंद्रीतून भानावर आला.


काय आहे ना, लग्नाआधी साक्षी आणि मोहन मध्ये काही नियम ठरले होते. साधे सोपे असे ते नियम कोणत्याही परिस्थितीत पाळायचेच असे स्पष्ट वचन होतं दोघांच. पहीला नियम, कॉलची समाप्ती 'लव्ह यू' याच शब्दाने होणार मग कॉलवर कितीही भांडणं होऊ दे. दुसरा नियम प्रत्यक्ष भेटीत जर भांडणं झालीच तर ज्याचा आवाज पहीला चढेल त्याने दूसर्याच्या गालावर किस करायचं.. मग काय.. या नियमांचा फायदा असा होता की कॉलवर यांच भांडण कधी दहा मिनिटाच्या वर टिकायचं नाही. आणि पब्लिक प्लेस मध्ये भांडण व्हायचंच नाही.


तर लग्नानंतर या नियमांत अजून एकाची भर पडली. तो तिसरा नियम असा, ' महीन्यातले ते काही मोजके चार-पाच दिवस भांडण पूर्णता टाळायचे (जरी झालेच तरी थोडफार व्हायला हवं ना राव), आणि इतर एखाद्या दिवशी जर वाद झाला तर त्या दिवसाची समाप्ती प्रणयाने करायची.'


मोहनला आठवू लागलं आतापर्यंत सर्व ठिकच होतं पण हल्ली ऑफिसमधला तणाव त्याच्यात येऊ लागला होता. तरीच साक्षी दोन-चार दिवसात सारखीच काही किरकिर करत असायची. नेमकं हेच त्याला उमगत नव्हते. असो आज झालेल्या खडाजंगीमुळे या प्रकरणाचा छडा लागला होता. संध्याकाळ होत आलेली. आज ऑफीसमधल्या कामाचा तर सत्यानाश झाला होता. पण चतूर कोल्हासारखं त्याने ज्यूनिअर्सवर काम टाकलं.


सहा वाजले आणि मोहन घरी जाण्यासाठी उठला. घरी पोहोचेपर्यंत त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आज बर्याच दिवसांनी त्याच्यात आणि साक्षीमध्ये वाद झाला होता.


घरी आल्यावर साधारण तासाभरात मोहन स्तब्ध उभा होता. आताही वर्षाव सुरू होता त्याच्यावर.. अहं.. ना पावसाच्या थेंबांचा ना शब्दांच्या टोचणार्या सुयांचा.. हा वर्षाव साक्षीच्या प्रेमाचा होता.

मोहनने पुन्हा तिच्या हवाली केलेलं स्वतःला. आणि हो.. या क्षणाला त्याला वेगळाच रोमांच मिळत होता..


( निलेश देसाई )


© https://www.marathistory.online/

Email Address: desai.nilesh199@gmail.com