रंग माझे किती - रंग माझे किती.. Nilesh Desai द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रंग माझे किती - रंग माझे किती..


दारावरची बेल वाजली तसे आईने जाऊन दार उघडले. दारात फुल स्लीव्हच्या ड्रेसमध्ये खांद्यावरची ओढणी सावरत शर्मिला उभी होती, गालांत मंद हसत.. सुंदर तितकीच नाजूक वाटावी अशी तिची छबी.

"उशीर केलास आज यायला..!" आई घड्याळाकडे पाहत म्हणाली.

"सॉरी आई.. पहिल्या बसमध्ये खूप गर्दी होती, म्हणून मग मागच्या बसने आली.. " काहीश्या घाबरट भावात आणि संस्कारी आवाजात मान किंचितशी हलवत शर्मिलाने उत्तर दिले.

"अगं.. नुसतंच विचारलं मी.. गुणाची माझी बाय.." आईला तिचा हेवा वाटला.

शर्मिलाच्या पाठी एक भाऊ असूनसुद्धा आई वडिलांची तिच लाडकी होती. आईवडिल दोघेही कडक शिस्तीचे होते. मुलीच्या जातीला असणाऱ्या साऱ्या मर्यादा शर्मीलावर लहानपणापासून लागू होत्या. शर्मिलाचा लहान भाऊ सतत या ना त्या कारणावरून वडिलांचा मार खायचा. होताच तसा तो उडाणटप्पू स्वभावाचा. याउलट शर्मिला सोज्वळ, शांत, आईवडिलांचा एक शब्द खाली पडून द्यायची नाही. पदवी घेतल्यानंतर लगेच मोठ्या कंपनीत तेही मोठ्या हुद्द्यावर नोकरीला लागली होती. कधी कुठल्या मुलाशी बोलणं नाही. घरात मोबाईल हातात घेतलेला क्वचितच दिसायची. कामावरून आली घरकामात मदत करायची. त्यामुळे आईवडिलांना तिचा खूप अभिमान वाटायचा.

सकाळी आठ वाजता भरभर आवरून शर्मिला फुल स्लीव्हचा दुसरा ड्रेस घालून ऑफिसला निघाली. घरातून निघताना रोज आईवडिलांच्या पाया पडायची. आईवडिल रोज तिच्याकडे कौतुकाने पाहायचे. 'किती गोड दिसायची ती अश्या फुल स्लीव्हच्या ड्रेस मध्ये...!'

एकूणच शर्मिलाच्या अंतरंगात 'संस्कारी रंग' खूपच उठून दिसायचा.


बसस्टॉपपासून साधारण दोनतीन मिनिटं समोरच्या दिशेने चालत गेले की एका मोठ्या कंपनीची इमारत लागायची. तिच्याच मागच्या बाजूला असलेल्या एका जुनाट आणि छोट्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ते कॉलसेंटर होतं. इमारतीच्या आवारात तरुणाई दुकली, चौकडी अशी जमा होऊन गप्पा मारत होती. एका बाजूला तीन तरुण आणि दोन तरुणी आपापसांतील संभाषणात जरा जास्तच गुंग झाले होते.

"तू तिचा नाद सोड.. तिचा ऑलरेडी बीएफ आहे.." त्यातलीच एक तरुणी दुसऱ्या तरुणाला म्हणाली.

"तरीपण मी तिला पटवून दाखवेन.. आपण काय चीज आहे ते अजून दाखवलं नाही मी.." तो तरुण उत्साहात म्हणाला.

"अय.. चिरकूट... मायला तुला चीज बटर लावून मारेल तिचा बॉयफ्रेंड.." मागून आवाज आला तसा त्यांचा ग्रुप आवाजाच्या दिशेने वळून पाहू लागला.

आवाज ओळखीचा होता, आणि तीदेखील.

"शमी.. या तुमचीच कमी होती.. आज डबा बनवायला उशीर झाला वाटते संस्कारी मुलीला.. " त्याच ग्रुपमधला दुसरा मुलगा तिची टर खेचायच्या उद्देशाने म्हणाला.

त्याचं वाक्य संपेपर्यंत शर्मिलाने मागून येऊन त्याचा हात मागच्यामागे पिरगाळला.

"शानपट्टी आपल्यासमोर नाही हा.. शिस्तीत राहायचं.. आणि माझ्यापेक्षा कमी बोलायचं.. " शर्मिला बळेबळेच दातओठ खाऊन म्हटले.

"अगं हो.. दुखतंय.. सोड माझे आय.. " तो मुलगा आता विनंती करू लागला.

शर्मिलाने त्याला सोडून दिले आणि ग्रुपमधल्या तिसऱ्या मुलीकडून छोटी बॅग घेऊन ती वॉशरूमच्या दिशेने निघाली.

"अहो बघा बघा.. सीता आता गीता बनायला चालली.. " मागून पुन्हा त्याच मुलाने खिल्ली उडवली पण यावेळी फक्त तिने मागे पाहून दात दाखवत हसण्याची कृती केली.

कामाची वेळ नऊची असली तरी तिथला जवळपास सारा युवा वर्ग साडेआठलाच जमा व्हायचा. गप्पा गोष्टी करत दिवसाची सुरुवात छान व्हायची. घरातल्या मर्यादित स्वातंत्र्याला छेद देत मैत्रिणीच्या बॅगमध्ये असलेले आपले बदलत्या काळातले कपडे घालण्यासाठी शर्मीलाही लौकरच यायची. घरात अर्थातच तिचे असे कपडे खपवून घेतले गेले नसते, पण म्हणून मग स्वतःच्या आवडीनिवडीचा संपूर्ण त्याग कशाला करावा.

घरी जसे आईवडिलांना आवडते तशी ती सोज्वळ, संस्कारी होती, त्याउलट बाहेर जश्यासतसे, काहीशी फटकळ आणि एखाद्यावर चांगलेच तोंडसुख घेणारी होती.

जीन्स, टी शर्ट वा तत्सम टॉपमध्ये शर्मिला आणखीच खुलून दिसायची. टी शर्टच्या बाह्या जरा अजून आतमध्ये फोल्ड करून समोरच्या व्यक्तीशी नजर भिडवून ती आपल्या निडर व्यक्तिमत्वाची छाप पाडायची. घरी शांत अबोल राहणारी शर्मिला मित्रांसोबत त्यांच्याच भाषेत थट्टामस्करी करायची. यावेळी घाबरट भाव जाऊन तिच्या वागण्या बोलण्यातला आत्मविश्वास ठळक जाणवायचा.

तिच्यातला घरातल्या 'संस्कारी' रंगावर आउटलाईन मारल्यागत हा नवा 'बिनधास्त रंग' तिला बाहेरच्या जगात सुरक्षिततेची जाणीव करून द्यायचा.


मागे एकदा एका मित्राचा अपघात झाला होता, तेव्हा कामाचा खाडा करून तो दिवस मित्राची देखभाल करत घालवला होता, तेव्हा शर्मिलातील गडद 'बिनधास्त' रंगावरही 'काळजीचा रंग' आपलं अस्तित्व दाखवून गेला होता.


कामात वरिष्ठांवरही तिच्या संभाषणातील 'चातुर्याचा रंग' भुरळ पडून जायचा.

तिच्या कामाचं खूपदा कौतुक होऊन तिने आपल्यातला 'हुशारीचा रंग' देखील बऱ्याचदा दाखवून दिला होता.

आईवडिल, मित्रमैत्रिणी कितीही जवळचे असले तरी पगारातल्या पैश्यातून स्वतःच्या भविष्यासाठी छोटीशी शिल्लक जमा करताना तिचा 'व्यावहारिक रंग' समोर यायचा.

त्या दिवशी वडिलांचा मार खाताना लहान भावाला स्वतःच्या मागे घेऊन तिने वाचवण्याचा प्रयत्न केला. तसे तर हे रोजचेच होते. तिला त्याच्या पुढे पाहून वडील फारफार तर त्याला ओरडत आणि निघून जात. तेव्हा आपल्या लहान भावाला मग प्रेमाने समजावून सांगताना थंड सावली देणारा 'मायेचा रंग' तिच्यात चपखलपणे मिसळून जायचा.

आपल्या आसपासच्या परिघांवर तंतोतंत बसतील अश्या जवळपास साऱ्या रंगांची उधळण शर्मिला करत असायची. ते सर्व रंग एकत्र येऊनच शर्मिलाचं बहुरंगी आयुष्य अजूनच रंगतदार व्हायचं.

असाच एका सायंकाळी तो तिला पहिल्यांदा दिसला. वयाच्या त्या टप्प्यावर येईपर्येंत कित्येक रंगात रंगलेली शर्मिला अजून त्या रंगापासून अनभिज्ञ होती. पण त्या दिवसापासून 'प्रेमाचा रंग' ही तिच्यात हळूहळू मिसळू लागला होता.


स्त्री आयुष्यात फक्त इतकेच रंग नसतात. दैनंदिन जीवनात स्त्रियांच्या मनात असे कितीतरी रंग जन्म घेत असतात, ज्यांची मोजदात करता यायची नाही. स्त्री मनाचा कोणाला ठाव लागू शकतो, म्हणून ते सगळेच रंग शुभ्र कागदासारखं कोरं मन असलेल्या व्यक्तींवर अधिक शोभा आणतात.. अश्या बहुरंगी स्वभावाच्या या स्त्रिया त्यांच्या आसपासचं पूर्ण वर्तुळ रंगमय करून जातात. काळ्या वा गडद मनाच्या व्यक्ती स्त्रियांच्या त्या अभूतपूर्व रंगांपासून नेहमीच वंचित राहतात.


समाप्त

निलेश देसाई