सौभाग्य व ती! - 2 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

सौभाग्य व ती! - 2

२) सौभाग्य व ती!
खोलीतून बाहेर आलेल्या नयनच्या लक्षात आल, बाहेर चांगलं फटफटलं होतं. त्या पहाटव्याचा आनंद झालेली कोकिळा दूरवर कुठेतरी गात होती. नयनने चूळ भरण्यासाठी पाणी तोंडात घेतले. त्या पाण्याचा स्पर्श होताच ओठांची आग आग झाली. तिचं लक्ष सहजच शेजारी गेलं. कामवाली विठाबाई काम थांबवून तिच्या हालचाली निरखत होती.
"का ग, काय झालं? काय पाहतेस?"
"म्या की न्हाय तुमालाच बघते. लई तरास झाला का बो राती? धन्याने लै छळल का जी?"
"छे...छे...तुला..."
"तुमी सांगू नका. पर तुमचं त्वांड सम्द सांगत्येय की तुमचं कवळ-कवळ व्हट कसे लालभडक झाल्येत आन सुजलेत बी. बायसाब, आपला जन्मच त्येच्यासाठी. किडा-मुंगीला जे चुकलं न्हाय त्ये तुमा-आमाला कसं चुकल? बायसाब, बायकाचं आसच हाते फा. पंद्रा-सतरावरीस ज्यांनी सांभाळल, माया लावली त्येंना ईसरायचं आन् काल-परवा जो आपल्या जिंदगानीत आला, त्येला वरीस न वरीस जपल्याली जवानी देवून टाकायची...' झाडत झाडत विठाबाई दुसऱ्या खोलीत निघून गेली...
नयनच्या सासरी होते तरी कोण? सदाशिव आणि म्हातारी विधवा सासू. दुसरे एकदम जवळचे...सख्खे असे कुणी नातेवाईक नव्हतेच. सासुला तिच्या कामातून, पूजेतून वेळ नसायचा. गल्ली तशी भावकीची होती परंतु नयन सासरी आल्यापासून त्या दोन-तीन दिवसात कुणी भावकीचे वाड्याकडे फिरकले नव्हते. त्या वाड्याला लागून असलेल्या वाड्यामध्ये पन्नाशीकडे झुकलेले सदाचे मामा आणि त्यांची तरूण पत्नी प्रभा राहत होते. प्रभा सदाशिवची मामी होती. त्याच्या मामांचे कपड्याचे दुकान होते. नात्याने प्रभा नयनची सासू पडत असली तरी दोघी समवयस्क असल्यामुळे नयनने एक-दोन वेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु प्रभाने तिला हवा तसा प्रतिसाद दिला नाही, एकदम त्रयस्थासारखी ती वागत होती. नयनविषयी प्रभाच्या भावना द्वेषात्मक असल्याचे नयनला जाणवत होते. विठाबाई मात्र नयनची विचारपूस करीत असे. तिला काय हवय, काय नको ही चौकशीही करी. 'त्या' रात्री नंतरच्या एका दुपारी विठाबाई ओसरीवर गहू निवडत होती. घरात त्या दोघींशिवाय कुणी नव्हतं. नयन स्वतःच्याच विचारात दंग असल्याचे पाहून विठा म्हणाली,
"बायसाब, तोंडावर बारा कामून हो? लगीनाला म्हैना बी झाला न्हाय आन तुमी अशा? अव्हो, हासण्याचं-खेळण्याचं वय. आत्ताच कोठं सौंसार सुरू झाला आन तुमी... आणू का धन्याला बोलावून...म्हंजी मग..." तिच्या बोलण्याने अधिकच दुःखी होत नयन म्हणाली,
"विठा, अगं कसं सांगू तुला? रात्री फार त्रास देतात गं."
"तायसाब, लय सुखी बर तुमी. अव्हो, रोज तर्रास देणारा गडी मिळणं म्हंजी तुम्ही लय भाग्यवान व्हो..."
"अग, तुला..."
"खरं सांगते तायसाब तर्रास देणाऱ्या माणसाची ताकद..."
"कशाची ताकद आलीय? अग, रोज पितात आणि त्या नशेत नुसतं छळतात."
"तायजी, गडीच हाय की त्यो. राजे-महाराजे बी पेत व्हतेच की. पर अशा गोष्टी बायांना सोसाव्या लागतात मरद म्हटल्यावर पेणारच. ते कोण्ला सुटले हाय."
"अग, पण..."
"तस न्हाय. मव्ह ऐका. येक दारू पेणं सोडलं तर हाय का कोठ बोट ठिवाय जागा? सुकात लोळा हो, कहाची कमी नाय. पैकाच पैका हाय."
"पैशात लोळलं म्हणजे तुला सुख आहे असं वाटते?"
"तायसाब, जरा दमानं घ्या. हळूच त्येना समजून सांगा, आयकतील त्ये. उगीच काय बाय बोलू नगा. न्हाय तर सोन्यावाणी सौंसार बिघडल बगा." विठा म्हणत म्हणत भांडी घासायला गेली...
रात्रीगणिक नयनचा त्रास वाढत होता. ते सारे सासुला सांगायची हिंमत होत नसे आणि नयनशी बोलायला सासुलाही वेळ नसे. सकाळी चार वाजल्यापासून तिचा दिवस सुरू होई. थंड पाण्याने स्नान करून साधारण साडेपाचपासून ती देवघरात जाई ते आठ साडेआठ वाजेपर्यंत तिथेच असे. साडेपाच-सहाला नयन उठे. तिची चाहूल लागताच सासू चहाचे आधाण ठेवत असे. तोवर नयनचे स्नान होत असे. नंतरच नयनला स्वयंपाक घरात प्रवेश करण्याची परवानगी असायची. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या सासूने नयनला कडक शब्दात बजावलं,
"सूनबाई, सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करूनच घरात शिवायचे. पारोश्या अंगाने कशालाही हात लावायचा नाही." आठ वाजल्यानंतर सासू देवदर्शनासाठी जाई. नंतर सदाशिव उठत असे. तो स्नान करून येईपर्यंत त्याचा चहा नयनलाच करावा लागे. नऊ-साडेनऊला मंदिरातून परतलेली सासू पुन्हा स्वयंपाकघराचा ताबा घेई. स्वयंपाकात कुणी ढवळाढवळ केलेली चालत नसे. सदाशिवच्या आवडीचे जेवण सासू स्वतः करीत असे. सकाळी जेवून बाहेर गेलेला सदाशिव रात्री उशिरा घरी परत येई. घरी भरपूर शेती असल्यामुळे त्याला नोकरीची गरजच नव्हती. सायंकाळचे सदाचे जेवण बाहेरच होत असे. त्याबद्दल नयनसमोर सासूने कधीच चकार शब्द काढला नाही. एक दोन वेळा नयननेच त्याला विचारले,
"अहो, जेवायचे का?"
"तुझा आणि माझ्या जेवणाचा काहीही संबंध नाही."
"अहो, मी तुमची वाट पाहत थांबलीय."
"कुणी सांगितलं तुला? हे बघ, नवऱ्याला मुठीत ठेवायचे हे थेर करू नकोस. बाईच्या ताटाखालचे मांजर बनणे मला आवडणार नाही..."
"अहो, पण..."
"चूऽप!..." असे बजावत त्याने एक-दोन वेळा नयनवर हातही टाकला...
सासुला या गोष्टी सांगून काहीही फायदा नाही. प्रभाच्या तरी हे सारे कानावर घालावे म्हणून नयन त्या दिवशी दुपारी प्रभाच्या वाड्यात गेली. प्रवेश दारात लक्ष जाताच ती दचकली. दारात सदाशिवचे बुट होते. प्रभाचे पती नसताना सदाशिव तिथे? मनात आलेली शंका आत दाबत तिने वाड्यात प्रवेश केला. बैठकीमध्ये दूरदर्शनवर सिनेमा चालू होता. समोरील सोफ्यावर लक्ष जाताच ती दचकली... तिचा पती सदाशिव... तिचे सर्वस्व.... त्याच्या तरूण मामीच्या खांद्यावर मान टाकून सिनेमा पहात होता. ते दृश्य पाहून नयनला प्रचंड धक्का बसला. त्या अवस्थेत ती मागे फिरणार तितक्यात प्रभाचे नयनकडे लक्ष गेले. झटक्यात प्रभा बाजूला झाली. कपडे, केस विस्कटलेल्या अवस्थेत घोगऱ्या आवाजात ती ओरडली,
"कोऽण? नयन?"
आश्चर्य आणि रागाने सदाने ओरडून विचारले, "तू कशाला आलीस?"
"सहजच..." नयन हुंदका आवरत म्हणाली.
"सहजच? माझ्या मागावर राहून हेरगिरी करतेस?"
"तसं नाही हो..."
"मग कुणाच्याही घरात असं चोरासारखं शिरतात? आवाज न देता? दार न वाजवता? हेच शिकवलं वाटतं माहेरी?" सावरलेली प्रभा म्हणाली.
"खबरदार! माझ्या माहेरचे नाव काढाल तर?" चोराच्या उलट्या बोंबा पाहून संतापलेली नयनही जोरात म्हणाली.
"काय म्हणालीस? काय करशील ग? सासुला उलटून बोलतेस? थांब, तुझी मस्ती उतरवतो..." असे म्हणत सदाशिवने हातातली सिगारेट नयनच्या हातावर दाबली. त्याप्रकारामुळे कातडी भाजण्याच्या दुःखापेक्षा हृदयावर झालेली जखम घेवून आसवं आतल्या आत गिळत ती वाड्याबाहेर पडली. समोरच्या ओट्यावर बसलेल्या दोन-तीन बायका तिला पाहन कुजबुजत होत्या. तिच्या वाड्याच्या दारात बसलेल्या कुत्र्याने उगीच रडायला सुरुवात केली...
ओसरीवर विठाबाई बसली होती. हातातल्या सुईने पायात रुतणारा काटा काढण्याच्या प्रयत्नात होती. मात्र नयनच्या काळजात सलत असलेल्या काट्याचे काय? डबडबल्या डोळ्यांनी नयन खोलीत गेल्याचे पाहून विठाही तिच्या पाठोपाठ खोलीत शिरत म्हणाली,
"काय झालं?"
"काही नाही."
"नाही कसं? ह्यो डोळ्यात पूर कामून आला?"
"विठा, अग खरच..."
"तुमास्नी मही आन हाय. काय झालं त्ये सांगा." विठा तसं म्हणाली आणि मग नयनला राहवलं नाही. तिने रडतरडत प्रभाच्या वाड्यात घडलेलं सारं सांगितलं. ते ऐकून विठा म्हणाली,
"त्या मुडदीचं मडं कामून जात न्हाई? काळं पांढरं बी व्हईना हडळीचं. वाटलं व्हत परीवानी बायकू आल्यावर तरी हे थेर थांबतील, पर न्हाय वळणाचं पाणी..."
"म्हणजे? लग्नाच्या आधीपासूनच..."
"हां. आत्ता लपून काय ठिवायचं? म्हातारपणी त्या थेरड्यानं लगीन केलं आन आपल्या धन्याची चंगळ झाली..." विठा सांगत असताना शरीरातला प्राण निघून गेला असेच नयनला वाटले. बाहेरून कुणीतरी आवाज दिला म्हणून विठाबाई बाहेर गेली. आता आपणच काहीतरी केलं पाहिजे या विचारात नयनने सायंकाळी चांगला साजशृंगार केला. आरशात डोकावताच ती आश्चर्याने पाहतच राहिली कारण ती प्रभापेक्षा काकणभर सरस होती. नयन मनाशीच म्हणाली,
'मी थोडे बदलले. स्वतःच्या सौंदर्याच्या जाळ्यात जरा प्रेमाने सदाला पकडले तर तो प्रभाला दूर करेलच...' रात्री नयन वाट पाहत राहिली. दहा वाजता परतलेल्या सदाला घ्यायला ती दारापर्यंत गेली. त्याला सांभाळत आतल्या खोलीत नेले. सदाशिवने तिला झटकण्याचा प्रयत्न केला परंतु तिने जुमानले नाही. त्याला घट्ट पकडून पलंगावर बसवले. खाली बसून त्याचे बूट काढले. त्याच्याकडे प्रेमळ, तिरपा कटाक्ष टाकत आवाजात अधिक प्रेमळपणा आणत तिने विचारले,
"जेवण आणू का?"
"नैऽने तुला माहिती नाही, मी जेवत नाही ते? तू हे प्रेमाचे नाटक..."
त्याचा तो आरोप ऐकताच तिचा निश्चय डगमगला संतापाने थरथरत ती म्हणाली,
"काऽय? नाटक? कोण करते? ती का मी?"
"चूऽप! तिला काही बोलशील तर जीभ काढून..." असे म्हणत त्याने धडपडत नयनवर झडप घातली...
दिवसेंदिवस त्याचा छळ वाढत होता. प्रत्यक्ष बायकोवर नवनवीन पद्धतीने बलात्कार करताना तिला जखमी करायचा. त्या जखमा काही वेळाने भरून येतं परंतु हृदयावर झालेल्या जखमांचे काय? त्या कशा भरतील? उलट रोज नवीन जखम तिच्या काळजावर होत असे. तशा अनेक जखमा घेऊन नयन संसाराचा गाडा ओढू लागली. अनेक दिवस... काही महिने...
त्या सकाळी उठलेली नयन पळतच न्हाणीकडे जाताना रस्त्यातच भडाभडा ओकली. देवपूजा करणाऱ्या चाणाक्ष सासूने ती गोष्ट हेरली. तिच्या हातातला घंटा जोरजोरात वाजू लागला. विठाबाई नयनकडे धावली. तिला सावरत म्हणाली,
"ताईसाहेब, फा तर सूर्वे निघाला..."
"काय?.." काही न समजलेल्या अवस्थेत नयनने विचारले.
"डोंबल मव्ह. झोपा आता गुमानं..." असे म्हणत नयनला हाताला धरून आत पलंगावर नेऊन बसवले.
"म्हणजे?" नयनने विचारले.
"बायसाब, येड्या की खुळ्या. धन्याचं पिरेम..."
"नाऽही. नाऽही. विठा, अग हे प्रेम नाही. ही-ही वासना आहे..ती- ती... आता तुला कस सांगू...हे-हे- पाप आहे. रोज होणाऱ्या बलात्काराचे हे पाप आहे. त्यांचे ते प्रेम नसते ग विठा, प्रेम नसते! तो प्रेमाचा नुसता देखावाही असता ना तर मी त्यावरही जगले असते. अग, विठा तो बलात्कार असतो. बलात्कारी विठा! त्या संबंधात प्रेमाचा, नाजूकपणाचा लवलेशही नसतो."
"आता ग बया, आस्सी ग्वाड बातमी सांगली तव्हा फुलावाणी हसायचं सोडून रडताय..."
"मग काय करू विठाबाई? काय असेल भविष्य त्याचं? का जन्माव त्यानं? ही इस्टेट..."
"आता ग बया, त्यो जन्मला बी न्हाय तर तुमच येगळच. दुसरी बाय कोण ठिवत न्हाय हो? राजे, म्हाराजानीबी ठिवल्यात. अश्या ठिवल्याला बायांना काय म्हनत्यात ठाव हाय? रखेल...! रखेल म्हंत्यात त्येंना. ईष्टेटीचं म्हण्ता व्हय तर खरा वारीस तुमच्या उदरात वाढतो. तेव्हा सम्दी ईस्टेट यांचीच की. हा आता जरासं हासा की..." विठा म्हणत असताना नयन बळेबळेच हसल्याचं पाहून तीच पुढे म्हणाली, "हां फा बर, त्वांड कसं गुलाबावाणी झालं. पडा आता जरा गुमान. मही काम ऱ्हायलीत..."
विठाबाई खोलीबाहेर पडली आणि सदाशिवने खोलीत प्रवेश केला. मरणतीरी हेलकावणाऱ्या तिच्या नावेत स्वतःच्या हलकटपणाचा, अतिरेकीपणाच अंश सोडणाऱ्या नवऱ्याला पाहून नयनच्या अंगाची लाही लाही झाली...
००००