Matrutva books and stories free download online pdf in Marathi

मातृत्व - एक संघर्ष असाही


मातृत्व हे महिलांना लाभलेले वरदान जरी असले, तरी काही महिला यापासून वंचित राहतात. समाज त्यांना वेगवेगळी दूषणे लावून हिणवतो. नातेवाईकांकडून टोमणे ऐकावे लागतात. आई होण्याचं भाग्य लाभलेली स्त्री आणि कधीही आई न होण्याचा शाप जगणारी स्त्री या विषयांवर आपल्याकडे बऱ्याचश्या कथा, कविता येत असतात. असे विषय लेखक लिहितात, वाचकांकडून ते वाचले जातात. चर्चेत बोलले जातात.

परंतु त्या दोहोंच्या मध्येदेखील एक अशी स्त्री असते जी शापित नसली तरी ती व्याकुळतेने वरदानाच्या प्रतीक्षेत असते. बदलत्या काळानुसार अश्या दाम्पत्यांची संख्या समाजात मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. मुल लौकर होत नाही वा तत्सम विषयांवर आपला समाज किंवा स्वतः ते दांपत्यही चारचौघात बोलायचे टाळते. म्हणूनच मग हा विषय फारसा साहित्यात उतरत नाही.

संघर्ष हा फक्त गरीब परिस्थितीशी किंवा विषम सामाजिक तत्वांशी नसतो. प्रत्येकाचे संघर्षाचे अनुभव निरनिराळे असतात. कुणी गरिबीशी हसतमुखाने दोन हात करतो, योग्य त्या कारणासाठी समाजाच्या विरुद्धही उभा राहतो. जर का संघर्ष दोन जीवांपुरता मर्यादित राहिला तर त्यांचे मानसिक खच्चीकरण व्हायला वेळ लागत नाही. अशीच एक वेगळ्या विषयावरची वेगळी कथा, "मातृत्व - एक संघर्ष असाही".


"काय मग.. गुड न्यूज कधी..?"

"तुम्ही काही वेडंवाकडं करू नका.. देवाचं असतं ते.. त्याचा मार्ग अडवायचा नसतो.."

"यावर्षी होऊन जाऊ दे..!"

"अरे दोन वर्षें झाली की, आता कसली आलीय फॅमिली प्लँनिंग..?"

"पुढच्या वर्षी फक्त जोडीने नाही.. तिघे मिळून या हं.. !"


इथपासून सुरु झालेली वाक्ये,


"काही प्रॉब्लेम आहे का..?"

"सगळ्या टेस्ट केल्यात का..? "

"तुम्ही अमुक अमुक डॉक्टरला का दाखवत नाही, खूप अनुभवी आहे लगेच मूल होईल बघा.. "

"दुसऱ्याची मुलं खेळवायला आवडत मग स्वतः का अडवून धरलंय..?"

"बघ बाबा जितकं उशिरा करशील तितकं अवघड होऊन बसेल नंतर खूप अडचणी येतात..!"

"अगं.. तमकी डॉक्टर नामी आहे, फक्त पाच मिनिटात उपाय करेल.. !"


इथपर्येंत येऊन पोहोचली होती.


दिवस, महिने करता करता आता तिसरं वर्ष लागलं होतं. विवेक आणि सुनीता दोघेही नातेवाईकांचे, मित्रमैत्रिणींचे सल्ले ऐकून वैतागले होते. आता खरेच एखाद्या चांगल्या डॉक्टरला भेटून त्यांचे मार्गदर्शन घेण्याची तीव्र गरज भासत होती.

गरीब आणि मध्यमवर्गीय यांच्या मधल्या गटात मोडणारे ते कुटुंब. विवेक आणि सुनीता दोघेही खासगी कंपनीत नोकरीला होते. लग्नाला तीन वर्षें होत आली पण प्रयत्न करूनही अजून मुल काही होत नव्हते.

वरच्या सल्ल्यांवरती जाऊ नका, हल्ली रोज मिळणारे ते फुकटचे सल्ले आहेत. खरे सांगायचे तर विवेक आणि सुनीता दोघांनाही सुरुवातीपासून मुल हवे होते. तसे साधारण प्रयत्नही सुरूच होते. नंतर नंतर तर गुगल काकांकडून एकएक माहिती संकलित करून वेगवेगळी आचरणे, पथ्ये करून पाहिली. देवीदेवतांना नवस करून झाले. सुनीताने तर खाण्यातल्या सवयीही बदलल्या. पाणीपुरी, चायनीज खाद्यपदार्थ सर्व बंद. महागाईच्या काळातही विवेकने रोजच्या जेवणासोबत आवर्जून कांदा-लसूण खाणे सुरु केले.

महिन्यातल्या ठराविक दिवसांना लक्षात ठेवण्यापासून ते प्ले स्टोर वरून वेगवेगळी ऍप्लिकेशन घेऊन 'त्या' दिवसांचा माग घेतला. नेमक्या दिवशी गडद वातावरणनिर्मिती करून रंगतदार पद्धतीने कार्यक्रमही उरकले. यु ट्यूबवरचे डॉक्टर पाहून झाले. पण काहीही कामी आले नाही.

"माझ्यासोबतच असे का होतेय.. माझ्या मैत्रिनेचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले आणि आता तिला दिवसही गेले... " सुनीता उदासीन भावात म्हणाली.

"अगं.. प्रत्येकाचं शरीर, त्यातले घटक वेगवेगळे असतात. काहींना लौकर होतं, काहींना उशिरा.. आपण प्रयत्न तर करतोच आहे ना...? " विवेकने तिला समजावत म्हटले.

मध्यंतरी अजून दोनतीन महिने गेले, सुरुवातीचे संवाद ऐकून ऐकून आता दोघांचाही धीर सुटत चालला होता. एव्हाना नातेवाईक, मित्रमैत्रिणींचे टोमणे पण सुरु झाले होते.

प्रत्येक महिन्याला पाळी लांबायची आणि एक आशेचा किरण दोघांना दिसायचा. सुनीता तर खूपच उत्साहात यायची.

"मला खात्री आहे यावेळी नक्की टेस्ट पॉसीटिव्ह येणार.."

"सुनीता, तू अगोदरच त्या गोष्टीविषयी नको विचार करूस.. जेव्हा व्हायचे तेव्हाच ते होणार.."

"नाही पण यावेळी मला आतून त्याचे संकेत भेटत आहेत. माझी भूक वाढतेय, संत्री खावीशी वाटतात..."

"अगं.. या सर्व गोष्टी इतक्या लौकर नाही सुरु होत गं वेडे.." असे बोलून तो हसायचा. आपल्या अतिउत्साहावर त्याला हसताना पाहून तिलाही मग हसू फुटायचे.

पण प्रेग्नन्सी टेस्ट नेगेटिव्ह यायची, उशिरा का होईना पुन्हा पाळी यायची आणि त्यांच्या हास्यावर विरजण पडायचे.

शेवटी डॉक्टरकडे जाण्याचे नक्की होते. आजपर्येंत मिळालेल्या सल्ल्यानुसार जवळच्याच 'खूप अनुभवी' डॉक्टरकडे एका सायंकाळची वेळ निश्चित करून दोघेही तिथे पोहचतात.

'खूप अनुभवी' डॉक्टरचे स्वतःचे छोटे मॅटर्निटी हॉस्पिटल असते. त्या डॉक्टरचे वय साधारण साठपर्येंत असावे. डॉक्टर बाई काहीश्या कृश दिसत असल्या तरी एकंदर बराच अनुभव दिसत होता.

सुनीताने डॉक्टरांसमोर सर्व समस्या नीटपणे मांडल्या. विवेक शांतपणे बाजूला बसून ऐकत होता. त्याचं पूर्ण लक्ष डॉक्टरच्या सहाय्यिकेकडे होते. वीसबावीस वर्षांची ती मुलगी आणि तिच्या हालचाली विवेक बारकाईने टिपत होता. इथे गैरसमज नको, खरेतर चारचौघातले शिष्टाचार धाब्यावर बसवत ती सहाय्यक सारखे पेनाचे टोक टेबलवर आपटत होती आणि तेच विवेकला खटकत होते.

ती अस का करत असावी..? डॉक्टरबाई तिला गप्प का करत नाहीत..? असे विवेकच्या मनात आले म्हणून तो डॉक्टर बाईंकडे पाहू लागला.

विवेकने एक उसासा सोडला, डॉक्टरबाईंच्या सहाय्यिकेची कृती आणि त्यामागचे कारण त्याच्या ध्यानात आले. सुनीता खाली पाहत आपलं दुःख सांगण्यात हरवली होती, तिची नजर दर दहा सेकंदांनी पेंगत असलेल्या डॉक्टरबाईंकडे नव्हतीच. विवेकच्या मनात त्या डॉक्टरबाईंविषयी कीव आणि राग दोन्ही जन्म घेत होते.

'कदाचित कामाच्या अतिरेकामुळे असे होऊ शकते, डॉक्टरांचं काम म्हणजे निराळंच.. नाही म्हणता येत नाही.. पण म्हणून झोप न घेणं कितपत योग्य.. आम्ही काय ऑपेरेशन करायला नाही आलो आज.. जे काहीही करून आज आमची मिटिंग व्हायलाच हवी.. उद्या आलो असतो पुन्हा.. आणि जर ऑपेरेशन असे पेंगत पेंगत केले तर रुग्णाचे कल्याणच झाले मग...'

विवेकने कोपराने ढोसलंतच सुनीताला खुणावले. तिने मान वर करून डॉक्टरबाईंकडे पाहिले. तिच्याही चेहऱ्यावर आश्चर्य आणि राग येऊ लागले होते. कसेबसे सुनिताने आवरते घेतले.

डॉक्टरबाईंनी मग बोलायला सुरुवात केली,

"हम्म.. म्हणजे तुम्हाला आता बाळ नको आहे.."

"अहो... डॉक्टर.. आम्हाला हवे आहे.." सुनीता दातओठ खातच म्हणाली.

अर्थ स्पष्ट होता, मघापासूनचे तिचे सारे शब्द हवेत कुठेतरी विरून गेले होते. सुनीताचा पारा चढू लागला होता. वेळ मारून नेण्यासाठी तिला शांत करत विवेकने डॉक्टरबाईंना पुन्हा सगळे सांगितले. डॉक्टरबाईंनी एक कागद घेतला, बारा हजाराच्या चारपाच टेस्ट लिहिल्या आणि दुसऱ्या दिवशी त्या टेस्ट त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये करण्यावर भर दिला. पेंगत पेंगत ऐकण्याची फी फक्त सहाशे रुपये होती, जी विवेकने तत्परतेने भरली आणि सुनीतासोबत तिथून काढता पाय घेतला.

या प्रसंगामुळे कुणाचाही डॉक्टरांवरचा विश्वास उडाला असता. विवेक आणि सुनीता दोघेही संभ्रमात होते. पण फारफार दोन महिने त्यांनी स्वतःहून प्रयत्न केले आणि पुन्हा नवीन डॉक्टर शोधू लागले.

यावेळीही नातेवाईकांचा सल्ला कामी आला, "तमकी डॉक्टर नामी आहे, फक्त पाच मिनिटात उपाय करेल.. !"

एक दिवस कामाला दांडी मारून दोघेही त्या डॉक्टरकडे गेले. एका मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दुपारच्यावेळेत या डॉक्टर असायच्या. साहजिकच कामाला दांडी मारण्याशिवाय पर्याय नव्हताच. तिथे पोहोचल्यावर विवेक आणि सुनीता दोघेही तिथल्या बाकड्यांवरची गर्दी पाहून चक्रावले. चोविसावा नंबर लागला.

"बापरे..! इतकी गर्दी.. 3-4 तास तरी लागतील बहुतेक.." तो घड्याळ पाहत म्हणाला.

"हो रे..! पण एक लक्षात येतेय का..? या गर्दीचा अर्थ म्हणजे डॉक्टर खरोखरच चांगली आहे..." ती खुश होत म्हणाली.

"ठीकाय.. आपल्याला तसेपण बाळ महत्वाचे आहे.. जाऊ दे वेळ कितीही आज.. काहीतरी चांगले मार्गदर्शन भेटेल.." त्यालाही थोडं बरे वाटले.

एक एक करत सर्वांची तपासणी सुरु होती. आश्चर्य म्हणजे आत गेलेली व्यक्ती दोन ते तीन मिनिटात बाहेर येत होती. 'कमाल आहे डॉक्टरची.. कसली जलद सेवा देत आहेत..' विवेकच्या मनात विचार आला पण त्याने तो सुनिताजवळ जाहीर केला नाही.

"Next.." रिसेप्शनिस्टने सुनीताला खुणावले आणि दोघेही आत गेले.

या डॉक्टरबाई पस्तिशीच्या असाव्यात. सुनीताने गेल्यागेल्या डॉक्टरबाईंना सर्व सांगायला सुरुवात केली पण त्यांनी मध्येच तिला थांबवले.

"बच्चा चाहिये..."

"हा.."

"आखरी बार डेट कब आई थी..?"

"24"

"ठीक हे.. आज 30 है, ये कोर्स शुरु कारण पडेगा..." कागदावर काहीतरी खरखडत डॉक्टरबाईंनी कागद पुढे केला.

"दवाई नीचे की दुकानसे लेकर मुझे दिखाने आना.." त्यांनी सूचना केल्या.

चौथ्या मिनिटाला बाहेर पडून विवेकने शंभर रुपये जमा केले. एकमेकांशी एकही शब्द न बोलता खाली जाऊन औषधं घेतली, पुन्हा डॉक्टरबाईंना भेटून ती कशी घ्यायची हे समजावून घेतले आणि दोघांनी घराची वाट धरली.

"ही डॉक्टर जरा घाईत असल्यासारखी नाही वाटली का तुला..? म्हणजे आपले म्हणणे नीट ऐकले नाही.. काही टेस्ट नाहीत.. काही तपासले नाही.. सरळ कोर्स करायचा..." विवेक अडखळत म्हणाला.

"वाटतेय तर खरी.. पण डॉक्टर आहे.. तिचा रोजचा अनुभव आहे.. पाहू ती सांगतेय तसे करून..." सुनीता म्हणाली.

सहा महिन्याच्या कोर्समध्ये जवळपास अजून पंधरावीस हजार घातले. कुठूनही कसलीही सुधारणा दिसली नाही आणि शेवटी वैतागून विवेक आणि सुनीताने डॉक्टर वारी थांबवायचे ठरवले.

'मुल होत नाही' याव्यतिरिक्त इतरही खुपश्या समस्या होत्या त्या दोघांच्या. कामाचा ताण, प्रवासातले तणाव, घरातले इतर खर्च अश्या खुपश्या बाबी दुर्लक्षित होत होत्या. मागच्या दोनचार वर्षात कित्येकदा असे वाटले होते की आता प्रतीक्षा संपली. पण प्रत्येकवेळी मातृत्वाचे सुख सुनीताला हुलकावणी देऊन जात होते. बऱ्याचदा पाळी लांबायची, खूपवेळा चुकायची, शरीरातील हार्मोन्समध्ये बदल जाणवायचे, काही वेगळे खावेसे वाटायचे. तरीही निदान जसे हवे तसे मिळत नव्हते. कुठेतरी त्यात कमी राहत होती. ते सुख त्यांना कधी मिळणार तरी होते की मिळणारच नव्हते.

त्या रात्री दोघांनाही झोप येत नव्हती. एका गोष्टीची जाणीव दोघांनाही होती की विवेक वा सुनीता दोघांपैकी कुणामध्येही कसला दोष नव्हता. मग नेमके कारण काय असू शकते यावर विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती. ती रात्र दोघेही खूप रडले. कित्येक स्वप्ने त्या दोघांनी बाळासोबत पाहिली होती जी पूर्ण होता होत नव्हती.

विवेक लौकर सावरला, सुनीता अजूनही मुसमुसत होती.

"मला आई व्हायचंय विवेक.. नाहीतर मला जगायचं नाही.. लोक काय काय बोलतात मला नाही सहन होत हे.." तिला हुंदका आवरता येत नव्हता.

"सुनीता, आपण शक्य तितके प्रयत्न केले आहेत. यापुढेही करत राहू.. पण एक गोष्ट लक्षात ठेव जर कधी आपल्याला मुल नाही झाले तरीही आपण एकमेकांसाठी आहोत हे ही काही कमी नाही. फक्त मुल मुल करून आपण आपल्या नात्यात कटुता निर्माण करायला नको. राहिला प्रश्न लोकांचा तर ते किती दिवस तोंड वाजवणार.. एक ना एक दिवस ते गप्प होतील.. तू हे विसरू नकोस की मुल होण्याच्या आधी आपलं नातं या जगात आलेय आणि मुल झाल्यानंतरही आयुष्याच्या शेवटी आपलं नातंच एकमेकांसोबत असणार आहे.."

विवेकचं स्पष्टीकरण योग्य असलं तरी मातृत्वाची ओढ सुनीताच्या मनातून जातं नव्हती. तरीही विवेकसमोर ती शांत झाली. त्या क्षणाला दोघांनाही एकमेकांची तीव्रतेने गरज भासत होती. त्याने तिला मिठीत घेतले. मधल्या काळात हरवलेल्या त्यांच्या नात्यावर उत्कट भावनांचं आवरण पांघरून घालू लागले होते.

पुढचे काही क्षण प्रेमाच्या वर्षावात ते न्हाहून गेले, कित्येक दिवसात वा असं म्हणू शकता लग्न झाल्यावर पहिल्यांदाच इतक्या उत्कटतेने त्यांच्यात संबंध जुळून आले होते. ती रात्र अगदीच मंतरलेली अशी होती.

एक महिन्यानंतर सुनीता वॉशरूममधून बाहेर आली. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद होता. टेस्ट पॉसिटीव्ह होती. नऊ महिन्यात नॉर्मल डिलिव्हरी होऊन एका गोंडस बाळाने जन्म घेतला होता.

जे सुख इतकी धडपड करूनही त्यांच्या पदरात पडत नव्हते. दोघांच्या उत्कट इच्छाशक्तीने एकरूप झाल्यानंतरच ते मिळाले. बऱ्याचदा समस्या या वरवरच्या असतात, माणसं त्यांचं मूळ शोधण्यासाठी खोलात शिरतात.

बाळाच्या जन्मानंतर आनंदी झालेल्या विवेकने आख्ख्या चाळीत मिठाई वाटून आनंद साजरा केला होता. मातृत्वाच्या सुखाने सुनीताही अगदीच हरखून गेली होती.


समाप्त

निलेश देसाई

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED