नारायण धारप यांस पत्र Nilesh Desai द्वारा पत्र मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नारायण धारप यांस पत्र

माननीय कै. नारायण धारप सर यांस,

आपल्या रहस्यमय लेखणीने मराठीतला एक काळ ज्यांनी गाजवला अश्या सिद्धहस्त लेखकाला सामान्य वाचकाचा मनापासून सलाम.

लहानपणापासून आपल्या कथा वाचून मी माझ्या मनातल्या रहस्य जाणून घेण्याच्या उर्मिस शांत करत गेलो. 1960 च्या दशकात जी आपण लेखणी उचलली ती अखेरपर्येंत खाली ठेवली नाहीत, या सातत्याला शतशः नमन. त्यामुळेच रहस्यकथांचे निरनिराळे प्रकार मला जाणून घेण्यास मोलाची मदत झाली. मराठी साहित्यात भयकथा या प्रकाराला आलेली मरगळ आपल्या रहस्यमय आणि वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या लेखणीने पिटाळून लावली. मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा यांचे दालन आपण समृद्ध केलेत.

मुळात आपल्या कथांचे विषय हेच प्रामुख्याने आकर्षणाचे एक कारण आहे. त्यातही पुढे कथेला समर्पक अशी वातावरणनिर्मिती करून फुलवण्याचे आपले कसब वाखाणण्याजोगे आहे. वाचकाला कथेत अक्षरशः गुंतवून ठेवणे वा वाचकाला आपणच त्या कथेचा भाग झालो आहोत असे वाटणे हेच आपल्या कथांचे वेगळेपण आहे. त्या काळात आपल्याला सुचलेले विषय म्हणजे मला पडलेले एक कोडेच आहे. एकएक कथा वाचताना, समझून घेताना आपल्याकडील भन्नाट कल्पनांचे आकलन मला होत गेले.

आसपासच्या जगातील कित्येक घटनांना पाहण्याचा माझा दृष्टिकोन आपल्यामुळेच विकसित झाला आहे. कथेत तुम्ही मांडत असलेले बारकावे मनातल्या किती खोल, सूक्ष्म पातळीवर जाऊन विचार करायला भाग पाडतात याचा अंदाज लावता यायचा नाही. त्यात भरीस म्हणजे आपल्याकडचा अगणित शब्दसामर्थ्याचा खजिना जो प्रत्येक कथेत निराळा आणि अभूतपूर्व वाटत राहतो.

चेटकीण, 440 चंदनवाडी, कृष्णचंद्र, अनोळखी दिशाचे सर्व भाग, फ्रँकेस्टाईन, शाडूचा शाप, पळती झाडे, काळी जोगीण, ग्रहण, भुकेली रात्र, सावधान, लुचाई, वेडा विश्वनाथ, शपथ, पाठलाग समर्थकथा, इत्यादी कथा मी शक्यतो रात्रीच वाचल्या आहेत. यांतल्या साऱ्याच कथा मी एका दमातच वाचून काढल्या आहेत. कोणत्याही एका कथेला मी झुकते माप देऊ शकत नाही, कारण वरील सर्वच कथा अप्रतिम आहेत. त्यांची एकमेकांशी तुलना करता येणे मला शक्य नाही.

आपल्या कथा रात्री वाचताना मध्येच मी डोळे बारीक करायचो, खिडकी, दरवाजे, भिंतींचे कोपरे असे संपूर्ण खोलीत नजर फिरवायचो. भयानक प्रसंग सुरु झाल्यावर पांघरून ओढून बसायचो, अंगावर काटा यायचा पण तरीही पुस्तक हातातून बाजूला सारण्याचे मन व्हायचे नाही. एकाग्र चित्ताने पुढे काय होईल ही उत्सुकतेची भावना शब्दांत कशी मांडणार. त्या कथा वाचत असताना माझा सुरुवातीला उडालेला थरकाप आणि वाचून झाल्यानंतर लाभलेले समाधान याबद्दल किती आभार प्रकट करू.

त्याचसोबत आपण लिहिलेल्या अशी रत्ने मिळवीन, कांताचा मनोरा, चक्रधर या त्या काळातील अचाट करणाऱ्या विज्ञानकथा तितक्याच वाचनीय आहेत. मन थक्क करून टाकणाऱ्या आपल्या कित्येक कथा मी तोंडपाठ होईपर्येंत पुन्हापुन्हा वाचल्या आहेत.

खूप प्रश्न मनात पूर्वीपासून होते की, भयकथा लिहिताना आपल्याला खरेच कधी भीती वाटली नाही का? एखादा दाट काळ्या अंधाराचा प्रसंग खुलवून लिहिताना अंगावर कधी शहारा आला नाही का? गिळगिळीत चिकट द्रव, सडका, कुबट दर्प यांनी मन भयभीत नाही केले का? अर्थात या प्रश्नांची उत्तरे माझ्यासाठी अनुत्तरीतच राहतील. आपल्या कथांशिवाय आपला इतर परिचय फारसा झाला नाही. परंतु जरी आपण आज या जगात नसलात तरी पत्राद्वारे मी आपल्याप्रती माझ्या भावना प्रकट करू इच्छित आहे.

अजून सांगण्यासारखे इतकेच की मराठी साहित्यातील आलेल्या काही मोजक्याच भयकथा लेखकांपैकी आपल्या लिखाणाने माझ्या मनावर मोहिनी घातली. आपला काळ वेगळा असला तरी पुस्तकरूपाने एक वाचक म्हणून मी आपल्या लेखणीच्या जवळ आलो आणि समृद्ध होत गेलो. आपल्या अभूतपूर्व लिखाणाची व्याप्ती इतकी मोठी आहे की अजूनही आपल्या कित्येक कथा शोधून शोधून वाचत आहे. रहस्यातून निखळ मनोरंजन कसे होऊ शकते, हे आपल्या कथा वाचल्यावर कळते. असा अमूल्य खजिना आम्हा वाचकांपर्येन्त पोहोचवण्यासाठी मी आजन्म आपला ऋणी राहीन.

एक वाचक,

निलेश देसाई