सौभाग्य व ती! - 12 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

सौभाग्य व ती! - 12

१२) सौभाग्य व ती !
मालिनी म्हणजे नयनची चुलत बहीण! अण्णांची मुलगी. तिच्या लग्नासाठी बाळू, मीना आणि नयन गावी आले होते. लग्नाला येण्याचा सदाशिवला बाळूने खूप आग्रह केला. पण सदा तयार झाला नाही. मालिनीचे वय तसे सोळा वर्षाचे. तितक्या लहान वयात तिचे लग्न ठरविल्यामुळे नयन गोंधळली होती. आश्चर्य म्हणजे नवरदेव शिपाई म्हणून नोकरीस होता. अण्णासारख्या वतनदाराच्या मुलीचे लग्न एका शिपायासोबत? कसे शक्य आहे? परंतु सत्य स्थिती समोर होती. ते स्वीकारावेच लागले. त्याला इलाज नव्हता. लग्नाचा थाट अण्णा-भाऊंनी तोपर्यंत लावलेल्या इतर विवाहांच्या उलट होता. प्रत्येक लग्नाच्यावेळी लांबलचक हिरवागार पसरणारा मांडव मालिनीच्या लग्न समयी पाच जाळ्यांवर आला होता. ते कशाचे लक्षण होते? वतनदारी संपल्याचे? वतनदारीस उतरती कळा लागल्याचे? की आणखी कशाचे द्योतक होते? लग्नाच्या कार्यक्रमासही नेहमीची गती, चैतन्य, उत्साह, उल्हास काही काही नव्हतं. उलट कसे तरी उरकून टाकायचे असा अंदाज होता. अमरावतीहून भाऊ-आई पाहुण्यांप्रमाणे लग्नापूर्वी एक-दोन दिवस आधी पोहचले होते.
जायदादीवरून, शहरात स्थायिक होण्यावरून दोन भावातलं अंतर आणि दरी वाढत होती. जायदादीच्या नावावर दोरी लावून मोजण्याएवढी जमीन शिल्लक होती. तीही सावकाराच्या दाढेत गेलेली! एकंदरीत अण्णांची वतनदारी शेवटचा घटका मोजत होती. सावकाराकडून ती केव्हा कायमची संपविल्या जाईल याची शाश्वती नव्हती. तरीही अण्णा भूमिकेवर ठाम होते. लग्नासाठी आलेल्या भाऊंसोबत अण्णांचा दोन-तीन वेळा वाद झाला. त्या वादात बाळूही उतरला, भाऊंच्या बाजूने! बाळूचे आईवडील मृत्यू पावले त्यावेळी बाळूच्या गावाकडील जमीन विकून अण्णांनी स्वतःच्या शेतीला लागून घेतलेला तुकडाही नंतर अण्णांनीच विकला होता.
कमाआत्या लग्नाला आली होती परंतु पैशाच्या देवाणघेवाणीतून अण्णा आणि मामांमध्ये निर्माण झालेल्या दुराव्यामुळे मामा मालिनीच्या लग्नाला आले नव्हते. अनेक वर्षांपूर्वी अण्णा-भाऊंनी मेहुण्याकडून म्हणजे कमाआत्याच्या नवऱ्याकडून पंधरा हजार रुपये हातउसने घेतले होते त्यावेळी सहा महिन्यांमध्ये वापस करायचे ठरले होते परंतु दहा वर्षे झाली तरीही पैसे परत केले नव्हते त्यावरून अण्णा आणि भाऊंसोबत कमाआत्या -मामांचा अनेकवेळा वाद झाला, नात्यांमध्ये वितुष्ट आले, संबंध दुरावले...
मालिनीच्या लग्नाला आलेल्या कमाआत्याने पैशाचा विषय काढताच तिला अण्णांनी खडसावले. मी पैसे देऊ शकत नाही. तुम्ही काहीही करा असे म्हणून अंग काढून घेतले. नयनला मात्र मालिनीच्या लग्नाची घाई का? असा प्रश्न सतावत होता. परंतु तिच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे काकीने टाळले. घरात वेगळेच, गूढ आणि चमत्कारिक वातावरण होते. कुणी कुणाला विचारत नव्हतं. मालिनीलाही नयनने अनेकवेळा छेडले परंतु थातुरमातूर उत्तर देऊन तिने स्वतःची सुटका करून घेतली होती.
त्या दिवशी सकाळी प्रातःविधीला जाण्यापूर्वी तांब्या देण्यासाठी न्हाणीमध्ये गेलेली नयन दचकली. न्हाणीत मालिनी कोरड्या ओकाऱ्या देत होती. नयनला वाटले, ती तोंड धूत असेल. परंतु तसे नव्हते हे लक्षात आल्यावर तिने विचारले,
"मालिनी, काय झालं गं?"
"क...क... काही नाही ग. रात्री थालीपीठ जास्त झालं." तिने दिलेल्या उत्तराने समाधान न झालेली नयन म्हणाली,
"माले, मी आल्यापासून पाहतेय तू माझ्यापासून..."
"सांगितलं ना ग, तसे काही नाही म्हणून..."असे सांगत ती शक्य तितक्या लवकर अपराध्याप्रमाणे निघून गेली. तिच्या त्या वागण्याचा अर्थ लावत नयन पांदीकडे निघाली... ती मनालाच एक प्रश्न विचारत होती, की मालिनी तसे काही नाही असं का म्हणाली? तिचे उत्तर काय दर्शविते? ती तिच्यापुढून गडबडीने का गेली?
"अव्हो, नैनाबाय, न्हाई म्हन्ल माणूसबी दिसत न्हाई का?" त्या आवाजाने भानावर येत नयन म्हणाली,
"तसं नाही हो विमलाबाई."
"मग कस? धा आवाज देले पर तुमी सोताच्याच तंर्दीत. फाटे-फाटेच मालकाची याद..."
"हे हो काय विमलाबाई? काही तरीच तुमचं. अहो, चार दिवसांवर मालूचे लग्न आले पण तिची तब्येत..."
"काय झाल म्हणता?"
"अहो, कुणाशी बोलत नाही, आपल्यातच दंग राहते. शिवाय दोन-तीन वेळा उलटीसुद्धा झाली."
"आता ह्या दिसात वकणार न्हाई तर काय व्हो?"
"म्हणजे?"
"वाघाचे पंजे! अव्हो, गोगलगाय आन् पोटात पाय! तायजी, तुमच्या भयनीला दिस गेले हात..." "काय बोलता हे तुम्ही?"
"आत्ता ग बया. खोट न्हाई बोल्ले. समद गाव ज्ये बोलतया त्येच मी बोल्ले. पर तुमास्नी कामून लागल? अव्हो, तुम्ही तिकडं सासरी ऱ्हाता येथं तुमच्या माघारी काय चाल्ल त्ये तुमास्नी काय ठाव असणार?"
"पण विमलाबाई..."
"मी कशाला खोट बोलू तायजी? तुमी बी याच गावात लान्याच्या मोठ्या झाल्या. तुमी बी जवान होत्या. तव्हा तुमच्याकडं कोन्ही बोटं दावलं का? नयनबाय, सोभाव त्यो सोभावच. मालीचे गावातल्या कुण्या पोरावर पिरेम व्हतं. त्या पिरमातूनच ती पोटूशी हाय..."
"बर..बर. जावू द्या..." असे म्हणत नयनने तो विषय संपविला आणि ती पांदीकडे निघाली...
मालिनीच्या लग्नासाठी आल्यापासून तिचे वागणे,तिचे बदललेले रूप आणि कुणासही न बोलता घुम्याप्रमाणे आपल्याच तंद्रीत राहणे या गोष्टी पाहून जी शंका नयनला भेडसावत होती ती दुर्दैवाने खरी ठरली होती. मालिनीचे लहान वयात होणारे लग्न, शिपाई म्हणून काम करणारा पती सारेच शंकास्पद होते. शिवाय मांडवातील हरवलेलं चैतन्य, मालीचे वागणे साऱ्या गोष्टींचा उलगडा विमलाकडून आपोआप झाला होता. विचाराचे ओेझे काही प्रमाणात उतरलेली नयन घरी परतली. ओसरीवर कमाआत्या आणि भाऊंमध्ये चांगलाच वाद रंगला होता. विषय अर्थातच ऊसने घेतलेल्या पैशांचा होता. आत्याचे म्हणणे होते, की पैसे घेताना, पैशांची मागणी करताना अण्णासोबत भाऊही होते त्यामुळे कमाआत्याचे पैसे परत करण्यासाठी भाऊंनी पुढाकार घ्यावा परंतु भाऊ त्या व्यवहाराशी स्वतःचा संबध नाही असा पवित्रा घेत असल्याचे पाहून कमाआत्या चिडली होती. ते पाहून भाऊंनी कमाआत्यास खड्या आवाजात सुनावून स्वतःकडून त्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. भाऊंची तशी कणखर आणि अलिप्त भूमिका पाहून कमाआत्या बरीच दुखावली. तिने भाऊंचे बोल मनाला लावून घेतले. कदाचित कमाआत्याचा भाऊंवर अधिक विश्वास होता. तिला भाऊकडून तशा भाषेची अपेक्षा नव्हती. अपेक्षाभंग झालेल्या आत्याच्या डोळ्यांमध्ये गंगा-जमुना अवतरल्या. जमलेल्या पाहुण्यांमध्ये संजीवनी सर्वात लहान असल्यामुळे ती सतत कुणा ना कुणाजवळ असायची परंतु अण्णा-भाऊंनी तिला एकदाही जवळ घेतले नाही. साधी चौकशीसुद्धा केली नाही. तसेच त्या दोघांनी नयनची, तिच्या संसाराची किंवा नयनला होणाऱ्या त्रासाची चकार शब्दानेही विचारणा केली नाही. तिचे लग्न केले म्हणजे संबंध संपला अशीच सोईस्कर भूमिका त्यांनी घेतली. अण्णा किंवा भाऊ तिच्यासमोर आले, की नयनला वाटायचं ते विचारतील, 'काय नयन, कसं चाललंय? काय म्हणतो तुझा संसार?आता तर काही त्रास नाही ना?'
परंतु त्या दोघांचे तिच्याबाबतचे मौन पाहून प्रत्येकवेळी तिची प्रचंड निराशा होत असे. दुसऱ्याच क्षणी तिच्यासमोर विठाबाई येत असे. तिचे शब्द तिला आठवत असत. मग मनाची समजूत घालून ती स्वतःच्या कामामध्ये लक्ष देई...
'नैने, तुझी पोरगी म्हणजे लहानपणीचा बाळूच...' असे कुणीतरी आपलेपणाने म्हणायचे आणि ताबडतोब नयनला सदाशिवचे तसेच वाक्य आठवायचे. त्याच्या बोलण्यात राग, वेगळा अर्थ, कुत्सितपणा ठासून भरलेला असायचा, प्रत्येकवेळी त्याला वेगळे काही म्हणायचे असे तिला वाटायचे परंतु सदाशिव, 'डोळे अगदीच बाळूसारखे दिसतात. नाही का?' असे म्हणून निघून जात असे...
हळूहळू लग्नाचा दिवस उजाडला परंतु त्यात उत्साह नव्हता. कर्मचाऱ्याने दिवसभर कार्यालयामध्ये बसून एक-एक फाईल हातावेगळी करावी त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती स्वतःकडे आलेले काम उरकण्याच्या मनःस्थितीत दिसत होता. गावातही त्या लग्नाबाबत विशेष उत्साह नव्हता. ज्या घराण्याला पिढ्या न पिढ्या गावात मान होता. गावातील झाडाचे पानही ज्या घराण्याच्या इशाऱ्यावर हलत असे त्या घराण्याला आणि वतनदारीचा प्रचंड अभिमान असणाऱ्या अण्णांना त्यांच्याच मुलीने खाली पाहायला लावले होते. त्यांचे तोंड जणू काळे केले होते. मालिनीच्या त्या प्रकरणामुळे अण्णा फार खचले होते. अंगापिंडाने धिप्पाड असणाऱ्या अण्णांच्या शरीराचे पार चिपाड झाले होते. शेवटी मालिनी एकदाची सासरी गेली तसा सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. नाही तरी जमलेल्या पाहुण्यांना कर्णोपकर्णी मालिनी प्रकरण समजलेच होते. तिला दिवस गेल्याचेही कळत-नकळत कळालेच होते. कोंबडा झाकला तरी सूर्य उगवत नाही असे थोडेच आहे. मालिनी सासरी पोहचली नसले तोच इकडे मांडवामध्ये अण्णा-भाऊंचे व्दंव्द सुरु झालं.अर्थात विषय तोच उर्वरित जमीन आणि वाडा विकण्यावरुन कुणी तरी मध्यस्थी करुन ते वादळ शमविले. दुसऱ्याच दिवसापासून एक-एक पाहुण्यांनी काढता पाय घेतला.
सर्वांच्या शेवटी निघाले बाळू, मीना आणि नयन. भर दुपारी जेवण करुन निघाल्यामुळे नयनला डुलकी लागली.बसला लागलेल्या ब्रेकमुळे जाग आली. तिने आजुबाजुला पाहिले. तिचे सासर आले होते जणू ती तिच्यासाठी स्मशानभूमी होती, जिथे तिला रोजच मरणप्राय यातना आणि भोग मिळत होता. वाड्यासमोर ऑटो थांबला. नयन खाली ऊतरली. प्रथम तिचे लक्ष स्वतःच्या वाड्याकडे गेले. तो उघडाच होता. शेजारचा प्रभाचा वाडा तोही उघडाच. पण त्या दारात ती कोण? साजशृंगार केलेली स्त्री. कपाळावर लालभडक कुंकू, गळ्यात चमचम मंगळसूत्र? हातात हिरव्यागार बांगड्या? अग बाई ती तर प्रभा. हो. प्रभाच. मग सधवा कशी?
००००