स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 18 ) Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 18 )

नित्या टोपल्यातला राख झालेला कचरा उचलत म्हणाली , " तुम्ही माझे कागदपत्र जाळले ..माझी आयुष्यभराची कमाई जाळून टाकलीत आणि वरून काहीच न झाल्यासारखं हसत आहात ? तुम्हाला काहीच कस वाटत नाही ..नक्कीच माणसातच जन्म घेतला आहात ना की जनावर आहात ? "

नित्याचे बाबा ओरडत तिच्यावर म्हणाले , " तुला काल म्हणलो होतो ना काहीही झालं तरी तुला या घराबाहेर नौकरी करण्यासाठी पाऊल टाकता येणार नाही ..मग मी माझा शब्द पूर्ण केला ..तुला जनावर समजायचं तर तस समज पण तू आमची इज्जत घालवायला निघाली होतीस तेव्हा लोकांनी काय विचार केला असता की आम्ही तुला सांभाळू शकत नाही ..आता बसशील बघ घरातच ..बघूच आता कशी बाहेर जातेस ते .."

नित्याचा राग अनावर झाला होता आणि ती आवेशात म्हणाली , " आज तुम्हाला बाबा म्हणायला देखील लाज वाटत आहे ..तुम्ही इतक्या खालच्या थराला जाल अस कधीच वाटलं नव्हतं ..आणि तुम्हाला आपल्या संपत्तीचा , इज्जतीचा एवढाच मान आहे ना तर बघा कसा उतरवते ..हो तुम्ही म्हणत आहात तस घरातच बसून राहीन पण या घरात नाही तर आपल्या दुसऱ्या घरात मला माझा संपत्तीत वाटा हवंय याक्षणी .."

वडील हसत म्हणाले , " आता तुझं घर सासर आहे ..हे नाही त्यामुळे तुला इथून एक पैसा पण मिळणार नाही ।."

त्यांचं बोलणं ऐकून तिची आई हसू लागली होती ..नित्याने दोघांकडेही तिरकस नजर टाकली ..चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले आणि त्यांच्यावर मोठ्यांने हसत म्हणाली , " हे जे हसू आहे ना दोघांच्या चेहऱ्यावर हे नाही कायमच हिरावून घेतलं तर बघाच आणि या क्षणापासून जोपर्यंत तुम्ही मला माझा वाटा देत नाहीत तोपर्यंत मी तुमचं जगणं मुश्किल करून टाकेन हे तितकंच खरं आहे ..मग हसा स्वतावर.."

नित्या आज पाहिल्यांदाच वडिलांशी अस बोलली होती पण तीच वागणंही काहीसं चुकीच नव्हतं ..कारण ती तर घर सोडून जायला निघाली होती पण खोट्या इज्जतीमुळे त्यांनी तिचे कागदपत्र जाळून टाकले ..आता तिला जगण्यासाठी काहीच आसरा नव्हता म्हणून तिने आपला वाटा मागून तिथून जाईल अस सांगितलं होतं ..पण त्याहीपेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर उभं झालेलं टेन्शन तिला जास्त आनंद देणार होत ..वाट्याच नाव आलं आणि आईबाबा दोघांचेही चेहरे कोमेजले ..त्यांना वाटलं होतं की नित्या फक्त हे सर्व रागात बोलली होती त्यामुळे काहीच दिवसात ती शांत होईल पण हा त्यांचा गोड गैरसमज होता ..

नित्या पहिल्यांदाच आपल्या हक्कासाठी पेटून उठली होती ..दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच ती बाबांकडे जात म्हणाली , " बाबा मला माझा हिस्सा केव्हा देत आहात ते सांगा ..मला इथे क्षणभर पण थांबायचं नाही तेव्हा लवकरात लवकर मला हवं ते द्या .."

बाबा चहाच घेत होते ..तिच्या शब्दाने ते दुखावले आणि चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाले , " तुला हवं ते कर नाही देणार मी एक पण पैसा .."

नित्याही म्हणाली , " तुम्ही विसरलात बाबा मी तुमचीच मुलगी आहे कसे देणार नाही ते बघतेच .."

सकाळी - सकाळी नित्याचे कटू शब्द एकूण त्यांचा मूड ऑफ झाला आणि ते चहा न पिताच कामावर निघून गेले ..बाबाना तस रागावून जाताना पाहून नित्याला मनातून फारच आनंद मिळाला होता ।.वडील तर गेले होते मग तिने आईच्या मागे तगादा लावला ..तशी आहे बोलण्यात कुणाला हरत नसे कारण भांडण करण्यात ती चाळीत पटाईत होती पण आज नित्यासमोर तीच काहीच चालणार नव्हतं ..नित्याचे शब्द एकूण तिचाही मूड ऑफ झाला होता आणि त्या दोघांना तस पाहून नित्या फार खुश झाली होती ..

आता हे रोजच घडू लागलं होतं..बाबा सकाळी असले की नित्या त्यांना हैराण करून सोडायची आणि सायंकाळी कामावरून परत आल्यावर ती त्यांना सुखाने जगू देत नसे ..आजपर्यंत नित्या फार जेवत नसे पण आता ती स्वतःहून जेवायला यायची आणि जेवतानाही तोच विषय काढायची ..विषय निघाला की बाबांचा संताप व्हायचा ..आणि ते जेवणावरून उठून जायचे ..नित्याला तेव्हा मात्र फार समाधान मिळायचं .बाबासोबत अस वागत असताना ती आईसोबत पण तसच वागायची ..अलीकडे तिने कामाला हात लावन सुदधा बंद केलं होतं ..आई जस तिला बोलायची अगदी तसच तीही त्यांना टोमणे मारायची ..आईची सहनशक्ती देखील संपत आली होती ..हे रोजच होऊ लागल्याने तिला एक वेगळीच भीती सतावू लागली ती अशी की आपल्या मुलीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी संपत्ती नित्याला दिली तर माझ्या दोन मुलींना आणि एका मुलाला काहीच उरणार नाही ..त्यामुळे ती जास्त चिंतीत असायची ..ही गोष्ट नित्याने अचूक हेरली होती त्यामुळे ती जाणूनच त्तीच्यासमोर नाटक करू लागायची ..

रोज रोज तेच ते ऐकून त्यांना कंटाळा यायला लागला होता ..त्या रात्री पण जेवणावर नित्याने तमाशा केला आणि निघून गेली ..तिच्या अशा वागण्याने ते तिच्या बोलण्यावर विचार करत होते ..तेवढ्यात नित्याची आई बाबांजवळ येत म्हणाली , " अहो कसला विचार करत आहात ? "

आणि बाबा शांतपणे म्हणाले , " काही नाही ग शोभा ..नित्याच आता हे अस वागणं मला अजिबात सहन होत नाहीये त्यामुळे विचार करतोय तिच्या वाट्याच तिला देऊन द्यावं .."

त्यांचे शब्द एकूण आईचे होशच हरवले ..ते इतक्या लवकर हरतील आणि तिला संपत्ती द्यायला तयार होतील अस तिला कधीच वाटलं नव्हतं..तिला आपल्या मनात काय चालल हे त्यांना दाखवायचं नव्हतं म्हणून स्वतःच्या भावना लपवत म्हणाली , " तुम्ही द्या मला काहीही समस्या नाही पण विचार करा आज तिची ही अट मानली तर ती उद्या पुन्हा काही मागेल मग काय कराल शिवाय नवस फेडून मुलगा झालाय त्याच्या वाट्याला काय राहील ..तो तर लहान आहे अजून मग कस करायचं त्याने सर्व जर हिलाच दिलं तर.."

शोभा नित्याच्या बाबांच्या मनात विष कालवायला यशस्वी झाली आणि नित्याला संपत्ती देण्याचा विचार त्यांनी मनातून काढून टाकला ..वंशाच्या दिव्यासाठी ते काहीही करायला तयार होते पण स्वतःच्या मुलीला नौकरी करू द्यायला मात्र त्यांची इज्जत जाणार होती ..

असेच दोन तीन दिवस गेले ..नित्याच्या वागण्यात काहीच फरक झाला नव्हता ..आज दसरा होता त्यामुळे प्रत्येक व्यक्ती सर्वाना शुभेच्छा देत होता ..तिचे बाबा बेस्ट मध्ये बस चालवायचे त्यामुळे पूजा करायला डेपोत जाणार होते पण त्याच वेळी नित्याने त्यांना संपत्तीची आठवण करून दिली ..ते काहीही न बोलता सरळ डेपोला निघून गेले ..नित्याची आई सर्व काम आवरून कुणाच्या तरी घरी जाऊन बसली होती ..नित्याचा भाऊ पण कुठंतरी बाहेर गेला होता आणि नित्याही मित्रांसोबत बाहेर बसली होती ..नित्याचे बाबा पूजा करून घरी परतले होते ..ते आले तेव्हा नित्याला दिसले पण ती त्यांच्याशी काहीच बोलली नव्हती ..ते घरात गेले आणि ती मित्राकडे बसून राहिली ..सुमारे अर्धा तास झाला असेल तेवढ्यात तिचा भाऊ आईला घेऊन धावत घराकडे जाऊ लागला ..नित्याला ते दोघेही धावताना घराकडे जाताना दिसले त्यामुळे ती काय झालंय हे पाहायला बाहेर आली ..आई तशीच धावत घरात गेली होती हे पाहून नित्याही धावतच घरात गेली ..ती दारावर पोहोचली होतीच की तिचे पाय तिथेच थांबले ..तिने समोर बघितले तर बाबानीसुद्धा स्वतःला गळफास लावून घेतले होते ..काहीच वेळात घरात ओरडा ओरड सुरू झाली ..दसऱ्याचा दिवस असल्याने सर्वच घरात होते त्यामुळे आवाज ऐकताच सर्व धावत आले ..समोरच दृश्य बघून ते सर्व हैराण झाले होते ..काहींनी पाहताच पोलिसांना फोन केला ..आणि काही क्षणात पोलीस आले ..त्यांच्या शरीराला खाली उतरवण्यात आलं तर नित्या एका कोपऱ्यात बसून होती ...केवळ आपल्या बोलण्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं आहे याबद्दल ती विश्वस्त झाली होती त्यामुळे तिच्या तोंडातून शब्द देखील फुटत नव्हता...तिच्या आईने लगेच नित्याचा काकांना फोन केला होता तर तीचे मामा वर राहत होते त्यामुळे ते आधीच आले होते ..पोलिसांनी येऊन चौकशी केली आणि बॉडी पोस्ट मार्टमसाठी घेऊन गेले ..घरचे सर्वच रडत होते ..नित्याचे काही नातेवाईक बातमी मिळताच घरी आले होते ..तर काहींना यायला वेळ होता .एक एक नातेवाईक आले की घरचे पुन्हा रडायला लागत असत ..मात्र नित्या कोपऱ्यात बसून होती ..बाबा केवळ आपल्यामुळेच गेले आहेत असा तिचा समज झाला होता म्हणून कदाचित तिच्या डोळ्यातून अश्रू येत नव्हते ..आई येणाऱ्या जाणाऱ्यांना मागच्या काही दिवसात घडलेल सर्व सांगत होती आणि सर्वच लोक घृणास्पद नजरेने नित्याकडे पाहत होती पण नित्याला तर स्वतःचच भान नव्हतं ..ती शॉकमध्ये पूर्णतः बुडाली होती ..त्यामुळे त्या लोकांवर देखील तीच लक्ष नव्हतं ..

दुसऱ्या दिवशी सकाळी 12 च्या सुमारास त्यांचं शरीर घरी आणण्यात आल होता ..तोपर्यंत नित्याचे सर्व नातेवाईक घरी आले होते ...बाबांचं मृत शरीर पाहून नित्या त्यांच्याकडे धावत गेली आणि पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात अश्रूं आले ..तिने बाबांचे पाय धरले असता आईने तिला हाकलून लावलं ..नित्याला शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांना नीट पाहता येत नव्हतं ..ती बाल्कनीत एक कोपरा धरून शांत बसली होती तेव्हढ्यात तिचे काका तिच्यावर धावत येत म्हणाले , " कशी पोरगी आहेस ग तू फक्त संपत्तीसाठी आपल्या बापाला गिळलस !! तुझ्यासारखी पोरगी असण्यापेक्षा तर त्याला पोरगी नसती तेच बर झाल असते ..आमच्या घराण्याला लागलेल तू कलंक आहेस ..कलंक .."

काकांनी सर्वांसमोर नित्याला बोल एकवले आणि आतापर्यंत शांत असलेली तिची आई तिच्यावर ओरडत म्हणाली , " ए कारटे मिळाल का ग तुला समाधान !! म्हणाली होतीस ना तुम्हाला सुखाने जगू देणार नाही ..बघ कसा बापाचा जीव घेतलास ..तुझ्यासारखी पोरंगी तुझ्या बापाला मिळाली म्हणूनच फाशी लागून मेला तुझा बाप ..आता तरी खुश आहेस ना ? की आम्हालाही गिळून खुश होशील .."

तिचे सर्व नातेवाईक तिच्यावर येऊन ओरडत होते जणू तिला खरच वाटत होत का की बाबांनी जग सोडावं याचा विचार कुणीही केला नाही पण तिलाही त्या क्षणी वेदना होत होत्या हे कुणालाच कळत नव्हतं ..नित्याच्या डोळ्यात अश्रूंनी थैमान घातल होत पण नित्या काहीच बोलू शकली नाही ..एवढेच काय तिचे आजी आजोबा सख्खे मामा देखील फक्त बघ्याची भूमिका घेत होते पण कुणीही तिच्या बाजूने भूमिका घेतली होती ..नित्या रडत आहे हे पाहून बाजूचे निमसरकर काका म्हणाले , " काय लावून ठेवलं आहे तुम्ही !! अरे क्षण कोणता आहे बघा आणि तुम्ही काय बोलत आहात ते बघा ..वाद घालायला पूर्ण आयुष्य बाकी आहे .."

ते वयाने मोठे असल्याने त्यांचं बोलणं सर्वांनी एकल आणि शांत झाले ..काहीच वेळात त्यांना शांतीधाम मध्ये नेण्यात आले ..त्यावेळी सुद्धा तिला कुणीच चल अस म्हणाले नव्हते ..तरीही सर्वांच्या शेवटी ती आपल्या बाबाना शेवटचं बघण्यासाठी गेली होती ..सोबत होते ते काही शेजारी पण आपलं म्हणणार्यांनीच मात्र तिला अपराधी ठरवलं होतं ..पण यात तिचा खरच दोष होता का याचा विचार मात्र कुणी केला नव्हता ..दोष होता तो या समाजव्यवस्थेचा जो मुलींना जन्म तर देतो पण तिला ओझ समजून एका कोपऱ्यात सजवून ठेवतो ..दोष आहे त्या आईवडिलांचा जे मुलीच लग्न करून देतात पण तिच्यासोबत काही चुकीच झाल्यावर तिला समजून घेण्याऐवजी तिला चुकीच समजून तिलाच दोष देतात ..दोष आहे त्या समाज व्यवस्थेचा जो मुलांना वंशाचा दिवा मानून सर्वस्व प्रदान करतो पण मुलीने आपलं हक्क मागितला की मात्र ती आपली कुणीच नाही अस दाखवल्या जात आणि नित्याने तेच केल असताना सर्व दोष तिचाच का ?

काहीच क्षणात पार्थिव शांतीधाम वर नेण्यात आले ..शरीराचा वास सुटू नये म्हणून लवकरात लवकर सरण रचून त्यावर तिच्या बाबाना ठेवण्यात आलं ..सर्व लोक त्यांचे चरण स्पर्श करून शेवटचा प्रणाम करत होते ..नित्यालाही राहवलं नाही आणि तिने त्यांच्या चरणांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला पण आईने तिला बाजूला ढकलून दिले ..आईच्या नजरेत तिच्याबद्दल घृणा दिसत होती ..तरीही तिने दुर्लक्ष करून बाबाना शेवटची श्रद्धांजली दिली ..काहीच क्षणात बाबाना अग्नी देण्यात आला ..आणि त्यांचं शरीर अनंतात विलीन झालं ..

हळूहळू शरीर जळू लागलं आणि लोकांची गर्दी कमी होऊ लागली ..पण नित्या मात्र आतही तिथेच होती ..आपल्या वडिलांना डोळ्यात सामावून घेत कारण तिला त्यांनी जरी कधी मुलीच प्रेम दिलं नव्हतं तरी तिने मात्र त्यांना नेहमीच वडील मानलं होत ..सर्व लोक गेले आणि ती चितेजवळ जात बाबाना म्हणाली , " बाबा सर्व दोष माझाच आहे का ? "

क्रमशः...