Saubhagyavati - 17 books and stories free download online pdf in Marathi

सौभाग्य व ती! - 17

१७) सौभाग्य व ती !
दूर कुठेतरी कोकिळेचा मधुर स्वर ऐकू आला. आळस देत बाळू ऊठला. परंतु अंगातलाआळस जात नव्हता, उत्साह येत नव्हता. कदाचित त्याच्या मनावर असलेला ताण त्याचा उत्साह हिरावत होता. तितक्यात विठाबाई लगबगीने आत आली. तिला पाहताच बाळूने विचारले, "का ग विठा, काय झाले?"
"काकासाब, लई बेक्कार झालं?" विठाबाईचा घाबरलेला स्वर ऐकून बाहेर आलेल्या मीनाने विचारले,
"विठा, काय झालं गं?"
"अव्हो, वाड्यात तायसाब न्हाईत व्हो..."
"घरात नाहीत? अग जाणार कुठे? नीट बघ..."
"बाळासाब, सम्दा वाडा फायला. आजपस्तोर कव्हा देवघरात गेले न्हाई पर तेथं बी बघीतल पर... रातीचं तुम्हाला..."
"अग पण..."
"राती तुमी निघून आले. धन्यान तायसाबाला लई मारल. तवाच तायसाब म्हणाल्या, की घर सोडून जाते..."
"काय? बापरे! थांब पाहतो..." असे म्हणत अंगात कपडे घालून पायात चपला अडकवून बाळू घराबाहेर पडला. रस्त्यावर येतोन येतो तोच मांजर आडव गेलं. पाठोपाठ सदाशिव समोर आला. रात्रीचे सारे विसरून बाळू म्हणाला,
"नयन वाड्यात नाही म्हणे."
"मला काय माहिती? कुणाचे तरी पाप पोटात घेवून फिरण्यापेक्षा एखादी विहीर जवळ केली असेल. नाहीतर तोंड काळे..." सदाशिव म्हणत असताना त्या मुर्ख माणसाला बोलून फायदा नाही हे ओळखून बाळूने काढता पाय घेतला.
लगबगीने तो बसस्थानकावर पोहचला. दुरूनच त्याला एका बाकड्यावर बसलेली नयन दिसली आणि त्याचा जीव भांड्यात पडला. तो धावतच तिच्याजवळ जावून म्हणाला,
"नयन, हे तू काय आरंभलस?"
"आता या नरकात काय आहे? अरे, नरकातही नसतील अशा वेदना मी भोगल्या. पण...पण... कालचा आरोप...नाही. बाळू, नाही. अरे, आता नाही सहन होत. हा...हा आरोप ऐकून खरे तर मी जिवंत.. त्यापेक्षा हे घरच सोडून जाणे हा पर्याय..."
"अग, पण असं घर सोडून जाणे म्हणजे? कुठं जाशील? काय करशील?"
"कुठं म्हणजे? जाईन अमरावतीला भाऊंकडे. मी काही अडाणी नाही. कुठेही नोकरी मिळेल!"
"नयन, तुला वाटतं तशी नोकरी सहजासहजी मिळेल?"
"मिळेल. आज ना उद्या मिळेल परंतु आता काहीही झाले तरी माघार नाही. त्या त्या नरकात पुन्हा येणे नाही."
"मग हवं तर माझ्याकडे चल. काही दिवस शांतपणे..."
"म्हणजे पुन्हा त्यांचा नंगानाच पाहायचा. स्वतःच्या समाधीवर स्वतःच फुलं वाहू? नाही.... येते मी..." ती बोलत असतानाच बस लागली आणि नयन बसमध्ये चढली. बस दिसेनाशी होईपर्यंत बाळू डोळ्यात अश्रूंची फुले घेऊन उभा होता. नंतर थकल्या पावलांनी तो घरी परतला...
दारात मीना व विठा त्याचीच वाट पाहात उभ्या होत्या. त्याला पाहताच विठाने विचारले, "बाळासाहेब...?"
"भेटली पण ती...नयन,गाव सोडून गेली..."
"पण तुम्ही आपल्या घरी आणायच असत..."
"मी म्हणालो पण तिची इच्छा दिसली नाही. ती अमरावतीला भाऊकडे गेलीय. सुटली बिचारी..."
"न्हाई वो. आगीतून फुफाट्यात गेली हो..."असे म्हणत डोळ्याला पदा लावत विठा घराकडे निघाली.
"ही...ही...विटा असं का म्हणाली? ती माहेरी गेलीय." बाळूने विचारले.
"बरोबर आहे तिचं. माहेर? भाऊ? अहो, सारे चार दिवसाचे असतात. कुणी कायमचं घरी राहायला आलंय हे समजताच आपली माणस परकी होतात. प्रत्यक्ष जन्मदात्रीलाही लेक जड होते. शिवाय उद्या माधवचं लग्न झाले म्हणजे... अहो, नवीन येणाऱ्या पोरींची अनेक स्वप्नं असतात. संसाराच्या सुरुवातीच्या काळात त्यांना तिसरे कुणी अगदी सासुसासरेही नकोसे वाटतात. तिथे नणंद-दीर आणि त्यातही आश्रीत कुणी आलं की मग तर..."
"पण येणारी मुलगी तशी असेलच कशावरून? तू जसं..."
"माझे गावी राहणं म्हणजे मन मारून होत. जावू द्या. तुम्ही म्हणता तस येणारी सून नयनला सांभाळूनही घेईल. अगदी बहिणीसारखं वागवेल. त्याचा मलाही आनंद होईल."
"काय करावं? माझीही कमाई काही विशेष नाही. माझं डोकं नुसतं सुन्न झालंय. लग्नापूर्वीची नयन म्हणजे चालता-बोलता विनोद! हां स्वभाव थोडा जिद्दी, रागीट, चिडचिडा होता परंतु प्रसंग कसाही असला तरी नयनने तिथे विनोद पेरून हसणे फुलवलेच म्हणून समज. अनेकवेळा शर्यत लावून अनेकांना हसवलं. लग्न झालं आणि नयन स्वतःचे सारे चैतन्य हरवून बसली."
"चैतन्य सोडा ती बिचारी स्वतःचे सर्वस्व... संसार... सारे काही हरवून बसलीय. तिच्याच छातीवर बसून तिचाच संसार दळून खाताहेत दुष्ट...!"
"आपलाही इलाज नाही."
"काय कमाल आहे. नावालाच सारे वतनदार, जहागीरदार! वतनं, जहागिरी तर गेल्या पण राहिलेल्या दारांनाही द्वेषाची, भांडणाची कीड लागलीय..."
"अग, केवढा मोठा वाडा. केवढी प्रचंड शेती पण कवडीमोल भावात..."
"बरे झाले, तुम्हीच विषय काढलात म्हणून! माझे ऐका मोहात जाऊ नका. सगळ ठीक आहे. त्यांचे अनंत उपकार आहेत. तुमच्या लहानपणीच आई बाबा गेले. कुणी पुढे आले नाही. अण्णा-भाऊंनी तुम्हाला सांभाळलं, लहानाच मोठ केलं, सुसंस्कारित-शिक्षित केलं. नोकरीला लावून स्वतःच्या पायावर उभं केलं. पण..."
"हे सारे असूनही मी..."
"होय. आता आपल्याला आपल्या संसाराचं पाहिलं पाहिजे. आपल्याही मुलांची शिक्षण व्हायची आहेत. शिवाय बोलू नाही पण थोडं स्पष्ट बोलते त्यांनी भाचा म्हणून तुमच्यासाठी जे केलं त्याची पुरेपूर किंमतही त्यांनी वसूल केली. ऐका. आपल गावाकडचं तेवढं मोठ्ठ शेत विकून इथं घेतला एक तुकडा! त्या शेताचे पैसे आले किती, हे घेतलं केवढ्याला याचा हिशोब कधी दिला? तुम्ही विचारला?"
"अग, मी त्यांचा आश्रीत होतो. एकाच ताटात जेवताना वेगळा विचार करणे..."
"ठीक आहे ना पण आता आपण वेगळे झालो, ताटं वेगळी झाली. तेव्हा आपल्याच ताटाचा विचार करायचा. तुम्हाला वाढवलं, लग्न केलं... तुम्हाला सांगते...एवढी लग्नं, तेवढी लग्नं केली हा तोरा मिरवणाऱ्यांनी नयनचे लग्न करताना, सदाशिवच्या वतनदारीला दिपून न जाता येथे येवून जरा त्याची चौकशी केली असती तर आज नयनवर ही...ही... भीकेला लागायची आणि तुमच्यावर
रस्त्यावरची खड्डे मोजायची पाळी आली नसती. होय! तुमच्यावरही! तुम्ही पदवीधर झालात त्याचवेळी त्या-त्या साहेबांना दहा-वीस हजार देवून बँकेत चिकटवल असतं तर पण नाही. शिवाय ही रक्कम त्यांना स्वतःच्या खिशातून द्यायची नव्हती पण... बसा आता डांबराच्या टाकीत नाक खुपसत..."
"बाळू, अरे, बाळू..." आवाज देत आत आले ते अण्णा होते.
"अण्णा तुम्ही... या.. या.." असे म्हणत बाळूने ऊठून अण्णांचे स्वागत केले.
"या. बसा. अण्णा." असे म्हणत मीनाने पाणी आणून दिले. पाणी पिवून थोडे सैल होत अण्णा म्हणाले,
"बाळू, झालं रे बाबा सर्वाच्या मनासारखं झालं. शेत, वाडा सारं काही विकलं. भाऊंचा वाटा त्यांना दिलाय. हा तुझा वाटा, कमी जास्त सांभाळून घ्या."
"अण्णा, तुमचा वाटा..."
"माझी अवस्था वाल्याकोळ्याप्रमाणे झालीय. माझा सारा वाटा कर्जात, हातऊसणे फेडण्यात गेलाय. जाऊ दे. पण पण...त्यावेळी सारे एकत्र होतो ना, सर्वांची शिक्षणं, लग्नं, आलं-गेलं त्या कर्जातूनच झालं हे सगळ्यांनाच माहिती होतं पण..."
"अण्णा, कमाआत्याचे..."
"नाही झाले रे, नाही. तो एक फार मोठ्ठा कर्जाचा डोंगर राहिलाय त्याहीपेक्षा एक अपराधीपणाची जाण... कमासमोर आली की, हजारो खून केलेल्या अपराध्याप्रमाणे माझी मान खाली जाते. तिच्या नजरेला नजर नाही मिळवू शकत मी. वाटलं होतं, माझा हिस्सा बाहेरच्या कर्जात गेला. भाऊ स्वतःच्या हिश्श्यातून.... पण ते चक्क नाही म्हणाले."
"अहो..." मीना बाळूला काही तरी सांगत होती परंतु अण्णांनी तिला थांबवले.
"नाही, मीना नाही. तुम्ही म्हणालात तरी मी हा वाटा परत घेणार नाही..." अण्णा लगबगीने म्हणाले. मीनाने स्वयंपाक केला. अण्णा, बाळू जेवायला बसले. अवघ्या दीड पोळीत अण्णांनी जेवण आटोपले. भरपेट जेवण झाल्यावरही पाहुण्यांसोबत शर्यत लावून जेवणारे ते अण्णा हेच का? या प्रश्नातच बाळूचेही जेवण आटोपले. थोडावेळ आराम करून अण्णा निघाले. बाळू, मीना त्यांना सोडायला आले. थोडं पुढे गेल्यावर अण्णांनी मागे वळून पाहिले तसा बाळू त्यांच्याजवळ गेला तेव्हा ते म्हणाले,
"बाळू, एक शंभर रुपये..."
"म्हणजे?" बाळूने आश्चर्याने विचारले.
"नाही रे. सर्वांचे देवून एक पैही माझ्याजवळ राहिली नाही. हे पैसेही परत..."
"अण्णा..." असे म्हणत बाळूने भरल्या डोळ्यांनी दिलेली नोट अण्णांनी साश्रू नयनाने स्वीकारली आणि ते निघाले.. जणू... दुतामध्ये सर्वस्व गमावलेला पांडवश्रेष्ठ... युधिष्ठिर...! अण्णा गेले. त्यांना सोडून परत आलेल्या बाळूला मीना म्हणाली, '
"बघा. अण्णांनी नयनबाबत विचारले? नयनच्या वाड्याकडे तरी बघितले का?"
"कदाचित भाऊंच्या वागण्याचा..."
"त्यांचा राग पोरांवर का? असा भेदभाव का? हेच मालिनीचे घर असते तर अण्णा आपल्याआधी तिकडे गेले असते."
"जाऊ दे. आभाळच फाटलय. आपण तरी किती ठिगळं लावणार? आपले हात तरी कुठे पुरतील? असा विध्वंस का व्हावा, अशी दरी का निर्माण व्हावी? शरीर दोन असली तरी मनाने सदैव एकच असणारे अण्णा-भाऊ असे का वागताहेत?"
"पैसा! फक्त पैसा! हे आपल्याच घरी नाही तर सर्वत्र असते. जोपर्यंत घरात सारे आलबेल असते तोवर सारे एकत्र असतात. परंतु माणसांची, मित्रांची, भावाभावांची खरी परीक्षा संकटसमयी होते. मोठे जहाज जसे सागर, निसर्ग शांत आहे तोपर्यंत शांत असते, विनासायास प्रवास करते. परंतु जहाजावर थोडे जरी संकट आले तरी त्यावेळी कुणी कॅप्टनचा विचार करत नाही. सारेजण स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. एकत्र कुटुंब म्हणजे मोठे जहाजच नाही का? जोवर घरात सुख असते, पैशाची आवक भरपूर असते त्यावेळी कुणी विचारत नाही, 'घर कसं चाललंय?' परंतु आवक कमी होते, कर्जाचा डोंगर वाढतो, त्यावेळीही कुणी विचार करत नाही परंतु ज्यावेळी कर्जफेडीचा विचार होतो तेव्हा एकत्र कुटुंबाची वाताहत होते. कुणी कर्ज वाटून घेत नाही. सारे आपापल्या संसाराकडेच बघतात आणि वेगळे होतात. त्यावेळी कुटुंबप्रमुखाची अवस्था वाल्या कोळ्यासारखी होते. तुमच्या अण्णांचाही आज असाच वाल्या झालाय. त्याला कारण अण्णांचे नियोजन, बडेजाव कारणीभूत आहेच. तसेच भाऊही जबाबदार आहेत. शेतीचं पीक कमी झालं. धान्याची, पैशाची आवक कमी झाली त्याचवेळी भाऊंनी अण्णांना बडेजावापासून दूर करावयास हवे होते."
"तुझे बरोबर आहे. पण अण्णांचा स्वभाव काय तुला माहिती नाही? स्वतःच्या निर्णयापुढे ते कुणालाही जुमानत नाहीत."
"तिथेच त्यांच्या तशा स्वभावामुळेच सारं बरबाद झालं. सारं संपलं. आता तुम्ही तरी धीर धरा. भावनेच्या आहारी जावू नका. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' याप्रमाणे वागा. नाही तर हे कोण..माझे अण्णा...हे तर माझे भाऊ... ही कोण नयन? असा विचार मनात आणू नका. जिथे तिला..तिच्या बापाला तिच्याकडे पाहणे झाले नाही तिथे तुम्हाला काय गरज? आपल्यालाही आपला संसार आहे. उद्या मुले मोठे होतील. त्यांचे भविष्य आपणासच घडवायचे आहे. नाही तर अण्णा, भाऊ, नयन... त्यांची मुले यांचा विचार करताल ना तर आपली मुले उद्या असतील हमाल.. शिपाई..." मीनाचे म्हणणे पटल्यागत काही न पटल्याप्रमाणे बाळूने द्विधा मनःस्थितीत मान हलवली...
००००

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED