कादंबरी- जिवलगा ...४३ वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी- जिवलगा ...४३ वा

कादंबरी – जिवलगा

भाग – ४३ वा

------------------------------------------------------------------

नेहाच्या घरी सध्या काय चालू आहे ते पाहू या ...

नेहाचे बाबा ..ज्यांना .” मोठे वकीलसाहेब या नावानेच बोलतात सारेजण , आणि नेहाचा भूषण

दादू त्याला “छोटे वकीलसाहेब “असे म्हणतात . गेली सात-आठ वर्षे पासून मोठे वकीलसाहेब

कोर्टात हजेरी लावयची म्हणून जाऊन येत असतात ,लोकांना असे वाटू नये ..की मोठे वकील

साहेब आता काही कामकाज करीत नाहीत . गावाकडच्या वातवरणात जे समोर असते त्यालाच लोक

पाहत असतात .

नेहाचे आजोबा ,ते देखील वकील होते ,त्यांच्या जमान्यातील खूप मोठे आणि यशस्वी वकील म्हणून

त्यांचा नावलौकिक होता.आणि त्यांच्यापासूनच नेहाच्या परिवारात वकील होऊन गावातच ,फार फार

तर जिल्हा कोर्टात वकिली –कामे करणारी ही आताची तिसरी पिढी . नेहाचे दोन काका ,दोन मोठे चुलत

भाऊ असे पाच-सहाजण एकाच वेळी तालुका आणि जिल्हा कोर्टात वकिली व्यवसाय करीत आहेत

असे चित्र होते .

अशा परिस्थितीमुळे ..नेहाच्या आजोबांचा भला मोठा वाडा , आणि आजूबाजूला याच परिवारातील

इतरांची घरे होती..त्यामुळे या रस्त्याला वकील –वाडी असे नाव पडले होते , आणि तिथून पुढे

थोड्या अंतरावर गावाचा मुख्य भाग सुरु होत होता , बाजारपेठेचा -मेन रोड ,आणि सरकारी ऑफिसेस होती .

नेहाचा भूषणदादू -छोटे वकीलसाहेब .अनेक बँकेच्या वकील पेनेलवर होता . बँकेच्या सगळ्या कर्जदार ,अर्जदार यांच्या

केसेस ..भूषण वकीलसाहेब पाहतात ..आजोबा आणि वडिलांच्या तालमीत तयार झालेला नेहाचा

भूषणदादू आता फेमस वकीलसाहेब झाला होता .

गावातील नामवंत सामाजिक व्यक्ती आणि नेहाच्या बाबांनी एकत्र येऊन एक शिक्षण –संस्था

सुरु केली होती , मोठे वकील साहेब गेल्या अनेक वर्षापासून या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम

पहात होते . त्यांच्या प्रामाणिक आणि निस्वार्थीपानाच्या सामाजिक कार्याची पावती म्हणजे ..

दरवेळी ..संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची होणारी बिनविरोध निवड.

आपल्या परिवारातील माणसांचे सर्व क्षेत्रातील योगदान ,त्यांचे सामाजिक स्थान आणि मिळणारा

मान-सन्मान पाहून ..नेहाचे आजोबाना खूप मोठे समाधान लाभत असते.

ते नव्या माणसाला सांगतांना जुन्या काळात हरवून जातात .

ते म्हणतात ..आमचे हे गाव , अगदी दुर्गम परिसरातील , न सुख, ना सुख-सोयी , मोठ्या शहरी

जाण्या इतकी स्थिती नव्हती , सगळे लोक अशिक्षित ,गरीब ,तुटपुंज्या शेतीवर गुजराण करणारे ,

निझामी वातवरण ,सगळी विपरीत परिस्थिती .लांब दूरवर जाऊन ..हैद्राबादला शिकणारी पिढी होती आमची

तेव्हाच्या काळात मुंबई –पुणे ..म्हणजे आमच्यासाठी परदेश इलाखा .

आजूबाजूला जंगल-परिसर , रस्ते नव्हते ,जाण्या-येण्याची सोय नव्हती ..म्हणून आम्ही हात नाही

टेकवले , एका विचाराचे आम्ही त्या काळातले तरुण एकत्र आलो ..शिक्षण घेऊन आलो ,मोठ्या पगाराच्या

नोकर्या सोडून देत , गावातच राहिलो ,आणि मेहनतीने कायापालट केला .आमच्या गावाचा ,आजूबाजूंच्या गावांचा .

आज हे पाहिले की केलेल्या कार्याचे चीज झाल्या सारखे वाटते.

नवी पिढी आमच्या पेक्षा कर्तबगार निघाली ..इथे आता काय नाही ?

सगळ आधुनिक जग इथे अवतरले आहे.

आमच्या पिढीने लावलेल्या इवल्याश्या रोपट्याचा ..मोठा वटवृक्ष झालेला पाहून ..खूप आनंद होतो .

नेहाचे आजोबा सगळ्यांना नेहमी म्हणतात ..

प्रत्येकाचे जग ..त्याच्या भवतीच असते..आपण यातील लोकांसाठी, त्यांच्या मदतीसाठी यथाशक्ती

काही समाज-सेवारुपी कार्य केलेच पाहिजे , तरच आपली जबाबदारी पार पाडल्याचा आनंद आपण मिळवू

शकतो.

नव्या पिढीने ,जुन्या पिढीचा समाज-सेवेचा हा वारसा जपतांना आपल्या कार्याने त्यात भर टाकणे

सुरु ठेवले आहे “

हे पाहून ..नेह्च्या आजोबांना पंचक्रोशीतली जनता धन्यवाद देत असे , कारण आजोबांनी हा वसा

स्वतःच्या घरापुरता, घराण्यापुरताच मर्यादित न ठेवता .. हा सामाजिक प्रपंच सगळ्यांना सामवून घेत आयुष्यभर केला होता .

म्हणूनच .. अजून ही सगळा परिसर ..नेहाच्या आजोबांना आमचे बापूसाहेब “या आपलेपणाने

भेटतो ,बोलतो .

आता ऐंशी वयोमान असलेले बापूसाहेब ..बाहेर फारसे पडत नाहीत , कुणी भेटायला आले तर ,

आलेल्या प्रत्येकाशी अगदी आपुलकीने बोलतात , प्रत्येकजण बापूसाहेबांना भेटून,

बोलून , चार घास खाऊन मगच भरल्या पोटाने परततो “.खाल्याशिवाय जायचे नाही ,हा नियमच होता .

नेहाच्या बाबांनी आपल्या वडिलांचे कार्य पुढे चालवले ..आणि आता नव्या पिढीतला भूषणदादू –

छोटे वकीलसाहेब .तो देखील आजोबांची आणि वडिलांची कार्बन कॉपी झालाय.

गावातल्या सार्वजनिक जीवनातील एक नवे कर्तबगार व्यक्तिमत्व ठरते आहे.

अशा घरातील नेहा ..तिला नव्या जगाची ओळख व्हावी ,नवे तंत्रज्ञान आत्मसात केलेले आहे तर,

त्यातील अनुभव घेण्याची संधी ..घरातील नव्या दृष्टिकोनामुळे मिळाली होती .

तिचे लग्न होई पर्यंत ..तिला ही परवानगी मिळालेली होती.

ज्या वेळी तिच्या लग्नाचे काही ठरेल ..त्या नंतर नोकरी वगरे काही नाही ,सरळ गावी यायचे.

लग्नानंतर काय करायचे ? हे तिचे नवे घर ठरवील.

आजोबांचा हा निर्णय ,त्याला बाबांनी दिलेली मान्यता आणि भूषणदादूचा पाठींबा ..अशी भक्कम

बाजू असतांना ..

नेहाच्या आजी ,नेहाची आई , किंवा इतर कुणी नेहाकडून काही बोलणे शक्य नव्हते.

त्यामुळेच नेहाच्या मनात कायम धाक धुक सुरु झाली होती ..

हेमूच्या घरी एकवेळ त्याची इच्छा मान्य करतील ,,पण आपल्या घरी ..काय होईल ?

************

२.

गावाकडून आल्यावर हेमूच्या मागे ऑफिसच्या मिटिंग निमित्ताने आणि इतर कामाची एकच गर्दी

लागली ,जणू काही नेहाची आणि त्याची भेटच होऊ नये ..असे ऑफिसने ठरवले असावे . तसे तर

फोनवर बोलता येत होते ,पण, डोक्यात नव्या कामाचे भुंगे इतके सुरु झाले की ..ऑफिसला आलाय्वर

थोडावेळ नेहाच्या समोर बसून ,तिला पाहण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न जमला तर फार मोठी गोष्ट ,

यामुळे समोर असून बोलणे नाही ..,हा नवीनच प्रश्न नेहा आणि हेमू समोर उभा राहिला ..

येते काही दिवस असेच राहणार हे कळल्या पासून तर दोघे कमालीचे नाराज होऊन गेले .बाहेर

भेटणे, फिरणे ..या गोष्टी कठीण होऊन बसल्या .

सोनिया आणि अनिता दोघींच्या लक्षात या गोष्टी आल्याच ..त्यांना हेमूच्या मागे लागलेल्या नव्या

कामाबद्दल समजले .

नेहा घरी आल्यावर ..बिघडलेल्या मूड मध्ये बसून असते ,,हे पाहून दोघी तिला समजावीत असत..

नेहा ..असे काय करतेस ?

तुम्ही मनातले प्रेम व्यक्त केले , आणि तुम्हाला जणू तुमचे प्रेम मिळाले ,याचा आनंद झाला ,

पण तो घेता येत नाही , यालाच प्रेमातले विरह क्षण म्हणतात ,यातूनच प्रेमाचे बंधन घट्ट होतात

आणि मनाने अधिक जवळ येतात माणसे.

हे ऐकून नेहा म्हणाली ..

गावाकडून आल्यापासून हेमूने तिकडे काय काय झाले ? काहीच सांगितले नाही , जणू काही घडलेले

नाही असाच थाटात वावरतो आहे . मला त्याचे हे वागणे चमत्कारिकच वाटते आहे.

सोनिया म्हणाली – हेमू अगदी नॉर्मल दिसतोय , म्हणजे प्रोब्लेम सारखे काहीच नाहीये नेहा .

तसे काही असते तर , त्याने तुला सांगितले असते ,आमच्याशी शेअर केले असते ..

तू उगीच्या उगीच असे टेन्शन घेणे सोडून दे बरे ..!

त्याच्या मागे सध्या कामाचा खूप लोड आहे हे दिसते आहे ना आपल्याला ,

मग, त्यात तुझा अस मूड पाहून तो जास्तच परेशान होईल ..तेव्हा तू असे वागणे थांबव बरे..

हे मात्र नेहाला पटले असावे ..ते म्हणाली ..

सोनिया आणि अनिता ..तुमच्या सोबत मी आहे म्हणून बरी गत आहे माझी ...

नाही तर वेडी झाले असते मी नक्कीच.

नेहाचा हात हातात घेत अनिता म्हणाली ..

अशी वेडी नेहा ..आम्हाला तर आवडते बाई .. त्या हेमुला जास्तच आवडत असणार ..

**********

३.

गेल्या आठवड्यातली दहावी मिटिंग आणि ट्रेनिंग –वर्कशोप संपवून हेमू एका कंपनीच्या ऑफिसमधून

बाहेर पडला , मिटिंग झाल्यावर लगेच डिनर असायचे त्यामुळे सगळे होईपर्यंत रात्रीचे दहा वाजून जात .

त्यामुळे घरी जाई पर्यंत अजून तास लागायचा ..दिवसभराचा ताण ,खूप थकवा आलेला असायचा .

याचा परिणाम एकाच ..नेहा बरोबर छान बोलणे बागरे व्हायचे नाही . फक्त मोघम सांगायचे ..

आत्ता संपली मिटिंग ..घरी निघालो आहे . भेटू उद्या ऑफिस मध्ये .

हेमू गहरी आला ,फ्रेश होऊन आराम करीत असतांना ..त्याचा मोबाईल वाजू लागला ..

मधुरिमा दिदीचा कॉल.. काय काम असेल ?

बोल दीदी ..हेमूने उत्तर दिले ..

दीदी बोलू लागली ..

हेमू..मी काय सांगते आहे आता ..ते लक्षपूर्वक ऐक ,आणि तसे कर ..आज आहे मंगळवार ..

येत्या शुक्रवार सकाळ ते ..रविवार रात्री पर्यंत ..म्हणजे तीन पूर्ण दिवस .. तुझे आई आणि बाबा

ते माधुरीमाचे - म्हणजे माझे नातेवाईक आहेत ..असे सांगून .

.सोनिया आणि अनिताच्या रूमवर मुकामास असणार आहेत.

शनिवारी इथे त्यांचा सत्कार आहे ..तुझ्या बाबांना मोठा पुरस्कार जाहीर झालाय ..हे कारण सांगण्यासाठी आहे

सगळ्यात महत्वाचे म्हणजे -

ते तुझे आई-बाबा आहेत..”ही गोष्ट आपल्या पैकी कुणीच नेहाला सांगणार नाहीये.

आणि त्यांना हेमुची “नेहा “ ही मुलगी आहे हे कळू द्याचे नाहीये .

सोनिया आणि अनिता यांचीरुममेट असणारी एक मुलगी .बस.

याचा उद्देश एकच..

तुझ्या आई-बाबांना नेहा ..त्यांची होणारी सुनबाई ..कशी आहे हे जाणून घेता येईल , ते गावाकडे

गेल्यावर मी सांगेन त्यांना मग नेहाबद्दल .

तू फक्त एकच करायचे .. शुक्रवार ते .रविवार ..नेहाला कनेक्टेड राहायचे नाहीये.

तू तुझ्या आई-बाबांना स्टेशनवर घायला जा, आणि तिथून ..टैक्सी करून दे, सोनिया रजा

घेऊन घरी थांबलेली असेल.

अनिता आणि नेहा ऑफिसला असतील .

बाकी प्लैन मी सोनिया आणि अनिताला सांगितलाय ..त्या तसे करतील ..

रविवारी रात्री सोनिया तुझ्या आई-बाबांना स्टेशनसाठी टैक्सीत बसवून देईल , तू स्टेशनवर उतरवून

घे आणि ट्रेन मध्ये बसवून दे .

दिदीचा प्लान हेमुसाठी अगदीच अनपेक्षित होता ..

आणि यात त्याचा सहभाग काहीच नव्हता ..

आता काय काय होणार ? नेहाची मोठीच परीक्षा होणार आहे आता ,

माहिती असून ..काही माहिती नाही असे दाखवण्याची शिक्षा मिळाली ,असेच हेमुला वाटत होते ..

देवा ..नेहाला या परीक्षेत पास कर रे बाबा ..!

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाक पुढच्या भागात ..

भाग – ४४ वा लवकरच येतो आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – जिवलगा

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------