सौभाग्य व ती! - 20 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सौभाग्य व ती! - 20

२०) सौभाग्य व ती!
"अभिनंदन, ताई! आपण बी. एड. पास झालो..." आत आलेले गायतोंडे म्हणाले.
"काय सांगता?"
"होय. नयनताई, तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कारण ज्या परिस्थितीत सध्या तुम्ही आहात त्या स्थितीमध्ये शाळेचे काम सांभाळून, प्रचंड, मानसिक तणावामध्ये तुम्ही जे यश मिळवलंय ना त्याला खरेच तोड नाही. तुमचा आदर्श..."
"माझा आदर्श? भाऊ, अहो जिथे कौतुकाच्या चार शब्दांची वाणवा आहे तिथे तुम्ही माझ्या आदर्शाची भाषा करता? भाऊ कधी वाळवंटात का भाताचे पीक येणार आहे?"
"खरे आहे तुमचे. ताई, स्वार्थाने डबडबलेल्याया जगामध्ये कौतुक, अभिनंदन, सत्य अशा गोष्टी निघून गेल्यातच जमा आहेत..." गायतोंडेना मध्येच थांबवून नयन म्हणाली,
"भाऊ, सकाळीच साहेबांचा निरोप आला. ते या वर्षापासून पाचवीचा वर्ग काढायचा म्हणतात. एका शिक्षकाची नेमणूकही करणार आहेत. आपलाही पगार वाढवणार आहेत. परंतु या राजकारणामुळे ग्रँट मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत."
"ताई, वर्ग आणि शिक्षक वाढणार म्हणजे तुमचे अधिकारही वाढतीलच ना..."
"कशाचे अधिकार आणि काय? या तुटपुंज्या पगारात नवीन शिक्षक किती साथ देतील हे पाहणेही मनोरंजक असेल. पगार कमी, काम जास्त हे किती जणांना पेलवेल ते सांगता येत नाही कारण त्याउलट सध्या सर्वत्र कर्मचाऱ्यांचा ओढा आहे. हक्कासाठी लढणारे कर्मचारी दुसरी बाजू कर्तव्य आहे हेच मुळी विसरताहेत. थोडासा अन्याय झाला, की आपले कुठे चुकले ह्याचा विचार करण्याऐवजी संघटनेकडे धाव घेवून संपाचे हत्यार उपसतात."
"खरंय तुमचे, ताई. शासनाचे कामे म्हणजे 'आज करे सो कल करे...' अशी स्थिती होते आहे. शासन, व्यवस्थापन यांना जेव्हा कर्मचाऱ्यांच्या अधिक योगदानाची गरज असते नेमके त्याचवेळी संपाचा इशारा देवून सरकारचे नाक दाबायचे असे काहीसे चित्र या लोकशाहीत दिसू लागले."
"भाऊ, काहीवेळा सरकारचे, व्यवस्थापनाचे चुकते. अनेकवेळा मागण्या करूनही त्या पूर्ण होत नाहीत प्रसंगी त्या मागण्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष झाल्याचे, टाळाटाळीचे शासकीय धोरण लक्षात येताच नाइलाजाने कर्मचाऱ्यांना संपाचे हत्यार बाहेर काढावेच लागते."
"बरोबर आहे. दोघांनीही समंजसपणाची भूमिका घेतली. दोन टोकांना दोघांनी ताणले नाही तर संघर्षाची ठिणगी पडणार नाही."
"याला लोकशाही म्हणतात." नयन म्हणाली...
आशा, माधवचे लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले होते. बाहेरून येण्यासारखे मोजकेच पाहुणे होते. अर्धेअधिक पाहुणे त्याच शहरात होते. लग्नाच्या आदल्या दिवशी सारे एकत्र जमतील अशी शक्यता होती. किती फरक होता, गावात झालेल्या त्या लग्नांमध्ये आणि शहरातील लग्नामध्ये? गावी लग्न म्हटलं, की पाहुण्यांचे रेलचेल असायची. पंधरा-पंधरा दिवस अगोदरपासून पाहुणे जमायचे. तेच सारे पाहुणे आता लग्नघटिकेच्या आधी पंधरा मिनिटे आले तरी मिळवलं अशी म्हणायची स्थिती निर्माण झालीय. प्रत्येक गोष्टीचे शहरीकरण झाले होते. त्या शहरीकरणामुळे आईचं, बापाचं व पत्नीचेही प्रेम विकत घ्यावे लागण्यासारखी स्थिती निर्माण होतेय. पती-पत्नीची दोघांचीही जर 'शिफ्ट' पद्धत आणि 'ओवर टाईम' असेल त्यावेळी त्या दोघांचीही अनेक दिवस भेट होत नाही. पैशापुढे माणसाने स्वतःचे 'घरपण' गहाण ठेवलंय, माणूस लाचार होतोय. मुलाला भेटण आपल्याच आई-बापाला भेटण्यासाठी वेळ मागून घ्यायचा प्रसंग येण्याची शक्यता निर्माण होतेय. बालकांना स्वतःच्या आईपेक्षा पाळणा घराची ताई किंवा त्यांना सांभाळणारी दाई जवळची वाटू लागलेय. अशा वातावरणात वाढलेली मुले मोठी होऊन उद्योगधंद्यास लागल्यानंतर आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठविण्यास मागेपुढे पाहणार नाहीत का? खात्यापित्या घरातल्या मुलांसाठी घर म्हणजे हॉस्टेल ठरू लागलय...
सायंकाळी भाऊ, बाळू, माधव जेवायला बसले. कधी नव्हे ते भाऊंनी विचारले,
"काय म्हणाले वकील?"
"केस हरल्यातच जमा आहे."
"स्वतःचे हात स्वतःच तोडून दिल्यावर दुसरे काय होणार?"
"त्यांनी फसवून संमती घेतल्याचे मला जेवढे वाईट वाटले नाही त्यापेक्षा अधिक वाईट वाटले ते माहेरच्यांनी फसवल्याचं."
"काय म्हणतेस तू? कुणी फसवलं ग तुला?"
"प्रत्यक्ष जन्मदात्या बापाने..."
"नैऽने, काय बोलतेस तू? काही लाज आहे..."
"भाऊ, पैशापुढे तुम्ही एवढे लाचार झालात? तुम्हाला एवढेही भान नाही, की आपण आपल्या पोटच्या लेकीच्या दागिन्याची मोडतोड करून स्वतःच्या गळ्यात लॉकेट घालावं? माझ्या पाटल्या, एकदाणी उतरवून स्वतःच्या बोटांमध्ये अंगठ्या घालताना बोटे झडली कशी नाहीत?"
"नैऽने..."भाऊ ओरडले.
"मलाही ओरडता येते. मला एक सांगा भाऊ, माझ्या अंगावरचे दागिने तुम्ही कशासाठी काढले? त्या वकिलाचे घर भरण्यासाठीच ना? पण त्यांना दिले किती? दीड हजार..."
"म्हणजे? बाळू, बघ आता. अरे, वकिलच तो! खोटे बोलणे हाच त्याचा व्यवसाय! त्याच्यावर विश्वास ठेवून माझा...प्रत्यक्ष बापाचा पाणउतारा करते. तुला लाज नाही वाटत?"
"जो गुन्हा करतोय त्याला लाज नाही वाटत. मग मला का वाटावी? भाऊ, मी असा काय गुन्हा केला हो? गावी देवधर्म करणारे, मंदिरामध्ये सप्ताह चालविणारे भाऊ आणि सिनेमाच्या तिकिटांचा काळाबाजार करून मालक, शासन आणि पोटच्या मुलीला फसविणारे हे भाऊ? स्वतःच्या बहिणीच्या... कमाआत्याच्या पैशांवर डल्ला मारणारे भाऊ... कुणा-कुणाचे शाप घेणार आहात?" "जा-जा. मोठी आली. कावळ्याच्या शापाने..."
"मी कावळा नाही भाऊ. दुखावलेल्या स्त्रीचे अंतरीचे बोल..."
"काय डोकेदुखी आहे? कुठून ही पीडा माझ्या मानगुटीवर आली? देव जाणे..." असे म्हणत भाऊ रागारागाने ऊठून गेले. नयननेही रडायला सुरुवात केली. कोण काय बोलणार? बाळू, मीनानेही जणू मौन स्वीकारले.
नयनच्या डोक्यामध्ये भाऊंच्या स्वार्थी वृत्तीचे विचार थैमान घालत होते. आशा-माधवचे लग्न जवळ येऊन ठेपले होते. लग्नापूर्वी चार-पाच दिवस अगोदर वास्तुशांती आटोपून लग्नाचे सारे कार्यक्रम नवीन घरातच आटोपावेत अशी भाऊंनी तयारी सुरू केली होती. गावातले भाऊ व शहरातील भाऊ यामध्ये जमीन अस्मानाचा फरक जाणवत होता. गावातली राजेशाही संपल्याची जाणीव होताच त्यांनी शहरात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. ज्या भाऊंकडे गावातील लोक हात बांधून उभे राहत त्याच भाऊंना सिनेमागृहाच्या मालकापुढे हात पसरायची वेळ आली होती. परंतु ज्यांना भविष्य सुखकारक करावयाचे आहे, त्यांनी वर्तमानातील दुःखांपपासून पळ काढू नये. संकटांचा सागर जो पोहू शकतो त्यालाच खुणावणारा सुखाचा पैलतीर गाठता येतो. सिनेमागृहाच्या मालकाचा विश्वास संपादन करण्यासाठी भाऊंना वेळ लागला नाही. मालकांनी सारा कारभार भाऊंवर सोपविला आणि स्वतः राजकारणात दंग राहिले. पैसा हा एकमेव देव भाऊंनी लक्षात ठेवून त्याची ते मनोभावे सेवा करू लागले. त्याचप्रमाणे स्वतःचे बिंग फुटू नये, कुणी मालकाकडे कागाळी करू नये म्हणून इतर कर्मचाऱ्यांनाही फूल ना फुलाची पाकळी देऊन त्यांची तोंडे बंद करू लागले. खऱ्या अर्थाने भाऊंना जगण्याची दिशा आणि टप्पा सापडला होता. इतर सर्व बाबतीत सुखी, आनंदी दिसणारे भाऊ कामजीवनात मात्र अतृप्त होते. गावात एकत्र कुटुंबामुळे त्याना मन मारून राहावे लागे. तीच परिस्थिती शहरात त्यांच्या नशिबी आली. नयनने 'त्या' बाबतीत आईस खडसावल्यापासून आईचे बिऱ्हाड बाहेर मुलाजवळ आल्यामुळे भाऊ रात्रभर एखाद्या जखमीप्रमाणे तळमळत असत मात्र कामतृप्तीसाठी वेगळे पाऊल उचलण्याचे धैर्य भाऊ जवळ नव्हते...
भाऊंच्या घराची वास्तुशांती झाली. त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. सर्वांनी तोंडदेखली स्तुती केली. भाऊंच्या जिद्दीचे कौतुक झाले. नवीन घरात लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले. नयन आणि कमात्या अडगळीला पडल्याप्रमाणे एका खोलीमध्ये बसून असत. प्रत्येक लग्नामध्ये सिंहाचा वाटा असणारी कमात्या त्या लग्नामध्ये सर्वांपासून दूर होती. सिमंत पूजनाच्या वेळी डबडबलेल्या डोळ्यांनी नयन ज्येष्ठ जावयाचा आहेर घेण्यासाठी पाटावर बसताच मांडवामध्ये नवीन पाहुण्यांमध्ये हलक्या आवाजात चर्चा सुरू झाली..
"हीच का हो ती?"
"होय. नवऱ्याने सोडलेली..."
"का सोडली हो? हिचे कुणाशी..."
"हिच्या नवऱ्याचे म्हणे त्याच्या मामीशी सूत जमले. नंतर मग लग्नही केले."
"कोर्टात केस वगैरे?..."
"चालू आहे म्हणे..."
"मग ही इकडे का आलीय?"
"बापाच्या आणि भावाच्या मुळावर दूसरे काय?"
अशी एक ना अनेक तोंडे. ती का बंद करता येणार?...
त्यादिवशी सकाळी एका पाठोपाठ एक बहीण-भावाची लग्ने लागली. जेवणाची धांदल उडाली. जेवण म्हणजे काय? ना पाट, ना रांगोळी, ना उदबत्ती तर म्हणे बफे! हा ही एक शहरीकरणाचा मानसपूत्र! पूर्वीच्या लग्नानंतरच्या पंगतींचा काय थाट, मांडवात चैतन्य खळाळत असे. पूर्वीची लग्नं म्हणजे जणू पाच दिवसांचा क्रिकेट सामना! सारे कसे तंत्रशुद्ध आणि मनाजोगते तर आजकालची लग्नं म्हणजे जणू एक दिवसीय क्रिकेट! अशा या बफेच्यासमयी कार्यस्थळाच्या आजुबाजूला राहणारे लोक कार्यालयात नकळत येऊन जेवणावर ताव मारतात. विशेष म्हणजे अडवणार कोण आणि कसे? कारण वधूपक्षाला वाटते ही मंडळी वराकडील असेल आणि नवरदेवाकडील लोकांना वाटते ही माणसं वधुकडील असतील. शेवटचे मंगलाष्टक संपल्यानंतर एक-दीड तासामध्ये सारी जेवणे आटोपतात. दगदग नको. आग्रहाचे फवारे नकोत. उष्टे काढण्याची भानगड नको. अगदी साहित्यिक भाषेत सांगायचे तर पूर्वीची लग्नं म्हणजे बारीकसारीक घटनांचा आस्वाद घेणारी कादंबरी तर आजची शहरातील लग्नं म्हणजे धावता आस्वाद घेणारी कथा!
बफेची धावाधाव संपली आणि मांडव जवळपास रिकामा झाला. मांडवातले चैतन्य हरवले. राहिलेली मंडळी कर्तव्याचा भाग म्हणून रेंगाळत होती. सभा संपेपर्यंत हमखास थांबणाऱ्या कामकऱ्यांप्रमाणे! दुसरीकडे मुलांमध्ये मात्र कमालीचा उत्साह होता. आजच्या शैक्षणिक युगामध्ये असा एखादाच दिवस त्यांना धम्माल मस्ती करायला मिळतो. नाही तर बालकांचे जीवन म्हणजे व्यायाम, शिकवणी, शाळा, शिष्यवृत्ती, पुन्हा अभ्यास! घाण्याच्या बैलाप्रमाणे जुंपलेल्या बालकांना जेवणासाठीही ठराविक कालावधी असतो. शैक्षणिक सत्राच्या नंतर मिळणाऱ्या सुट्टीतदेखील आगामी सत्राच्या अभ्यासक्रमाच्या वेळा आगाऊ आरक्षित असतात. लग्न आणि इतर कार्यक्रमातच त्यांना विरंगुळा मिळतो. मिळालेल्या संधीचा आनंदोत्सव ही वानरसेना मांडव डोक्यावर घेऊन साजरा करते...
सायंकाळी भाऊंनी आशाला बोळवलं तर माधवच्या पत्नीच्या रूपात मीराला मिळवलं. दोन्ही बसेस नजरेआड झाल्या आणि तोपर्यंत कळ धरून बसलेल्या पाहुण्यानी आपापले सामान उचलले. भाऊ आणि आईनेही कुणास विशेष आग्रह केला नाही.
कमात्या निघण्यापूर्वी पुन्हा उसन्या पैशांवरूंन तिचा आधी अण्णांशी आणि नंतर भाऊंसोबत वाद झाला. त्या साऱ्या वातारणात नयनचे प्रकरण, तिची बुडालेली संसारनौका याकडे कुणाचे लक्ष नव्हते. नयनशी आपले काहीही संबंध नाहीत या थाटात सारे वावरत होते. दलदलीत फसलेल्या व्यक्तिला बाहेर येण्यासाठी कोणीही हात देवू नये याप्रमाणे!
००००