Lockdown - 9 books and stories free download online pdf in Marathi

लॉकडाउन - बेरोजगार -भाग ९

रात्रीचा एक वाजला होता. सायंकाळपासून रिमझिम बरसणारा पाऊस आता मुसळधार कोसळू लागला होता. अधून – मधून विजा देखील चमकत होत्या. विजांमुळे होणार्‍या लख्ख प्रकाशामुळे दोन सेकंद का होईना सभोवतालची सृष्टी दिसत होती. बाहेरील सुकलेली झाडे एखाद्या पिशाच्चासारखी दिसत होती आणि विजेचा प्रकाश जाताच लुप्त होत होती. वार्‍यामुळे पानांची प्रचंड सळसळ होत होती. प्रत्येक पानाचा आवाज हा त्याचे अस्तित्व जपण्यासाठी धडपडत होता. अस्तित्व म्हणजे तरी नक्की काय असत? आपले असणे. या असण्याने कुणाला फरक पडत असला तर ठीक. नाहीतर काही नाही. मधूनच मांजराचे डोळे चमकत होते. अचानक ढगांचा मोठा गडगडाट होत होता. मधून मधून येणारे बेडकांचे आवाज देखील बंद झाले होते. कदाचित पावसाच्या आवाजात त्यांचा आवाज फिका पडत असावा. एखाद्या श्रीमंतपुढे गरिबाचा पडतो तसा. संपूर्ण गावातील विज सायंकाळपासूनच गायब झाली होती. मध्यरात्र उलटून गेली तरी शुभमचा डोळा लागला नव्हता. आता तर त्याला ही सवयच झाली होती. सुमारे सात - आठ महिन्यांपासून त्याला शांत झोप नव्हती. तो शांतपणे केव्हा झोपला होता, त्याचे त्यालाच आठवत नव्हते. त्याने कूस बदलून पाहिली, पांघरून पहिलं पण झोप काही येईना. त्याने आजूबाजूला बघितले. घरातील सर्वजण शांतपणे झोपले होते. तो हळूच उठला आणि जिना चढू लागला. अंधार असल्याने एकदोनदा धडपडला देखील. दरवाज्याचा आवाज होणार नाही अशी काळजी घेत त्याने हळूच दरवाजा उघडला. बाहेर गच्चीवर आला. इथे पावसाचे रौद्ररूप अजून जास्त धडकी भरवत होते. पण शुभमला त्याचे काहीच देणेघेणे नव्हते. त्याच्या मनाची अवस्था देखील काही वेगळी नव्हती. तो पावसात गच्चीवर उभा राहिला आणि समोरील दृश्य पाहण्याचा प्रयत्न करू लागला. काहीच दिसत नव्हते तरी पहात होता. दोन वर्षांपूर्वी देखील तो असाच उभा होता. तेव्हादेखील तो असाच होता, बेरोजगार....

त्या मुसळधार कोसळणार्‍या पावसात त्याच्या मनात देखील आठवणींच्या सरी कोसळू लागल्या. सरी कसल्या, त्या तर त्याच्या मागील दोन वर्षांच्या आठवणी होत्या. अतिशय कडवट आणि विषारी. हलाहल विषासारख्या. पण प्रत्येक हलाहल पचवायला रुद्र लागतो. शुभम देखील तसाच रुद्र होऊन ते विष पचवण्याचा प्रयत्न करू लागला. त्या काळ होऊन कोसळणार्‍या पावसात एक – एक आठवण त्याच्या मनःचक्षु समोर उभी राहू लागली. त्याला दोन वर्षे मागे लोटून त्या वाईट आठवणींच्या खाईत लोटू लागली.

शुभम एक मेकॅनिकल इंजिनीअर होता. पुणे विद्यापीठातून सुमारे ऐंशी टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला होता. तेव्हा त्याला जॉब नव्हता. मग सहा – सात महीने भरपूर ठिकाणी प्रयत्न केल्यावर त्याला एका मल्टीनॅशनल कंपनीत डेव्हलपमेंट मध्ये जॉब लागला. तेव्हा तर त्याला आकाश ठेंगणे झाले होते. पण हा जॉब इतका सोपा नव्हता. कामाच्या पहिल्याच दिवशी त्याला तब्बल बारा तास थांबावे लागले होते. दुसर्‍या दिवशी चौदा तास. मग नियमाप्रमाणे तो कधी आठ तास थांबला असे झालेच नाही. रोज बारा तास काम तर ठरलेलेच असायचे. अनेक वेळा त्याच्या मनात यायचे की आता बस्स... बंद करावे हे सर्व आणि निघावे इथून. पण पुढच्याच क्षणी त्याच्या मनात विचार यायचा की इथून गेल्यावर तरी काय करणार? हाच जॉब मिळवायला किती कष्ट लागलेत आणि त्यात हा सोडला म्हणजे दूसरा लगेचच भेटेल अशी शाश्वती मुळीच नाही. मग परत तो अंग झटकून कामाला लागायचा.

त्याच्या दोन महिन्यानंतर अभिलाष लागला होता. त्याचा एकदम राजेशाही कारभार होता. त्याच्या पाच महिन्याने प्रसाद जॉइन झाला होता. मग दीड वर्षाने पुजा. हे चौघे एकाच डिपार्टमेंटला, सारख्याच हुद्दयावर होते. पण शुभमवर खूप अन्याय होत होता. तो सकाळी साडे आठ ची ड्यूटी पकडण्यासाठी साडे सहाला घर सोडायचा. बस, टू व्हीलर, ट्रक जे मिळेल त्याने कंपनीत आठ वाजेपर्यंत पोहोचायचा. सोबतची मंडळी पावणेनऊ पर्यन्त यायची. मग आरामशीर कामाला लागायची. यांना कामाशी काही देणेघेणे नव्हते. तोपर्यन्त शुभम कामाला जुंपलेला असायचा. शुभमचे काम मशीनवर असायचे. त्याला डिझाईन यायचे, मशीन प्रोग्रामिंग यायची, बाकी इतर लीगल डॉक्युमेंट्स तयार करता यायची. एक मेकॅनिकल इंजिनीअर म्हणून जे यायला हवे त्यापेक्षा कितीतरी अधिक यायचे. रात्री केव्हा सुट्टी होईल याची काहीच कल्पना नसायची. रात्री आठ, नऊ, कधीकधी बारा देखील वाजायचे. मग इतक्या रात्री हायवे वर उभे राहून मिळेल त्या वाहनाला हात देऊन रात्री उशिरा घरी पोहोचायचा आणि परत सकाळी साडेसहाला घर सोडायचा. हे दृष्टचक्र अविरतपणे सुरूच होते. पण तरीही शुभम हे सहनच करत होता कारण त्याला गरज होती. त्याच्या तुटपुंज्या पगारावर घर चालत होते. त्यामुळे त्याला या नरक यातना भोगणे क्रमप्राप्त होते.

अचानक एका दिवशी त्याला कळले की अभिलाष कायम झाला. याच्या हृदयाचे ठोके चुकले. पण आशा वेडी असते. आपले पण काम होईल या विचाराने तो अजून जोमात काम करू लागला. अभिलाष आणि शुभम चांगले मित्र होते. अभिलाषच्या प्रमोशननंतर देखील त्यांच्या मैत्रीत काही फरक पडला नाही. मग एका महिन्याने प्रसाद कायम झाला. आता मात्र शुभमच्या मनाचा संयम सुटत चालला होता. डिपार्टमेंट हेड ला विचारले तर ते करू, करू सांगून वेळ मारून न्यायचे. मग हा उदास होऊन परत कामाला लागायचा. असेच काही महीने गेले. मग एका दिवशी त्याला हळूच बातमी कळली की पुजाचे देखील कन्फर्मेशन झाले. शुभमला आता मेल्याहून मेल्यासारखे झाले. या सगळ्यांत तो एकटा सीनियर होता. सुट्टीच्या दिवशी देखील यायचा. चक्क दोन वेळा तो तीन पूर्ण शिफ्ट कंपनीत थांबला होता. काम चांगले होते. कितीही वेळ थांबण्याची तयारी होती. पण तरीही याचे काम झाले नव्हते. सगळ्यांनी फक्त शुभमचा वापर करून घेतला होता. नंतर त्याला कळले की, अभिलाष, प्रसाद आणि पुजा या तिघांचे मोठे वशिले होते. कंपनीत प्लांट मॅनेजरशी ओळखी होत्या. आपल्या याच ओळखींचा वापर करून वशिल्याने हे सर्वजण कंपनीत कायम झाले होते. त्यामुळेच ते उशिरा येत, लवकर जात, हात तर मुळीच काळा वगैरे करत नसत. ह्यांना सर्व माफ होते.

मग हा भला माणूस नैराश्यात जाण्याच्या उंबरठ्यावर होता. सकाळी जाताना त्याच्या मनात विचार यायचा, का चाललो आपण? काय करायला? अपमान… मानहानी… काय केले आपण इतके दिवस काम करून? प्रामाणिकपणे काम करण्याची हीच शिक्षा असते का? का झाले आपल्यासोबत असे? प्रामाणिकपणाला बाहेरच्या जगात काहीच किंमत नाही. यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला चांगले वागून वा कष्ट करून काम करावे लागते असे नाही. हेच सूर्यप्रकाशाइतके निखळ सत्य आहे. तथापि रत्नांची पारख गाजरपारख्यांना झाली नाही तर तो दोष काही त्या रत्नांचा नसतो. दिवसरात्र त्याच्या मनात असेच विचार यायचे. त्यामुळे तो झोपेला पारखा झाला होता. कधी आपला करार संपून आपण इथून मोकळे होतो असे त्याला वाटायचे. शेवटी तो दिवस आला आणि त्याचा करार संपला. तो पर्यन्त शुभम फक्त शरीराने कंपनीत जात होता. मनाने तो खूप खचून गेलेला होता.

आता लगेचच त्याला पुण्याला जायचे होते. वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नव्हता. सर्व तयारी झाली होती तोच कोरोना महामारीने भारतात प्रवेश केला. लॉकडाऊन सुरू झाले आणि नशीब आजमावायला निघालेल्या शुभमची पावले नियतीने जागेवरच थांबवली. अनिश्चित काळासाठी आता त्याला घरात थांबणे भाग होते. काम नाही तर पैसा नाही. त्यामुळे एखाद्या महिन्याच्या पगारात कसे भागणार हा गहन प्रश्न तर आ वासून उभा होता. खिन्न मनाने शुभम दिवस घालवत होता. येणारा प्रत्येक दिवस त्याच्यासाठी गतिरोधक म्हणून येत होता. त्याच्या नशिबाची, कर्तुत्वाची, आयुष्याची, सुखाची गती रोखण्यासाठी. इथे घरातून निघणेच अशक्य होते. तर मुलाखतीला कसे जाणार आणि कोण बोलवणार. दिवस तर कसाबसा निघून जायचा पण रात्र मात्र वैरी होऊन सोबत करायची. लॉकडाऊन मुळे सर्व जग ठप्प झाले होते, त्यात या तरुणाची दळभद्री कहाणी समजून घेऊन त्याला पोटापाण्यासाठी काहीतरी कामधंदा देईल असं कुणीच सापडत नव्हतं. सापडेल कसं, लॉकडाऊन मुळे सर्वजण घरातच बसून होते. कंपन्याही बंद पडल्या होत्या. जिथे थोर अनुभवी व्यक्तींना लॉकडाऊन मुळे आपल्या नोकरीची शाश्वती नव्हती तिथे याचा काय निभाव लागणार होता. त्याची अवस्था फणा नसलेल्या भुजंगसारखी झाली होती. किंबहुना तो सिंह गुहेत कैद झाला होता. शिकार करण्याची इच्छा, उमेद, अनुभव सर्वकाही असताना....

ज्या तरुण वयात घरच्यांना काहीतरी करून दाखवायचे असते तेव्हा मी घरी बसून आहे. ज्या वयात पालकांनी माझ्या उमेदीवर गावात मिरवले पाहिजे. माझ्या कर्तुत्वाने त्यांची मान समाजात उंच झाली पाहिजे अशा वयात मी काय करतोय? मी खरच आई – बाबांचा मुलगा म्हणवून घेण्यास लायक आहे का? इंजिनीअर ही पदवी लाऊन घेण्यास पात्र आहे का? मी जगण्यास खरच योग्य असा मनुष्य प्राणी आहे काय? की मी नुसताच भूमीला भार म्हणून जगतो आहे? असे विचार रोज रात्री त्याच्या मनात गर्दी करायचे. मग त्या गर्दीत तो हरवून जायचा. त्या गर्दीत त्याचा जीव गुदमरायचा. त्या सापसारख्या वळवळणार्‍या गर्दीतून निघताना त्याचा जीव कासावीस व्हायचा. त्या काळ्या कभिन्न आठवणींच्या गर्गेतून बाहेर पडत असताना त्याला कोंबड्याची बांग ऐकू यायची. तेव्हा तो भानावर यायचा पण तोपर्यन्त तांबड फुटायला सुरुवात झालेली असायची. अशा कितीतरी रात्री पचवल्या होत्या.

आधीपासून शांत असणारा शुभम आता अधिकच शांत झाला होता. त्या समुद्रातील खोल पाण्यासारखा. ज्याच्यावर सूर्यप्रकाश पडत नाही. पण प्रवाळ देखील या पाण्यातच सापडते. दिवस उगवल्यापासून तो मोबाइलवर जॉब शोधत बसायचा. काही ओळखीच्या मित्रांना फोन करून त्यांच्या कंपनीत काही जागा वगैरे आहेत का? अशी विचारणा करायचा. याच कामात तो कासातरी दिवस घालवायचा. शेकडो ठिकाणी अर्ज केले, पण एकही ठिकाणाहून उत्तर येईल तर शपथ. अशा प्रकाराने तो अजूनच खंगत चालला होता. वरकरणी तो आनंदी असल्याचे भासवायचा. पण आतून तो खूप खिन्न असायचा.

त्याला पुस्तकं वाचण्याची आवड होती. गावातील काही मंडळींकडून पुस्तके आणून वाचायचा. त्यात त्याचे थोडेफार मन रमायचे. त्याने कर्ण वाचला, तो स्वतःची तुलना त्या अभागी कौंतेयाशी करू लागला. हिटलर वाचला तो पण त्याला समदुःखी वाटू लागला. संभाजी वाचला, पानीपत वाचलं. या सर्वांत तो स्वतःला शोधू लागला. पण पुस्तक बंद केल्यावर परत त्याच्यावर झालेल्या अन्यायाने आणि आता असणार्‍या परिस्थितीने त्याचे मन परत दुःखी व्हायचे. शेवटी त्याने पुस्तक वाचणे देखील बंद करून टाकले. अजून त्याच्या गावात आणि पंचक्रोशीत काही कोरोनाने भेट दिली नव्हती. त्यामुळे शेतात जाण्याचे कारण सांगून थोडेफार बाहेर जाता यायचे. मग हा त्याच्या बालमित्रांकडे जायचा. हे मित्र आता शेतीच्या कामात तरबेज झालेले आणि त्यांचा हा एकच मित्र इंजिनीअर असल्यामुळे एकूणच मित्रमंडळीत मजा घेण्यासाठी हक्काचा एकमेव माणूस शुभमच. यामुळे ते बोलताना थोडी मजामस्करी करत. तुझे काय बुवा, तू कंपनीत आहेस, लॉकडाऊन संपल्यावर परत सावलीत कामाला जाशील आणि आम्ही जाऊ शेतात. या मंडळींनी असे म्हणताच, याच्या तळपायाची आग मस्तकात जायची. ज्याच्यापासून दूर व्हयायला आपण इथे आलो, तेच आपल्या पाठीमागे धावत आले, असा विचार करून तो खिन्नपणे बसून राही. काही दिवसांनी शुभमने या मित्रांमध्ये बसणे देखील सोडले. मग तो नदीकिनारी जाऊ लागला. तिथेच त्या भयाण संध्याकाळी नदीच्या वहात्या पाण्याबरोबर विसर्जित करू लागला. साक्षीला दगडगोटे, रानातील झाडं – झुडूपं असायचीच. संध्याकाळ मात्र भयानक. अतिशय भयाण. धड सूर्याचा प्रकाश न चंद्राचा. सावलीपण नाही. हवा नाही. तिकडे सूर्य कलतीला आणि चंद्र उगवतीला. वर्षानुवर्षे हेच कालचक्र अखंडपणे सुरू. संध्याकाळी रम्य असतात असे ऐकले होते, असतीलही. पण याच्यासाठी नाही कारण, गेल्या दोन वर्षांत याने संध्याकाळ पाहिलीच नव्हती. तेव्हा तो एकतर कंपनीत असायचा नाहीतर माणसांनी खचाखच भरलेल्या एखाद्या वाहनात. आता सायंकाळ अनुभवण्याचा योग आला होता तर तो असा होता.

इकडे जगात कोरोना ने कहर माजवला होता. लॉकडाउन दिवसेंदिवस वाढत होते, सोबतच याच्या मनाची घालमेलही वाढवत होते. येणारा प्रत्येक दिवस काळजी वाढवत होता. पण शुभम चेहर्‍यावर काहीच दिसू देत नव्हता. तो हसत होता, पण मनातून रडत होता. नशिबाला आणि प्रारब्धाला दोष देत. तो जेवत होता, पण दुःख पचवत होता. तो रात्री डोळे उघडे ठेऊनच झोपत होता. तो आता मायामोहाच्या प्रलोभनांपासून हळुवारपणे दूर लोटला जात होता.

शुभमला या काळ होऊन बरसणार्‍या पावसात उभे राहून बराच वेळ झाला होता. तो विचारच करत होता. पाऊस काही थांबत नव्हता, नखशिखांत चिंब भिजलेल्या शुभमच्या डोळ्यातून देखील असाच पाऊस सुरू झाला होता.....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED