Lockdown - 10 books and stories free download online pdf in Marathi

लॉकडाउन - चंदा - भाग १०

दुपारचे बारा वाजले होते. इतक्या दिवसाढवळ्या देखील रस्त्यावर शुकशूकाट होता. सरकारने लॉकडाउन घोषित करून आठवडा उलटला होता. एवढ्या तप्त उन्हात देखील चंदा तशीच उभी होती. कुणीतरी येईल या आशेवर. कुणीच येणार नाही हे तिलादेखील माहिती होते पण तिला पर्याय नव्हता. सडपातळ बांध्याची चंदा केसांच्या सोडलेल्या एका बटेशी उगाचच चाळा करत होती. सकाळपासून केलेला शृंगार आता घामामुळे पुसला गेला होता.

तिच्या पोटाच्या खळगीपेक्षा तिच्या आई आणि आजीचे पोट भरण्यसाठी ती जगत होती. तिची आई तिला कुंटणखाण्यात सोडून गेली तेव्हा ती अवघी वीस वर्षांची होती. तिचे मुळ गाव दूर महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवर कुठेतरी होते. आईचे वय झाले म्हणून आईच्या बदली दिदीने तिला थांबवून घेतले होते. दीदी म्हणजे यांची मालकीण. तिचे वडील कोण हे तिला ठाऊक नव्हते. कसे माहीत असणार? तिची आई एक वारांगना होती. त्यामुळे तिचे वडील कोण? हा अगदी नगण्य प्रश्न होता. चंदा देखील वारयोषिता होती. आजीसोबत छोट्याश्या खेड्यात राहायची. आजीने थोडेफार शिकवले. मग ही आईसोबत आली. इथले सगळे वातावरण वेगळे होते. सर्व प्रकार बघितल्यावर ती खूप घाबरली होती. आईला ती नेहमी तिच्या बाबांबद्दल विचारायची? आई म्हणायची, “काय माहीत?” हे देखील खरेच होते म्हणा. “आजीची तब्येत बरी नसते म्हणून तिकडे चाली आहे”, असे सांगून तिची आई गावी परतली होती. तिला तिच्या जागेवर सोडून. खरं म्हणजे पन्नाशी ओलांडल्यामुळे हिच्याकडे आता कुणी गिर्हाइक फिरकत नव्हते. त्यापेक्षा तुझ्या मुलीला घेऊन ये हा दिदीचा सल्ला तिला पटला आणि ती कुंटणखाण्यात आली. आपल्या मुलीचे आपल्या डोळ्यासमोर वेश्या व्यवसायात उतरणे तिला बघवले नाही त्यामुळे ती असे पर्यन्त तिची मुलगी चंदा दिदीकडेच होती. सुरक्षीत.

आई गावी गेल्यापासून मात्र चंदाच्या नरकयातना सुरू झाल्या. पण प्रत्येक वेळी तिला आईचे शब्द आठवत. “मी आजीसाठी चालले आहे. मी तिच्यासाठी जगले. तू माझ्यासाठी जग. पण आमच्यासारखी चूक नको करू. वंश वाढू नको देऊस, काहीही झाले तरी.” बस्स..., एवढं बोलणं मनातून कानात आणून ती सहन करायची. दर महिन्याला शंकर्‍या यायचा आणि जमा झालेले पैसे तिच्या आईला द्यायचा. त्या पैशांवर दोघं म्हातार्‍या पोट भरायच्या. शंकर्‍या हा त्यांच्या गावाजवळचा माणूस. शहरात एकटाच मजुरीसाठी आलेला. चंदाच्या आईचा कायमचा गिर्हाइक. शंकर्‍याची महिन्या – दोन महिन्यातून घरी चक्कर ठरलेली, शिवाय गावाजवळचा. त्यामुळे चंदाची आई तिचे साठलेले पैसे याला द्यायची. काही पैशाची दारू पिऊन उरलेले थोडेफार पैसे हा म्हातारीला द्यायचा. परत हेच चक्र सुरू झाले होते. शंकार्‍या कसाही असला तरी चंदाला मात्र त्याने अजून हात लावला नव्हता. तो तिला गावकडीला गोष्टी सांगायचा, आई-आजीची खुशाली कळवायचा. ती देखील गावाकडच्या गोष्टी ऐकून तेवढ्यापुरती आनंदीत व्हायची. सर्व काही सुरळीत चालू होते. समाजाकडून उपेक्षीत अशा वर्गाचे सुरळीत चालणे म्हणजे इतर समाजासाठी पाप होते. असो, पण पैसा हाच जीवनाचा मूलमंत्र असल्यामुळे तो वर्ग देखील काय करू शकत होता.

इथपर्यंत सर्व ठीक होते. पण आता कोरोना महामारीने आपला फास घट्ट आळवायला सुरुवात केली होती. त्यामुळे सरकारने लॉकडाउन घोषित केले होते. आधीच फक्त शरीराने जीवंत असलेल्या कुंटणखाण्यातल्या वेश्यांना मनाने मारण्यासाठी कोरोना आला होता. अहो, जिथे सहा फुट अंतर ठेऊन काम करावे लागत होते, तिथे यांची वल्गना कोण करणार? जीवघेण्या उन्हात-वातावरणात चंदा विचाराच्या तंद्रीत उभी होती. रेश्माच्या प्रश्नाने ती भानावर आली, “कोई नाही आएगा चंदा. कितनी देर हो गई, तू धूप मे खडी है. चल, चलते है.” असं म्हणत रेश्मा चंदाला जवळजवळ ओढतच घेऊन गेली.

त्या दोघींना येताना दिदीने बघितले होते. आपआपल्या खोलीत जात असताना चंदाला दिदीने आडवले, “किधर थी?”

“कुछ नही, वो थोडा दुकान पे गई थी. सामान लाने.”

“देख चंदा, मैने तुम्हे और रेश्माको देखा है बहार से आते हुए. तुझे भी पता है, कस्टमर नही आयेगा. फिर भी तू जाती है”, चंदा खाली मान घालून ऐकत होती.

“भूक लगी होगी ना, चल.”

“नही दीदी, मै खा लूंगी.”

“तेरे पास पैसे नही है, पता है मुझे. चल. और सून, भगवान ने जलम दिया है तो पेट भरने की चिंता भी वही करेगा. तेरी भी और तेरे परिवार की भी. चल.”

नाईलाजाने चंदा दिदीच्या मागे चालू लागली. आतापर्यंत बघितलेल्या दिदीचे हे वेगळे स्वरूप होते. दिदीने तिला जेवणासाठी बोलावले याचेच तिला जास्त आश्चर्य वाटत होते. आतापर्यंत पैशांसाठी मागे लागणारी दीदी तिने पाहिली होती. पण ही दीदी वेगळी होती. दिदीने तिला जेवण दिले आणि ती पान करायला लागली. “तू खएगी?”

“नही दीदी”, असे म्हणत चंदा उठली आणि ताट धुवायला मध्ये गेली. बाहेर आली तोपर्यंत दिदीने तोंडात पान कोंबले होते. दिदीचे आभार मानून चंदा निघाली आणि तिच्या खोलीत आली. खोली कसली खोपटेच होते. एका कोवळ्या पण परिस्थितीमुळे लाचार झालेल्या चिमणीचे. चंदा विचार करू लागली, आजचा दिवस तर गेला. आज जेवायला भेटले पण उद्याचे काय? आई कशी असेल? आणि आजी? त्यांना भेटत असेल का जेवण? कश्या असतील त्या? अशा नानाविध प्रश्नांनी तिच्या डोक्यात घणाचे घाव पडू लागले. विचार करून तिचे डोके सुन्न झाले. ती तशीच आडवी पडली आणि थोड्याच वेळात तिचा डोळा लागला. उठली तेव्हा काळोख पडायला सुरुवात झाली होती आणि थोडीशी भूक पण लागयला सुरुवात झाली होती. खाण्यासाठी म्हणून असे तिच्याकडे काही उरलेच नव्हते. रेश्माची आणि इतरांची काही वेगळी परिस्थिती नव्हती. सकाळीच तर दिदीकडे जेवली होती त्यामुळे परत लाचारासारखे दिदीकडे जेवायला जाणे हे तिच्या बुद्धीला पटत नव्हते. जाऊ द्या, आजची रात्र उपवास करू, असे म्हणून तिने तिच्या मनाची समजूत घातली आणि परत पलंगावर आडवी झाली. पण झोप येतच नव्हती, कशी येणार? उपाशीपोटी आणि चिंतेने ढवळून निघालेल्या मनाने.

दुसर्‍या दिवशी ती जागी झाली आणि परत पोटाची खळगी भरण्यासाठी काय करावे या विचारात गढून गेली. तिच्या आणि तिच्या कुटुंबाची काळजी, त्यांच्या भविष्याची आणि आयुष्याची चिंता तिला सतावत होती. होय, भविष्य. त्यांना पण भविष्य असते. काळेकभिन्न, लाचार असले तरी त्यांचे देखील आयुष्य असते. मग काही वेळ असाच विचार करत असताना ती त्या विचारांना देखील कंटाळली आणि तयारी करून परत बाहेर जाण्यासाठी म्हणून निघू लागली. पण बाहेर जाऊन देखील काय आहे, कुणी येणार तर नाहीच. असा विचार करून ती खिन्न मनाने तिथेच उभी राहिली. तोच तिला बाहेरून आवाज येऊ लागला. गलका हळूहळू वाढू लागला. चंदाने खाली बघितले तर तिला वेगळेच दृश्य दिसले. काही माणसांचा घोळका मास्क वगैरे लावून उभा होता, त्यांच्या हातात काहीतरी होते. आणि ते बोलत होते. ऐकू मात्र येत नव्हते. त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या सर्व वारांगना त्यांचे बोलणे ऐकत होत्या. कुतूहल म्हणून तीपण तिथे गेली.

ते लोकं कोणत्यातरी स्वयंसेवी ग्रुपचे होते. तो गट आपत्तीकाळात आणि इतर वेळेस कपडे, अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत करत असे. त्यांचे बोलणे ऐकत असताना चंदाचा तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. विनामोबदला असं कुणी करू शकतं असा तिला विश्वासच नव्हता. तिचे देखील बरोबरच होते म्हणा. तिचं जग तरी केवढं होतं, आणि त्या जगातली माणसे देखील कशी होती. असा विचार करत असतानाच तिला त्या भाषणामधले शेवटचे वाक्य ऐकू आले. “संपूर्ण लॉकडाउन संपेपर्यंत आम्ही तुमच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. काळजी नसावी.”

आणि लगेच दुसर्‍या मिनिटाला पंगत बसली. वरण-भात, बटाट्याची भाजी, पोळी असे जेवण वाढायला सुरुवात झाली. ते भरलेले पान बघत असताना तिला आनंद झाला आणि दुसर्‍याच क्षणी तिच्या डोळ्यात पाणी तरारले. तिची व्यथा तीच समजू शकत होती. तिला दिदीचे शब्द आठवले, त्याप्रमाणे देवाने आपला आईची-आजीची देखील पोट भरण्याची सोय केली असेल असा विश्वास तिला वाटला आणि ती जेवण करण्यासाठी मनाने तयार झाली. जेवण करताना आग्रहाने “ताई, काही हवे का?” असे विचारणार्‍या त्या देवदूतांचे पाय धरावे असे तिला वाटू लागले. कारण अजून पर्यन्त तिला कुणी ताई म्हटले नव्हते आणि इतक्या आपुलकीने विचारणा केली नव्हती. जगात असे देखील माणसं असू शकतात यावर तिचा विश्वास बसला होता. आता तिच्या आणि सोबत असणार्‍या सर्वांची दोन वेळची जेवणाची व्यवस्था झाली होती. त्यामुळे ती थोडी निश्चींत होऊन जेउ लागली आणि सोबतच देवदूतांना आपल्या आनंदाशृंनी आशीर्वाद देऊ लागली.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED