Lockdown - 7 books and stories free download online pdf in Marathi

लॉकडाउन - बदल - भाग ७

“है गह्यरं चांगलं व्हयन. आते कालदिन पास्थीन मी बी जासू के इकाले.”

“कारे पोर्‍या, कोरोना चालू शे आनी तू काय इचार करी राह्यना.”

“आपल्या के ले काय भाव भेटस आसा बी, आनी कोरोनानं कोनता व्यापारी ली राह्यना. त्यान्ह्यासाठे मी दारवर के इकाना इचार करी राह्यंथू .”

“घरमा बठाले सांगेल शे तं घरमा बठ ना. कोठे चालना के इकाले.”

“ओ आबा, तुम्हले कई समजत नई. मुगमुग बाठीसन खा. जे ताट म्हा ई राह्यनं ते.”

“राह्यनं भो, माले काय करनं शे. ईक, के ईक का आम्हले इक.”

शेतकर्‍यांचा माल हा अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केला असून त्यांना आता तो थेट ग्राहकांपर्यंत विकता येणार आहे. ही बातमी ऐकुन सख्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. सख्या एकुलता एक होता. जळगाव जिल्ह्यातील एक बागायतदार शेतकरी होता. त्याचा केळीचा बाग होता. जमीन चांगली होती, भरपूर पाणी होते, सख्या सहकुटुंब – सहपरिवार शेतात राबायचा. त्यामुळे उत्पन्न भरपूर व्हायचे. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तिमुळे म्हणा किंवा भाव मिळत नसल्यामुळे म्हणा घरात जेमतेम पैसा येत होता. घर चालत नव्हते असे नाही. पण शिल्लक काहीच रहात नव्हते. जेवढा काही पैसा यायचा तेवढा परत मजुरी, खत यांच्यात चालला जायचा. त्यामुळे हा व्यक्ति सतत चिंतेत असायचा. सख्या लोभी होता. ही गोष्ट त्याला सोडून गावातील सगळ्यांना मान्य होती. बायकोसकट. कायम त्याच्या मनात पैशाचा विचार सुरू असायचा. प्रत्येक बाबतीत कंजूसपणा हा तर त्याचा स्वभावच झाला होता. पाच वर्षांच्या लहान मुलाला देखील तो शेतात काम करायला घेऊन जायचा. हे पाहून गावातील लोकांना त्या लहान जिवाची कीव यायची. सोबतच सख्याचा राग देखील. ह्या लहान, नाजुक फुलासारख्या मुलाला शाळेत पाठवायचे सोडून तो शेतात पाठवायचा. या प्रकारामुळे त्याच्या मुलाची शरीरिकच नव्हे तर बौद्धिक वाढ देखील खुंटली होती. घरच्यांना तर तो कच्चे खाऊन गेला होता. त्यामुळे त्याला बोलण्याची कुणाची शामत नव्हती. गावात देखील त्याचे हॉटेलवाला बाळू भोई, गाडीवला कुशल असे दोन-तीन जण सोडले तर कुणाशीच पटत नव्हते. हिच मंडळी त्याला वाटेल ते बोलू शकायची. आतातर त्याने डोक्यात नवीनच खूळ घातले होते. त्याच्या शेतातील केळी जिल्ह्याच्या गावाला - जळगावला दारोदार विकायला घेऊन जाणार असे म्हणत होता. दारोदार नाही निदान दिवसभर तीन-चार चौकात केळी विकण्यासाठी उभा राहणार होता. या कोरोना काळात सर्वजण घरात असताना त्याच्या कुठल्याशा मित्राने असेच द्राक्ष विकून काही दिवसांतच खूप पैसा मिळवला होता म्हणे. सख्या अशाच संधीची वाट पहात होता आणि आतातर ही आयती संधी चालून आली होती. या संधीचे सोने करायचे असे त्याने ठरवले होते आणि तो इरेला पेटला होता. सायंकाळी सातच्या सुमारास त्याने ही बातमी ऐकली आणि त्याने सरकारला खूप धन्यवाद देत आता मरेपर्यंत तुम्हालाच मत देईल अशी मनातच खूणगाठ बांधत कुशलचे घर गाठले.

“काकू, कुशल शे का घरमा?” ओसरीवर आपल्या नातवंडांना खेळवत असलेल्या कुशलच्या आईला त्याने विचारले.

“शे ना. कुशल हौ सख्या उना रे.” कुशलच्या आईने त्याला हाक मारली.

सख्याने बाजूला पहिले. कुशलची मालवाहू गाडी उभी होती. ती बघून त्याला हायसे वाटले. गरीब कुशलचे पोट या गाडीवरच होते. कुशल गरीब होता, पण समाधानी होता. कुशलचे नुकतेच जेवण झाले होते. रुमालाला हात पुसत कुशल आला आणि तोच रुमाल खांद्यावर टाकत विचारले, “काय व्हयनं रे?”

“आपले कलदिन पास्थीन जयगाव जवानं शे.” सख्या आनंदात म्हणाला.

“काब रे भो?” कुशलने प्रश्न केला.

“के इकाले. बातम्यास्मा देखं मी. आपले कोनी कई बोलाऊ नई.” सख्या संदर्भासाह स्पष्टीकरण देत म्हणाला.

हे ऐकताच कुशलच्या कपाळावर आठ्या पसरल्या. आठयांचे जाळे कमी करीत तो म्हणाला, “साला, तू तं मरशी, पण आम्हले बी ली मरशी. घर मा बठाले सांगेल शे तं फिराना बाता करी राह्यना.”

“आपन कोठे लोकस्मा जाई राह्यनूत, गाडीमा बशीसन के इकूत ना.”

“सख्या मन्हा घरमा धाकलं लेकरू शे, आई-दादानं वय बी गच्ची हुई जाएल शे आते. कोठे रिकामी उपादी घर मा लऊ. मले नई जमाऊ भो हाई.”

“मन्हा घर थांबजो भो. मी तुल्हे रोजना रोज पैसा दी टाकसू.”

“पैसास्नी गोट नई शे, तुन्हा डोकामा कस ई नई राह्यनं. जगशी वाचशी त कामावशी अन खाशी न. देख एकदा ईचार कर यान्हावर.”

“हाईच ये शे कमावानी. तुल्हे ध्यान मा ई राह्यनं का? तू कईच करजो नको. बठी राह्यजो नुस्ता. चाल ना रे. काब जीव ली राह्यना. तुन्हाफा गाडी शे म्हनीसन उनू.”

“तू कई आईकौ नई. कितला वाजता जवानं शे.” कुशलने विचार केला, गाडीचे हफ्ते भरायचे आहेत, असेपण आता काम नाही. मग काळजी घेऊन याच्यासोबत जायला काय हरकत आहे.

“नऊ वाजता निंघूत. दुपारे दोन-तीन वाज्याशे ई जाउत. गाडी वावरमा लाई दे. सकायले भरसू.”

सख्या अत्यानंदात घरी आला. जेवण करता-करता त्याने त्याचे उद्याचे नियोजन घरातल्या सगळ्यांना सांगितले. अपेक्षेप्रमाणे या कार्यक्रमाला घरातील सगळ्यांनी विरोध केला. पण सख्या आता ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. सकाळी लवकर शेतात जाऊन केळी गाडीत भरून शक्य तितक्या लवकर निघण्याचा त्याचा मानस होता. त्यामुळे घरच्यांचा विरोधाला न जुमानता तो अंगणातल्या खाटेवर आडवा झाला. डोळा लागतो न लागतो तोच त्याला काहीतरी आठवले आणि त्याने फोन हातात घेतला. केळीचा भाव विचारण्यासाठी त्याने व्यापर्‍याला फोन लावला होता. सुमारे विस ते तीस रुपये डझन असा भाव त्याला व्यापर्‍याकडून माहिती पडला होता. त्यामुळे त्याच्या मालाचा भाव ठरवता ठरवता त्याला केव्हा झोप लागली, त्याचे त्यालाच कळले नाही.

तांबड फुटायच्या आताच तो शेतात हजर होता. सांगितल्याप्रमाणे कुशलने गाडी रात्रीच शेतात लाऊन ठेवली होती. दोन-अडीच तासांत सख्याने गाडीत माल भरून ठेवला आणि कुशलची वाट पाहू लागला. ठरल्याप्रमाणे नऊ वाजता कुशल आला. सख्या तयार होताच. त्याला बघतच कुशलचा तोंडाचा पट्टा सुरू झाला, “महिती होतं माले, तू काई मास्क लावाव नई ते. मी आनेल शे ते लाव.”

“मन्हा जीव गुदमरस रे भो त्यान्हामा.”

“जाऊ दे मंग, मी नई येत.”

कुशलचा असा पवित्रा बघून सख्याने मास्क लावण्याचे मान्य केले आणि पैसे घेतल्यानंतर प्रत्येक वेळी हातावर सॅनीटायझर लावण्याचे कबुल करून गाडीत बसला. लॉकडाऊन असले तरी जीवनावश्यक वस्तूंसाठी दुपारची वेळ निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यावर कुणीच नव्हते. कुशलने वार्‍याच्या वेगाने गाडी पळवली. जळगावला एका चौकात गाडी थांबवली. तीस रुपये डझन भावाने तो केळी विकू लागला. खरं म्हणजे हा भाव जळगावच्या मानाने थोडा जास्तच होता. कारण जळगाव म्हटलं म्हणजे केळीच. तरीही लोकं त्या भावात घेत होते. कारण दूसरा पर्याय नव्हता. आधीच जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी तारेवरची कसरत होती.

तीन-चार तासांतच सख्याचा सगळा माल विकला गेला. त्यामुळे तो भलताच खुश झाला. एक म्हणजे त्याचा माल त्याने स्वतः विकला होता, भाव त्याने ठरवला होता, व्यापार्‍याच्या पाया पडाव्या लागल्या नव्हत्या. त्यामुळे स्वारी अतिशय आनंदात होती. इकडे याची विक्री सुरू असताना मात्र कुशल ड्रायव्हर सीटवरच बसून होता. वेळोवेळी हात सॅनीटायझर ने स्वच्छ करत होता. मास्क तर त्याने काढलेच नव्हते. सर्व विक्री झाल्यावर सख्या परत घरी जाण्यासाठि म्हणून कुशलच्या बाजूला बसणार तोच कुशलने त्याला हटकले आणि मागे बसायला लावले. सख्या तयार होईना. कुशलने त्याला समजावले की तो लोकांच्या संपर्कात आला असल्याने त्याला बाजूला बसू देणे उचित नाही. कसाबसा सख्या तयार झाला. सख्याने गाडी परत शेतात लावला लावली आणि दोघे पायीच घरी गेले.

आतातर त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. जळगाव शहरात विक्री झाल्यावर ते आजूबाजूच्या तालुक्यांच्या ठिकाणी केळी विकण्यासाठी जाऊ लागले. सख्याच्या शेतातली केळी संपल्यावर त्याने गावातील शेतकर्‍यांच्या केली स्वस्तात विकत घेऊन स्वतः विकायला सुरुवात केली. सख्या आता शेतकर्‍यासोबतच हंगामी व्यापारी देखील झाला. कुशलला रोजचे पैसे मिळत होते आणि मुख्य म्हणजे तो वेळोवेळी काळजी घेत असल्याने निर्धास्त होता. पण सख्याविषयी त्याच्या मनात थोडी चिंता होतीच. सतत लोकांच्या संपर्कात आल्यामुळे सख्याला कोरोनाची लागण तर होणार नाही ना, ही चिंता त्याला भेडसावत होती. तो त्याला आता जवळ बसूच देत नव्हता. सख्यापण आता भरपूर बदलला होता. त्याने आता केळीचा भाव प्रती डझन दुप्पट करून टाकला होता. तो भावात तडजोड करत नव्हता. गिर्हाइकांशी बोलण्यातला गर्विष्ठपणा आता जाणवेल इतका वाढला होता.

एकदा तालुका ओलांडत असताना पोलिसांनी यांची गाडी अडवली. विचारपूस केल्यावर काही हरकत नसल्याचे सांगून गाडीला वाट मोकळी करून दिली. कुशलने त्या पोलिसांकडे बघितले. त्यांचे चेहर्‍यावर कामाचा ताण स्पष्टपणे जाणवत होता. जीवघेण्या उन्हात आणि कोरोनात ते आपले कर्तव्य बजावत होते. त्यांना थोडी केळी द्यावी असे कुशलच्या मनात आले. त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी त्याच्याकडे दुसरे काय होते. हस्तांदोलन वगैरे तर करू शकत नव्हता. त्याने खाली उतरून तसे सख्याला बोलून दाखवले. त्यावर सख्या म्हणाला, “कई गरज नई त्यास्ले. गन पगार लेतस.”

“पगारनी गोट नई शे सख्या आठे, बिचारा त्यास्न घरदार सोडीसन आठे उभा शेतस. आपलसाठेच उभा शेतस ना.”

“मंग, मी काय करू.” सख्या निर्विकारपणे म्हणाला.

“तू काईच नको करू. आज माले जरासा कमी पैसा देजो. मी मान्हा पैसास्नी देस यास्ले.” कुशल थोडा रागतच म्हणाला.

“माले काई तरास नई.” सख्या निर्लज्जपणे उत्तरला.

शेवटी कुशलने सख्यकडून केळी विकत घेतली आणि पोलिसांना दिली. पोलिसांना देखील कुशलचे कौतुक वाटले. दोघांना काळजी घ्यायला सांगून पोलिसांनी परत एकदा आभार मानले आणि निरोप दिला. सख्या मागे बसला होता. इकडे कुशलच्या मनात कुठेतरी समाधानाची भावना होती. काहीतरी चांगलं केल्याचा त्याला आनंद झाला होता. सख्याच्या मनात, डोळ्यासमोर, हातात आता रात्रंदिवस पैसा पैसा आणी पैसाच नाचत होता. त्यामुळे आता त्याला स्वर्ग दोन बोटं उरला होता. सकाळी घरातून निघताना तो घरात त्याच्याविषयीची चिंता देऊन जायचा आणि घरी परतातच घरातील लोकांचा जीव भांड्यात पडायचा. कुशलच्या घरी काही वेगळे नव्हते. पण हा व्यवस्थित काळजी घेत असल्यामुळे घरचे बर्‍यापैकी निश्चिंत असायचे.

असेच काही दिवस उलटले. एका कोर्‍या पानांच्या वहीसारखे. कोरे आणि पांढरे. भीतीने गर्भगळीत आणि पांढरेफटक झालेले. एके दिवशी कुशल गाडीत बसला होता. नेहमीप्रमाणे सख्याची भर उन्हात विक्री सुरू होती. त्याच्या गाडीच्या दारावर टक-टक झाले. त्याने वळून पहिले, तिथे एक चाळीसीतली स्त्री तिच्या तान्हुल्याला कडेवर घेऊन काहीतरी मिळेल या आशेने उभी होती. तिच्या एकंदरीत देहबोलीवरून ती बर्‍याच दिवसांपासून उपाशी होती असे वाटत होते. तो लगेचच गाडीतून खाली उतरला आणि मागील वेळेप्रमाणे सख्याशी भांडत न बसता त्याच्याकडून भरपूर केळी विकत घेतली आणि त्या स्त्रीला दिली. तोच तिच्या डोळ्यातून आसवे वाहू लागली. ती कुशलच्या पाया पडण्यासाठी म्हणून खाली वाकु लागताच विजेचा शॉक लागल्यासारखा कुशल मागे झाला. कुठल्यातरी अगम्य भाषेत त्या स्त्रीने कुशलला आशीर्वाद दिले आणि समोरच असलेल्या दुकानाच्या पायर्‍यांवर बसून केळी खाऊ लागली. असे विदारक दृश्य बघून कुशलच्या डोळ्यांत देखील पाणी आले. पण तो तरी काय करू शकत होता. खिन्नपणे तो परत गाडीत बसला आणि सख्याची विक्री पूर्ण होण्याची वाट पाहू लागला. आज त्याला सख्याचा खूप राग आला होता. पोलिसांच्या वेळी ठीक होते, पण आता.... आता मात्र हद्द झाली होती. त्याने जवळपास सख्याशी बोलणे बंद केले होते. तो बोलेल तेवढेच बोलायचा. सख्याचा देखील हे लक्षात आले होते. पण तो विचार करायचा, हे सगळे माझ्या प्रगतीवर जळतात.... पण कुशलचे काय, तो कितीही नाराज असला तरी पैशासाठी सख्याला सोडत नव्हता ना. तो देखील वाहत्या गंगेत हात धुवून घेत होता.

मास्क लाव, हातांना सॅनीटायझर लाव असे वारंवार सांगून कुशल आता थकला होता. शेवटी त्याने सख्याशी बोलणेच बंद केले होते. व्हायचा परिणाम तोच झाला. जळगाव जिल्ह्यातल्या कडक उन्हाळ्यात सख्याला काही न खाता-पिताच खोकला सुरू झाला. कुशलला शंका आली. त्याने तसे सख्याला तसे संगितले. आतापर्यंत बिनधास्त असणारा सख्या आता मात्र चेहरा पडून बसला. त्याच दिवशी त्या दोघांनी कोरोना चाचणी करून घेतली. कुशलने खबरदारी म्हणून त्याच्या आणि सख्याच्या घरी फोनवर चाचणीविषयी संगितले. इथेच घोळ झाला. एकाअर्थी चांगलं झालं.त्याचं असं झालं, गावात नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने कुशलच्या लहान भावाला अंगणात येऊन जोरात बोलावे लागले. गल्लीतील घरे एकमेकांना लागूनच. त्यामुळे लोकांनी अंदाज बांधून वार्ता वार्‍याच्या वेगाने पसरवली. गावातील सरपंच, पाटील वगैरे मंडळी चिंतेत. कारण, या दोघांना गावात घ्यायचे नाही हे तर न सांगताच ठरलेले. पण त्यांची व्यवस्था कुठे करायची हा देखील गहन प्रश्न. बाहेर गावाहून आलेल्या मंडळीला जिल्हा परिषदेच्या शाळेत आदरतीथ्य करण्यासाठी ठेवलेले. आता या दोघांचा सत्कार आणि सेवा कुठे करायची ही वेगळीच अडचण. शेवटी सख्याच्या शेतातच दोघांना क्वारंटाईन करायचे ठरले.

सायंकाळी चाचणी करून येत असतानाच त्यांच्या स्वागतासाठी गावातील पुढारी मंडळी उभी होती. गावाच्या वेशीवरच तांची गाडी थांबवण्यात आली. सख्या मागे बसला असल्याने अचानक गाडी का थांबवली हे त्याला कळले नाही. तो गाडीखाली उतरला आणि त्याने त्याच्या स्वागतासाठी आलेला लवाजमा बघितला. त्याच्या लक्षात येईपर्यंत मंडळींनी त्याला शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली होती.

“कोठे शे रे तो सख्या?” सरपंचांनी कुशलला विचारले. तो काही बोलणार तोच त्यांना सख्या येताना दिसला.

“उनात का शेठ, परसाद लीसन.” पाटलांनी सख्याला दरडवून विचारले.

“देखा, अजून कई आम्हले कोरोना नई व्हाएल शे. आम्ही नुसतं चेक करेल शे. तीन दिन कन रिपोट येतीन तव्हय बोला आम्हले.” सख्या सारवासारव करत म्हणाला.

“मंग, तुम्हले तं आम्ही मंदिरम्हा ठेवणार शेतस.” पाटील.

“देखा त्या रिपोट येतीन तव्हय येतीन, तुम्हले क्वारंटाईन होनं पडीन.” सरपंच

“कोठे?” सख्या.

“तुन्हा वावर मा.” सरपंच

“तू नई म्हन का हा म्हन. ईतला दूरथीन लोकं उनात आपला गाव म्हा. एकले बी सोड नई. तुम्ही तं आपला मानसे शेत. चाचणी करेल. तुम्हले कसं सोडसूत? एक ईचार करी ठेवा, तुम्हना पाह्यरे जर कोरोना गाव म्हा घुसना तर तुम्हले तुम्हना घरदार संग गाव मधीन भाईर काढसूत. गाव इसरी जा मंग.” पाटील तावातावाने बोलत होते आणि गावाची मंडळी त्यांना साथ देत होती.

शेवटी एक चकार शब्द न काढता दोघं सख्याच्या शेतात राहायला गेले. यथावकाश तीन-चार दिवसांत दोघांचे रिपोर्ट आले. सख्या पॉसिटीव्ह होता आणि कुशल निगेटिव्ह. रिपोर्ट बघताच सख्याच्या तोंडाचे पाणी पळाले. डोळ्यांपुढे अंधारी आली. डोके गरगरू लागले. इतके दिवस आपल्याच गुर्मीत असणारा सख्या त्या एका कागदाच्या तुकड्याला पाहून घाबरला होता. कागद, किती प्रकारचा असतो ना, काही दिवसांपूर्वी अशाच कागदांच्या बंडलांकडे पाहून तो खुश व्हायचा. कारण त्या पैशांच्या नोटा असायच्या आणि हा कागद तर त्याच्या समोर ठाकलेल्या मृत्यूसूचक संकटाचे प्रमाणपत्र होता. नव्हे ही तर त्याच्या मागील दिवसांत, आयुष्यात केलेल्या कामांची पावती होती. वाईट कामांची. हा सख्याच्या कर्मयोग होता. त्याच्या वाईट कर्मांचे फळ तो भोगत होता. सख्या जिल्हा रुग्णालयात होता. आता सख्याच्या शेतात त्याचे कुटुंबसुद्धा राहला आले होते. गावकर्‍यांनीच तो हितावह निर्णय घेतला होता. कुशल मात्र बरा होऊन घरी आराम करत होता. सख्याविषयी चिंता होतीच, पण तो सुद्धा काय करू शकत होता. त्याने सर्वतोपरी वारंवार सख्याला बजावले होते. कर्मफळ भोगणे देवांनासुद्धा चुकले नाही, सख्या तर एक सर्वसाधारण लोभी मनुष्यप्राणी होता.

यथावकाश आठवडा उलटला. सख्याने कोरोनावर मात केली. त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर. कारण दवाखान्यात सकारात्मक असे काहीच नव्हते. तिथली माणुसकी मूग गिळून गप्प झाली होती. एक आजीबाई मृत अवस्थेत शौचालायात तब्बल आठ दिवस पडून होत्या. शेवटी दुर्गंध यायला सुरुवात झाली, तेव्हा कर्मचार्‍यांना जाग आली. या अशा वातावरणात सख्या रहात होता. नकारात्मकेच्या दलदलीत तो फसला होता. काहीही झाले तरी सख्या देखील माणूसच होता. त्याने आजूबाजूला पहिले, तिथे सर्व प्रकारचे लोकं होते, कोरोनाग्रस्त म्हणून. तिथे धर्मभेद नव्हता, जातीयवाद नव्हता, वर्णभेद नव्हता. काही काही म्हणून विषमता नव्हती. श्रवणतील घनगंभीर मेघ जसे भेदभाव न करता आंब्याच्या, नारळाच्या झाडावर बरसतात त्याचप्रमाणे बाभळीच्या, बोराच्या आणि निवडूंगच्या झाडावर देखील तसेच बरसतात. कोरोना देखील तसाच सर्वांवर बरसत होता. समभाव ठेऊन. इथे सख्याने जगणे शिकले. पैशापेक्षा जीव महत्वाचा असतो, हे त्याला इथे समजलं. तो स्वतः स्वतःवरच खजील झाला. त्याच्या आतापर्यंत वागण्याचा त्याला पश्चाताप येऊ लागला. आठवढाभराच्या चिंतनाने तो आतबाहेरून ढवळून निघाला.

त्याला बरं वाटत असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला. तो दवाखान्यातून बाहेर पडताना कोरोना सोबतच त्याचा लोभीपणा, अहंकार, गर्व सर्वकाही तिथेच ठेऊन आला....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED