लॉकडाउन - मी अभिमन्यु - भाग १ Shubham Patil द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लॉकडाउन - मी अभिमन्यु - भाग १

मला असं एकाएकी हलकं- हलकं का वाटू लागलं ? एकदम हलकं….. अगदी कापससारखं, शांत आणि शुभ्र, सर्व बंधंनातून मुक्त झाल्यासारखं... मला काही झालेले तर नाही ना? म्हणजे मला आठवतय की, मला साधारणतः एका आठवड्यापूर्वी थकवा जाणवू लागला होता. आई म्हणाली होती, “अरे, दिवसभर हॉस्पिटलमध्ये असतो ना, काय तो तुमचा नवीन आजार आला आहे, कोरोना की काय त्यासाठी, मग काम करून थकून जात असशील.”

मी पण विचार केला, खरच तेव्हा हॉस्पिटलमध्ये खूप काम असायचे, डॉक्टर घोलप सरांनी त्या दिवशी मेन मीटिंग हॉल मध्ये तातडीची मीटिंग बोलावली होती. सर्व स्टाफ झाडून हजार होता. सर्वांच्या चेहर्‍यावर एक अनामिक चिंता स्पष्ट दिसत होती. अजेंडा सर्वांना न सांगताच ठाऊक होता. कोरोना. या नवीन महाभयंकर आजाराने जगभरात हाहाकार माजवला होता आणि आता तर तो भारताचे दार ठोठावत होता. आमची तर भीतीने गाळण उडाली होती, जिथे इटली सारखा देश नतमस्तक होत होता, तिथे आपली काय गत होणार या विचाराने मन बेचैन होत होते. आम्ही सर्वजण आपापले स्थान ग्रहण करून बसलो होतो, इतक्यात घोलप सर आले, आम्ही त्यांना मान म्हणून उभे राहिलो तसे ते म्हणाले, “आतापसून या सर्व पद्धती बंद करा. अजेंडा सांगण्याची गरज नाही असे वाटते, त्यात उगाचच वेळ जाईल. काही दिवसांत तो भारतात देखील येईल आणि या वेळी सैनिकांचे काम नाहीये. प्रत्येक लढाईला बंदूकधारी सैनिक लागत नसतात. आपणच सैनिक आहोत. आतापसून तयारीला लागा, हे एक महायुद्ध आहे. आपली शस्त्रे तयार करून ठेवा, शत्रू बलाढ्य आहे. मूळापासून उखडून फेकायचा आहे. विशेष म्हणजे अदृश्य आहे, इंद्रजीताहून भयंकर आहे, तो तरी काही वेळ दिसायचा, हा तर कायम स्वरूपी अदृश्य आहे. प्रसंग बाका आहे. धिरानं घ्या.” नंतर त्यांनी खूप बारीकसारीक सूचना दिल्या. बेड्सची व्यवस्था बघायला सांगितली, व्हेंटिलेटर किती आहेत. कशा परिस्थितीत आहेत हे बघायला लावले आणि सर्व व्यवस्था लावायला सांगून मीटिंग संपली तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी मीटिंग होती तब्बल चार तास चाललेली.

घरी येत येत दहा वाजले होते. घरी येताच चहूबाजूंनी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. शांतपणे मी सर्व प्रश्न ऐकून घेतले आणि म्हणालो, “या पुढे असाच वेळ होणार, मनाची तयारी करून ठेवा, कदाचित काही दिवस हॉस्पिटलमध्येच राहावे लागेल.”

आई-बाबांचे चेहरे तर बघण्यासारखे होते.

“अरे, पण तु तर याच वर्षी त्या हॉस्पिटलमध्ये कामाला लागलास ना ?” आई काळजीने म्हणाली.

“हो आई, पण आता परिस्थिती गंभीर आहे.” मी तिला समजावत म्हणालो.

“तुला मोकळा वेळ मिळतच नाही रे, बारावीच्य्या सुट्ट्या तेवढा घरी होतास, नंतर मेडिकलला प्रवेश घेऊन डॉक्टर होईपर्यंत ऊर फुटेपर्यंत अभ्यास केलास आणि लगेच प्रॅक्टीसला जायला लागलास.”

“असू दे गं, आता सवय करून घे त्याची. त्याचं आयुष्य हे असच असणार, डॉक्टर माणूस तो. आता जेवायला वाढ बघू. पोटातले कावळे ओरडून ओरडून थकून गेलेत बघ.”

जेवण करून मला बिछान्यावर जाताच झोप आली. दुसर्‍या दिवशी तर कोरोनाने देशात आपले जीवघेणे जाळे विणायला सुरुवात देखील केली होती. या आजारावर उपचार देखील नव्हता. त्यामुळे आपल्याकडे कुणी कोरोनाग्रस्त आला तरी त्याच्यावर उपचार कसा करायचा ? हा एक गहन प्रश्न होता. देवाच्या कृपेने आमच्या शहरात कुणीच बाहेरून आले नसल्याने फारशी चिंता नव्हती. मला दुपारी माझ्या मित्राचा उदयचा फोन आला होता, त्याची दुबई ट्रीप छान झाली होती म्हणे. आपण रात्री बोलू असे सांगून मी फोन ठेवला आणि कामाला लागलो.

असेच काही दिवस गेले आणि आता तर कोरोनाने देशात कहर माजवायला सुरुवात केली होती. उदय सारख्या बाहेर देशातून आलेल्या मंडळींना तर घरातच थांबायला लावले होते. देशात तर लॉकडाऊन सुरू झाले होते. सर्व जग ठप्प झाले होते. कुणालाही कुठेही जायला मज्जाव होता. हे सर्व आपल्यासाठीच होते. पण लोकं समजून घेत नव्हते. कसे समजून घेतील? अहो, ज्यांचे हातावर पोट आहे, ते कसे करतील. काय खातील. काय पीतील. त्यांना कामावाचून गत्यंतर नाही. अशा बातम्या बघून मन विषण्ण होत होतं.

रात्री उशिरा मला साक्षात घोलप सरांचा कॉल आला. माझ्या पोटात भीतीचा गोळा आला. मला हॉस्पिटलला जॉइन होऊन सहा महीने झाले. घोलप सरांशी आतापर्यंत मुलाखातीनंतर काही बोलण्याचा प्रसंग आला नव्हता. आतातर त्यांचा कॉल येत होता. मी घाबरतच कॉल उचलला.

“हॅलो अभिमन्यु, कसा आहेस? काय करतोय?”

“हॅलो सर, मी छान, आपण?”

“मला काय धड भरलीये, बर ऐक, उद्यापासून तुझे सर्व समान वगैरे घेऊन ये. काही दिवस हॉस्पिटल हेच आपले घर असणार, घरी तशी कल्पना दे, गुड नाइट.” असे एका दमात बोलून त्यांनी फोन ठेवला आणि मी विचारात गुंग झालो.

सकाळी घरी तशी कल्पना दिली आणि आई अतिशय नाराज झाली. “आई, अगं काही दिवसांचाच तर प्रश्न आहे. मी युद्धावर निघल्यासारखी काय करतेस ?” मी तिची समजूत घालत म्हणालो.

“जाऊ दे त्याला. आता तोच सैनिक आहे. अशी संधी वारंवार नाही येत आणि त्याची काय काळजी करतेस तू. स्वामी आहेत त्याच्या पाठीशी.” वडील आईला समजावत होते.

तयारी करून मी काहीशा संमिश्र भावना मनात ठेऊन मी डोळ्यातल्या पाण्यासह निरोप घेतला. आई तर रडतच होती आणि वडील नेहमीप्रमाणे धीर देत होते. ते देखील मनात रडत होते. पण पुरूषांना उघडपणे रडता येत नाही म्हणे असे कुठेतरी ते ऐकून असावेत बहुतेक.

लॉकडाऊन मुळे रिक्षा वगैरे तर नव्हत्याच. मग पायीच तो चार किलोमीटरचा रास्ता तुडवत निघालो. मुळात तो रोजचा आपला येण्या-जाण्याचा रस्ता आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. कधीकाळी या रस्त्यावर पाय ठेवायला जागा नसायची इतका तो गजबजलेला असायचा. पण आता येथे चिटपाखरुदेखील नव्हते.

कोरोनाने सगळ्या जगात कहर माजवला होता. साधारणतः पाऊण तासाने मी हॉस्पिटलला पोहोचलो. माझ्या आधी बराच स्टाफ आला होता, बाकीचा अजून यायचा होता. सर्वांना कामे वाटून देण्यात आली. त्याप्रमाणे सर्वजण कामात गुंतलो. दोन-तीन दिवसांनी पिपिई किट आले. घोलप सर याला चिलखत म्हणायचे. हे किट अंगावर चढवून काम करणे म्हणजे तारेवरची कसरत होती. सकाळी घातलेला किट रात्री उशिराच काढायला मिळायचा. अंग पुर्णपणे घामाने भिजून जायचे. रात्री थोडाफार वेळ मिळाल्यावर घरी फोन लावायचो तेव्हा थोडीफार माहिती मिळायची. एरवी बाहेरील जगाशी पुर्णपणे संबंध बंद होता. कालच आईने फोनवरून संगितले की “तिरूपती बालजींचे मंदिर पण बंद झाले.”

“मग त्यात काय, सर्व देवस्थाने बंद झाली ना, त्यात हे पण आले असेल.” मी सहजच म्हणालो.

“अरे, या मंदिराचा इतिहास वेगळा आहे, गेल्या २५०० वर्षांपासून हे मंदिर सुरूच होते.” आई म्हणाली.

“अरे बापरे, मला हे नव्हते माहीत.” मी अतिआश्चर्याने म्हणालो. निसर्ग मात्र कुणावर काय वेळ आणेल हे सांगता येत नाही. आज त्याने देवांनासुद्धा बंद केले होते. मग काही वेळ सहकार्‍यांशी गप्पा मारायला म्हणून बसलो. त्यात कळले की आमच्यातल्या एका सहकार्याच्या नातेवाईकचे लग्न घरच्या-घरी पार पडले. आम्हाला फार आश्चर्य वाटले. आम्ही त्याला सविस्तरपणे विचारले. तर त्याने संगितले की, काही नाही, वधू, वर, दोघांचे आई-बाबा आणि गुरुजी एवढीच मंडळी होती. घरातल्या हॉल मध्ये लग्न लागले आणि किचन मध्ये पंगती उठल्या. हा प्रकार एकूणच छान होता. पैशाची बचत, मानापमान नाही. सगळं कसं एकदम स्वस्त आणि सुटसुटीत.

दुसर्‍या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा धावपळ सुरू झाली होती. मी विचारणा केल्यावर कळले की दुबई हून आलेल्या ग्रुपच्या मंडळींचे रिपोर्ट पोसीटिव्ह आले होते. आता या मंडळींना कोरोना झाला होता आणि आम्हाला यांना बरे करायचे होते. बरं या महामारीवर इलाज देखील नव्हता. मग आम्ही आमच्या परीने प्रयत्न सुरू केले. रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी गोळ्या-औषध सुरू केल्या. रुग्णांशी मनमोकळ्या गप्पा मारायला सुरुवात केली. जेणेकरून त्यांना सकारात्मक वाटेल अशा उपाययोजना करायला सुरुवात केली. एकूण दहा जण आले होते. आम्ही यांना टि.व्ही. दाखवणे पुर्णपणे बंद केले होते. कारण आपली मीडिया कोरोना विषयीच्या सर्व नकारात्मक बातम्यांनी पेटून उठली होती. एखाद्या कमजोर दिलाच्या व्यक्तीने जर या बातम्या पहिल्या असत्या तर तो मानसिकरीत्याच कोरोनाग्रस्त झाला असता, मग आम्ही यांना रामायण-महाभारत दाखवायला सुरुवात केली. जेणेकरून आम्हाला आणि यांना प्रेरणा मिळेल.

आमच्या या उपक्रमाला सर्व रुग्ण अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत होते. मग परिणाम व्हायचा तोच झाला, सर्व दहाच्या-दहा जण कोरोनामुक्त झाले. त्यांना ही आनंदाची बातमी दिली तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. काही जण तर चक्क आमच्या पाया पडायला लागले. आम्हाला एकदम संकोचल्यासारखे झाले. आम्ही फक्त आमचे काम केले होते. या चांगल्या कामामुळे आमच्या सर्वांवर समाजातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. आम्हालादेखील खूप धन्यता वाटली. आमचा होणारा असा सन्मान पाहून ऊर अभिमानाने भरून आला. आई-बाबांना पण सर्व ओळखीपाळखीचे लोकं खूप शुभेच्छा देत होते. खचितच त्यांना माझ्यामुळे समाजात खूप मान मिळत होता आणि आपल्या मुलाच्या कर्तुत्वामुळे समाजात आपला सन्मान व्हावा यापेक्षा चांगली गोष्ट ती काय, असो,