Lockdown - 4 books and stories free download online pdf in Marathi

लॉकडाउन - दुर्मिळ प्रेतयात्रा - भाग ४

सकाळी जाग आली तेव्हा बराच उशीर झाला होता. अविचे दोन कॉल्स सकाळी सात वाजताच येऊन गेले होते. मी या गडबडीत त्याला झालेला प्रकार कळवलाच नव्हता. त्यालादेखील खूप वाईट वाटले. तो लगेचच भेटायला येण्यासाठी निघत होता. पण मी त्याला आईला भेटून मग शक्य असल्यास इकडे यायला लावले. कारण आधार देणारा तो एकटाच होता.

दुपारी जेवताना कळले की, बाबांच्या वार्ड मधील दोन गृहस्थांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांचे शव शवागरात ठेवले होते. त्यांचा अंत्यविधी करायला देखील कुणीच नव्हते. कारण दोघांच्या घरातील सर्व जण क्वारांटाईन केले होते. मला त्यांच्याविषयी खूप वाईट वाटत होते. अंत्यविधी करण्यासाठी देखील कुणीच नसणे म्हणजे किती शोकांतीका होती. मग सायंकाळच्या सुमारास अविचा फोन आला. त्याला येण्याचे शक्य नसल्याचे तो म्हणाला. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच त्याला अडवले आणि मग नाइलाजाने तो परत निघून गेला होता. तो आईला पण दुरूनच भेटून आला होता. आई बरी होती, चांगली बोलली, असे तो म्हणाला तेव्हा माझ्या जीवात जीव आला. माझी तर आईला फोन लावण्याची हिंमतच होत नव्हती, काय बोलणार होतो मी आईशी? ही बातमी बाबांना सांगायला हवी असे मला वाटले. मग मी एका कर्मचार्‍याच्या परत विनवण्या करून बाबांना भेटला जायचे असे संगितले. तशी त्याने मला मनाई केली. मी मन खट्टू बसलो. बाबांना फोन लावण्याचा प्रयत्न केला तर तो स्विच ऑफ येत होता. चार्जिंग करायला विसरले असतील बहुतेक म्हणून मी फोन लावणे बंद केले.

आज रात्रीचा बाबांना भेटायला जाण्याचा बेत फसला होता. त्यामुळे मी नाइलाजाने बेडवर पडून होतो. कालचा बाबांचा तो चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. ते चक्क रडत होते. मला देखील रडू येत होते. पण त्यांच्यासमोर कसं रडणार. अविने जरी संगितले होते तरी आईची अवस्था देखील आमच्यापेक्षा काही वेगळी नसणार हे मी मनोमन जाणून होतो. बाबा संगत नव्हते, पण त्यांना किती त्रास होत होता हे काल त्यांच्या डोळ्यांतून मी बघितले होते. माझ्या मनात अशुभ विचार येऊ लागले. मी झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. पण येतच नव्हती. कारण या रात्री फक्त रात्री नव्हत्या. प्रत्येक रात्र ही वैर्‍याची होती. काळ बनून प्रत्येक रात्र समोर येत होती. यमदूत तर अदृश्यपणे बेभान होऊन सभोवताली पिंगा घालत होते. जो खचत होता, त्याला यमदूत दिसत होता आणि दोघांची नजरानजर होताच यमदूत त्याला कळण्याच्या आत काळाच्या पडद्याआड ओढत होता. मग ती व्यक्ती नावाने आणि कर्तुत्वाने जगात राहत होती फक्त.

बाहेर कुत्र्यांच्या भांडणाने जोर धरला होता. हळूहळू त्यांचे भांडण बंद झाले आणि दीर्घ स्वरातील भेसूर रडणे सुरू झाले तेव्हा मनात एक वेगळी भीती घर करून बसली. इकडे औषधांचा प्रभाव शरीराने स्वीकारायला सुरुवात केली होती आणि मला थोडी झोप लागत होती.

मी बाहेर त्या कुत्र्यांचे रडणे बंद करायला जातो. त्यांना दगड मारणार तोच मागून एक अजस्त्र कुत्रा येऊन माझ्या हातचे तुकडे पडतो. मला असह्य वेदना होतात. मी माझाच हात खाली जमिनीवर पडलेला पाहतो आणि घाबरून जोरात परत रुग्णालयाकडे पळत सुटलो. इतक्यात डोळ्यांसमोर लक्ख प्रकाश पडला आणि डोळे उघडले तर मी बेडवरच होतो आणि माझा हात देखील शाबूत होता. मी घाबरून उठून बसलो. ते स्वप्न होते तर.

या वेळी बाबांना बघण्याची अनिवार इच्छा झाली म्हणून तसाच उठलो आणि दुसर्‍या वार्डकडे गेलो. सुमारे साडेचार होत होते. तिथे अडवणारं कुणी नव्हतं म्हणून बरं झालं. मी पटकन मध्ये घुसलो आणि बाबांचा बेड जवळ आलो. तिथे बाबा नव्हते, कदाचित वॉशरूमला गेले असतील म्हणून थोडा वेळ थांबलो. अर्धा तास झाला तरी बाबा आले नाहीत म्हणून मीच वॉशरूम कडे गेलो. तिथे कुणीच नव्हते. मग कदाचित रस्त्यात चुकामुक झाली असेल म्हणून परत जागेवर आलो, पण तिथेही बाबा नव्हते. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

मी धावतच रिसेप्शनकडे गेलो. तिथे कुणीच नव्हते. मग पळत पळत कुणी कर्मचारी दिसतो का हे बघू लागलो. शेवटी एक सापडला. तो कोण, काय करतो हे न विचारताच मी त्याला माझ्या बाबांविषयी विचारले. तो अजून झोपेतच होता. माझा आवाज वाढताच तो शुद्धीत आला आणि मला वार्डकडे घेऊन गेला. मला त्याने बाबांचे नाव विचारले आणि ते ऐकताच तो गंभीर झाला. त्याने मला त्याच्या मागून यायला लावले तसा मी त्याच्या मागून जाऊ लागलो. बरेच अंतर कापल्यावर आम्ही ज्या जागेसमोर आलो तिचे नाव वाचताच मला दररून घाम आला. ते शवागर होते. त्याने ते दालन उघडले आणि आम्ही सोबतच आत गेलो.

एका शवपेटीकेसमोर त्याने मला उभे केले आणि जरा मागे जाऊन उभा राहिला. मी काय समजायचे ते समजलो. त्या पेटीत माझ्या बाबांचे प्रेत होते.

काळजावर दगड ठेऊन मी पांढरा कापड ओढला. समोर बाबा शांतपणे झोपले होते. अगदी शांत आणि निर्विकार. त्यांना आता काहीच होणार नव्हते. कुठलाच जीवघेणा रोग आता त्यांना हात लावू शकणार नव्हता. कारण कोरोनाने त्यांना आपल्या मागरमिठीत घेतले होते. मी एकसारखा बघतच होतो, कर्मचार्‍याने दोन-तीन वेळा जोरात हाक मारताच भानावर आलो.

“तुम्ही कोण यांचे?”

“मुलगा.”

“अरे रे, वाईट झाले. आता लवकरात लवकर पुढील प्रक्रिया सुरू कारला हवी. या बाबांसाठी तरी तुम्ही आहात, बाकीच्या प्रेतांना तर कुणीच वाली नाही.”

“ते जाऊ द्या. मला सांगा काय करायचे आहे?”

“तुम्ही डॉक्टरांना भेटा.”

“त्यांना बोलव इथे. मी शोधत नाही बसणार. मला शेवटचं एकदा बसू दे बाबांजवळ.”

“ठीक आहे, मी सांगतो.”

मी शवागरात तसाच बसून होतो. एक जीवंत शव होऊन. कदाचित त्यांच्यासारखेच होण्यासाठी. कायमच्या शांत झालेल्या बाबांशी मी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. आता आईला काय सांगू असे मनोमन विचारत होतो. काही वेळाने डॉक्टर आले. त्यांनी खेद व्यक्त केला.

“केव्हा झालं?”

“काल सायंकाळी. माफ करा, आम्हाला माहिती नव्हते तुम्हीपण इथे आहात.”

“काय फरक पडतो आता. मी खिन्नपणे म्हणालो.”

“माझ्या आईला दुरूनच अंत्यसंस्कार बघण्यासाठी बोलावू शकतो का?”

“नाही, आम्हाला खरंच माफ करा. पण नियमांचे उल्लंघन आम्हाला नाही करता येणार आणि तुम्हीदेखील करू नका. सहकार्य करा, प्लीज.”

काही ठिकाणी मला स्वाक्षर्‍या करायला लावल्या आणि पुढील संस्कारांसाठी प्रेत माझ्या हवाली केले. ते आल्या पावली निघून गेले. मी मात्र तिथे एकटाच होतो. मघाचा तो कर्मचारी आणि डॉक्टर निघून गेले होते. आता मात्र मी खरोखरच एकटा होतो. माझ्या डोळ्यासमोर आईचे पांढरे कपाळ येऊ लागले. शेवटी कासातरी उठलो आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था लावण्यासाठी बघू लागलो. देवाने सारी सोय आधीच लावून ठेवली होती. स्मशानभूमी देखील पायी पंधरा मिनिटांच्या अंतरावर होती. म्हणजे हे सगळे आधीच ठरले होते तर. जवळच स्मशानभूमी, रात्री त्या कुत्र्यांचे भेसूर रडणे, स्वप्नात माझाच हात तुटलेला पहाणे, हे सर्व या घटनेचे सूचकच नव्हते काय? पण आता वेळ निघून गेली होती. ती थांबवता येणे कुणालाही शक्य होते काय?

रुग्णवाहिकेसाठी मी प्रत्येकाला विचारत होतो. कुणीच धड सांगत नव्हते. बाहेर आवारात रुग्णवाहिकेजवळ एक व्यक्ति बसलेली दिसली. त्याला मी विचारले असता तो रुग्णवाहिकेचा वाहक असल्याचे समजले. मी त्याला स्मशानभूमी पर्यन्त घेऊन चालण्याची विनंती केली. त्याने अगदी उर्मटपणे मला नकार दिला. आता मात्र माझ्या संयमाचा बांध फुटला आणू मी त्याच्यावर धावून गेलो.

“अरे उर्मटा, पगार कसला घेतोस मग? त्यालाही असाच नाही म्हणत जा ना. सकाळपासून फिरतो आहे. माझे बाबा वारले आहेत. तुला माहिती आहे का. फक्त स्मशानापर्यन्त घेऊन जायला लावतो आहे. स्वर्गात नाही.”

“ए, सोड मला. मी सरकारी कर्मचारी आहे. हात लावायचं काम नाही आणि अजून जर काही बोलला ना तर विचार करून ठेव.”

“माज आला काय रे तुला सरकारी नोकरीचा. गेलास उडत. ठीक आहे. मी समर्थ आहे. चुलीत घाल तुझी सरकारी नोकरी. असाच मरशील एक दिवस. गरज नाही मला कुणाची.”

मी तडक शवागराकडे गेलो. बाबांचे प्रेत ताब्यात घेतले तिथे जवळच स्ट्रेचर ट्रॉली पडली होते. शवपेटीकेतून एकच्या मदतीने प्रेत ट्रॉलीवर ठेवले आणि ट्रॉली लोटत-लोटत रुग्णालयाच्या बाहेर आलो. बाहेर आल्यावर त्या रुग्णालयाच्या नारकसामान इमारतीकडे आग ओकणार्‍या डोळ्यांनी पाहू लागलो. माझ्या त्या नजरेत कितीतरी संताप होता. स्मशानभूमीचा रास्ता धरला आणि चालू लागलो. किती दुर्दैवी होते बाबा. त्यांना खांदा द्यायला देखील कुणी नव्हते. तिकडे दिवस उजाडला होता आणि बाबांचा दिवस आयुष्याच्या रम्य सायंकाळी संपला होता. कायमचा. सत्य हे कल्पनेपेक्षा भयंकर असते असे म्हणतात, मला त्याचा आज याची देही याची डोळा प्रत्यय येत होता. रस्त्यावरील लोकं मला बघत होते. काही हळहळत होते. काहींना खरंच वाईट वाटत होते. काही मनोरंजन म्हणून पहात होते. मला कुणाशीच काहीच देणेघेणे नव्हते. हे निर्दयी, क्रूर, फसवे, खोटे जग आता माझे शत्रू झाले होते.

मी माझ्याच वेगळ्या जगात होतो. एकटाच. काही दिवसांपूर्वी आम्ही तिघे होतो आमच्या कुटुंबात. पण आता, आता तर आई आणि मीच उरलो होतो. असाच बेभान विचार करत करत स्मशानभूमीत पोहोचलो. मग एका दगडाची ठेच लागताच भानावर आलो. पुढे काय करायचे याचा विचार करत असतानाच मागून कुणीतरी येण्याचा भास झाला. मागे वळून बघितले असता अवि अतिशय पाडलेल्या चेहर्‍याने येत होता.

“मी रुग्णालयातून आलो. तिथेच समजले.”

मी खिन्नपणे हसलो. मी काहीच बोलत नाही हे पाहून तो परत म्हणाला, बघ, कुणी कसेही वागले तरी मी तुझ्यासोबत आहे. मी सदैव तुझ्या सोबत आहे.

“सोबत आहेस ना. चल, बाबांची चिता रचू लाग.”

तो स्मशानभूमीच्या बाहेरच खाली मान घालून उभा राहिला. मी समजायचे ते समजलो. आताच सोबत असणारा अवि बाहेरच उभा होता. मी कोरोनाग्रस्त होतो ना.

मी निमूटपणे चिता रचू लागलो. तिथे एक लहानसा मुलगा होता. त्याने बाकीची व्यवस्था करून ठेवली. मग आम्ही बाबांना ट्रॉलीवरुन उचलून चितेवर ठेवले. मी शेवटचं बाबांना डोळेभरुन बघितलं. अविने नजरेनेच मला धीर दिला.

मुखाग्नि देण्यासाठी मी वळलो. एकदा अविला विचारले, “आईला घेऊन येतोस का? तसा तो रडायला लागला.”

“समजून घे मित्रा. नाही आणता येणार. तिला जिवंत पहायचे आहे ना. मग हे अग्निदिव्य करावेच लागेल. शूर हो.”

आता वेळ दडवण्यात काहीच अर्थ नव्हता. आपण फक्त विधात्याच्या हाततल्या कळसूत्री बाहुल्या आहोत हे मला पुरेपूर उमगले होते. तो नाचवतो तसे नाचायचे, त्याच्या इच्छेप्रमाणे हसायचे, रडायचे आणि मरायचे सुद्धा. शांतपणे चिरनिद्रा घेत असलेल्या बाबांकडे एकदा पहिलं आणि मुखाग्नि दिला.

त्या सुकलेल्या लाकडांच्या चितेने लगेच पेट घेतला. आतापर्यंत थांबवून धरलेल्या अश्रूंना मी वाट मोकळी करून दिली. जोरात आक्रंदून रडू लागलो. त्या अश्रूंवाटे बाबांसोबतच्या आठवणी गालावरून ओघळू लागल्या. माझ्याकडे बघून अविदेखील रडू लागला. त्या स्मशानभूमीत आम्ही तिघेच होतो. जळणार्‍या चितेचा प्रत्येक कण क्षणाक्षणाला बाबांचे उरलेसुरले अस्तित्व नष्ट करत होता. भौतिकदृष्ट्या. आठवणरूपी तर ते कायमच स्मृतीत असणार होते. कपाळमोक्ष झाला आणि आम्ही दोघे रुग्णालयात निघालो. आता तिथे धगधगता विस्तव होता. एका माणसाचा जो या कोरोनामुळे अनंतात विलीन झाला होता...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED