लॉकडाउन - मी अभिमन्यु - भाग २ Shubham Patil द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लॉकडाउन - मी अभिमन्यु - भाग २

सगळीकडे कोरोना, कोरोना आणि कोरोना. थैमान घातला होता राव या रोगाने. असेच एका दिवशी रात्री सहा-सहा फुट अंतर ठेऊन गप्पा मारत बसलो होतो. आपल्याला पुर्वीसारखे मनसोक्त जगता येईल का? या विषयावर परिसंवाद चालला होता. कुणी म्हणत होतं की निसर्गाने मानवाला चांगला धडा शिकवला आहे, कुणी म्हणत होत की आता काही पूर्वीसारखं नाही जगता येणार, बंधांनातच राहावं लागेल वगैरे. इतक्यात डॉक्टर घोलप आले. ते आमच्यात बर्‍यापैकी सीनियर. त्यामुळे त्यांच्याविषयी एक आदरयुक्त भीती सर्वांच्याच मनात असायची. त्यांचा व्यासंग फार मोठा. त्यामुळे बोलताना ते अशी काही उदाहरणं द्यायचे किंवा अशी अगम्य भाषा वापरायचे की समोरचा अगदी मंत्रमुग्ध होऊन जयचा. आज त्यांनी कोरोना विषयी बोलताना संगितले की, “हा आजार रक्तबीज या राक्षसासारखा आहे. हा रक्तबीज कोण तर साक्षात दुर्गा देवीने मारलेल्या असुरांपैकी एक. ह्याचं एक विशेष होत म्हणे, त्याच्या रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तरी तसाच दूसरा राक्षस तयार व्हायचा. त्याच्या रक्ताचा थेंब पडला की परत राक्षस, म्हणजे जितके थेंब तितके राक्षस. हळूहळू संपूर्ण पृथ्वी या प्रजातीच्या राक्षसाने व्यापून टाकली. जिकडे पहावे तिकडे रक्तबीज... आणि हाच रक्तबीज आज नाव बदलून आला आहे, त्याचे नवीन नाव आहे कोरोना...!!!”

त्यांनी सांगितलेल्या महितीचा विचार करत-करत मी केव्हा निद्राधीन झालो, माझे मलाच कळले नाही. दुसर्‍या दिवशी तर पाच पोलिस मामा तपासणीसाठी आले होते. त्यांची तपासणी करताना त्यांच्यात कोरोनाची प्राथमिक लक्षणे अढळत होती. त्यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांना लवकरात लवकर बरे करून त्यांना आम्ही हसतमुखाने निरोप दिला. मला त्यांचे विशेष आश्चर्य वाटले. आम्हाला तरी रात्री आडवं पाडण्यासाठी काहीतरी होतं. त्यांना तर ती सुद्धा सुविधा नव्हती. जे मिळेल ते खायचं आणि ड्यूटी करायची, जीव धोक्यात घालून. खायला देखील मिळेल याची शाश्वती नसायची. मी त्यांना मनातूनच सलाम ठोकला.

काही दिवस असेच गेले. रुग्ण येत होते आणि जात होते. कोरोना या नावाची दहशतच अशी होती की, साधा ताप किंवा खोकला आला तरी त्याला कोरोना समजत होते. मग अशा रुग्णांना आम्ही औषधे देऊन आणि कोरोना विषयी भीती न बाळगण्याची ग्वाही घेऊन पाठवत होतो.

दोन दिवसांपासून मला श्वास घेण्यास त्रास होत होता. मी थोडे दुर्लक्ष केले. दिवसभर मास्क घातले असल्याने तसे होत असेल असे मला वाटले. कारण ते मास्क लावल्याने थोडे गुदमारल्यासारखे व्हायचे. हळू-हळू मला सवय झाली मग. त्यातलाच हा भाग म्हणून मी सोडून दिले. हल्ली थकवा देखील जास्त प्रमाणात जाणवू लागला होता. मला सहकार्‍यांनी थोडा विश्रांतीचा सल्ला दिला. मी नाही म्हटल्यावर घोलप सरांचा धाक दाखवून मला विश्रांतीसाठी परावृत्त केले. एक-दोन दिवस जरा औषधे वगैरे घेऊन आणि आराम करून मला बरे वाटू लागले होते. या काळात मी घरी आई-बाबांशी बोललो होतो, सर्व मित्र, नातेवाईकांना फोन लावले होते. सर्वांनी मला काळजी घेण्यास सांगितली होती. सर्वांच्या आवाजात माझ्याविषयीची काळजी दिसून येत होती. मग परत मी कामावर रुजू झालो.

आज काही विशेष काम नव्हते. त्यामुळे काही थकवा जाणवला नाही. पण अधून-मधून श्वास घेण्यास त्रास होत होता म्हणून मी माझी स्वैब टेस्ट करण्याचे ठरवले. मी टेस्ट करत असताना घोलप सर अतिशय आत्मियतेने माझी चौकशी करायला आले होते. घरी जातोस का? अशी विचारणा केली होती. पण मी त्यांना नम्रपणे नकार दिला होता तेव्हा ते अतिशय आनंदित होऊन म्हणाले होते की, “बाळ अभि, तूच खरा डॉक्टर, आपले आयुष्य हे असेच. निखार्‍यावरचे चालणे. दुसर्‍याच्या आरोग्यासाठी आपले आयुष्य झोकून देणे हेच आपल्या आयुष्याचे नैतिक कर्तव्य. ते जाऊ दे, आता कसं वाटतय तुला?”

“आता ठीक आहे सर,”

“बर झालं, टेस्ट करून घेतलीस तर. उगाच शंका नको. सांभाळून रहा. येणारा काळ कठीण आहे. चल येतो मी.” असे म्हणून ते मला काही बोलू न देताच निघून गेले.

जेवण वगैरे झाल्यावर मी रात्रीच्या गप्पांच्या मैफिलीला काही गेलो नाही. अजून श्वास घ्यायला थोडा त्रास होत होता आणि औषधांची गुंगी देखील येत होती. बिछान्यावर जाताच केव्हा झोप लागली ते कळलेच नाही. रात्री दोन-अडीच च्या सुमारास जाग आली तेव्हा मला प्रचंड त्रास होत होता. जवळपास कुणीच नव्हते. हाका मारण्यासाठी म्हणून तोंड उघडले जात होते पण आवाजा निघतच नव्हता. जसे काही कुणीतरी माझा आवाजच माझ्यातून काढून घेतला आहे. कसातरी उठून उभा राहिलो आणि जवळच ठेवलेल्या जार मधून पाणी घेण्यासाठी जाणार तोच तोल गेला आणि खाली पडलो. परत उठण्याचे त्राणच नव्हते शरीरात. थोड्यावेळाने कसातरी पलंगाला धरून उभा राहिलो आणि औषध घेतलं. परत झोपलो.

चार-साडेचार च्या सुमारास मला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होऊ लागला. जणू काही कुणीतरी माझा गळा दाबून ठेवला आहे. सोबतच रक्तदाब देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचे जाणवू लागले. वेदनांमुळे आवाज तर निघतच नव्हता. मी असह्य वेदनांनी तळमळू लागलो. सहस्त्रावधी काटे अंगावर एकाच वेळी टोचले जात असल्याचा आभास होत होता. मी मरणार-बिरणार तर नाही ना? अशी एक उद्विग्न शंका मनात आली. कधीकधी मृत्युची जाणीवच माणसाला भयभयीत करत असते. मला तर खरे काय नी खोटे काय, हेच कळेनासे झाले होते. या परिस्थितीत मग मी आयुष्यातील आनंदाचे क्षण आठवू लागलो. नकारात्मक विचारांना मारण्यासाठीचे अस्त्र म्हणून. मला आठवू लागला तो क्षण, मेडीकलला प्रवेश घेतल्याचा.... डॉक्टर झाल्याचा...पहिला रुग्ण बरा केल्याचा....आई-बाबांना वेगवेगळी उपचार पद्धती समजावून सांगताना त्यांच्या चेहर्‍यावरील न मोजता येणारा आनंद बघितल्याचा...असे अनेक क्षण आठवू लागले. नव्हे, तशा क्षणांची रांगच रांग लागली. मुंग्यांसारखी. या मुंग्या देखील आठवणरूपी साखर आणायला एका रांगेत जात होत्या आणि मनरूपी वारुळात ती अवीट गोडव्याची आठवणरूपी साखर उगाचच भरत होत्या....

मग मला थोडं शांत आणि हलकं- हलकं वाटू लागलं. काही वेळाने मी उठून बसलो. थोडे धूसर दिसत होते. अगदी पातळ. विशेष म्हणजे मघापसून होणारा सर्व त्रास आता अचानक पुर्णपणे बंद झाला होता. गंमत म्हणजे मी आता पुर्णपणे बरा झाल्यासारखा वाटत होतो. किंबहुना इतका की आता काहीच त्रास होणार नाही असा. एक मिनिट, असे कसे होऊ शकते? मी तर आजारी होतो ना? मग हे असे अचानक बरे कसे वाटायला लागले? मी भ्रमात आहे की काय? काहीच समजत नव्हते. मी उठून रूमच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तर दरवाजा न उघडताच रूमबाहेर आलो. मला याचे फार आश्चर्य वाटले. समोरच्या घड्याळात बघितले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते. शेजारच्या अनिरुद्धला उठवायला गेलो तर तो माझ्याआधी उठलेला. मग त्याच्याशी बोलायला लागलो तर तो माझ्याकडे लक्षच देईना. जणू काही माझा आवाज त्याला ऐकूच येत नसावा. मग मी रागाने माझ्या रूममध्ये आलो तर अहो आश्चर्यम ! मी तिथेच झोपलेलो होतो. मग मघाशी रूम मधून बाहेर गेला तो कोण होता? असे कसे होऊ शकते? मी मलाच पहात होतो. शांतपणे झोपलेला.

इतक्यात अनिरुद्ध माझ्या खोलीत आला आणि मला हाका मारू लागला. मी त्याला प्रत्यूत्तर देत होतो पण त्याला थोडेसेही ऐकू येत नव्हते. तो घाबरून जवळपास पळत-पळत निघून गेला. माझे डोके सुन्न झाले. असे का होत असावे? सकाळीपण त्याला माझा आवाज येत नव्हता. हा प्रकार मला काही उचित वाटत नव्हता. थोड्याच वेळात सर्व स्टाफ आला. डॉक्टर घोलप यांनी मला तपासले आणि म्हणाले, “हि इज नो मोअर....”

खिन्नपणे ते रूम बाहेर आले आणि म्हणाले, “खूप चांगला होता तो.”

“होता म्हणजे? नक्की काय झाले डॉक्टर?” अनिरुद्ध अतिशय घाबरून म्हणाला.

“अरे, तो आता या जगात नाहीये. त्याच नाव त्याने सार्थ केलं अभिमन्यु... महाभारतातल्या अभिमन्यु सारखाच लढला, नशिबी वीरमरण आले. या पेक्षा थोर भाग्य ते काय... कोरोनाशी लढता-लढता गेला. वीरमरण पत्करले त्याने या महायुद्धात. त्याचा जन्म सार्थकी लागला. रणांगणात मृत्यू यावा यापेक्षा श्रेष्ठ ते काय. तुझे अश्रु पुसायला आम्ही आहोत अनिरुद्धा, पण याच्या आई-बाबांचे अश्रु कोण पुसेल? त्यांच्या अश्रूंचा फुटलेला बांध कुणाला तरी आवरता येण शक्य आहे काय? अनिरुद्धा याच्या घरी कळव. मला ते धैर्य नाही होणार भल्या माणसा.”

घोलप सरांचे ते बोलणे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. म्हणजे या कोरोनाच्या धगधगत्या यज्ञकुंडात माझी देखील आहुति पडली होती तर. मी स्वाहा झालो होतो तर. असे म्हणतात की यज्ञात टाकलेली आहुति थेट स्वर्गात जाते म्हणे. मग मी कुठे जाणार होतो? माझे मलाच माहिती नव्हते. मुळात मी माझ्यातून केव्हा विलग झालो होतो तेच समजले नव्हते. कोरोनाने मला केव्हा मगरमिठीत घेतले याचा पत्ताच लागू दिला नाही.

आता मी जगात नव्हतो तर...........