Saubhagyavati - 25 books and stories free download online pdf in Marathi

सौभाग्य व ती! - 25

२५) सौभाग्य व ती !
मार्च महिन्यातले भर दुपारचे रखरखते ऊन! सूर्यदेव आपल्या किरणाद्वारे जणू आगीचे लोळ फेकत होते. त्यांचा तो रूद्रावतार सहन होत नव्हता. घरात बसून जनता सूर्याचे ते रूप अनुभवत होती. त्यापासून दूर जाण्याच्या प्रयत्नात होती. थंडावा मिळावा म्हणून कुलर, पंखे अशा गोष्टींचा सहारा घेऊन बचाव करत होती. परंतु ज्यांचे पोट हातावर आहे असे लोक सूर्याला सामोरे जाताना, स्वतःच्याच घामाने शरीराची आग थंड करीत होते. ऊन नको म्हणणारे लोकही कामासाठी बाहेर पडत होते. नयन तिच्या कार्यालयात बसून होती. शाळा सुटायला थोडा वेळ बाकी असताना गायतोंडे आत येत म्हणाले,
"काय ताई, कसला विचार चालू आहे?"
"विचाराशिवाय माझ्या जीवनात दुसरे आहेच काय? विचार हीच माझी शिदोरी आहे. एक आशा होती तीही मावळली..."
"निसर्गापुढे कुणाचे काहीच चालत नाही हेच खरे."
"संजीवनीच्या मृत्यूचा मोठा आघात सहन केला त्यावेळी वाटायच की, माझाही अतं व्हावा पण..."
"नाही. ताई, नाही. तुम्ही विचारी आहात. अनेक प्रसंगी तावून सुलाखून निघाला आहात. असे अविचार यापुढे मनातही आणू नका. माधवीकडे पहा. ती आता तरुण होतेय. तिला या काळातच तुमची खरी गरज आहे..."
"भाऊ, म्हणूनच पाय अडखळतात. तसे विचार मनात येताच माधवी समोर येते आणि तो हेतू दाबावा लागतो..."
"ताई, केसच्या निकालाचे काय झाले?"
"आता तीही आशा मावळली. संजू गेली त्याच दिवशी वकिलाचे केस हरल्याचे पत्र आले होते..."
"अरेरे! वाईट झालं. तो तुमची किती परीक्षा घेणार ते देवच जाणे. केसचा निकाल तुमच्या बाजूने लागला असता तर मिळणाऱ्या पैशातून चांगलं ठिकाण पाहून माधवीच्या लग्नासाठी त्याचाउपयोग झाला असता."
"आलिया भोगासी असावे सादर! सदाशिवला नशिबानेही साथ दिली. भाऊ, जिथे स्वतःचा नवरा, जवळचे नातेवाईक परीक्षा घेत आहेत तिथे त्याच्या परीक्षेचे काय? आणखी काय पाहायचे नशिबात आहे देव जाणे..." नयन बोलत असताना शाळा सुटल्याची घंटा वाजली...
नयन घरी आली. स्वयंपाक केला आणि ताट वाढून घेऊन एकटीच जेवायला बसली. बैठकीत आई दूरदर्शन पाहात होती. ती आणि तिचे विश्व जणू वेगळेच होते. सकाळी देवपूजा झाल्यानंतर ती जे दूरदर्शनसमोर बसे ते रात्री झोप येईपर्यंत. कुणी चहा दिला तर पिला नाही तर जेवणाची वेळ होईपर्यंत दाताला दात लावून ती दूरदर्शनसमोर बसून राहात असे. त्यातले तिला किती कळायचे नि किती नाही हे तिलाच माहिती परंतु घरातले तिचे स्थान तिने तसे मर्यादित केले होते. लग्न होऊन आल्यावर सुरुवातीला मीराने तिची वरवर केली परंतु जसजशी घरातील सारी सूत्रे तिच्या हातात आली, माधवला हळूहळू ताटाखालचे मांजर बनवताना भाऊंवरही तिने हलकेच ताबा मिळविला आणि आईची ऊठबस आणि खाणेपिणे तिने स्वतःच्या मर्जीने सुरू केले. भाईजी नेहमी म्हणे त्याप्रमाणे सून सासूला म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला छळत होती. दुसरीकडे आईनेही सर्वच कामातून अंग काढून घेतले. कुणी एखादा शब्द बोलले तर तिच्याकडून तसाच शाब्दिक प्रतिसाद मिळत असे. एरव्ही ती शांतपणे सारे टकमक-टकमक पाहात बसायची. कुणाला काही बोलत नसे, कुणाला काही मागत नसे. नयनचे जेवण झाले. सोफ्याशेजारी तिने अंग टाकले आणि स्वतःच्या नकळत तिचा डोळा लागला...
कशाच्या तरी आवाजाने नयनला जाग आली. तिचे लक्ष समोरच्या घड्याळावर गेले. सायंकाळचे पाच वाजत होते. म्हणजे ती चक्क दोन तास झोपली होती. तिचे लक्ष सोफ्यावर गेले. भाऊंजवळ माधवी बसली होती. संजीवनीच्या मृत्यूनंतर भाऊंमध्ये बराच बदल झाला होता. नयनशी जरी ते विशेष संवाद साधत नसले तरी माधोशी बरेच मोकळेपणाने वागत होते. तिला हवे नको ते विचारत, तिच्या अभ्यासांविषयी चर्चा करीत असत. त्यावेळीही भाऊ-माधवी कुठल्या तरी विनोदावर खळाळून हसत होते. ते पाहून नयनला समाधान वाटले. निदान माधवीला तरी आजोबांची माया उशिराने का होईना पण मिळत होती. तितक्यात मीरा खोली झाडायला आली तशी नयन उठली. न्हाणीत जाऊन तोंडावर पाणी मारून आळस झटकण्याचा प्रयत्न केला. स्वयंपाकघरात जावून सर्वांसाठी चहा ठेवला आणि बैठकीत डोकावलं. वातावरण पूर्ववत होते. भाऊ-माधवी हास्य-विनोदात दंग होते. नयनने बारकाईने पाहिले, भाऊंच्या शरीराची सुटलेली गोलाई तिच्या लक्षात आली. गावाकडचे भाऊ पार बदलले होते. एक वेगळीच झळाळी, आगळे तेज त्यांच्या अंगावर चमकत होते. भाऊंचे मुळचे रूप तेजोमय दिसत होते. चहा खळखळ उकळू लागला तशा नयनच्या विचारांनाही उकळ्या फुटू लागल्या.. मीरा सासऱ्याला बिल्कुल दुखवत नव्हती उलट त्यांचे सारे वेळेवर करीत असे. एकवेळ माधवला टाळायची, त्याची काही कामे त्याला स्वतः करायला लावायची परंतु भाऊंच्या साऱ्या वेळा सांभाळताना त्यांना काहीही कमी पडू देत नसे. पैशाचा झरा सापडलेले भाऊ तिला कमी करत नसत. सणासुदीशिवाय अधूनमधून तिला भारीभारीच्या साड्या घेत असत. दोन-तीन महागातले दागिनेही त्यांनी मीराला केले होते. भाऊंचा सिनेमाचा काळा पैसा मीराच्या हातामध्ये सातत्याने खुळखुळत होता. त्यामुळेच मीरा सतत भाऊ-भाऊ करीत त्यांना खुश ठेवत असे. मीराला सातवा महिना लागला होता त्यापूर्वी एकदा तिचा गर्भपात झाला होता. मीराचा भाऊ बाळंतपणासाठी तिला न्यायला आला त्यावेळी माहेरी पाठविण्यास भाऊंनी नकार दिला. मीरानेही 'पाँचो ऊगलिया घी में...' अशी स्थिती सासरी असताना तुलनेने गरीब असलेल्या माहेरी जाणे नाकारले...
गॅसवरील चहाच्या आवाजाने नयन वर्तमानात परतली. चहा गाळून सवयीप्रमाणे मूकपणे तिने चहा सर्वांसमोर ठेवून म्हणाली,
"माधवी, जा. मामीला दूध घ्यायला बोलव." नयनचा चहा संपेपर्यंत माधवी परत येवून म्हणाली, "मामी, धुणं धुतेय..."
"मामी धुणे धुतेय?..." नयनने आश्चर्याने विचारले कारण धुणी-भांडी ही कामे अलिखितपणे नयनची होती. ती लगबगीने बाहेर आली. मीरा धुणे आपटत होती. दुःखी मनाने नयन दगडाजवळ बसली. तिने कपडे धुवायला सुरुवात केली. त्या कपड्यांवरचे डाग, मळ दूर होत होता परंतु घरातल्या जित्या जागत्या माणसांच्या मनामध्ये असलेले मळभ कसे दूर व्हावेत? सृष्टीकर्त्याने सारे निर्माण केले परंतु अशी एखादी पावडर, पेस्ट का निर्माण केली नसावी की ज्यामुळे एकमेकांच्या मनातील गैरसमज दूर व्हावेत? मने स्वच्छ व्हावीत? तशा अनुत्तरीत प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात तिने धुण्याचा डोंगर बाजूला केला. शेकडो रुपयांची दिवसाकाठी कमाई असूनही भाऊंनी आणि खरे तर मीरानेच कामाला बाई ठेवली नाही आणि धुणे-भांडी ही कामे नयनला शाळेचा व्याप सांभाळून करावी लागत...
सकाळी उठून दात घासत असलेल्या नयनचे लक्ष सहजच पूर्वेकडे गेले. सूर्यदेवाचे पृथ्वीवर आगमन होत होते. त्याच्या अस्तित्वाच्या चाहुलीनेच सजीव चेतनामय होतात, नव्या उमेदीने सारे कामाला लागतात. सूर्यदेवाच्या पसरणाऱ्या कोवळ्या किरणांसोबत तिच्या विचारांनी ऊभारी घेण्यापूर्वीच न्हाणीमधून माधवी रडतच बाहेर आली. गोंधळलेल्या नयनने तिला बघितलं. तिच्या हातामध्ये 'तो' कपडा होता. त्यावर लाल-तांबडा डाग पाहून नयन मनोमन दचकली. माधवी दाखवत असलेला तो डाग तिला नवजीवन देऊन ती नवोत्पत्तीला सिद्ध झाल्याची साक्ष देत होता. आता खरी कसोटी होती नयनची. 'शहाणी' झालेल्या पोटच्या गोळ्याला तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे आवश्यक होते. तिने जणू नुकतीच कात टाकली होती. त्या वेगळ्याच तेजाने, आगळ्यावेगळ्या गंधाने तिची अंगकाती झळाळणार होती. फुललेल्या गुलाबाच्या फुलाकडे असंख्य भ्रमर आकर्षित होणार होते. अचानक आलेल्या बदलामुळे माधवी गोंधळली होती, घाबरली होती. त्या गांगरलेल्या, चलबिचल झालेल्या हरिणीला सांत्वनाच्या शब्दानी गोंजारणे आवश्यक होते...
"घाबरू नकोस माधो. अग, मुली नि स्त्रियांच्या जीवनात हा बदल अटळ असतो. तो कुणासही टाळता येत नाही. आता तुला खरे स्त्रीत्व लाभले आहे..." नयन माधवीला समजावत असताना माधव गडबडीने बाहेर येऊन म्हणाला,
"आई, मीराला बहुतेक त्रास सुरू झालाय. मी रिक्षा आणतोय.... तोवर तिला सांभाळ... आलोच मी..." असे म्हणत माधव गडबडीने बाहेर पडला...
००००

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED