Saubhagyavati - 27 books and stories free download online pdf in Marathi

सौभाग्य व ती! - 27

२७) सौभाग्य व ती !
माधवच्या मुलाचे आणि भाऊंच्या नातवाचे बारसे! त्याचा थाट काय वर्णावा? गेलेले वैभव, गेलेली वतनदारी परत मिळविल्याच्या थाटात त्या बारशाचे आयोजन केले होते. गरिबा घरची अनेक लग्न लागावीत असा खर्च सुरू होता. आठ दिवसापासूनच पाहुण्यांनी गर्दी करायला सुरूवात केली होती. बाळू व मीनाही आले होते. नयनला सासर सोडून तपापेक्षा अधिक काळ लोटला होता. तप...एक विशिष्ट संज्ञा! तप म्हटले, की आठवते रामायणातील वनवास! रामामुळे सीतेलाही वनवास घडला होता. कलीयुगात नयनलाही वनवास भोगावा लागत होता... सदाशिवमुळे! रामायणातील सीतेला काही काळ रामाची सोबत होती तोवर वनवासातील तो काळ सीतेसाठी सुसह्य होता. परंतु नयनला एकटीलाच वनवास घडत होता. त्या वनवासात कांचनमृग, शबरीची बोर, लक्ष्मण होता तसाच हनुमान होता, रावण होताच. कलीयुगातील वनवासामधील सारीची पात्रे कशी मायावी, फसवी होती. प्रत्यक्षात नवरा मायावी, फसवा आहे. तिथे इतर पात्रांचे काय? परंतु तरीही शबरीप्रमाणे विठाबाई, गायतोंडे जणू लक्ष्मण तर भाईजीच्या रूपामध्ये हनुमान होता. त्याचप्रमाणे रावणही होता. एकमुखी हजारो रावण! सीतेचा वनवास बारा वर्षानंतर प्रचंड लढाईनंतर संपला होता. परंतु नयनचा वनवास वर्षानुवर्षे स्वतःच्या अस्तित्वासाठी सुरू होता...सुरूच राहणार होता...
पाहुण्यांची रेलचेल असल्यामुळे गप्पांना ऊत आला होता. हास्याला ऊधाण आले होते. आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्या सायंकाळी गच्चीवर नयन, बाळू आणि मीना तिघेच एकत्र बसले होते. साहजिकच जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता. गप्पांच्या ओघात नयनने विचारले,
"बाळू, विठाबाई भेटते का रे? कशी आहे रे ती?"
"अगं, ती आमच्याकडेच कामाला आहे. एक दिवस असा जात नाही की, ज्या दिवशी तिने तुझी आठवण काढून तिचे डोळे भरून आले नसतील. पदोपदी सतत तुझीच आठवण काढत असते."
"खरेच मोठ्या बहिणीप्रमाणे तिने प्रेम केले. तिचा मुलगा काय करतो? खूप मोठा झाला असेल ना.?"
"खूप हुशार आहे. गेल्याच वर्षी मॅट्रिक झालाय."
"वा! किती छान वाटल ऐकून! खूप दिवसांनी जवळच्या माणसाला भेटल्याप्रमाणे झाले बघ. विठाबाईच्या कष्टाला फळ मिळालं. तिचा पांग फिटला. खूप मायाळू नि कष्टाळू आहे विठाबाई!" नयन विठाबाईबद्दल भरभरून बोलत असताना बाळूने विचारले.
"नयन, तू सदाबदल, त्या घराबद्दल काही विचारल नाही?"
"तिथ माझे आहेच कोण? त्यानेच नाते तोडताना माझ सर्वस्व लुटलं. एखादे वाईट स्वप्न विसरल्याप्रमाणे मी तिथे सारे विसरून गेलेय..." डोळ्यात आलेले पाणी आत दाबत नयन म्हणाली.
"नयन, तुमच्या केसचा निकाल लागला त्यावेळी मुलीच्या वाढदिवसाचे निमित्त साधून सदाने गाव पंगत दिली. तू इकडे आल्यावर आम्हालाही क्वार्टर मिळाले त्यामुळे त्या गल्लीचा संपर्क तुटला. तरीही भेटतात...कधी सिनेमात, कधी बाजारात. निर्लज्जाप्रमाणे नवराबायकोसारखे वागतात."
"अरे, ते नवरा-बायकोच ना मग वागणारच ना. लाज कशाल बाळगतील ते. ती लाजच तर विकून खाल्लीय ना त्यांनी..."
"दोन मुली आहेत. मोठी असेल दहा-बारा वर्षांची पण मुकी आहे. लहानी सात-आठ वर्षाची... अपंग आहे...." मीना म्हणाली.
"महिन्यापुर्वी सदा भेटला होता परंतु खूप ऊतरलेला वाटला. एकदा वाटलं, त्याला विचारावं पण लगेच तुझा चेहरा पुढे आला आणि ओठावर आलेले शब्द आत गिळले. एकाच दुकानात आम्ही अर्धा तास होतो. अनेकवेळा त्याने बोलण्याचा प्रयत्न केला. त्याचे ओठ आणि चेहरा तसं भासवत होते. तो माझ्याशी बोलण्यासाठी कासावीस होतोय, तळमळतोय असं जाणवत होतं. दुकानातून बाहेर पडताना पुन्हा एकदा आमची नजरानजर झाली त्यावेळीही त्याचे ओठ थरथरताना दिसले परंतु कदाचित त्याला शब्द सापडत नाहीत असे मला वाटले? काय असेल? दुकानाच्या बाहेर आल्यावर वाटलं, आत जावून त्याला विचारावं परंतु लगेच विचार आला, सदा कशासाठी वाकेल? का बोलेल? उन्मत्त हत्ती रस्त्याने सरळ चालीने चालेलच कसा? त्याचा आणि आपला संबंधच काय? होते नाते तेही संपले. मलाच भास होत असेल या विचाराने मी निघून आलो. नयन, काय असेल ग त्याच्या मनात? खरेच काही त्याला बोलायचे असेल की, मला भ्रम झाला असेल?"
"काय असणार? तो का म्हणून बोलेल? जित्याची खोड का मेल्याशिवाय जाईल? कुत्र्याचे शेपुट कधी सरळ होईल? त्या हडळीपुढे त्याला माझी आठवण येईलच कशाला?"
"नाही. नयन, नाही.माझे डोळे धोका देणार नाहीत. त्याला निश्चितच काही तरी सांगायचं, विचारायचं होत..."
"जाऊ दे ना बाळू. आता कशाला त्याची आठवण? मला कशाचीही आशा नाही की तिकडचे स्वप्न नाही. एकदा का माधवीला चांगल्या घरी दिलं की मी मोकळी..."
"लग्न? माधवीचं? इतक्यात? नयन, तू वेडी तर झाली नाहीस?"
"नाही. मी पूर्ण विचार करून बोलते. बाळू, तुझ्या पाहण्यात एखादा चांगला मुलगा असला तर..."
"बाळू ....ये.... बाळू...." खालून अण्णा आवाज देत होते त्यामुळे ती चर्चा थांबवून मीना आणि बाळू खाली गेले. नयन एकटीच थांबली. एकटी का? तिच्यासोबत होती शिदोरी... विचारांची ! त्या जन्मोजन्मीच्या शिदोरीसोबत नयन हितगुज करू लागली...
'सदा काय म्हणणार असेल? त्याला काय बोलायचं होतं? त्याला पश्चाताप तर झाला नसेल? त्याला बाळूजवळ काही निरोप द्यायचा होता का? परंतु बाळूने विचारले नाही ते चांगलेच झाले. त्यादिवशी सदाशिवने बाळूचा घोर अपमान केला त्यामुळे बाळू त्याला न बोलता निघून आला ते चांगलेच झाले. सदाचे काही बरेवाईट झाले तर? मी-मी विधवा? पण त्याचा माझा संबंधच काय? अनेक वर्षांपासून मी सधवा असूनही विधवेचे जीवन जगतेच ना? मी सदाचा विचार का करते? का-का? काय दिलं मला त्याने? कधी एक शब्द प्रेमाने बोलला? त्या रात्री प्रेमाचे नाटक करून माझे हात तसे तोडले तरी त्याच्याबद्दल आपल्या मनात विचार का यावेत? अनेक वर्षांपासून मी त्याच्या विचारांना निग्रहाने टाळले. सदाबद्दल मनात कुठे प्रेम, सहानुभूती तर नाही ना? म्हणतात ना, पहिलं प्रेम विसरल्या जात नाही. पण मी प्रेम केलेला सदाशिव म्हणजे लग्नानंतर सासरी जाताना पहिल्या प्रवासातला सदा! त्यावेळी झालेला त्याचा स्पर्श, तो गंध आठवला, की आजही मन कसे अस्वस्थ होते, चलबिचल होते. नंतर पहिल्या रात्री, मधुचंद्राच्या रात्री माझ्या स्वप्नांचा चकनाचूर करणारा आणि त्याच रूपात वारंवार समोर आलेल्या सदाशिववर मी कधीच प्रेम केले नाही कारण तो माझा नव्हताच मग जो माझा नाहीच त्याचा विचार मी का करावा? विचारांच्या चक्रव्युहात न सापडलेलं बर...' अशा विचारात नयन खाली आली...
बैठकीत सारे पाहुणे गप्पागोष्टींमध्ये दंग होते. तिच्या अस्तित्वाची फारशी कुणी दखल घेतली नाही. मामा, मावश्या, त्यांची मुल, नातवंडं सारे होते. मुलांची गर्दी जास्त असल्यामुळे कोण कुणाचे ते पटकन ओळखल्या जात नव्हते. अण्णा मात्र फार्मात दिसत होते. त्यांचेजवळ भाऊइतकी मायापुंजी नसली तरी किशोरला प्रकाशन संस्थेतून भरपूर उत्पन्न होत होते. भाऊ बारशाचा बेत साधून पुन्हा वतनदारी प्राप्त झाल्याच्या थाटात वावरत होते. काकीही आनंदात होत्या. किशोरच्या मुलांना खेळवत त्याही चर्चेत आणि आनंदामध्ये सहभागी होत होत्या. काकीजवळ कमात्या बेबीच्या मुलास मांडीवर घेवून बसली होती. म्हाताऱ्या बायकांचे एक बरे असते, जीवनाच्या उतारावर नातवाचीसोबत त्यांच्यासाठी एक पर्वणीच असते. त्यांच्या बाललीलांमध्ये त्यांचा वेळ पटकन निघून जातो. जीवनातले सारे चढ-उतार विसरून चिमुकल्यांच्या सान्निध्यात ते सर्वस्व हरवतात, नवीन काही तरी शोधतात. समाधानी, आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. संसारावर अकाली बसलेल्या धक्क्यातून कमात्या बरीच सावरली होती. उशिरा का होईना तिची बेबी चांगल्या घरात पडली होती. तिच्या सासरची माणसंही खूप चांगली होती. तिच्या संसारवेलीवर दोन सुंदर फळ लागली होती. एकंदरीत सारे सावरले होते. सावरली नव्हती ती फक्त नयन! अगोदर सदाशिवमुळे आणि नंतर माहेरच्या माणसांमुळे सुख, समाधान, आनंद या गोष्टींना तिच्या आयुष्याशी जणू काही घेणे-देणे नव्हते. असतात एकेकाचे योग, भोग!
००००

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED