लेडीज ओन्ली - 17 Shirish द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लेडीज ओन्ली - 17

|| लेडीज ओन्ली - १७ ||


( वाचकांसाठी एक विनम्र निवेदन -

शिरीष पद्माकर देशमुख यांची 'फरदड' {कथासंग्रह} आणि 'बारीक सारीक गोष्टी' {बालकुमार कथासंग्रह} ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि ही दोन्ही पुस्तके आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिळविण्यासाठी 7588703716 किंवा 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा / वाट्सप करा. 'बारीक सारीक गोष्टी' हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.)


" लेडीज ओन्ली "

|| सतरा ||

संध्याकाळची वेळ होती. अश्रवी बुक स्टोअर बंद करून बराच वेळची घरी येऊन बसली होती. आपल्या मोबाईलवर काही बघत, काही शोधत होती. आज विजयाताईंना घरी यायला जरा उशीरच झाला. निवडणुकांचे दिवस होते. तरीही, अश्रवी एकटीच घरी असणार आहे याचं भान ठेवून घराबाहेर किती वेळ द्यायचा, याचं नियोजन त्यांनी केलं होतं. त्या सगळा प्रचार पायी फिरूनच करत होत्या. पक्षानं चारचाकी गाडी दिली होती प्रचारासाठी. पण त्यांनी ती परत पाठवली. लोकांशी जुळवून घेण्यासाठी, त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी आपण राजकारणात उतरतोय असं म्हणायच्या त्या. एसी गाडीतून फिरणाऱ्या माणसाला उन्हातान्हातल्या सामान्य माणसांचे प्रश्न कळायचे कसे? अन् चारचाकीतल्या आरामाची सवय लागल्यावर दगडमातीत पायपीट करणाऱ्यांशी सूत्र जुळायचे तरी कसे?
विजयाताईंच्या या अती आदर्शवादी राजकारणामुळे कार्यकर्ते मात्र त्यांच्यापासून जरा दूरच राहू लागले. तसं पाहिलं तर इलेक्शन पिरियड म्हणजे कार्यकर्त्यांसाठी सुगीचे दिवस. दारूच्या महापूराचा अन् कोंबड्या बकऱ्यांसाठीचा महाप्रलयाचा काळ. पाच पाच वर्षे खांद्यावर झेंडे वाहणाऱ्यांची जी काही हमाली वसूल व्हायची ती ह्याच काळात. पण विजयाताईंसारखे उमेदवार अशा कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी ओततात. कमाई तर नाहीच पण किमान घसा ओला करण्याची तरी काही तरतूद असावी की नाही? नाहीच! तसा पक्षानं बऱ्यापैकी निवडणूक निधी पाठवला होता.. खर्चापाण्यासाठी म्हणून.. पण विजयाताईंनी तोही जसाच्या तसा माघारी पाठवला. अन् पक्षश्रेष्ठींना स्पष्ट सांगितलं, "मी निवडणूक लढवीन ती फक्त प्रामाणिकपणावर.. एका पैशाचीही गैरप्रकारानं उलाढाल होतेय असं माझ्या लक्षात आलं तर मी त्याच क्षणी निवडणुकीतून माघार घेईन..." त्यांची ही भुमिका कार्यकर्त्यांना पचत नसली तरी निष्कलंक चारित्र्याच्या, सामान्यांच्या वेदना जाणणाऱ्या एक प्रामाणिक उमेदवार म्हणून जनमानसात विजयाताईंची स्वच्छ प्रतिमा तयार व्हायला लागली होती. लोकांचा भरघोस प्रतिसादही मिळायला लागला होता. केवळ त्यांच्याच मतदारसंघात नव्हे तर शहरातील इतर वॉर्डांमधूनही एक स्वच्छ, प्रामाणिक आणि लोकहितासाठी धडपडणारा उमेदवार म्हणून विजयाताईंच्या नावाची चर्चा व्हायला लागली. त्यांच्या पक्षातील इतर उमेदवारही ' आमचे नेतृत्व' म्हणून विजयाताईंचे नाव अन् फोटो पुढे करू लागले. एकूणच एकट्या विजयाताईंच्या उमेदवारीमुळे पक्षाची प्रतिमा उजळून निघायला लागली होती. पैशांची उधळपट्टी न करता, लोकांना खाऊ पिऊ न घालता त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा बघून विरोधात उभ्या असलेल्या शारदाबाईंच्या पायाखालची वाळू सरकायला लागली होती. घरात इतकं अस्वस्थतेचं वातावरण असतानाही समाजातून मिळणारा प्रतिसाद विजयाताईंचं बळ वाढवणारा होता.
" आई, मला तुला काही सांगायचंय.." हातातला मोबाईल बाजूला ठेवत अश्रवी बोलली.
"हं.. बोल ना बाळा.. " विजयाताई आज दिवसभरात लोकांच्या घेतलेल्या भेटींचा अहवाल तयार करत होत्या.
" आई.. आई... मला.. जॉब आॅफर आलीय.. "
" ओह्ह.. दॅट्स ग्रेट.. " विजयाताईंनी हातातला कागद बाजूला ठेवला," काँग्रॅट्स.... मेनी काँग्रॅट्स बेटा...! " विजयाताईंच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता.
".... लंडनला..!!" अश्रवी पुढे बोलली अन् कमळासारखा फुलून आलेला विजयाताईंचा चेहरा क्षणात काळाठिक्कर पडला.. कोमेजून गेला.
"काय? लंडनला? म्हणजे तू..? "
" हो आई... मी परत जायचं ठरवलंय...! " अश्रवी शांतपणे बोलली," मागच्या काही दिवसात सगळे अॅप्लीकेशन्स मी लंडनसाठीच केलेत.. "
" अगं पण का? तुला तिथे जाऊन शिकायचं होतं... तू शिकलीस.. मग आता परत का जायचंय तुला? " विजयाताईंसाठी अश्रवीचा निर्णय म्हणजे मोठाच धक्का होता.
" कारण... कारण.. मला इथे राहायचं नाहीये.. "
" राहायचं नाही? का? तुला इथे.. तुझ्या देशात का राहावंसं वाटत नाहीये? "
" कारण इथे जेनी नाहीये... " अश्रवी संतापाने उसळून बोलली," या देशाने माझ्या जेनीला माझ्यापासून हिरावून घेतलंय... इथे जेनी नाहीये... आणि मी जेनीशिवाय जगूच शकत नाही.. "
" हो मान्य आहे... जेनी इथे नाहीये.. पण मग ती लंडनमध्ये गेल्यावर तुला भेटणार आहे का बाळा? अगं ती आता कुठेच नाहीये... ती आपल्याला सोडून दूर निघून गेलीय... सगळ्यांपासून खूप खूप दूर... " विजयाताई आपल्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न करू लागल्या," हे बघ बाळा... तू कुठे जरी गेलीस तरी तुला तुझी जेनी परत मिळणार नाहीये... हे समजून घे तू जरा... "
" समजतंय आई... मला सगळं समजतंय.. " अश्रवीने आपल्या आईच्या खांद्यावर हात ठेवला," पण मी काय म्हणतेय ते तुला समजत नाहीये.. "
अश्रवीला काय म्हणायचंय ते खरोखरच विजयाताईंना कळत नव्हतं. अन् लेक आपल्यापासून पुन्हा दुरावणार ही कल्पना सहनही होत नव्हती," तू परत जाण्याचा विचार का करते आहेस बाळा? " त्यांनी कळवळून विचारले.
" मग मी इथं राहून काय करणार आहे आई? इथे जेनीची आठवण मला क्षणाक्षणाला छळतेय. तिच्या सहवासातल्या आठवणींचा वणवा निमिषानिमिषाला जाळतोय मला. इथल्या लोकांनी, या देशाने माझ्या जेनीला माझ्यापासून दूर केलंय.. आणि.. आणि आता इथे.. कोणीही माझी जेनी मला परत मिळवून देऊ शकत नाही.. मला माझी जेनी हवीय आई.. जेनी मला परत हवीय.. " अश्रवी बेभानल्यागत बरळत होती.
" अश्रू वेड लागलंय का तुला? जेनी परत मिळणं... कसं शक्य आहे ते? "
" नाही.. खरंच शक्य नाही.. या इथे..या देशात तरी ते शक्य नाही... म्हणूनच मला परत जायचंय.. जेनीच्या शोधात.. एका नव्या जेनीच्या शोधात.. "
" काय...?... म्हणजे तू..? "
" होय आई... माझा नाईलाज आहे.. जेनी ही माझी गरज आहे... अन् ती नसेल तर... तर जेनीसारखी दुसरी कुणी... "
" पागल झालीयेस तू.. " विजयाताई रागावून ओरडल्या," अगं प्रेम म्हणतेस ना तू तुझ्या अन् जेनीच्या नात्याला? हे असं असतं प्रेम? एका क्षणाला तुझे अन् जेनीमधले संबंध मान्यही केले मी... कारण ते मला शुद्ध वाटले.. असं वाटलं की तुम्ही दोघी म्हणजे एका लोकविलक्षण प्रेमाचे विशुद्ध प्रतीक आहात.. पण आज... तिला जाऊन महिनाही उलटत नाही तोच... तुला व्यभिचार सुचतोय? हे कसलं प्रेम... ही तर फक्त वासना... " त्या चांगल्याच चिडल्या होत्या.
" शरीराचा मोह... वासना कधी नाकारलीय मी? आमच्या नात्यात एकमेकींच्या मनाइतकंच शरीरही महत्वाचं मानत आलोय आम्ही... आणि तुला काय वाटतं... माझं तिच्यावर खूप प्रेम आहे म्हणून ती मेल्यानंतर तिच्या चितेवर सती जायला हवं होतं मी? की.. की.. आज ती नाही म्हणून तिच्या आठवणीत विधवेसारखं जीवन जगायला हवंय मी? आम्ही एकत्र आलो कारण आम्हाला जगण्याचा आनंद घ्यायचा होता... तोही आमच्या इच्छेप्रमाणे... तो आनंद एकमेकींना द्यायचा अन् एकमेकींनी घेत राहायचा असं वचन दिलं होतं तिनं मला अन् मी तिला... पण तिने विश्वासघात केला... वचन मोडून पुढे निघून गेली ती... मला एकटीला सोडून... "
" विश्वासघात तिने नाही केला... तू करते आहेस.. तिचा..! "
" असं तुला वाटत असेल आई.. पण मी तिला वचन दिलंय.. आनंदाने जगण्याचं.. मी ते पूर्ण करणार...आमचं ठरलं होतं.. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत सोबत जगायचं... आनंदात... एकमेकींना सुख देत... नाही जगता आलं तर सोबतच मरायचं... आणि जर सोबत मरता आलं नाही तर जो मागे उरेल त्यानं जगायचं.. अगदी आनंदात.. दोघी सोबत असताना जसं जगत होतो तसं... स्वच्छंदी आनंदी..!! जीवनाचा मनमुराद आनंद घ्यायचा एवढंच शिकवलं गं आमच्या मैत्रीनं आम्हाला...
अन् तिलाही माहिती आहे.. माझा आनंद कशात आहे ते... खोटा आनंद.. चेहऱ्यावरचं खोटं हास्य... खोटं सुख दाखवणं .. मला नाही जगता येत आई.. कृत्रिमपणे...! तू चांगलं म्हण.. वाईट म्हण.. पण जेनीचं शरीर.. ही माझ्या शरीराची गरज आहे... जर ती नसेल तर मला दुसरं शरीर शोधावं लागेल... मिळवावं लागेल... "
" मला किळस येतेय अश्रू तुझे विचार ऐकून... शरीराच्या वासनेपायी तुझे इतके वैचारिक अन् नैतिक अधःपतन होईल असं कधीच वाटलं नव्हतं मला.... "
" स्वतःच्या मनाचं, शरीराचं अन् गरजांचं वास्तव ओळखणं अन् ते खुलेपणाने स्वीकारणं, मोकळेपणाने मांडणं... यात कसलं आलंय अधःपतन? जे लोक हे स्वीकारत नाहीत.. खोटे मुखवटे चढवून नैतिकतेचा मोठेपणा मिरवतात ते खरे अधःपतित..आणि आई माणूस जन्माला येतो तो शरीर घेऊन... त्याला त्याच्या मनाची जाणीव खूप नंतर होते गं. तो नॅचरली देहनिष्ठच असतो... जेनी माझ्या मनात आहे. तिला मागे ठेवून आयुष्याच्या वाटेवर मी पुढे निघून जाईलही.. पण या शरीराचं काय करू? देहाला मागे ठेवून कसं पुढं जायचं गं? "
" लोक काय आहेत काय करतात याच्याशी माझा काहीही संबंध नाही.. मला माझ्या मुलीचा होत असलेला नैतिक ऱ्हास बघवत नाहीये... "
" मग तू डोळे मिटून घे... पण तू डोळे मिटल्याने वास्तव बदलणार नाहीये आई... तुझी मुलगी एक लेस्बियन आहे हे सत्य तू स्विकारायला हवंस. स्त्रीचं प्रेम - स्त्रीचं शरीर ही माझी गरज आहे हे वास्तव मी स्विकारायला हवं. कल्पनेतल्या गोष्टी कितीही रम्य आणि सुखावह असल्या तरी त्या सत्य नसतात आई.. आणि वास्तव कितीही रुक्ष, जळजळीत अन् दाहक असलं तरीही ते स्विकारावंच लागत असतं.. "
" ठीक आहे... स्वीकारलं... सगळं स्वीकारलं.. तुझं सत्य स्वीकारलं... तुझ्या शरीरगरजांचं वास्तवही स्विकारलं.. पण एक माणूस म्हणून आपलं मन आपलं शरीर आपल्या नियंत्रणात असायला हवं की नको? स्त्री शरीराची अती लालसा असणाऱ्या पुरुषाला स्त्रीलंपट म्हटलं जातं.... जर तू तुझ्या वासना तुझ्या काबूत ठेवू शकत नसशील.. तर तुला काय म्हणावं? तू जर स्वतःच्या शरीरावर ताबा ठेवू शकत नसशील तर मग तुझ्यात अन् माझ्यावर बलात्कार करणाऱ्या, जेनीची छेड काढणाऱ्या वासनांध पुरूषांत फरक तो काय उरतो?? "
" काहीतरीच काय बोलतेस आई? अगं एखाद्या शरीराबद्दल आकर्षण वाटलं, मोह झाला म्हणून मी बलात्कार नाही करत कुणावर... आणि माझं मन आणि शरीर माझ्या नियंत्रणात आहे म्हणूनच मी शांत आहे ना... मला हे ठाऊक आहे की मला जेनीच्या सहवासाची गरज आहे... मी तो सहवास शोधण्यासाठी जातेय आई? दोन मिनिटांची शरीराची भूक भागवण्याचाच प्रश्न असता तर शंभर पन्नासात अशी भूक भागवणाऱ्या खाणावळी असतातच की प्रत्येक शहरात... मी आधार शोधतेय... जेनीसारखा... ती माझ्या मनासाठी अन् शरीरासाठीही आधारस्तंभ होती... "
" तुझ्या बीभत्स विचारांवर पांघरूण घालण्यासाठी तू शोधलेली पळवाट आहे ही... "
" पळवाट? कशासाठी शोधू मी पळवाट? कुठे अन् कुणापासून दूर पळायचंय मला? आई मी स्वतःला पूर्णपणे ओळखते. मी काय करतेय.. कशासाठी करतेय याची माझी मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे मी कधीच स्वतःबद्दल अवास्तव मतं मांडत नाही.. माझे विचार जे आहेत ते आहेत... मग कुणाला ते गलिच्छ वाटोत किंवा बीभत्स... त्याने मला फरक पडत नाही.. हं.. एक मात्र नक्की... माझी आई माझ्याबद्दल काय विचार करते त्याने मात्र मला नक्कीच फरक पडतो. पण तिनं मला चांगलं म्हणावं म्हणून चांगुलपणाचं उसनं कातडं पांघरूण मी तिच्यासमोर कधीच येणार नाही... आई, तू माझ्या संपूर्ण देहाला बघितलंयस... नग्न अवस्थेत तुझ्या हातांवर घेतलंयस.. आजही माझं सगळं वास्तव विवस्त्र अवस्थेत तुझ्यापुढे उभं आहे. कसलाही आडपडदा नाही. काहीही झाकलेलं नाही... तुझी लेक तुझ्यासमोर उभी आहे आई... आता तिला तिच्या विचारांसकट, निर्णयांसकट तळहातावर घ्यायचं की नीतिमत्तेचे भरजरी कपडे तिच्या अंगावर घालून तिला समाजात मिरवण्यासाठी लाथाडून द्यायचं.. ते तू ठरव आई...आई, माणसाच्या मनात ज्या वावटळी उठतात ना... त्यांना वाट करून देता येते डोळ्यांतून... त्या बरसतात अन् विरतात पाणी होऊन... देहातून उसळणाऱ्या वावटळी शमवण्यासाठी मला जेनीची गरज आहे...! " जेनी स्तब्ध होऊन खुर्चीत बसली. विजयाताईंनी तिचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं.
" अश्रू... तुझ्या आनंदासाठी तू मला दुःखात लोटून जाणार का गं? तू गेलीस तर मी जगायचं कुणासाठी अन् कशासाठी? तुझ्या आईचा तरी विचार कर... तुझ्याविना मागच्या दोन वर्षात माझ्या जीवाची झालेली होरपळ तुला जाणवली नाही का गं? तुझ्या एका निर्णयानं माझ्या सुखाचे सगळे धागे उधडून जाणार आहेस तू? माझ्या आयुष्यभराच्या तपश्चर्येचं हेच फळ का गं मला? " विजयाताई खूप काही बोलत राहिल्या. पण मनाशीच. शब्द त्यांच्या ओठांतून बाहेर पडत नव्हते. आतच कुठेतरी अडकून पडले होते. पण आईच्या मनाची ही घालमेल, निःशब्द कालवाकालव लेकीला कळली असावी. ती म्हणाली," मी परत येईन आई.. माझ्या जेनीला घेऊन..!! "
" तू इथेच... या देशातच तुझ्या जेनीला शोधलंस तर? " काळजावर अगदी आग ओतत विजयाताईंनी विचारलं.
" इथे? नाही मिळणार... मिळाली तरी इथले स्वयंघोषित समाजरक्षक आम्हाला एकत्र राहू देणार नाहीत. हा समाज आमचं नातं मान्यच करणार नाही... पुन्हा एकदा ते माझ्या जेनीला किंवा मलाही.... ठार करतील.. " अश्रवीचा समाजावर विश्वास उरलेला नव्हता.


© सर्वाधिकार सुरक्षित -

© शिरीष पद्माकर देशमुख ®


{ 'लेडीज ओन्ली' या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.
'लेडीज ओन्ली' कथामालिका कादंबरीच्या संदर्भातली सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}

© शिरीष पद्माकर देशमुख ®