Saubhagyavati - 31 books and stories free download online pdf in Marathi

सौभाग्य व ती! - 31

३१) सौभाग्य व ती !
सदाशिवच्या घरापुढे बाळूने मोटारसायकल ऊभी केली. इकडेतिकडे नजर फिरवली. गल्लीमध्ये विशेष फरक पडला नव्हता. प्रभा आणि सदाशिव या दोघांच्या जुन्या वाड्याचे नुतनीकरण करून एकत्रित बांधलेल्या बंगल्याची पार दुर्दशा झाली होती. सारा रंग उडून गेला होता. अनेक ठिकाणी रंगासोबत सिमेंटनेही साथ सोडली होती. एकंदरीत बंगला कसा विद्रुप दिसत होता. बंगल्यासमोर दोन-तीन उकंडेही पडले होते. दारासमोर आबालवृद्धांची विष्ठा पडली होती. नयनच्या काळात तोच भाग सडा, रांगोळ्यामुळे मनमोहक दिसत असे.
'अशी अवकळा का यावी? बंगल्यात माणसे राहतात ना? इतक्या वर्षांनी माझी आठवण का झाली? जेव्हा सदाशिवने माझा अपमान केला आणि मी वाड्यातून बाहेर पडलो त्या गोष्टीस कितीतरी वर्षे लोटली. इतक्या वर्षांनी त्याला माझी का आठवण आली असावी? त्याचा काही वाईट हेतू तर नसेल ना?' असे मनाशीच बोलत बाळू धडधडत्या अंतःकरणाने आत शिरला. उजव्या बाजूस पोत्यांची रास पडली होती त्यातून बरेचसे गहू बाहेर पडत होते. त्या फुटक्या पोत्यांवर, सांडलेल्या गव्हावर मोठमोठी उंदरं राज्य करीत होती. मनसोक्त खेळत होती. बंगल्यामध्ये सर्वत्र केर होता. असं वाटत होतं की अनेक महिन्यांपासून वाड्याची आणि झाडूची भेट झाली नव्हती. सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे बंद हवेलीमध्ये ठिकठिकाणी जाळेच जाळे दिसत होते. बाळूने सर्वत्र शोधक नजर फिरली परंतु कुठेही माणसाचा मागमूस नव्हता. कुणी समोरही दिसत नव्हते. कुठे शोधावे? असा प्रश्न स्वतःलाच विचारत असताना एका खोलीतून त्याला खोकलण्याचा आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने बाळू लगबगीने निघाला. खोलीच्या दाराजवळ जाताच तो दचकला. तुंबलेल्या गटाराचा किंवा सार्वजनिक शौचालयाचा जसा वास येतो तसाच वास त्या खोलीतून येत होता. खोलीत जावे का नाही या विचारात असताना आतून क्षीण आवाज आला,
"या. बाळासाहेब, या..." मन घट्ट करून तो आत शिरला आणि दचकला. दाराच्यासमोर असलेल्या एका पलंगावर अतिशय भयानक अवस्थेत सदाशिव झोपला होता. अगदी न्याहाळून पाहताच तो सदाच असल्याची खात्री पटत होती. नवागत बालकाप्रमाणे हातापायांच्या काड्या, डोळ्यांची खोबणी, दोन्ही गालामध्ये चेंडू बसतील अशी अवस्था झाली होती. सदाशिवच्या अंगातील रक्तापेक्षा बैठकीत खेळत असलेल्या उंदराच्या शरीरातील रक्त नक्कीच जास्त असेल या विचारामध्ये तो पलंगाजवळच्या खुर्चीवर टेकला.खोलीतील स्थिती पाहून त्याला मळमळ सुरू झाली. त्याने रूमाल तोंडावर धरला. फार लांबून यावा अशा आवाजात सदाशिव म्हणाला,
"माफ करा बाळासाहेब..."
"ते जावू द्या सदाशिव. पण तुमची, वाड्याची ही दशा..."
"कर्माची फळ भोगतोय. जिवंतपणी मरण यातना भोगतोय."
"पण प्रभाताई..."
"प्रभा? हूं. जिथं दिवसागणिक एक-एक अवयव साथ सोडतोय, एक दिवस एक पाय, काही दिवसानी दुसरा पाय, हात... पुन्हा हात तर मध्येच कधी नाकातून रक्त तरी कधी कानातून रक्त. रोज नवे मरण अनुभवतोय. तिथे प्रभा काय साथ देणार? ती तर हाडामासाची जिवंत परी. गेली सोडून वर्षापूर्वी! तिचा कोण हां .. हां विनय नावाचा मित्र भेटला होता. त्याचे इथे रोज येणे-जाणे सुरू होते. मागे तुमची दुकानामध्ये भेट झाली त्यानंतर काही दिवसातच अंथरूण धरले ते आजही... ती दोघे बाजूच्या खोलीत दिवसाढवळया नंगानाच करायचे, माझ्या छातीवर दळण दळायचे आणि मी.. मी..." म्हणताना त्याला जोराची धाप लागली. शेजारी पडलेला पांढरा शुभ्रपणा रक्ताने पिऊन घेतलेला रूमाल सदाने उचलला तोंडावर धरून पुन्हा बाजूला केला तसे करताना तोंडावर अर्धवट राहिलेली लाली पुन्हा पुसण्याचा प्रयत्न केला. परंतु अगोदरच रक्ताने माखलेल्या रूमालाने नवीन रक्त शोषून घेतलेच नाही उलट रूमालावरील अगोदरचे रक्त गालावर पसरले. त्या अवस्थेमुळे बाळूलाच गलबलून आले...
"त्या दिवशी तुम्ही दुकानात भेटलात तेव्हा वाटलं तुम्हाला बोलाव.. क्षमा मागावी परतु हिंमत झाली नाही. कोणत्या तोंडाने तुम्हाला बोलू? नंतर हा असा आजारी पडलो. प्रभा-विनय यांचा गोंधळ ऐकताना प्रकर्षाने नयनची आठवण येत होती. त्यावेळी माझे आणि प्रभाचे संबंध पाहन नयनची काय अवस्था झाली असेल? असा प्रश्न स्वतःलाच वारंवार विचारून नशिबाला दोष देतोय. काही दिवसानी प्रभा-विनयसह गेली ती कायमचीच..."
"तुम्हाला दोन मुली..."
"आहेत ना. मोठी मुलगी मुक्या मुलींच्या शाळेत असून तिथेच राहते तर दुसरी अपंगाच्या शाळेत आहे. प्रभा मला टाकून गेली आणि मला नयनची आठवण येत राहिली. हातात शक्ती होती तोपर्यंत रोज नयनला पत्र लिहित राहिलो. परंतु टाकण्याचे धाडसच झाले नाही. सकाळी-दुपारी लिहिलेले पत्र सायंकाळी फाडून टाकावे. सहा महिन्यापासून दोन्ही हातांनी साथ सोडली..."
"मग खाणे-पिणे..."
"सारे गड्याच्या भरवशावर. सकाळ-संध्याकाळ गडी येतो. कधी चार दोन घास भरवितो तर कधी दूध-चहाचे चार थेंब तोंडात टाकतो. बाकी साऱ्या क्रिया अंथरूणातच. नयनवर केलेल्या साऱ्या अत्याचाराचा बदला अगदी चक्रवाढ व्याजासह वसूल होतोय मात्र माझे हाल नि भोग अजूनही संपलेले नाहीत. कधी कधी वाटायचं तुम्हाला बोलावून सर्व काही सांगावं. तुम्ही नयनला सांगाल.
कदाचित ती येईलही. पण मी तिला काय म्हणून बोलावू? मी तिला काय दिलं? दुःख आणि दुःखच दिलं हो. आताही ती आली तर मी तिला काय देवू शकेल? पुन्हा दुःखच! शिवाय आता माझा अधिकारच काय ? जिच्या जीवावर, जिच्या पदराआडून मी तिला छळल, जिच्यासाठी मी नयनवर राक्षसी अत्याचार करून तिला इथून पळवून लावलं त्या प्रभाने माझे चांगले पांग फेडले हो. नयन अमरावतीलाच..."
"होय. ती अमरावतीला एका शाळेत मुख्याध्यापिका असून तिला राज्य सरकारचा पुरस्कार मिळालाय. पेपरमध्ये फोटो आलाय. माधवीचं लग्नही ठरलंय..." असे म्हणत बाळूने सोबत आणलेल्या वर्तमानपत्रातील फोटोचा भाग सदाकडे केला. परंतु तिकडे न पाहता गपकन डोळे लावत सदा म्हणाला,
"नको नको. तिच्या आनंदी चेहऱ्याच्या फोटोवरही माझी पापी नजर, काळी छाया नको. उगाच तिला दृष्ट लागायची. माधवीच्या लग्नासंदर्भात मी तुम्हाला बोलावले आहे. गादीखाली माझे चेकबुक आहे. नयनच्या नावे एक लाख रूपयांचा चेक लिहून ठेवलाय. तो घ्या. तिला द्या. मी तिची माफी तर मागू शकत नाही. एकवेळ ती माफही करेल. परंतु मला तिच्याकडून माफी नकोय परंतु हा पैसा घेऊन माधवीच लग्न चांगल धूमधडाक्याने कर म्हणावं..."
"मी तुम्हाला चांगल्या दवाखान्यात..."
"नको नको. आता दवाखाना वगैरे नको. मामांचा खून, नयनला दिलेल्या यातनांची सजा मला भोगू द्या. खरे सांगू, अनेक महिन्यापासून मी खूप समाधानी आहे. घाबरू नका. अहो, जे गुन्हे मी केले त्या पापांची सजा यापेक्षा वेगळी असूच शकत नाही. असे करा, चेक काढून घ्या आणि नयनला द्या. माझी काळजी करू नका. मला सोबत आहे, माझ्या गुन्ह्यांची आणि त्यापोटी मिळणाऱ्या शिक्षेची. बरे झाले, मला वाचा आहे तोवर आलात. कधी वाचा जाईल काही सांगता येत नाही..." सदा म्हणाला आणि त्याने पडल्या पडल्याच गादीची एक बाजू उचलली. बाळूची द्विधा स्थिती ओळखून तोच पुढे म्हणाला,
"हा चेक घ्या. विचार करू नका. तुमच्याकडे प्रथमच आणि कदाचित शेवटचं मागतो. प्लीज, हा.. हा... घ्या. "
शेवटी बाळूने धनादेश घेतला. तो निघाला. खोलीच्या दाराजवळ येताच त्याने पुन्हा मागे वळून सदाकडे पाहिले. सदाच्या डोळ्यातून येणारे पाणी ओठापर्यंत येऊन अगोदर साचलेल्या रक्ताला पुन्हा लाल करीत होते. रंगांच्या डिशमध्ये चित्रकाराने ब्रश फिरवावा तसा सदा जीभ फिरवत होता. बैठकीत निर्ढावलेल्या उंदरांचा खेळ रंगात आला होता. एका वेगळ्याच जाणिवेने तो दाराबाहेर धावला आणि पोटात चाललेली गलबल त्याने बाहेर टाकली. तितक्यात बाळूला वाड्यातून घुबडाचे आवाज ऐकू आले. दोन-तीन घारी बंगल्यावर घिरट्या घालीत होत्या...
बाळूने घरात प्रवेश केला न केला तोच मीनाने विचारले, "काय झाले हो?"
"सदा सिरियस आहे. प्रभा पळून गेलीय..."असे म्हणत बाळूने सारे सांगितले.
"बर झाल. नैनीला छळल्याच पाप त्याला याच जन्मात फेडावे लागतंय. आता लवकर सुटका..."
"न्हाई. अस्सच धा वर्स खितपत पडलं फायजेत." विठा म्हणाली.
"या जन्मात केलेल्या वाईट कृत्यांची फळे सदा भोगतोय. तिकडे संकटांशी सामना करणारी आणि पदोपदी अपमानीत होऊनही केवळ चांगल्या कामामुळे नयन प्रसिद्धीच्या झोतात आहे." असे म्हणत बाळू पुन्हा आंघोळीस गेला. मीनाने चहा ठेवला.
"मालकीन, तायसाबांना लै फावसं वाटत्ये, लै वरीस झाले बगा भेटीला."
"अग आता माधवीचे लग्न ठरतेय. मग होइलच की भेट."
"मला बोलवतील?"
"विठा, तुला नयन बोलावणार नाही असे का वाटते तुला? अगं, ती तुला बोलावणारच..."
"म्या बी येडीच हाय. म्या बलावण्याची वाट कामून फावू? पंद्रा दिस अगुदर जाणार हाय. मझ्या पोरीचं लगीन आन म्या बोलवण्याची वाट फावू? काय म्हणतील तायसाब?"
"काय झालं विठा?" बाळू म्हणाला.
"बाळासाब, मेधातायच्या लगीनाची तारीख मला पैले सांगा बरं का?" असे म्हणत विठा कपबश्या विसळायला ती निघून गेली...
०००

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED