लेडीज ओन्ली - 20 Shirish द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लेडीज ओन्ली - 20

|| लेडीज ओन्ली - २० ||


( वाचकांसाठी एक विनम्र निवेदन -

शिरीष पद्माकर देशमुख यांची 'फरदड' {कथासंग्रह} आणि 'बारीक सारीक गोष्टी' {बालकुमार कथासंग्रह} ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि ही दोन्ही पुस्तके आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिळविण्यासाठी 7588703716 किंवा 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा / वाट्सप करा. 'बारीक सारीक गोष्टी' हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.)


" लेडीज ओन्ली "


|| वीस ||

" विजयाताई... सॉरी.. मी तुम्हाला आता ताई म्हणूच शकत नाही.. तर.. विजयाबाई, मला तुम्हाला विचारायचंय," निकिता पुढे बोलू लागली," आपल्या मुलीचे एका दुसर्‍या परदेशी मुलीशी अनैतिक, अनैसर्गिक संबंध आहेत हे कळल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? "
" काय सांगू... काय प्रतिक्रिया असणार...? " विजयाताईंना उत्तर द्यायचं सुचत नव्हतं.
" नाही.. म्हणजे चांगलं वाटलं... वाईट वाटलं... आनंद वाटला... दुःख वाटलं.. नेमकं काय वाटलं? " निकिता प्रश्न सोडायला तयार नव्हती. " व.. वाईट.. वाटलं... " विजयाताईंना व्यक्त होणं जड जात होतं.
" तरीही तुम्ही तिच्या अन् तिच्या त्या गोऱ्या मैत्रीणीमधल्या संबंधांना मान्यता दिलीत? "
" नाही... मी त्या गोष्टीला विरोध केला.. "
" पण व्हिडिओत तर तुम्ही त्यांचं नातं मान्य केल्याचं स्पष्ट दिसतंय.. ऐकू येतंय.. "
" म.. मा.. माझा... नाईलाज झाला... तरीही माझा विरोध होताच... "
" बरं... म्हणजे त्यांच्या नात्याबद्दल मनात राग असूनही तुम्हाला ते स्वीकारावं लागलं तर...? "
" हं.. हो.. हो... "
" त्या जेनी नावाच्या मुलीचा खून झालाय म्हणे. रागाच्या भरात तर तुम्ही त्या गोऱ्या मुलीचा काटा काढला नाहीत ना? "
" अहो वेड लागलंय का तुम्हाला... काहीतरीच काय बोलताय? " विजयाताईंना तो आरोप सहन नाही झाला.
" ओके ओके सॉरी... " निकीताला आपली चूक लक्षात आली," तुमचा त्या प्रकारच्या नातेसंबंधांना विरोध होता असं म्हणताय तरीही आपल्या मुलीसोबत त्याच प्रकारचं नातं ठेवण्यासाठी तुम्ही कशा काय तयार झालात? " विजयाताई गप्प झाल्या. त्यांना काहीही बोलता येईना." बोला विजयाबाई बोला... " निकिता पुन्हा उसळून टेबल वाजवू लागली, हातवारे करू लागली.
" अहो त्या काय उत्तर देतील, " वर्तकबाईंनी वादात उडी घेतली," आपल्या लेस्बियन पोरीशी संबंध ठेवताना परदेशातून आलेल्या त्या पोरीचा अडथळा येऊ नये म्हणून यांनीच सुपारी दिली असेल तिची... अन् एकदा ती मेली की यांच्या वासनापूर्तीचा घाणेरडा रस्ता मोकळा झाला... " त्या बेछूट आरोप करत सुटल्या. विजयाताईंनी दोन्ही हातांनी डोकं गच्च दाबून धरलं," नाही.. नाही... नाही... " त्या अस्वस्थपणे म्हणत राहिल्या. पण तिथे कुणीही थांबायला तयार नव्हतं. सर्वच बाजूंनी त्यांच्यावर शब्दांचे प्रहार केले जाऊ लागले.
" वाया जाणाऱ्या आपल्या मुलीला योग्य मार्गदर्शन करून नीट वळण लावायचं सोडून ही बाई राजकारण करत समाजाचे उकिरडे फुंकीत बसली.. " शारदाबाईंनीही ही संधी साधत विजयाताईंवर जहरी शब्दांचे बाण सोडायला सुरूवात केली," घरातल्या जबाबदार व्यक्तीनेच कुटूंबव्यवस्थेला विकृत विचारांच्या गटाराचं स्वरूप दिलं तर कसं व्हायचं आपल्या समाजाचं? आपल्या देशाचं? शेवटी बलात्काराची पैदाईश... बलात्कार पचवलेली माय अन् त्यातून पैदा झालेली आवलाद... काय अपेक्षा ठेवायच्या समाजानं यांच्याकडून?? "
" ज्या आईने मुलीवर सुसंस्कार करायचे ती आईच जर मुलीला वाममार्गाला लावत असेल तर खरंच खूप वाईट दिवस येणार आहेत यापुढच्या काळात.. " खिरेमॅडमांनीही आपलं मत मांडलं.
" विजयाबाई.... आहे का तुमच्याकडे एकाही प्रश्नाचं उत्तर? " निकीताने हल्लाबोल सुरू केला," कसं समर्थन करणार आहात तुम्ही तुमच्या निर्लज्ज कृत्याचं... बोला.. उत्तर द्या... "
सर्वच बाजूंनी विजयाताईंना घेरण्याचा प्रयत्न होत होता. काळजावर ओरखडे ओढत जाणारे ते जहरी शब्द त्यांना असह्य होत होते. त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले. पॅनलवर बसलेल्या त्यांच्या बाजूच्या बायका अजूनही बडबडतच होत्या. पण आता त्यांना आजूबाजूच्या कुणाचाही आवाज ऐकू येत नव्हता. त्यांनी फक्त त्यांच्या मनातून येणाऱ्या आतल्या आवाजावर लक्ष केंद्रित केलं. अन् आपल्या खुर्चीतून त्या ताडकन उठून उभ्या राहिल्या.
" बस्स...!! " त्या हात पुढे करून गरजल्या अन् सगळ्यांचाच आवाज बंद झाला..." खूप झालं... खूप बोललात तुम्ही... अन् खूप ऐकलं मी... पण आता बस्स..!! हो.. आहे माझी मुलगी बलात्काराची पैदाईश... नाही माहित मला तिचा बाप कोण आहे तो... पण मी आई आहे तिची.. तिचं पालनपोषण संगोपन करण्यासाठी समर्थ असणारी आई..! आयुष्यात ना मला कधी नवऱ्याची गरज भासलीय, ना मी तिला बापाची गरज भासू दिलीय... माणूस म्हणून जगण्यासाठी जे काही संस्कार द्यायला हवे होते ते दिलेत मी तिला..! आणि तिच्या सुसंस्कृतपणाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही..
राहिला प्रश्न तिच्या लेस्बियन असण्याचा तर ती जशी आहे तशी मला मान्य आहे... माझी मुलगी आहे... निसर्गानं तिला जसं बनवलंय तसं मी स्विकारलंय तिला.. केवळ स्त्री आणि पुरुष या दोनच जाती असतात या अज्ञानातून समाजाने बाहेर पडलं पाहिजे आता... तुमच्या आसपास फिरणारे तृतीयपंथी लोक , लेस्बियन, गे... हे सगळे आपल्याच समाजाचा अविभाज्य भाग आहेत... तुम्हाला त्यांच्या असण्यावर आक्षेप घेण्याचा काहीही अधिकार आहेत. ते आहेत आणि त्यांना या समाजात सन्मानाने जगण्याचा अधिकारही आहे... तुम्हाला मान्य असो किंवा नसो... संस्कृतीच्या हस्तीनापूराच्या रक्षणाची जबाबदारी घेतलेल्या अन् स्वतःला भीष्माचार्य समजणाऱ्या समाजाच्या पितामहांनी शिखंडीचं अस्तित्व नाकारणं बंद करावं आता....!" ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हा वाहू लागावा तशा विजयाताई शब्दांतून आग ओकू लागल्या होत्या," अश्रवी... माझी मुलगी... अवघं जगणं, अवघे श्वास पणाला लावून मी लहानाचं मोठं केलंय तिला. संकटांच्या महावादळांतही पदराखाली झाकून जपलंय तिला... माझी खूप इच्छा होती... फॉरेनला शिकलेल्या आपल्या मुलीसाठी आपण फॉरेनचाच मुलगा शोधावा एखादा..धुमधडाक्यात त्यांचं लग्न लावून द्यावं... त्यांच्या चिमुरड्या लेकरांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवावं... त्या चिमण्यांच्या बोबड्या बोलांनी 'आजी आजी' म्हणत आपल्याला भांडावून सोडावं.. असं खूप काही वाटायचं... पण पुन्हा एकदा माझ्याच जीवनानं मला उद्ध्वस्त केलंय.. पण हे आयुष्या, तुही लक्षात ठेव... तू जेव्हा जेव्हा मला जाळून खाक केलंयस... तेव्हा तेव्हा मी फिनिक्सागत उठून आभाळाच्या दिशेने झेप घेतलीय... आताही उठेन... पुन्हा झेप घेईन..!! माझ्या लेकीसाठी.. होय... माझा खूप जीव आहे तिच्यावर... तिच्यासाठी मी काहीही करू शकते... अगदी काहीही...!! म्हणूनच जेव्हा जेनीच्या शोधात ती मला सोडून जाणार आहे हे माझ्या लक्षात आलं तेव्हा मी तयार झाले... तिच्यासाठी जेनी व्हायला...! "
" म्हणजे स्वतःच्या मुलीशी शरीरसंबंध ठेवायलाच ना..? " निकीताने मध्ये बोलायचा प्रयत्न केला.
" पण... " विजयाताईंनी निकितापेक्षाही मोठा आवाज काढला.. ती गप्प झाली," पण... माझ्या लेकीला तिच्या चुकीची जाणीव झाली.. आपली आई आपल्यासाठी काहीही करू शकते या जाणिवेने ती अस्वस्थ झाली. तिने माझे पाय पकडले. ती ढसाढसा रडली. तिच्या चुकीसाठी तिने माफी मागितली... हा पुढचा व्हिडिओ कुठे आहे निकिताबाई? मला तर तुम्हाला बाई म्हणायची सुद्धा लाज वाटतेय. तुमच्या टीआरपीच्या खेळासाठी एका मुलीच्या अन् आईच्या नात्याचा असा बाजार मांडलाय तुम्ही.... मला कोणत्याही परिस्थितीत माझ्या मुलीला गमवायचं नव्हतं. त्यासाठी मला बोलावं लागलं... त्या एका वाक्याच्या आधारावर एवढी आग लावलीत तुम्ही... शेम... धिक्कार तुमचा.. अन् तुमच्या बाजारबसव्या पत्रकारितेचा...!! येते मी.. नमस्कार.. " विजयाताईंनी दोन्ही हात जोडून नमस्कार ठोकला अन् तिथून जायला निघाल्या. पण निकिताने त्यांना रोखले.
" शो अजून संपलेला नाही... विजयाबाई... तुम्हाला असं जाता येणार नाही..मी तुम्हाला विनंती करते.. प्लीज... बी सीटेड..! " जायला निघालेल्या विजयाताई थांबल्या. पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसल्या.
" प्रेक्षकहो, आपण विजयाताईंची बाजू ऐकून घेतली. आपल्या पोटच्या पोरीसाठी कोणत्याही थराला जाण्याची, कोणतंही दिव्य पार करण्याची ताकद एका आईमध्ये असते. त्याचे दाखले आपण इतिहासात बघितलेत. मला वाटतं विजयाताई देखील एक माय म्हणून हिमालयाएवढ्या मोठ्या आहेत... त्यांच्यावर ओढवलेले संकटांचे प्रसंग हे निश्चितपणे विलक्षण आहेत.. पण त्यांनी त्या प्रत्येक प्रसंगाला ज्या धीरोदात्तपणे तोंड दिलंय... त्याला खरोखरच तोड नाही. मी विजयाताईंमधल्या मातेला अन् मातृत्वाला मनापासून सलाम करते... " निकिताच्या बोलण्याची भाषा आता बदलली होती. शारदाबाई अन् वर्तकबाईंचे आक्रमक चेहरेही हिरमुसून गेले होते.
" मी आता जातेय आमची चीफ करस्पाँडंट दीप्तीकडे... काही वेळापूर्वी राधाबाईंजवळ असलेली दीप्ती आता पोहोचलीय 'लेडीज ओन्ली' या ठिकाणी. 'लेडीज ओन्ली' हे विजयाताईंच्या घराचं नाव आहे. त्या ठिकाणी आता आपण संवाद साधणार आहोत या सर्व प्रकरणात एक महत्वाची भुमिका असणाऱ्या विजयाताईंच्या मुलीकडे.. म्हणजेच अश्रवीकडे. तिचं मत आणि तिच्या भावना जाणून घेण्यासाठी..
दीप्ती... दीप्ती.. माझा आवाज येतोय तुला? "
" हो.. हो... बोल निकिता... "
" दीप्ती कुठे आहेस तू आता? "
" मी विजयाताईंच्या घरासमोरच्या रस्त्यावर आहे निकिता... "
" बरं... अश्रवीशी भेट झालीय का दीप्ती? तिची काय प्रतिक्रिया? "
" नाही निकिता... अश्रवीशी भेट झालेली नाही अजून... कारण... कारण... "
टीव्हीच्या पडद्यावर दीप्ती दिसत होती. अन् ती बोलत असतानाच कॅमेरा तिच्या बाजूच्या घराच्या दिशेने फिरला. 'लेडीज ओन्ली '. विजयाताईंचं घर. त्या घराभोवती शेकडो लोक जमा झाले होते. ते विजयाताई अन् अश्रवीला शिव्या देत होते. 'हाय हाय, मुर्दाबाद'च्या घोषणा देत होते. ते दृश्य दाखवत दीप्ती रिपोर्टिंग करू लागली.
" लेडीज ओन्ली या विजयाताईंच्या घराभोवती लोकाचा जमाव झाला आहे. लोक ओरडताहेत. विजया, अश्रवी मुर्दाबाद अशा घोषणा देत आहेत. विजया, अश्रवी यांनी या देशातून चालत्या व्हा! असंही ते म्हणताहेत. आपण बघतोय की हा जमाव बराच चिडलेला अन् संतप्त दिसतोय. आपण यातल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. "
दीप्ती जमावाच्या दिशेने पुढे गेली. जीन्स टीशर्टचा पेहराव केलेल्या, हायड्रोजनने केस रंगवलेल्या एका सुशिक्षित दिसणाऱ्या मुलाजवळ जाऊन दीप्ती त्याला प्रश्न विचारू लागली," तू का आलास इथे? "
" निषेध करायला.. "
" कशाचा निषेध? "
" या लेस्बियन मायलेकींचा... "
" तुला कसं कळलं त्या लेस्बियन आहेत ते? "
" प्रो महाराष्ट्र चॅनेलवरचा शो बघून... "
" निकिता... हा आपल्या चॅनेलवरचा शो बघून आलेला तरुण आहे... मला वाटतं टीआरपी पेक्षाही हा आपल्या शो साठी मोठा सन्मान आहे..." दीप्तीने आपल्या न्यूज चॅनेलची अन् निकीताचीही पाठ थोपटून घेतली, "बरं काय म्हणणं आहे तुझं या प्रकाराबद्दल? "
" या मायलेकी आपल्या समाजासाठी... देशासाठी कलंक आहेत... त्यांना या देशात राहण्याचा काही एक अधिकार नाही... मुर्दाबाद मुर्दाबाद.. " अन् तो ओरडत राहिला.
" निकिता, आपण बघतोय की लोक चिडले आहेत. जनप्रक्षोभ उसळला आहे. मी इथल्या प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहे. आपल्या चॅनेलचा जनमानसावर किती प्रभाव आहे त्याचं जिवंत उदाहरण आज इथे बघायला मिळतंय. शेकडोंच्या संख्येने इथे जमलेले लोक केवळ आपल्या चॅनेलचा शो बघून आलेले आहेत... " दीप्ती बोलत राहिली.
" हो दीप्ती... आम्ही परत येतोय तुझ्याकडे.. "
"मला जाऊ द्या... माझी मुलगी एकटीच आहे घरी..." विजयाताई विनवणी करू लागल्या, " इतक्या संख्येने लोक माझ्या घराभोवती जमलेत.. काही विपरीत व्हायच्या आधी मला घरी गेलं पाहिजे... माझी मुलगी एकटी आहे.. ती घाबरली असेल.." विजयाताई घाबरून गेल्या होत्या. त्यांचं सर्वांग थरथरायला लागलं होतं. घशाला कोरड पडली होती.
" हो.. आम्ही तुम्हाला लगेच घरी सोडण्याची व्यवस्था करतो... " निकीतानेही परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं. ती न्यूजरूममधल्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली.
" निकिता... इथे परिस्थिती चिघळत चाललीय... " दीप्ती पुन्हा एकदा कनेक्ट झाली होती," मी दीप्ती 'लेडीज ओन्ली' वरून थेट लेटेस्ट अपडेट देत आहे फक्त प्रो महाराष्ट्र न्यूज चॅनेलवर. "
" बोल काय अपडेट्स आहेत दीप्ती..? " निकिताने विचारले.
" इथला जमाव वाढत चाललाय निकिता... " पडद्यावर विजयाताईंच्या घराची दृश्यं दिसू लागली," आणि लोक हिंसक व्हायला लागलेत.. काहीजण 'लेडीज ओन्ली' वर दगडफेक करायला लागलेत. आपण बघू शकतो की विजयाताईंच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत... " टीव्हीच्या पडद्यावर चित्र दिसू लागलं.
" आपण बघताय एक्सक्लुजिव दृश्य... विजयाताईंच्या घराचे.. " निकिता निवेदन करू लागली," आपण बघताय काचांचा पडलेला खच... आपण बघताय लोक भिरकावत असलेले दगड.. चिडलेल्या जमावाच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेची ही दृश्य सर्वात प्रथम आणि सर्वात आधी फक्त आपल्याच न्यूज चॅनेलवर.. "
विजयाताईंची अस्वस्थता वाढली. त्या उठून जाण्याचा प्रयत्न करू लागल्या. 'मला जाऊ द्या... मला जाऊ द्या...' पुन्हा पुन्हा म्हणू लागल्या. शारदाबाईंनी त्यांचा हात पकडला. खुर्चीत बसवले," आता जाल तर तुमचा जीवही धोक्यात येईल... " त्या समजावू लागल्या.
" दीप्ती... दीप्ती... कॅमेरा झूम करायला सांग... आपल्याला अश्रवीचा चेहरा दाखवायचाय प्रेक्षकांना... फुटलेल्या खिडकीतून.. किंवा कुठूनही दिसतोय का बघ.. " निकीताने सांगितले. कॅमेरा फिरला. अश्रवीचा शोध घेऊ लागला. झूम केल्यानंतर खिडकीची फुटलेल्या काचेच्या आत एक अस्पष्ट चित्र दिसलं. भेदरलेली अश्रवी. जीव मुठीत धरून खुर्चीत बसलेली अश्रवी. भितीने अंगाचा थरकाप उडालेली, घामाघूम झालेली अश्रवी.
" प्रेक्षकांनो, आपण ही एक्सक्लुजिव दृश्य बघताय सर्वात प्रथम सर्वात आधी फक्त प्रो महाराष्ट्र न्यूज चॅनेलवर..." निकिताचं निवेदन, "आता आपण पडद्यावर जी भेदरलेली मुलगी बघताय ती आहे अश्रवी. जमावाच्या हल्ल्याने घाबरून जाऊन जीव मुठीत धरून घरात बसलेली ही आहे विजयाताईंची मुलगी. जेनी नावाच्या परदेशी मुलीशी शरीरसंबंध ठेवणारी हीच ती लेस्बियन मुलगी... याच मुलीशी संबंध ठेवण्यासाठी हिची आई तयार झाली होती... ही दृश्य आपण बघताय... फक्त आमच्या चॅनेलवर... "
मुलीचा चेहरा टिव्ही स्क्रीनवर बघून विजयाताईंच्या मनातली घालमेल वाढली. त्यांचे डोळे वाहू लागले.. त्या अस्वस्थपणे ओरडल्या... 'अश्रूबाळ....'
" आणि आपण बघताय.... विजयाताईंच्या घराला जमावातल्या कुणातरी समाजकंटकांनी आग लावलीय... हे दृश्य तुम्हाला इतर कुठेही बघायला मिळणार नाही.. सर्वात प्रथम.. सर्वात आधी.. एक्सक्लुजिवली.. फक्त आमच्याच चॅनेलवर...
आपण टीव्ही स्क्रीनवर बघताय... लेडीज ओन्ली चहूबाजूंनी पेटलंय... आगीच्या ज्वाळा आकाशाच्या दिशेने झेपावयाला लागल्यात.... घराचा एकेक भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडायला लागलाय.. लोक ओरडायला लागलेत... इकडून तिकडे धावपळ करायला लागलेत.. पण कुणीही आग विझवण्याचा प्रयत्न करत नाहीये... आग वाढतच चाललीय...प्रेक्षकहो, याआधीही आपण विझलेल्या आगीची अनेक दृश्यं पाहिली असतील. पण थेट आग लावणारी माणसं, लागलेली अन् वाढत जाणारी आग आपण पहिल्यांदाच लाईव्ह बघताय .. ही सगळी दृश्ये आपण बघताय.. फक्त आमच्या चॅनेलवर..!! " निकिता जणू आगीचं धावतं वर्णन ऐकवत होती. मध्येच तिने दीप्तीला पुन्हा सुचना केली." कॅमेरा झूम करून घरातली दृश्यं दाखव... अश्रवीवर कॅमेरा स्टाॅप कर.. " अन् पुन्हा एकदा कॅमेरा अश्रवीवर जाऊन स्थिरावला.
" आपण बघताय विजयाताईंची मुलगी... ती आगीच्या तावडीत सापडलीय... ती मघाशी खुर्चीत बसलेली होती पण आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहे. घराबाहेर पडण्यासाठी कुठून वाट सापडतेय का याचा शोध घेत आहे. पण आग सगळ्याच बाजूंनी लागलीय आणि आगीचे लोट तिला गिळंकृत करण्यासाठी तिच्या दिशेने झेपावताहेत.. ती मागे सरकून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतेय... आणि हा मागच्या बाजूचा आगीचा लोट... तिच्या पाठीला स्पर्श करून गेलाय... ती विव्हळायला लागलीय असं दिसतंय... तिची पाठ भाजून गेलीय.. आपल्याला तिचा आवाज येत नाहीये.. पण तिच्या चेहऱ्यावरून आपण अंदाज लावू शकतो... तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकवता आला असता तर बरं झालं असतं पण... आमचा कॅमेरा दूर असल्यामुळे ते शक्य होत नाहीये... ही सगळी भयावह दृश्यं आपण बघताय फक्त आमच्या चॅनेलवर... मी प्रेक्षकांना विनंती करीन की आपली मुलं जर आता टीव्ही बघत असतील तर त्यांना बाहेर पाठवा. ही काळीज हेलावून टाकणारी दृश्यं मुलांच्या मनावर वाईट परिणाम करू शकतात. तेव्हा त्यांची काळजी घ्या...
खरंतर वेळ झालाय एका कमर्शियल ब्रेकचा... पण व्यावसायिक नफ्यापेक्षा या क्षणी आम्हाला त्या मुलीच्या जीवनाची अधिक काळजी वाटत आहे. म्हणून ब्रेक न घेता आम्ही तुम्हाला दाखवत आहोत ही दृश्यं... लाईव्ह.. आणि नॉनस्टॉप..!
आणि आपण बघताय अग्नी त्या मुलीच्या अंगावर झेपावलाय. तिच्या कपड्यांनी पेट घेतलाय. ती जोरजोरात ओरडतेय. आग वाढत चाललीय. ती हात वर करून इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न करत आहे. आगीनं तिच्या शरीराला चहूबाजूंनी घेरलंय. आता ती पूर्णपणे पेटलीय... तिची त्वचा जळून खाक झालीय... ती जमिनीवर कोसळलीय... तिच्या शरीराचा कोळसा झालाय... ती जळून राख झालीय..!! समाजकंटकांनी लावलेल्या आगीत एक निरपराध निष्पाप तरूणीचा जळून मृत्यू ..... ही आहे आत्ता या क्षणाची... ताजी ब्रेकिंग न्यूज...!
काय सांगाल शारदाताई? "
" मी माझ्या, माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या अन् पक्षाच्या वतीने अश्रवीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहते.... "
" वर्तकबाई? "
" ईश्वर मृतात्म्यास शांती आणि सद्गती देवो.. "
" जोशीमॅडम? "
" खूपच दुर्दैवी आणि काळीज हेलावून सोडणारी घटना... मी त्या समाजकंटकांचा निषेध करते.. आणि अश्रवीला श्रद्धांजली अर्पण करते.. "
" विजयाताई... तुमची मुलगी आता या जगात नाही... काय सांगाल तुम्ही? कसं वाटतंय तुम्हाला? "
दगड झाल्यागत विजयाताई खुर्चीत स्तब्ध बसलेल्या होत्या.
" विजयाताई, आम्ही सर्वजण तुमच्या दुःखात सहभागी आहोत... तुम्ही सावरायला हवं स्वतःला. "
विजयाताई स्तब्धच..
" अश्रवीचा इतका करून अंत होईल असं कुणालाही वाटलं नसेल.. " निकिता खुर्चीतून उठून विजयाताईंच्या जवळ गेली," तुमच्या या दुःखाच्या प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत... " निकीताने त्यांच्या खांद्याला हात लावला. तोच विजयाताई समोरच्या टेबलावर कोसळल्या. निकिताने एकच किंकाळी फोडली. पॅनलवरच्या सगळ्या बायका उठून इकडे तिकडे पळू लागल्या. पाहता पाहता तिथे कुणीच उरलं नाही. स्टूडिओमध्ये एकच खळबळ उडाली. कॅमेरा चालूच ठेवून कॅमेरा वाले अन् इतर क्रू मेंबरही स्टूडिओबाहेर पळाले. टेबलावर पडलेल्या विजयाताई आणि बाजूला उभी असलेली निकिता... दोघीच होत्या तिथे. निकिता घाबरून गेली होती. तरीही तिने स्वतःला सावरलं. एक दीर्घ श्वास घेतला. आपल्या खुर्चीच्या बाजूला येऊन उभी राहिली. कॅमेऱ्याकडे बघत बोलू लागली..
" प्रेक्षकहो, तुम्ही आजवर मेलेली माणसं अनेक बघितली असतील... पण आज माणूस मरताना लाईव्ह अँड एक्सक्लुजिवली बघताय फक्त प्रो महाराष्ट्र चॅनेलवर. तिकडे आगीच्या तावडीत सापडून अश्रवी जळून मेली. अन् मुलीच्या मरणाच्या धक्क्याने तिची आई म्हणजे विजयाताई... आज आत्ता या स्टूडिओमध्येच त्यांनी प्राण सोडला... ही विलक्षण आणि अलौकिक दृश्यं बघण्याचं सौभाग्य तुम्हाला मिळालंय फक्त आमच्या न्यूज चॅनेलमुळे. तेव्हा नेहमी आणि नियमित बघा. प्रो महाराष्ट्र न्यूज. आजच्या कार्यक्रमात मी इथेच थांबते. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात.. नवा विषय.. नवी चर्चा घेऊन.. तो पर्यंत पहात राहा.. प्रो महाराष्ट्र न्यूज..! शुभरात्री..!! " आणि शो संपला. कॅमेरा बंद झाला..!
" एऽऽऽ.... " निकिता कानावर हात ठेवून मोठ्या आवाजात ओरडली," अरे उचला यार हिला लवकर... या कुणीतरी... " बाहेर उभे असलेले स्पॉटदादा आणि इतर सहकारी धावतच आत आले," अरे उचला या मढ्याला... बाहेर घेऊन जा लवकर... " ती किंचाळत राहिली. ओरडतच शन्नोजवळ गेली. तिला मिठी मारून बोलली," टीआरपीसाठी मढ्यासोबत शो कंटिन्यू केलाय आज मी... महत्वाकांक्षेसाठी याहून जास्त कोणी काही करू शकेल?? "
शन्नो निकिताची पाठ थोपटत राहिली...!!

© सर्वाधिकार सुरक्षित -

© शिरीष पद्माकर देशमुख ®


{ 'लेडीज ओन्ली' या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.
'लेडीज ओन्ली' कथामालिका कादंबरीच्या संदर्भातली सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}

© शिरीष पद्माकर देशमुख ®


|| लेडीज ओन्ली - २१ ||

( वाचकांसाठी एक विनम्र निवेदन -

शिरीष पद्माकर देशमुख यांची 'फरदड' {कथासंग्रह} आणि 'बारीक सारीक गोष्टी' {बालकुमार कथासंग्रह} ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि ही दोन्ही पुस्तके आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिळविण्यासाठी 7588703716 किंवा 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा / वाट्सप करा. 'बारीक सारीक गोष्टी' हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.)



" लेडीज ओन्ली "

|| एकवीस ||

आठ मार्च.. महिला दिनाच्या दिवशी प्रो महाराष्ट्र न्यूज चॅनेलवर बातम्या झळकल्या....

शारदाबाई थोरात शहराच्या नव्या महापौर.

अनुजाताई वर्तकांची संस्कृती रक्षण सभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड...
.
डॉ. इरा खिरे यांना स्त्री भुषण पुरस्कार...

आणि

प्रो महाराष्ट्र न्युज चॅनेलच्या प्रमुख संपादक पदी निकीता साबळे यांची नियुक्ती..!!


© सर्वाधिकार सुरक्षित -

© शिरीष पद्माकर देशमुख ®


{ 'लेडीज ओन्ली' या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.
'लेडीज ओन्ली' कथामालिका कादंबरीच्या संदर्भातली सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}

© शिरीष पद्माकर देशमुख ®