सौभाग्य व ती! - 34 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सौभाग्य व ती! - 34

३४) सौभाग्य व ती !
माधवीच्या लग्नाची तयारी सुरू झाली. वर्तमानपत्रातून भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर मालकाने भाऊंना नोकरीहून कमी केलं होतं. तेव्हापासून भाऊ अत्यंत निराश होते. मूकदर्शक बनून घरातील प्रत्येक हालचाल न्याहाळत असत. लग्नाच्या बाबतीत ते चकार शब्द बोलत नसत.
नयनची आई जमेल तसं निवडण्याचे काम करीत होती. मीरा-माधव, आशा मधुकर मदतीला होतेच. आई-अण्णा अधूनमधून चक्कर टाकत असत. किशोरही काय हवं -नको ते विचारीत असे. किशोर आणि माधवनेही आर्थिक मदतीची तयारी दर्शविली होती. परंतु नयनने नकार दिला. सर्व पाहुण्यांची यादी तयार झाली. जमणारे सारे पाहुणेच होते. घरची एकटी फक्त नयनच होती. यादीप्रमाणे सर्वांच्या आहेराची खरेदी झाली. माधवीसाठी पाच तोळे सोन्याचे दागिने घेतले.
माधवी-इंद्रजितने एकमेकांचे कपडे पसंतीने घेतले. जेवणाचा मेनुही ठरला. खर्चाचा आकडा दीड लाखापर्यंत फुगला होता. थोडेफार पतसंस्थेचे कर्ज झाले होते...
एक-एक दिवसाने लग्नाचा दिवस जवळ येत होता. सर्वांना अगदी विठाबाईला आणि भाईजीलासुद्धा लग्नपत्रिका दिली होती. शाळेला सुट्ट्या असल्यामुळे कार्यस्थळ शाळा होती. हळूहळू लग्नाचा दिवस जवळ येत होता. तसतसा कामाचा डोंगर वाढत होता. एक काम हातावेगळं होत नाही तोच दुसरे काम दत्त म्हणून समोर उभा ठाकत असे.
लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. देवप्रतिष्ठा बसविणे, इतर धार्मिक विधींसाठी मुलीच्या आईवडिलांची चर्चा सुरू झाली. मात्र आशा-मधुकरने धार्मिक सोपस्कार पार पाडायची तयारी दर्शविली. त्या दोघांसोबत माधवीच्या लग्नाचा कार्यक्रम सुरू असताना नयनला गलबलून येई, डोळ्यांमध्ये आसवांची दाटी होत असे परंतु महत्प्रयासाने ती त्यांना आवर घालत असे. मुखावर हसू आणून प्रत्येक काम हातावेगळे करी. कर्तव्य म्हणून तिने सदाशिवलाही पत्रिका पाठविली होती. त्याची मरणासन्न अवस्था माहिती असूनही तो लग्नास येईल हा विचार सातत्याने तिच्या मनात येत असे. दारापुढे ऑटो थांबताच सदाच आला आहे ही आशा उसळी पेई परंतु दुसरा पाहुणा दिसताच ती नाराज होत असे. शेवटी आशाच ती! अनेकांना झुलवते, जिवंत ठेवते. अनेकांच्या इच्छा फलद्रुप होतात त्यावेळी त्यांना होणारा आनंद वर्णनातीत असतो. आशा प्रत्यक्षात उतरत नसतानाही माणूस आशा सोडत नाही. एका अर्थाने मानवी जीवनातील आशा ही कलियुगातील शक्तीबल आणि कार्यबल आहे...
त्यादिवशी सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास दारापुढे ऑटो थांबला. सवयीप्रमाणे नयन बाहेर आली. ऑटोतून बाळू, मीना आणि त्यांचा मुलगा उतरत होते आणि जो विश्वास होता, जी आशा होती ती विठाबाईही उतरत होती. दीड तपानंतर दोघी एकमेकींना पाहत होत्या. एका अनामिक संवेदनेने नयन पळत सुटली. विठाही लगबगीने पुढे झाली. दोघी समोरासमोर आल्या. क्षणभर दृष्टभेट झाली आणि दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. दोघींच्याही डोळ्यातून जणू अरबी-हिंदवी महासागर पाझरत होते. निःशब्द प्रेमाची जणू भरती आली होती. रस्त्याने जाणारे-येणारे थबकून ते अनोखे दृश्य डोळ्यात साठवून पुढे जात होते. कितीवेळ झाला असेल कदाचित काही क्षण काळही थबकला असावा. मीनाने बोलण्याचा प्रयत्न केला परंतु बाळूने तिला खुणावले. सारे वातावरण स्तब्ध झाले. पहिला पूर ओसरला परंतु दोघी वेगळ्या झाल्या नाहीत. विठाच्या खांद्यावर मान ठेवून नयन म्हणाली,
"वि..विठा, तुला राग तर आला नाही?"
"राग? त्यो...त्यो कामून?"
"त्यादिवशी तुला न सांगता मी निघून आले याचा..."
"त्या दिसी राग आल्ता पर आज न्हाई. तायसाब, तुमी त्यो कैदखाना सोडला त्यापायीच ह्यो सोन्याचा दिस गावला. मझं आईकून तुमी तिथच पिचत पडल्या असत्या... मही जीभ झडो पर त्यांनी तुमास जित्तच..." असे म्हणत विठा थांबली. नयनही सावरली होती. तिने विठाला मोकळी केली. पुन्हा एकवार तिने विठाचे निरीक्षण केले. ती अंगापिंडाने थोडी सुटली होती, केससुद्धा पूर्ण पांढरे झाले होते. आवाज मात्र तसाच ठणठणीत होता. नयनचे लक्ष विठाबाईच्या मागे असलेल्या युवकाकडे गेले. तो बिचारा दोन्ही हातात सामान घेवून ताटकळत उभा होता. नयनने विचारले,
"विठा, हा..हा.."
"मझं पोरग हाय! रामदास! पोलिसात हाय!"
"अग...अग... तो अवघडलाय! या. आत या." नयनच्या पाठोपाठ सारे आत आले. तितक्यात कुणास काही समजायच्या आत माधवी पुढे होऊन विठाच्या पायाशी वाकली परंतु तिला मध्येच अडवून छातीशी कवटाळत विठा म्हणाली,
"न्हाय. न्हाय. सानुताय न्हाई. अगोबाय, कित्ती मोठ्या झाल्या व्हो. मला वाटलं, मझी मेधाबाय मला वळखते का न्हाई, तायसाब, या छकुलीला काळी टीक लावा व्हो.आता म्या आले न्हव, मंग मीच लावते बगा..."
"ये मावशी, हे सानूताय बंद कर. तू आपलं छकुलीच म्हण. नाहीतर मी बोलणारच नाही..."
"न्हाई. आस्स बोलायचं न्हाई. जीव गेल्यावानी व्हते व्हो, आता हसा हं. माझी छकुली ग..."
विठाबाईच्या आगमनाने सारे संदर्भ बदलले. प्रेम काय चीज असते, निःस्वार्थ प्रेम काय असते त्याचा आदर्श म्हणजे विठा!
दुपारची जेवणे झाली. काम तसं विशेष नव्हतं. लहानसहान कामे बाळू आणि माधव करीत होते. नयनने विठाबाईस वरती बोलावून घेतले. आशा खाली जमलेल्या पाहुण्यांमध्ये व्यस्त होती. दोघी सोफ्यावर बसल्या. काय बोलायच ते दोघींच्या ओठी होतं परंतु कुणी सुरुवात करावी? शेवटी निःशब्द वातावरणाचा भेद करून नयन म्हणाली,
"विठा, बाळू मागे म्हणत होता, तुझे मालक..."
"हां. मेल्यातच हाय. कव्हा जात्ये की मुडदा. आता तर वाचा बी गेली. बाळासायबांना बोल्ले ते आखरी. तव्हापासून नुस्ते फातात. वाड्यात कुणी बी जात न्हाय. हागणदारीत कोण जाईल? कोसभर वास जात्ये. लोकांनी म्हणे म्युनशीपाल्टीत लिवून देलय. काय व्हते, काय ठाव? पर तुमच्यावर केलेल्या जुलमाचा बदला..."
"अग पण, प्रभा..."
"त्या सटवीचं नाव कशाला घेता? अवो, डुकरीनच ती. घाण गावल तिकडेच जाणार, धनी खाटेवर पडले आन् तिनं नंगानाच घातला. रात- रात बाहीर ऱ्हायाची..."
"मग सदा..."
"अव्हो, त्यान्लाच मारायची. त्यांनी हूं का चूं केलं की दे ठोका न्हाय तर दे चटका. पुरा बदला बगा घेतला.. तुमचा..."
"त्यांची मुलं..."
"हात की दोन! येक मुकी अन् दुसरी लंगडी..."
"प्रभा गेल्यापासून त्यांची सोय..."
"आता ग बया, सोत्ता जाता की काय? काय सोभाव बाई. इतल छळल, इधवेवाणी पर... ती गेली
आन् ह्येंनी खाट पकडली. मांदळ पैका हाय तव्हा बरं हाय. गड्याला शंबर रुपै रोज हाय. त्यो जमाल तसं करतो. धन्याला घाणीतच ठिवतो. जाताना शंबर रूपै आन ढाळजातले बी गहू बी नेतो..."
"अग, पण..."
"जावू द्या व्हो. कहापायी उकंडे उकरता? दिस फिरले का? कशी नकेसत्रावाणी पोर हाय. धूमधडाक्यात लगीन करून गुमान ऱ्हावा. त्येची सय काढून... पण आज संजूतायची लईच सय यायली बगा. वाटत्ये, आत्ता पळत येईल आन् गळ्यात पडल..." विठाबाई बोलत असताना बाहेर ऑटो थांबल्याचा आवाज आला. नयन पाठोपाठ विठाबाईही खाली आली. आत आलेल्या कमाआत्याच्या नयन पाया पडली. तशी कमात्या म्हणाली,
"पोरी कमावलस. पोरीचे सोने केले ग. किती त्रासात दिवस काढलेस नयन तू.त्याचे फळ मिळाले."
सीमांत पूजनाच्या दिवशी सकाळीच सारे सामान शाळेत आणले. खरे तर शाळा हेच तिचे हक्काचे घर झाले होते. दुपारपासून पाहुणे येत होते. वराकडील मंडळी येण्याची वेळ झाली. त्यांच्या स्वागताला सारे सज्ज झाले. एका खोलीत बायकांमध्ये बसलेल्या नयनचे डोळे पाणावल्याचे कुणाच्या नाही पण विठाबाईच्या लक्षात आले तशी ती म्हणाली,
"तायसाब, हे काय? अहो, आता काय कमी हाय? पोरीचा सौंसार उभा व्हतोय..."
"विठा, अग आज संजीवनीची फार आठवण येते ग."
"हा तायसाब. आज बेबी फायजे व्हती. जावू द्या. आसतो एकेकाचा भोग. त्येंच आयुक्स तेव्हढच. त्ये काय कोन्हाच्या हाती हाय. त्या मड्याला उचलून त्येची जिंदगानी संजूबायला देली आसती तर?" विठा म्हणाली.
तितक्यात एकच आवाज झाला, "वऱ्हाड आल, वऱ्हाड आलं..." दोघी बाहेर आल्या. वऱ्हाडी मंडळीला सन्मानाने आत आणण्यात येत होते. पाहुण्यांचे चहापाणी चालू असताना कार्यालयातील फोनची घंटा वाजली. भाईजीने तो उचलला, "हॅलो..."
"भाईजी, जरा ताईंना बोलव..."
"हॅलो, खांडरेसाहेब..."काही क्षणांनी तिथे पोहचलेली नयन म्हणाली.
"ताई, सगळे ठीक आहे ना? कशाची कमतरता नाही ना? काहीही हवं असेल तर निःसंकोचपणे सांगा. माझ्या भाचीच्या लग्नात कशाचीही ददात भासू नये."
"भाऊसाहेब, सगळं ठीक आहे. गरज पडलीच तर भाईजीस पाठवीन. पण लग्नाला मात्र तुम्ही..."
"ताई, हे काय सागणं झालं? अहो, बहिणीकडे लग्न असताना माझ्यासारखा भाऊ एकटा नाही तर सहकुटुंब येणार आहे..." असे म्हणत खांडरेंनी फोन ठेवला.
दुसरा दिवस लग्नाचा! चहापाणी, फराळ होत नाही तोच लग्नाची वेळ होत आली. कार्यालयाबाहेर शिक्षण राज्यमंत्री खांडरेसाहेबांची गाडी इतर फौजफाट्यासह उभी राहिली. खांडरे सहकुटुंब लग्नाला उपस्थित राहिल्यामुळे लग्न मंडपाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. लग्न लागले. खांडरेंनी माधवीला फ्रीज आणि नयनला सुबक मनगटी घड्याळ भेट दिले. जेवण होताच ते निघून गेले...
मांडवाचा ताबा बाळू, माधव, किशोर आणि विठाच्या मुलाने घेतला होता. सर्वांची ते चांगली व्यवस्था ठेवत होते. भाऊ एका कोपऱ्यात बसून होते. अण्णा मात्र मांडवामध्ये फिरून सर्वांची विचारपूस करीत होते. हळूहळू जेवणारांची गर्दी कमी झाली. सायंकाळ होत आली तशी जाणारांची गडबड सुरू झाली. गायतोंडे मंडळीनेही आवराआवर सुरू केली. खाडरे साहेबांनी वधुवरास सोडण्यासाठी सजवलेली कार पाठवली होती. अखेर तो क्षणही आला. अठरा वर्षे सांभाळलेले धन कुणातरी अनोळखी व्यक्तिच्या स्वाधीन करण्याची वेळ. माधवी सर्वांच्या गळ्याला पडून रडत होती. पाया पडत होती. नयन आधीच कारजवळ येवून थांबली. सर्वांना निरोप घेवून अण्णा-भाऊ, आई-काकू अगदी विठाबाईसह साऱ्या मोठ्यांचा, छोट्यांचा निरोप घेवून माधवी नयनला शोधत कारजवळ आली. नयनला पाहतात ती पळत सुटली. नयनने पसरलेल्या दोन्ही हातामध्ये माधवी शिरली. दोघींनाही रडे आवरत नव्हते. ते पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, आबाल-वृद्ध गहिवरले. किती वेळ गेला. शेवटी नयन सावरली. स्वतःला सोडवत म्हणाली,
"माधो, सांभाळून राहा. आईची मान..."
"आई, तू माझी काळजी करू नको. स्वतःला साभाळ. कुणाला बोलू नको, टेंशन घेऊ नको..." असे म्हणत स्वतःला सावरत कारमध्ये बसली. इंद्रजितने नयनला नमस्कार केला. गायतोंडे पुढ होत म्हणाले,
"ताई, मुळीच काळजी करू नका. आजपर्यंत भाची होती, आज मुलगी झाली."
"मला ते माहिती आहे. मागच्या जन्माचे माहिती नाही, पुढल्या जन्माचे ठाऊक नाही परंतु या जन्मात मात्र सख्खे भाऊच आहात..." नयन म्हणाली.
हलकेच निघालेली कार दिसेनाशी झाली. थकलेल्या पावलानी परंतु समाधानाने नयन परतली. पाहुणेही एक-एक निघत होते. का कोण जाणे परंतु नयनला एकदम भडभडून आले. ती कमात्या आणि मीना यांच्या गळ्यात पाडून ओक्साबोक्शी रडू लागली. तिचा आवेग ओसरताच काकी, किशोर, आत्या, मामा साऱ्यांनी कौतुक करत निरोप घेतला. निरोप घेताना अण्णा म्हणाले,
"पोरी, खूप छान लग्न केलेस. एकदम शंभर मार्क..."
००००