Salaam-a-ishq - 8 books and stories free download online pdf in Marathi

सलाम-ए-इश्क़ - भाग-८




आदिला भेटून बाहेर पडण्यापूर्वी एकवेळ आदीची रूम, तो त्याचा आवडता पारिजातक...ते घर..जणू तिच्याच ‘स्वप्नांचं शिल्प’, सारं सारं..तिने प्रेमाने डोळ्यात साठवल आणि ह्या घरात आदिसोबत संपूर्ण आयुष्य जाणार ह्या विचारानेच तिच्या हृदयात एक गोड हुरहूर दाटून आली.
आशुच्या चेहऱ्यावर पसरलेल लाजेच चांदण त्या भर उन्हातही चमकत होत...म्हणूनच की काय शलाकानेही तिला काही विचारायचं टाळलं आणि ते निघाले.

रात्री अभ्यास झाल्यावर मात्र शलाकानेच विषय काढला.

‘आशुडे तू सॉरी बोललीस की नाही आमच्या इत्यादीला?

‘शले झालं ना तुम्हा दोघा नालायकांच्या मनासारखं..मग आता छळू नको.....’ पुस्तकं आवरता आवरता ती म्हणाली.

‘ohh my god….look at you baby…you are blushing………….’
तिच्या गालांचा चिमटा घेत शलाका म्हणाली.

‘जाडे बास ना आता...........चल जाते मी घरी उद्यापासून दुसरा विषय घेऊ अभ्यासाला.’ शलाकाला एक चापट मारत ती निघाली.

‘स्वीट ड्रीम !!!!’ शलाका तिला मुद्दाम चिडवत म्हणाली.

रात्री कितीही प्रयत्न केला तरी आशुचे डोळे लागत नव्हते आणि तिकडे स्वप्नशिल्पमध्ये ही परिस्थिती वेगळी नव्हती.
डोळे मिटल्यावरही जणू त्याच्या श्वासांचा स्पर्श होत आहे ह्या जाणीवेने ती शहारली...बंद पापणीच्या आड आदीचा राजबिंडा चेहराच तिच्या डोळ्यासमोर तरळत होता..त्याचे ते गहिरे डोळे,सिल्की केस आणि...आणि स्ट्रोबेरीसारखे ओठ.. विसापुरचा तो धुंद क्षण आठवून ती स्वतःशीच लाजली.
खिडकीतून दिसणारी चंद्रकोर तिलाच गालातल्या गालात हसतेय असं जाणवून तिकडे एकटक बघत ती डोळ्यांनीच त्या चंद्रालाच जणू जाब विचारात होती-

“तू जरा वेडाय का?..कसं कळतं रे तुला कुणीतरी प्रेमात आहे आणि त्याला त्याच्या प्रेमाच्या माणसाची आठवण येतेय?..लगेच येतोस ना छळायला...जणू वाकुल्या दाखवत म्हणतोस...

‘बघ तो तुझ्यापासून दूर आहे पण मला दिसतोय की इतक्या वरून’ ...

ये सांग ना! काय करतोय रे तो आता ह्या क्षणी ? झोपलाय की त्यालाही माझी आठवण येतेय?
तू आवर ना लवकर तुझा हा चांदण्यांचा पसारा...मी हरवत जातेय तो आवरतांना...आणि..आणि समज हरवलेच मी, तर मला शोध माझ्या आदीच्या गर्द गहिऱ्या काळ्याभोर डोळ्यात,माझे शब्दच अबोल झाले तर सरळ जाब विचार त्याच्या ओठांना...तेच माझ्या ओठांना कैद करायचा गोड गुन्हा पुन्हा पुन्हा करतात आणि शब्दांनाही मुकं करतात....
तुला दिसतोय ना तो? समज जर तुला वाटलं की त्याचे डोळे झाकले गेलेय काळ्याभोर रेशमी ढगांच्या आड...तर वेड्या भुलू नकोस ! ते रेशमी केस आहेत माझ्या शोनाचे...
तू मग त्याच्या आवडत्या पारिजातकाच्या झाडाला एक निरोप दे, म्हणावं-एक हळुवार हवेची झुळूक पाठव ते केस अलगद बाजूला करायला...पण लक्षात ठेव हा...डोळे मिटून पडलेल्या माझ्या अवखळ,बेफिकीर काळजाच्या तुकड्याला नजर लाऊ नको..प्लीज उतरवून टाक ना तुझ्या पसाऱ्यातील एक एक नक्षत्र माझ्या आदिवरून ! आणि तुला एक शेवटचं आर्जव....
‘सरळ त्याच्या राजबिंड्या चेहऱ्याकडे बघू नकोस.... ‘आदित्य’ आहे तो...त्याचं तेज तुलाही प्रेमात पाडेल......”

त्या चंद्र्कोरीशी हितगुज करता करता ती केव्हा झोपली ते तिलाही कळलं नाही....प्रेम व्यक्त केल्यावरचा हा नवा हळुवार अनुभव एक वेगळीच जाणीव देऊन गेला होता.

***************************

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच टर्म-वनचे थेरी पेपर्स होते.
आदित्य एव्हाना दुखापतीमधून बऱ्यापैकी सावरला होता.आशु आणि शलाकाच्या मदतीने त्याचा व्यवस्थित अभ्यासही झाला होता.आशुच्या प्रेमाच्या प्रतिसादाने गेल्या काही महिन्यात झालेला त्याचा चिडचिडा स्वभाव..शांत झाला होता.
प्रेम करणं,ते मिळवण्यासाठीची धडपड आणि नंतर ते आयुष्यभराच्या बंधनात बांधण..ही एक प्रकारची अदृश्य जबाबदारी ओझं बनून नकळतपणे दोघांच्याही मनावर दडपण आणत होती.
शेवटच्या पेपरनंतर काय लिहिलं,किती लिहिलं....हे नेहमीचं डिस्कशन झाल्यांनंतर तिघे कॅन्टीनला बसले होते.दहा/बारा दिवसांची सुट्टी मग नवीन टर्मला सुरुवात होणार होती.

‘शाकाल कुठे जाणार मग सुट्टीत?’ आदिने विचारले.

‘मी तर बाबा मुंबईला मामाकडे जाणार आणि कॉलेजसुरु झाल्यावरच येणार तू कुठे जातोय....?’

‘मी चाललोय सासुरवाडीला कासेगावला...........जावईबापू आराम करणार आहे तिकडे जाऊन......’ तो आळस देत म्हणाला. त्याच्या उत्तरावर दोघीही खुपवेळ हसल्या.

‘निट सांग ना मुर्खा...आणि आशु तू कधी निघतेय कासेगावला?’

‘एक मिनिट...ती कुठेही जात नाहीये ती पूर्ण सुट्टी इथेच थांबणार आहे....आणि सॉरी गणूबाप्पा पण ह्या महिन्यात रोज चतुर्थी असणार आहे.....’

तो अगदी फर्मान सोडल्यासारख म्हणाला.

‘रोज चतुर्थी कशी काय बुवा?’ शलाकाने गोंधळून विचारलं.

‘शले अगं म्याड आहे तो लक्ष देऊ नको.....’ तिने लटक्या रागाने त्याच्याकडे पहात म्हटले.

‘पण चतुर्थी तर झाली ना...?’ शलाकाने निरागसपणे विचारलं.

तसं आदित्य हसत म्हणाला- ‘ शाकालभाई तू रेहने दे......’

तिचा गोंधलेला चेहरा पाहून आशु म्हणाली-
‘वेडे तो रोज सारसबागेत भेटूया म्हणतोय.....’

‘अच्छा...ओह....आता कळलं....मग तू थांबणार आहेस का पुण्यात?’

‘हो ती थांबणार आहे......’आदित्य शांतपणे हाताची घडी घालत म्हणाला.

‘आदि वेडा झालाय का?...मला उद्याच जावं लागेल...सीमाच्या अभ्यासात जरा मदत करायचीय,गावी काही मुली वाट बघत आहेत त्यांना फिजिक्स समजून घ्यायचंय....खूप काम आहेत रे.दिवाळीत सुद्धा जास्त वेळ मिळाला नाही परीक्षेमुळे..’ ती जरा रागात म्हणाली.

‘अरे यार तुम्ही दोघी नाहीत,तो सुज्या गावी निघाला....मी काय करू....?’ आदि चिडून म्हटला.

‘इत्यादी ...म्यागी असेल ना पुण्यात तुला कंपनी द्यायला.’ शलाका हसू दाबत म्हणाली.
म्यागीच्या नावाने आदि मागचा प्रसंग आठवून गोरामोरा झाला.
आशु आणि शलाका मात्र टाळ्या देऊन हसत होत्या.

‘बरं चला खुप वेळ झालाय, मी लायब्ररीत बुक देऊन येते तोपर्यंत तुमच्या गप्पा संपवून घ्या मग आशु आपल्याला निघायचं...’

‘ठीकये लवकर ये....’

आदि शांत बसला होता.त्याचं लक्ष बाहेर होत.तो चिडलाय हे एव्हाना आशूच्या लक्षात आलं होतं.

‘आदि बोल ना......चिडलाय का?’

मानेनेच नाही म्हणत तो उगाच बॅग उचकत बसला.
आशुने चिडून ती बॅग ओढली-
‘प्लीज बोल ना रे,नाहीतर निघते मी..’ती सुद्धा चिडून म्हणाली.

तिच्या हातावर हळूच हात ठेवत तो म्हणाला-

‘पिल्ल्या प्लीज...नको ना जाऊ........बघ तू म्हटली होतीस तसं प्रेम आहे म्हणून त्यात वाहवत न जाता अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यास केला.सगळे पेपर्स छान लिहिले,सगळे बॅकलॉग आणि रेगुलर सुद्धा भारी लिहिलेय ते हि तुझ्यापेक्षा चांगले...बघ १% तरी तुझ्यापेक्षा जास्त मिळेल मला...सगळं निमुटपणे ऐकल तुझं परीक्षेत,आता तू ऐक ना........’

‘आदि....मी इथे राहिले तरीही नाही भेटता येणार सोनु आपल्याला रोज....आणि मी ज्या कामाला जातेय ते सुद्धा महत्वाचं आहेच ना....?

‘यार !!! नको ना त्रास देऊ .. मला काही माहित नाही..तू जात नाहीये ..’

‘अरे सोनू ....मला उद्या निघावंच लागेल.उद्या मामा मामी पहाटेच सायगावला माझ्या आजोळी जायला निघणार आहे.सीमा कालच दादांसोबत गावी गेलीय.. मला फक्त उद्या लवकर उठून मामा ,मामी गेल्यावर सगळं आवरून लगेचच निघायचंय.

मग काहीतरी आठवून तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला-
‘ऐक ना ..पिल्या....ठीक आहे तू जा पण त्या अगोदर मला तुला माझ्या सगळ्यात आवडत्या ठिकाणी घेऊन जायचंय..तू सकाळी लवकर आली तर अगदी ९ वाजता तुला नासिकफाट्याला सोडतो. प्लीज ह्यासाठी नाही म्हणू नको.’

गोंधळून त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली –‘कुठे नेणार आहेस?’

‘मॅडम प्लीज ट्रस्ट मी!..ओके....सांगितलं तेवढ करा....’ तिच्या प्रश्नाचा कल बघत तो म्हणाला.

शलाका लायब्ररीत जाऊन परत आल्यावर...सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी कॉलेजला रीपोर्ट करायचं असं ठरवून त्या दोघी निघाल्या. जाता जाता ..‘उद्या आदिसोबत बाहेर जाणार आहे’ हे शलाकाला सांगितल्याशिवाय मात्र तिला राहवलं नाही.

*********************************
मामा मामी गेल्यावर तिने आवरायला घेतलं -ऑफ व्हाईट कुर्ता,ब्लू चुडीदार,व्हाईट,ब्लू शिफॉन ओढणी...डोळ्यात काजळ..नाजूक कानातले... छान तयार होऊन ती निघाली.
आधी टेलीफोन करून मी ९ वाजता निघतेय हे घरी सांगायलाही ती विसरली नाही.
कासारवाडीच्या स्टॉपवर ती वाट बघत उभी होती.
कुणी बघेल का याची भीती,आदि कुठे घेऊन जाणार ही धाकधूक....चुकून कुणाला कळल तर ह्याचे परिणाम काय होईल ही धडधड,तिला पाच मिनिटाचा काळ तिथं उभं राहायला जड जात होतं.
तेवढ्यात समोरून तिला स्पोर्ट् रेड करिझ्मावर आदि येतांना दिसला.
मस्टर्डकलर टीशर्ट,फेडेड ब्लू जीन्स,हलका बियर्ड लूक,शूज,गॉगल....तो समोर येऊन थांबला तरी ती भान हरपून पहातच होती.
‘मॅडम बसा पटकन’ तिला भानावर आणत आदि म्हणाला.

तिने ओढणी डोक्यावरून घेऊन खांद्यावर टाकली.आदिची नजर तिच्यावर खिळली.तिचं लक्ष जाताच तो गालात हसला.

‘काय झाल,का हसतोय....?’

“काही नाही गाणं आठवलं.... ‘गली मै आज चांद निकला’..”

तिने हळूच त्याच्या डोक्यात एक टपली मारली.
आग्रहाने हन्डलला लावलेलं हेल्मेट घालायला लावलं आणि ती त्याच्यामागे सावरून बसली.तरी तो गाडी स्टार्ट करत नाहीये पाहून ती म्हणाली
“ आता काय झाल ...चल ना पटकन?”

“पिल्या तू माझ्या मागे बसलीये...निदान खांद्यावर तर हात ठेवूच शकतेस...”

“ प्लीज लवकर चल नाटक करू नकोस...”त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली.

*****************

साधारण पाऊन तासाने आदित्यने बाईक थांबवली ती एका टेकडीच्या पायथ्याशी.
सकाळच्या प्रसन्न वातावरणात तो परिसर अधिकच अल्हायदायक वाटत होता. टेकडी चढणाऱ्या काही हौशी लोकांशिवाय जास्त वर्दळ नव्हती.शेजारी एक छोटेखानी चहाची टपरी होती. पे पार्किंगला बाईक उभी करून टपरीजवळ चहा घेता घेता आदि आशूला म्हणाला.

“आशु वर जिथं आपण जाणार आहोत ना त्या जागेत काय जादू आहे मला माहित नाही पण ...जर मी खूप लो फील करत असेल आणि इथं पोहचलो ना तर जणू जादूच होते आणि ..माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं,ह्या जागेचं आणि माझं एक वेगळंच कनेक्शन आहे.वरच रुद्र महादेवाचं मंदिरसुद्धा अप्रतिम आहे.कमालीची शांतता मिळते आणि तुला माहितीये इथून फक्त पंधरा मिनिटांत स्वप्नशिल्प आहे.”

आदीच्या चेहऱ्यावरचा तो निरागस आनंद पाहून तिला खुदकन हसू आलं.टेकडी चढतांना आशुची दमछाक होत होती.तिला हात देत,प्रसंगी सावरत तो चालत होता.ते वर आले.
रुद्र महादेवाचं दर्शन घेऊन आदिने तिला त्याच्या आवडत्या जागेकडे नेलं.
तो त्या टेकडीचा मागच्या बाजूचा उतार होता आणि समोर दुसर्या टेकडीचा चढ होता.त्या उताराच्या अगदी कड्यावर बसायला पसरट बाकड्यासारखा दगड होता.समोरच्या टेकडीपर्यंत हिरव्या रंगाच्या असंख्य छटा जणू कुणी चितारल्या होत्या.
कोवळीक ल्यायलेल्या लुशलुशीत पोपटी ते कोरड्या पडलेल्या पिवळसर हिरव्या पर्यंत हिरव्या रंगांची उधळण होती.
सर्वात मोहून टाकणारी गोष्ट म्हणजे त्या पूर्ण हिरवळीवर चांदण्यांसारखी छोटीशी नाजूक पांढरी असंख्य फुले उमललेली होती. सकाळच्या सावळ्या आणि गार वातावरणात ती हळुवारपणे मिरवत होती.
त्या दगडावर बसून हे समोरचं वातावरण,शेजारी आदिचं असणं हे मनात कुठतरी खोल दडवायची वेडी खटपट तिची चालली होती. आदीच्या खांद्यावर अश्वस्थपणे डोकं ठेऊन ती हरवली होती.

आदिनेही हळुवारपणे तिला एका हाताच्या कवेत घेतलं होतं.

“आदि तू ह्या जागेला काय म्हणतो माहित नाही पण मला हे “ताऱ्यांच गावं” वाटतंय....दिवसा उजेडी चांदण अंथरून दोन जीवांना भूल घालायला म्हणून चंद्राने वसवलेलं ताऱ्यांच गाव.....” मग तिचे डोळे उगाचंच भरून आले.

हळूच त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली-
“आदी आपण आयुष्यभर असेच एकत्र असू ना रे?”

तिच्या टपोऱ्या डोळ्यात जमा झालेले आसू तिच्या पापण्या हळुवारपणे बंद करून टिपत, डोळ्यांवर ओठ टेकवत तो म्हणाला-
“पिल्ल्या वेड्यासारखं काय बोलतोय...? काय झालं तुला?बघ किती सुंदर वातावरण आहे..आणि आयुष्यभरच का पुढच्या प्रत्येक जन्मात आपण सोबत असू..ह्या तुझ्या ताऱ्यांच्या गावाची शपथ...”

त्याच्या हात हातात घट्ट पकडत रडवेली होत ती म्हणाली-
“आदि पुढची दोन वर्ष व्यवस्थित स्कोर करून पास झाल्यावर मग फक्त दोन वर्ष देईल मी तुला सेटल व्हायला...आपली कास्ट एक आहे...कुटुंब चांगली आहेत..फक्त माझ्या मोठ्या भाऊकाकांचा प्रश्न आहे ते फार डेंजर आहेत... आई दादांनी त्यांना समजावलं की मग काही प्रश्न नाही...पण होईल ना रे सगळं व्यवस्थित? मनाप्रमाणे?...आदि ह्यात काही संकट आलं तर...आपले आयुष्य एक झाले नाही तर?...”

वाऱ्याने उडून सारखे डोळ्यांवर येणारे तिचे केस कानामागे सारत तो म्हणाला-
“पिल्य्या भानावर ये काय झालं तुला? का घाबरला वेड्या एवढं?मी आहे ना...सगळं व्यवस्थित होईल...तुझं माझं आयुष्य तर त्याच क्षणी एकत्र बांधल गेलं..ती तुझी ओढणी आपल्यातला अंतरपाटच होती..मंगळसूत्रच हवय असं काही नाही...तुझ्या नजरेला बांधली गेलेली माझी नजर..ते बंधन कुठल्याही पवित्र बंधनाहून कमी नाहीये..त्यावेळी वाढलेली हृदयाची धडधड, हृदयाने हृदयासाठी दिलेली हाक..प्रेमाचे मंगलाष्टकच होते...आठवत असेल तर तुझी टिकली सुद्धा मी सांगितल्यावर तू कपाळावर व्यवस्थित लावली होती...सोन्या आयुष्य एक तर केव्हांच झालेय...कधीच विलग न करता येण्यासारखे.”

तिच्या पाठीवर थोपटत तो कितीतरी वेळ तिला शांत करत राहिला..परतीच्या वाटेवर दोघंही शांतपणे हातात हात घट्ट धरून उतरत होते...कुठलीतरी अनामिक भीती तिच्या मनात घर करून बसली होती.

पार्किंगमधून गाडी काढतांना तो तिला म्हणाला-

“पिल्य्या तुला चाकणपर्यंत सोडतो ना गाडीवर....प्लीज ऐक ना..!”
“नाही हा आदि कुणी चुकनही बघितलं ना तर धडगत नाही आपली...”
“धडगत काय ..कोण काय करेल...कुणाच्या बापाला घाबरत नाही हा आदित्य शिर्के...न यु नो दॅट”

“ये बाबा ..चुकलं माझं,तू टाइमपास करू नको आणि सोड मला लवकर ...”त्याच्या हातात हेल्मेट देत ती म्हणाली.

“पिल्या ह्याचा बदला मी कसा काढणार आहे सांगू?...तुला लग्नानंतर एक दिवसपण माहेरी पाठवणार नाही...माहेरीच काय बेडरूममधून सुद्धा...नाही बेडवरून सुद्धा बाहेर पडू देणार नाही.....बघच तू...” तिच्या जवळ जात तो कानात म्हणाला.

शहारून त्याला दूर लोटत ती म्हणाली-“ओह प्लीज आदि...निघायचं का ? नालायका ....अरे देवाच्या पायथ्याशी आहोत आपण, न तुला काय सुचतंय....”

गाडी स्टार्ट करत तो म्हणाला-“ अरे लग्नानंतर सर्वात अगोदर इथेच दर्शनाला आणणार तुला ..मग बघ काय काय सुचतं मला...”

त्याच्या मागे बसत तिने एक जोराचा रपटा त्याला दिला.नाशिकफाट्याला तिला निरोप देतांना मात्र त्याच्या जीवावर आलं होतं...
“I WILL MISS YOU पिल्ल्या..आणि मी तुझं ऐकणार नाहीये ..मी एकदा तरी LANDLINE वर फोन करेल.”

तिला बजावत तो म्हणाला. उत्तरा दाखल मिळालेली तिची गोड स्माईल तिच्या ओठातून चोरून अलगद हृदयात कुठेतरी साठवून ठेवावी आणि पुढचे दुराव्याचे काही दिवस ती आठवण पुरवून पुरवून वापरावी ह्या विचारात तो -ती बसलेल्या गाडीकडे कितीतरी वेळ बघत राहिला.

***************************

कुणाच्यातरी प्रेमात असण्याचे दिवस म्हणजे..हे
“पॉपीलोन डेज” ..फुलपाखराच्या पंखांसारखं रंगीबेरंगी तेवढच नाजूक..थोड्याही दाबाने बोटावर रंग सोडून..मलूल होणारं...आणि महत्त्वाच म्हणजे क्षणात उडून जाणारं....हे प्रेमात असण्याचे दिवस म्हणजे पहाटेची दवबिंदू....कुठेतरी संकोचून आपलाच एक स्वतःचा परीघ सांभाळून पानालाच विश्व समजून सूर्याच्या पहिल्या किरणात चमकून उठणारी....त्यांचाही आयुष्य तेवढचं....प्रेमात झुरण्याच्या,रमण्याच्या,घायाळ होण्याच्या दिवसाचं अस्तित्वही तेवढच...
आशु अन आदित्यचं ही प्रेम असंच बहरत होत...ऊन पावसाप्रमाणे प्रेमाचेही काही वेगळेच ऋतू असतात रुसवा,अबोला,मनधरणी, कधी याची कधी तिची...,हळुवार स्पर्श,उबदार मिठी...ओठांचे सांगावे ,डोळ्यांची आर्जवे....कधी शब्दांनाच शिक्षा तर कधी बोलायला संपूर्ण दिवसच अपूर्ण....LANDLINE TELEPHONE पासून हळूहळू हातात नोकियाचा मोबाईल येण्याचे ते दिवस..ह्या साऱ्या कसोट्यांवर त्याचं प्रेम तावून सलाखून निघत होतं.

प्रेमाच्या सुरवातीच्या दिवसांचा अल्लडपणा जाऊन एक खूप मचुयर्ड नातं फुलून आलं होत.
दुसऱ्या वर्षापासून त्याने बोलल्या प्रमाणे तो नेहमीच एक दोन टक्का आशुच्या पुढेच राहिला होता..आणि त्याच्या ह्या यशावर आशुनेही जीव ओवाळून टाकला होता.
आशुच्या बरोबरीने आदित्य सामाजिक कार्यात भाग घेऊ लागला होता.शेवटच्या सेमिस्टरला नेमकी आशुच्या मामांची बंगलोरला बदली झाल्याने तिला आणि सिमाला शेवटचे सहा महिने होस्टेलवर काढावे लागले होते.जून महिन्याचा दुसरा आठवडा होता.
सीमाचे बारावीचे पेपर,मेडिकल एन्ट्रन्सची परीक्षा आटोपून आता रिझल्टची ती वाट बघत होती.
दोन वर्ष मान मोडून केलेल्या अभ्यासच चीज होणार होतं,तिचं डॉक्टर बनायचं स्वप्न खरं होणार होतं.
आशुच्याही शेवटच्या वर्षाच्या परीक्षा संपून आता फक्त शेवटची प्रोजेक्ट ओरल बाकी होती.
शलाका,आशु,सुजित आणि आदित्य यांचा दिव्यांग लोकांसाठी बनवलेली ‘स्मार्ट चेयर’ प्रोजेक्टला विविध स्पर्धांमध्ये बक्षीसही मिळत होते.तीन दिवसांनी प्रोजेक्ट ओरल होती...आणि आशूला घरून फोन आला “....आज आता ताबडतोब घरी ये....”

का? कश्यासाठी?...मनात शंकेच काहूर माजलं......स्वच्छ,निरभ्र आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले होते....धो-धो बरसणाऱ्या घनांनी कुठला जीवघेणा सांगावा आणला होता.....?

*************

आदित्य आणि सुजित ऐनवेळी शोर्ट झालेलं प्रोजेक्टचा एक हार्डवेअर पार्ट पूर्ण करण्यात गुंतले होते म्हणून आदिला फक्त घरी जाऊन येते एवढं बोलून ती निघाली.
गावी पोहचेपर्यंत तिच्या जीवात जीव नव्हता.घरी आदित्यबद्दल काही कळलं असेल का? ह्या एका प्रश्नाने तिचं अवसान गळालं होतं.
ती स्टँड वर उतरली.तिचा चुलत भाऊ पंकज अगोदर पासून वाट बघत होता.तिने रस्त्यात त्याला विचारले-
‘पंक्या काय झालय रे एवढं घरी लगबगीने बोलावल ते?”

“चल घरी वली समजील सगळं” तो हातचं राखून बोलला.

कासेगावचा शितोळेवाडा म्हणजे गावाच्या मातब्बर शितोळे लोकांची घरे.
कासेगावात शितोळे म्हणजे वाडवडिलार्जीत जहागीरदार.गावचं पुढारीपण,घरातला मान सगळ्याचे एकमेव धनी होते ते अश्विनीचे मोठे काका..’भाऊकाका’.
वाड्यात भाऊकाकांचा शब्द म्हणजे अंतिम शब्द होता.त्यांचा आवाज आला तरी घरातल्या बायका चुलीच्या खोलीतून बाहेर यायच्या नाहीत.
अश्विनी वाड्यात आली तेव्हा घराच्या ऐसपैस ओसरीवर जणू सभाच भरली होती.
अश्विनीला सगळी शितोळेनची मात्तबर मंडळी जमलेली पाहून दरदरून घाम फुटला.तिचे पाय लटलट कापायला लागले.तिने आत जातांना चोरून भाऊकाकाडे पहिले.त्यांच्या देवीचे व्रण असलेल्या खडबडीत चेहर्यावर प्रचंड संताप दाटला होता.

आशु चुलीच्या खोलीत आली सीमा पोळ्या करत होती. तिने रुमालाने घाम पुसत,पर्स खाली ठेवत सिमाला चाचरत विचारलं-

“सिमे क....क..काय झालंय घरात ?”

पोळी लाटायच थांबून डोळ्यात पाणी आणून ती हळूच म्हणाली.

“आपली दिनूकाकाची गुड्डीताई...जी इंजिनिअरिंग नंतर मुंबईला एका कंपनीत मागच्या वर्षापासून जॉब करत होती ....तिने पळून जाऊन लग्न केलं चार दिवसांपूर्वी,पोरगा आपला मराठ्याचाच होता ...आणि आता बाहेर हे लोकं कोरडेपणाने म्हणतायेत तिचा नवरा अक्सिडेंटमध्ये गेला,रात्री कुठल्यातरी ट्रकने त्याला ठोकलं म्हणे...आई काकीकडे गेलीय..गुड्डीताईला बळजबरी घेऊन आलेय हे लोकं तिच्या सासरहून .....ती तर पूर्ण सुन्न झालीयं तायडे....”

आशु जागेवरच बसली.तिच्या हृदयाची धडधड तिला ऐकू येईल एवढी वाढली होती.
संपूर्ण खोली तिच्या अवतीभोवती फिरतेय असं वाटून ती डोळे मिटून,भिंतीला टेकून पडून राहिली...
क्रूर नियतीच्या पोतडीत काय काय दडलं आहे ह्याचा अंदाज येईपर्यंत माणसाच जीवन एक खेळण झालेलं असतं.....

क्रमशः

©हर्षदा

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED