Salaam-a-ishq - 10 books and stories free download online pdf in Marathi

सलाम-ए-इश्क़ - भाग - १०





मध्यरात्री केव्हातरी आदीचे डोळे उघडले..खोलीतले दिवे चालूच होते.कितीवेळ तो तसाच पडून राहिल्याने अंग ठणकत होतं.तो उठून बसला.डोकं अजूनही भणभणत होतं.
कदाचित हे सगळ स्वप्न तर नाही?म्हणून त्याने आजूबाजूला बघितलं..ते पत्र अजूनही तिथेच पडून होतं.त्याने बेडवर चाचपडत मोबाईल शोधला आणि वेळकाळ न बघता आशुचा नंबर लावला.
फोन बंद येत होता.आता मात्र त्याला वास्तवाची जाणीव झाली....हे सगळं आपल्यासोबत खरच झालय आणि आपण आशुला आयुष्यातून कायमच गमावलय ह्या जाणिवेने तो हतबल झाला. मागे टेकून बसला...श्वासांची गती वाढली होती....डोक्यात विचारांची गर्दी गर्दी झाली होती-

“......बाप्पा...खरंच तू माझ्या आशुला माझ्यापासून दूर केलंस ?...आजची ती भेट शेवटची होती?..माझ्या प्रेमाचा इतका वाईट शेवट का केलास देवा?

आशु तू का बोलली नाहीस ह्याबद्दल माझ्याशी...आपण काहीतरी मार्ग काढला असता रे पिल्ल्या...प्रत्येक अडचणीवर मार्ग असतो ना आणि हे असं एकट्याने निर्णय घेण्याचा अधिकार तुला कुणी दिला गं?...तुझं आयुष्य तुझ्या एकटीच राहिलं होतं का? तुझ्या सोबत आता माझंही आयुष्य बांधल गेलं होत ना? मग का नाही सांगावसं वाटलं तुला एकदाही? मी काय करू?...मी विसरून गेलोय तुझ्याशिवाय जगायचं ...आता जगायचं कसं हे तरी जातांना शिकवून गेली असतीस!

माझा दिवसच तुझ्या विचारांनी सुरु होतो आणि रात्र तुझ्या स्वप्नांत हरवते.
हे नक्षत्रांसारखं रूप घेऊन दिवसभर अवखळ फुलपाखरासारखी बागडत असते आजूबाजूला...तेव्हा आयुष्य किती सुंदर आहे याची खात्री पटते.
कधी खुदकन हसतेस तर कधी रागावून नकट नाक लाल करून घेतेस....कधी खुश असतेस तर कधी पटकन दुखावली जातेस...श्रावणातल्या सरीसारख हे तुझं वागणं.....मी कसं विसरू?
पहिल्यांदा तुझ्यात डोळ्यात हरवलो तो क्षण कसा विसरू? पहिल्यांदा तुझा हात हातात घेतला तो पहिला स्पर्श कसा विसरू?

.. तुझ्या नाजूक ओठांना पहिल्यांदा केलेला स्पर्श मी कसा विसरू? किती आणि काय काय विसरू ? की तुला विसरण्यापेक्षा विसरून जाऊ स्वतःला....ह्या आयुष्याला?संपवून टाकू ह्या जीवनाला?...आशु मी हे देखील नाही करू शकत ग.....आत्महत्या करून तुझ्या प्रेमाला डाग नाही लाऊ शकत.
तुझ्यावर पापाचं ओझं नाही टाकू शकत...........खरं तर मी आता काहीच करू शकणार नाही..........कारण आशु ......तुझ्या डोळ्यात माझा जीव मी जपून ठेवलाय..माहित आहे ना तुला?
तुझ्या गोड गुलाबी गप्पांमध्ये माझे क्षण कैद आहेत माहित आहे ना तुला?
तुझ्या नाजूक चेरीसारख्या ओठांवर फक्त माझंच नाव शोभतं..... माहित आहे ना तुला?
ओठांच्या साखरमिठीत येतांना तुझी होणारी नाजूक धडधड मला उगाच वेड लावते.... माहित आहे ना तुला?
लाजून माझ्यापासून नजर चोरतेस तेव्हा नकळत माझ्या मिठीत सापडते...माहित आहे ना तुला?
जेव्हा जेव्हा डोळ्यांची नाजूक उघडझाप करत चेहऱ्यावर एक गोड स्माईल आणतेस; त्यावर माझ्या ओठांची मोहोर उठल्याशिवाय तुझी सुटका होत नाही... माहित आहे ना तुला?
..ह्या तीन वर्षात तू माझं संपूर्ण आयुष्य व्यापून उरली आहेस ...माहित आहे ना तुला?
तू निघून गेल्यावर मी माझा उरणारच नाही,तू सावरलेल्या आयुष्याला मी न्याय देऊ शकणार नाही,मी पूर्वीसारखा हसू शकणार नाही,स्वप्न पाहू शकणार नाही....मी हरवून जाईल तुझ्या आठवणींमध्ये ...हे सगळं..सगळं.. माहित आहे ना तुला?

मग का आशु हा असा एकट्याने निर्णय घेतला...तुझं सगळं मान्य..तुझा बाकीच्या मुलींच्या शिक्षणासाठी आपल्या प्रेमाचा त्याग मान्य,तुझी इतरांसाठीची तळमळ मान्य,तुझं मुलगी म्हणून,बहिण म्हणून कर्तव्य मान्य...पण वेड्या तुला जो त्रास ह्यातून होणार आहे तो नाही रे मला मान्य !!...तुला माझ्याशी का बोलावसं वाटलं नाही पिल्या...का एकट्याने सहन करत राहिलीस सगळं?

तुला हेच हवंय ना की आपलं प्रेम होतं हे कधीही तुझ्या घरच्यांना कळायला नको. विश्वास ठेव नाही कळणार!

माझ्या घरच्यांनी तर तुला केव्हाच सून मानलय..त्यांनाही समजावेल मी.तुझ आयुष्य कुणाशी बांधलं जातंय हे शोधायचा प्रयत्न ही करणार नाही...काही काही सबंध ठेवणार नाही....ना ते कॉलेज आठवेल,ना त्या सारसबाग आणि शनिवार वाड्यातल्या भेटी...न ताऱ्यांच्या गावाची टेकडी... पण एक मात्र माझ्याकडून होणार नाही ...तुझं अस्तित्व माझ्यातून वजा होणार नाही...तू नेहमीच माझ्या श्वासांत,मनात हृदयात तुझं अवखळ हसणं घेऊन मला सोबत करशील....तुला हवं तसच आयुष्य पुढे जगेल...स्वतःच अस्तित्व निर्माण करेल...तू एक सामाजिक जबाबदारी तुझ्या पुरती निभावली...मी एक निभावेल......आणि तुझ्याशिवाय कुणीही माझ्या आयुष्याचा ,प्रेमाचा हिस्सा होणार नाही...कधीच नाही.

हा आदित्य फक्त त्याच्या आशुचा होता आणि राहील..........पण ह्या नियतीला कधीच माफ करणार नाही..............कधीच नाही!!!

कितीतरी वेळ आदि आठवणींच्या गर्दीत हरवला होता.
मन,मेंदू,भावना सगळ्यांचा एक विचित्र गुंता होऊन बसला होता.
हे अचानक आयुष्य कुठल्या वाईट वळणावर घेऊन आलं..हा धक्का त्याला सहन होत नव्हता.ह्या तीन वर्षातले कितीतरी क्षण डोळ्यातून अश्रू बनून ओघळत होते. ही आता उजाडलेली पहाट,आशुला कुण्या परक्याची बनवणारी पहाट त्याच्या आयुष्यात प्रेमाचा कोपरा अंधारून टाकत होती.

******************

त्याच दिवशी,इकडे;

आशु घरी आली तेव्हा घरात लगबग चालू होती.
आजच आशुला फॉर्म्यालिटी म्हणून बघायला विक्रम,त्याचे आई,वडील आणि काही महत्वाचे पाहुणे येणार होते.घरात बरीच गर्दी होती, उद्या सर्वानुमते हळद आणि दारासमोरच लग्न होणार होतं.
ती आलेली दिसताच काकूने तिला पटकन घरात नेले आणि साडी नेसायला सांगितली.तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा असलेला विक्रम तसा आशुचा लहानपणीचा मित्र ही होता.
दिल्लीत एका कंपनीमध्ये सॉफ्टवेयर इंजिनिअर होता.
विक्रम जेव्हा आला तेव्हा समस्त शितोळे मंडळी त्याला बघतच राहिली.
उंचपुरा,गोरापान,हसतांना दोन्ही गालावर पडणारी खळी.. नाकावर येणारा चष्मा एका बोटाने सावरण्याची त्याची लकब...आल्यावर सगळ्यांशी त्याचं अदबीनं वागणं...सगळे भारावून गेले होते.
आशुच्या काही लहान चुलत बहिणी ‘जीजू आले’ म्हणून गलका करत तिच्या खोलीत आल्या.
आशु यंत्रवत सगळं आवरत होती.तिच्या डोक्यात प्लॅन पक्का झाला होता.रात्रीच्या ’पाणमायला’ दिवा दाखवायच्या प्रथेच्या वेळी काय करायचं हे तिचं ठरलं होतं.
तिने मनात एकदा संपूर्ण प्लॅनची उजळणी केली–
‘छान तयारी करून,हसत,लाजत देवाचा नमस्कार,घरातल्या मोठ्यांचा नमस्कार करायचा,कुणालाच शंका यायला नको.मग घरतल्या बायका प्रथेप्रमाणे दिव्याच्या विहिरीला दिवा लावायला,नमस्कार करायला,पूजा करायला घेऊन जातील,मग पाणमायला दिवा लावायचा,हळदी कुंकू अर्पण करण्यासाठी राहाटाजवळ जायचे आणि पाय घसरून बेमालूमपणे स्वतःला विहिरीत झोकून द्यायचं........फक्त आदीचा हक्क असणाऱ्या ह्या अस्तित्वाला कायमचं पाणमायला अर्पण करायचं...’

स्वतःच्या ह्या ठरवलेल्या मृत्युच्या विचाराने तिला आनंद झाला.
डाळींबी रंगाच्या पैठणीत आशुच रूपं अजुनच खुललं होतं.आईने तिच्या कानामागे काजळाच बोट लावलं.पाहुण्यांच्या मानाच्या पंगती उठल्या मग घरातल्यांची जेवणं झाली.
बाहेर पाहुणे मंडळीच्या गप्पागोष्टी चांगल्याच रंगल्या होत्या.
विक्रमच लक्ष सारखं आतल्या दाराकडे लागलं होतं.
थोडा वेळ गेल्यानंतर विक्रमच्या वडलांनी मुलीला बोलवायला सांगितलं आणि विक्रमला हायसं वाटलं.

पदर सावरत मोठ्या अदबीने,चेहऱ्यावर शक्य तितके लाजेचे भाव ठेवत ती हळुवार पावलांनी बाहेर आली. मुलासोबत आलेल्या पाहुण्यांना ही नक्षत्रासारखी मुलगी पाहताच क्षणी जाधव घराण्याची मोठी सून म्हणून पसंत पडली.

भाऊकाका मग पुढाकार घेत म्हणाले-
‘विक्रमरावसाहेब तुम्हाला पोरीला काही प्रश्न इचारायचे असतील तर इचारा.. लाजू नका काय...न्हाइ..तुम्ही तसं तायडी संग लहानपणी खेळला बी आहेत पण काही अजून इचारायच असेल तर इचारा..काही तरी ”

इतकावेळ खाली बघत असलेल्या विक्रमने हळूच वर बघितलं.
समोर खाली मान घालून आशु बसली होती.
विक्रम फक्त हसला आणि आणि नकारार्थी मान डोलावली पण शेजारी बसलेल्या पंकजला हळूच विचारलं-
“तुमच्या घरात काय होणाऱ्या बायकोसोबत लग्नाअगोदर दोन शब्द एकट्यात बोलायची पण परवानगी नाहीये का?”

“भाऊजी..उद्याचा एकच दिवस मग बोलायचंच आहे की आयुष्यभर...पण तरी विचारतो मी भाऊंना”

मोठ्यांनी विचारलेल्या काही जुजबी प्रश्नांना उत्तरं देऊन ती आत गेली.
आत आल्यावर आशु सरळ तिच्या खोलीत गेली.
न्हाणीघरात जाऊन तिने मोबाईलवरून आदिला एक मेसेज केला,आदीचे सर्व मेसेजेस कॉल रेकॉर्ड्स तिने डिलीट केले आणि मोबाईल बंद केला.आपल्या नंतरही आदीच्या बाबतीत कुणाला काहीच कळू नये म्हणून तिची केविलवाणी पण निरर्थक धडपड चालू होती.
ती बाहेर आली.तिने एकदा घर मनात साठवलं..तिच्या सगळ्या वस्तू डोळे भरून पाहून घेतल्या.सीमाला,आईला घट्ट मिठी मारली.
आईकडे पाहून तिला भरून आलं.तिच्या डोळ्यातल पाणी टिपत आईने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हटलं-
“माझी गुणाची लेक ती”.
दादा बाहेरच्या खोलीत समोरच बसले होते.त्यांच्याकडे तिने एकदा डोळे भरून पाहून घेतलं आणि शेवटी डोळे बंद करून आदीचा चेहरा एकदा डोळ्यासमोर आणत ती मनातच म्हणाली-
‘सोन्या तुझ्याशिवाय कुणाच्या आयुष्याचा भाग व्हायचा मला काहीच अधिकार नाही....हा जन्म फक्त तुझ्यासाठीच होता...तो तुझ्या नावावर लिहूनच निरोप घेतेय जमलं तर मला माफ कर.... ”

मोठ्या आईने तिच्या हातात पूजेच ताट आणि नारळ दिलं.
आशुने घरातल्या देवाला नमस्कार केला.
“मला माफ कर बाप्पा ..पण माझ्यानंतर माझ्या घराला,आईवडलांना,सीमाला सांभाळ आणि माझ्या आदिला आयुष्यातील सगळी सुखं लाभू दे”

रात्र बरीच झाली होती.बाहेर अंधार होता.बल्बचा फिक्कट प्रकाशच काय तो रस्ता दाखवत होता.डोक्यावरचा पदर सावरत,पूजेचं ताट घेऊन ती इतर बायकांसोबत दिव्याच्या विहिरीकडे निघाली...थोड्याच वेळात ती ह्या जगाला सोडून,समाजाच्या दृश्य-अदृश्य धाकाला,लग्नासाठी प्रेमापेक्षा आब्रू,मान,प्रतिष्ठा ह्या गोष्टींचा आधार घेण्याच्या मानसिकतेला सोडून दूर जाणार होती..खूप दूर.... ताटातल्या हाताच्या आडोश्याने सावरलेल्या दिव्याच्या ज्योतीत तिचा चेहरा उजळून निघाला होता..तिच्या चेहऱ्यावर पसरलेल्या आदीच्या प्रेमाच्या रंगला तो अधिकच खुलवत होता.........

**********************

शलाकाने जेव्हा आशुच गिफ्ट उघडून बघितलं तेव्हा गिफ्ट सोबत एक लेटर होतं.
ते वाचून शलाका हादरलीच..आशुच लग्न?..तिने पुन्हा पुन्हा ते वाचलं तिला धक्काच बसला.
लेटरमध्ये आशुने फोन न करण्याची सक्त ताकीद देऊनही न राहवून तिने आशुला फोन लावला तो बंद होता.
ह्या गोंधळात “आदीच काय झालं असेल” ह्या विचाराने तिला धस्स झालं.
तिने लगेच आदीचा फोन लावला.
शलाकाचा आवाज ऐकून आदिला भरून आलं.मोठ्या मुश्किलीने स्वतःला सावरत तो जड आवाजात म्हणाला-
“शाकालाका प्लिज लवकर परत येशील का? बोलायचंय तुझ्याशी....प्लिज यार आय नीड यु”

आदिसारखच एक लेटर तिने तिच्या LIC बेस्टीला लिहिल होत.शलाका ह्या धक्क्यातून सावरुच शकत नव्हती.
तिचा सुट्टीचा सगळा बेत रद्द करून ती ताबडतोब मुंबईवरून निघाली.
दुसऱ्या दिवशी शलाकाने संध्याकाळी संभाजी उद्यानात आदि आणि सुज्याला बोलावले होते.
फक्त तीन/चार दिवसांनतर तर भेटत होते ते... नेहमी आनंदी असणारा,त्याच्या उत्साहाने सगळं वातावरण भरून टाकणारा आदि... अगदी निस्तेज,मलूल वाटत होता.चेहरा पार सुकून गेला होता..ती नेहमीची चमक...नेहमीचं गोड हास्य कुठंतरी विरून गेलेलं होत..रडून सुजलेले डोळेच त्याची अवस्था सांगायला पुरे होते. विस्कटलेले केस त्याच्या विस्कटलेल्या मनाची परिस्थिती उलगड होते.
शलाकाला त्याला असं पाहून गलबलून आलं..डोळे भरून आले.त्याच्या शेजारी बसत तिने मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवला.
तिच्याकडे पाहून निराशेने,उपहासाने..कसनुसं हसत खूप प्रयत्नाने तो बोलला –
“शाकाल...हे काय झालं?...ती आपल्यापासून अशी कशी दूर जाऊ शकते यार...फक्त एका दिवसात होत्याचं नव्हत झालं?...कोण आहे कोण ग हा देव वर बसून खालच्या लोकांच्या लग्नगाठी बांधणारा?
त्याला दोन जीवापाड प्रेम करणारे लोकं दिसत नाही?..शाकाल त्याच्या लग्नाच्या प्रोग्रामिंगमध्ये गडबड आहे,व्हायरस आहे.....मी—मी—मी केस करेल त्याच्यावर ....My lord this god is culprit…….hang him till death …….. ”

रडतच वर आकाशाकडे बघत तो पुन्हा एकदा मोठ्याने ओरडला-
“ ....My lord this god is culprit…….hang him till death ……..”

आजूबाजूचे लोकं थांबून त्याच्याकडे बघायला लागले तसं शलाकाने त्याला सावरलं.
त्याची ही अवस्था पाहून तिच्याही आसवांचा बांध फुटला.
तो लहान मुलासारखा तिच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडायला लागला.
सुज्याचेही डोळे पाणावले.कितीतरी वेळ तो धाय मोलकडून रडत होता.
जरा मन मोकळ केल्यावर मग तो सावरला आणि डोळे पुसत दोघांकडे पाहून बोलला-

“...सुज्या,शाकालाका ...मी सिडनीला जातोय मावशीकडे.इथल्या सगळ्या गोष्टींशी ती जोडलेली आहे...विचारांनी जीव भंडावून जातो.इथे चित्त लागत नाहीये आता.
तिकडे किती दिवस राहील ते माहित नाही...पण कॉलेजचे हे चार वर्ष,माझा फोन नंबर,ओर्कुट अकाऊंट,सगळं सगळं डिलीट करून जातोय.तिने शपथ घातलीये-“मला शोधायचं नाही,माझा नंबर शोधायचा नाही,फोन लावायचा नाही,माझं आयुष्य अजून कठीण करू नका.”
सो प्रॉमिस मी कुणीही तिच्यापर्यंत पोहचायचा प्रयत्न करायचा नाही आणि अजून एक -आपणही एकमेकांना यांनतर कधीच ठरवून भेटायचं नाही म्हणजे ह्या आठवणीच नको.समजूया की आपण कधी भेटलोच नव्हतो आयुष्यात.....”

बोलता बोलता त्याला अचानक रडू कोसळलं तो सुज्याला मिठी मारून रडायला लागला.
शलाकाला हे सगळं एका वाईट स्वप्नासारखं वाटत होतं.
त्याच्या केसांमधून हात फिरवत सुज्या म्हटला..
“आद्या वी विल मिस यु यार......”

बराच वेळ ते तिघंही शांत बसून होते.रंगत आलेला डाव नियतीने अचानक उधळून दिलेला होता.निरोप घेतांना तिघांचेही डोळे रडून सुकले होते.....

चौघांचे रस्ते हे असे वेगळे झाले होते.कॉलेजचे रंगीत,सहजसाध्य दिवस संपून आता वास्तव आयुष्याचे चटके बसायला सुरुवात झाली होती.

आदि सिडनीला मावशीकडे जाऊन बर्यापैकी सावरला होता,डिप्रेशनमधून बाहेर पडत होता.
तो परत आल्यावर आपल्या लाडक्या लेकाची ही अवस्था पाहून विभाताई खचल्या होत्या...ह्या कठीण काळात अभिमान,त्याची बायको ऋतुजा,संजय शिर्के सर्वांनी आदिला ह्या अवस्थेतून बाहेर काढलं आणि त्यांची कंपनी जॉईन करायचा आग्रह केला पण आशुच्या स्वप्नासाठी इंजिनिअरिंगचा उपयोग समाजहितासाठी करायचा म्हणून त्याने “The Social Engineering ” ही स्वतःची फर्म चालू केली जी हळूहळू विस्तारत गेली आणि Air and Water Pollution Controlling चे नाविन्यपूर्ण प्रोडक्ट्स ते आता बनवू लागले.
वेगवेगळ्या NGO ला लागणाऱ्या टेक्निकल सपोर्टसाठीही त्याची कंपनी काम करत होती.
हळूहळू आयुष्य स्थिरावत होतं..पण मनात अजूनही तेच प्रेम,तिच ओढ.कायम होती.
आयुष्य संपूर्ण अशुच्या नावावर करून आदि आता फक्त काम करत होता....अविरतपणे..दिवस रात्र विसरून............

ह्याच मेहनतीचं फळ म्हणजे त्याला आज मिळालेला हा पुरस्कार होता.

....... आयुष्यातून कुणी अचानक निघून गेलं तरी आयुष्य कुणावाचून थांबत नाही असं म्हणतात खरंही आहे ते!...पण आयुष्य थांबत जरी नसलं तरी ते कुणावाचून पूर्ण ही होतं नाही मनाचा एक हळवा कोपरा नेहमीच रिकामा राहतो
हे ही तितकच खरं नाही का?

क्रमशः

©हर्षदा

https://www.facebook.com/soniways/

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED