सौभाग्य व ती! - 35 - अंतिम भाग Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

सौभाग्य व ती! - 35 - अंतिम भाग

३५) सौभाग्य व ती !
एक भयाण जंगल... जिकडे तिकडे झाडीच झाडी! अचानक वाघाची भयाण डरकाळी ऐकू येते. नयन इकडेतिकडे पाहते. तिच्यामागे धावणारा अक्राळविक्राळ वाघ बघून ती जीवाच्या आकांताने धावत सुटली, पाठोपाठ वाघही! थोडे पुढे जाऊन तिने धापा टाकत मागे पाहिल तर काय आश्चर्य तिच्यामागे सदाशिव पळत होता. त्याला पाहून ती थांबते न थांबते तोच पुन्हा कर्णकर्कश्श डरकाळी बाप रे! तो सदाशिव नसून वाघ होता. नयन पुन्हा धावत सुटली. धावतच राहिली. तिने पुन्हा मागे पाहिले. पुन्हा सदाशिव...वाघ...सदा...ती पळतच राहिली एक क्षण असा आला, भीतीने पळणारी नयन पाय घसरून पडली. पाठी असलेल्या वाघाने झडप घालून तिची मान स्वतःच्या अजस्त्र, अक्राळविक्राळ जबड्यात पकडली...
'नाSऽहीऽऽ...' असे किंचाळत नयन उठली. भर हिवाळ्यात ती घामाघूम झाली होती. एवढे भयंकर स्वप्न! तिने भिंतीवरील घड्याळात पाहिले. सकाळचे सहा वाजत होते. नयन उठली. पडलेले स्वप्न विसरून ती कामाला लागली. प्रातःविधी आटोपले. धुणी-भांडी झाली. हिवाळा असूनही पावसाची सर अधूनमधून येत होती. वातावरणाचा असेल किंवा पडलेल्या स्वप्नाचा परिणाम असेल परंतु नयनची कामे आटोपत नव्हती. कामे रोजचीच परंतु दररोजप्रमाणे सफाई नव्हती. का व्हावं तसं? भर हिवाळ्यात पाऊस का यावा? निसर्गानेच नियम मोडला, स्वतःचे चक्र बदलले तर तक्रार कुणी आणि कुणाकडे करावी? जिथे निसर्ग स्वतःच्या नियमांना सोडून वागतो तिथे सदाशिव, प्रभाच्या वागण्याचे काय?
नयनने घड्याळात बघितले, साडेआठ वाजत होते. उशीर होणार या भीतीने तिने सारे पटापट आवरले. काहीतरी विसरल्यासारखं, चुकल्यासारखं वाटत असताना ती पुन्हा आरशासमोर गेली आणि तिला धक्का बसला कारण ती चक्क कुंकू लावायचे विसरली होती. कुंकू लावणे हा तिचा रोजचा धर्म ती का विसरली? विधवेपेक्षा निकृष्ट जीवन जगत असूनही ती सधवेच्या धर्माने वागत होती. नयनने कुंकू लावले आणि ती निघाली. बाहेर पाऊस कोसळत होता. छत्री उघडून ऑटोची वाट पाहत उभी राहिली पण ऑटो मिळण्याची चिन्हे दिसत नव्हती. ती पायीच निघाली. थोडे पुढे गेल्यावर ऑटो मिळाला...
नयन शाळेत पोहोचली. पावसामुळे मुलांची संख्या कमीच होती. ती कार्यालयात बसली परंतु उत्साह नव्हता. कमालीची अस्वस्थता जाणवत होती, ती अस्वस्थता नेहमीपेक्षा वेगळी होती. तितक्यात फोन वाजला फोन उचलून ती म्हणाली, "हॅलो..."
तिचा आवाज ओळखून दुसऱ्या बाजूने आवाज आला, "नयन, मी बाळू, एक दुःखाची..."
"सदाशिव गेला का?" नयनने इतक्या सहजपणे विचारले की, जणू कुणी गावाला गेल्याची चौकशी केल्याप्रमाणे!
"अं... अ... हो. पहाटे पाच-सहा वाजता सदाने प्राण सोडला असावा. जवळ कुणीही नव्हतं. सकाळी गडी आत गेल्यावर गाजावाजा झाला. थोडावेळापूर्वी मी गेलो होतो. अंत्ययात्रेसाठी कुणी पुढे येत नाही. कुणीतरी नगरपालिकेला कळवलं. ते तयारी करताहेत. सदाचे वकिलही तेथे पोहचले. हॅलो..."
"बाळू, बोल. मी ऐकतेय..."
"सदाशिवने काही महिन्यांपूर्वी मृत्यूपत्र तयार केलंय. त्याप्रमाणे त्याची सारी मालमत्ता सरकारच्या ताब्यात जाणार असून त्याने माधवीच्या आणि त्याच्या दोन्ही मुलींच्या नावे काही रक्कम बँकेमध्ये ठेवली आहे.... हॅलो... नयन...नयन, तू..."
"नाही. मी येणार नाही..." असे म्हणत नयनने फोन ठेवला. यांत्रिकतेने पर्समधील रूमाल काढून कुंकवावरून फिरविला. सधवेचे एकमेव अखेरचे निशाण तिने नष्ट केले. डोळ्यात आसवाचा टिपूसही नव्हता. नेहमी पाझरणारे डोळे त्याक्षणी मे महिन्यातल्या नदीच्या पात्राप्रमाणे कोरडेफाक होते. पर्समधली काळी टिकली काढली. अनेक महिन्यापासून सदा सडत पडलाय हे समजताच तिने काळ्या टिकल्यांचे पॉकेट जवळ ठेवले होते. शरीर सैल करीत तिने खुर्चीवर मान टेकवली...
'काय मिळवले सदाने? त्याच्या अंत्ययात्रेलाही कुणी नसावे ? अंत्ययात्रा? की अनंताची यात्रा? तो अनंतात विलीन व्हायला निघालाय म्हणून अंत्ययात्रा? त्याला कुठे जागा मिळेल? की.. की... त्रिशंकू होणार? त्याला शेवटचा निरोप द्यायला निघणार म्हणून अंत्ययात्रा? तो प्रवास मरणाकडून जन्माकडे की जन्माकडून मरणाकडे? म्हणतात ना, मेलेला पुन्हा जन्मतो. मृत म्हणे कुणा ना कुणा योनीत जन्म घेतो. जन्मापासून सुरू झालेला प्रवास मरणाच्या थांब्यावर संपतो म्हणून जन्माकडून मरणाकडे नाही तरी प्रत्येक जीव हा चिरंतन... मरणापर्यंत प्रवास करतो ना? या प्रवासरूपी जीवनात काटे आहेत तसे गुलाबही आहेत. काटे दूर करून जो गुलाब मिळवितो तोच खरे जीवन जगतो. फूल स्वतः नष्ट होताना फळास जन्म घालते. तेल स्वतः जळते परंतु शेवटच्या क्षणापर्यंत दिव्याला जिवंत ठेवते. अनेक यातना सहन करूनही स्त्री अपत्याला जन्म देणे हा स्वतःचा गौरव समजून त्यात धन्यता मानते...
सदाशिव कुणासाठी झिजला? तो इतरांसाठी जगलाच नाही. उलट इतराना झिजवून, खेळवून त्याने प्रवास संपवला. नयनला दुःख देताना त्याने स्वतःचे सुख पाहिले. नयनच्या दुःखावर जणू त्याने त्याचे स्वतःचे इमले उभारले. जीवनाच्या उत्तरार्धात त्याला तसं कुणी झिजणार मिळालं नाही...
कुंकू होत म्हणून नयन सधवा होती परंतु त्याच कुंकाखाली, कुंकाच्या साक्षीने ती विधवेचे जीणे जगत होती. लग्नानंतरचा तिचा प्रवास खडतर, काटेरी होता. स्वतः दुखाच्या सागरात विहार करतानाही तिने सदाला त्याच्या मनाप्रमाणे ओरबाडून सुख घेऊ दिलं. स्वतःच्या संसाराची नौका बुडू नये म्हणून ती झिजली परंतु त्याचा सदाच्या मनावर परिणाम होवू नये म्हणून तिने झिजण्याचा मार्ग बदलताना माहेरचा रस्ता धरला. तिथेही झिजणे हेच तिच्या नशिबी होते. माहेरचे तिचे झिजणे शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी होते. घरातल्या घरात ती संजीवनी, माधवी, मीरा, माधव, भाऊ काही प्रमाणात स्वतःसाठी झिजली. या झिजण्याचे, काटेरी प्रवासाचे फळही तिला तसेच मधुर मिळाले होते. माधवी तिच्या संसारात छान रमली होती, लवकरच आई होणार होती. इंद्रजित आणि सासरचे लोक माधवीवर प्रेमाची उधळण करीत होते.
त्या शहरामध्ये नयनला एक नाव प्राप्त झाले होते. आदर्श शिक्षिका! कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका म्हणून! असे असले तरी ती जगतानाही मरत होती. पदोपदी तसा अनुभव घेत होती. तिचा प्रवास चालूच होता. या प्रवासात तिला विठाबाई, बाळू, मीना, खांडरे, गायतोंडे, भाईजी यांच्यासारखा अनेक व्यक्ती भेटल्या तर भाऊ, सदा, मीरा, माधव अशीही माणसं भेटली. अण्णा, किशोर, आई, काकी, आशासारख्याही व्यक्ती भेटल्या. नयनच्या दृष्टीेने प्रत्येकाचा स्वभाव वेगळा होता. जगण्यासाठी सर्वांचाच आटापीटा असला तरी नयनच्या दृष्टीने आपण जे जीवन जगतो, जी कृती करतो ती चांगली असेल, वाईट असेल परंतु ती कृती आपणास मरणाच्याजवळ नेते. प्रत्येक जण हा मरण्यासाठीच जगतो कारण जीवन हे अशाश्वत आहे तर मृत्यू हाच शाश्वत आहे...
सदाशिवला त्याच्या करणीचे फळ मिळाले, वेदनामयी.. असह्य जिवंत मरण! जिथे त्याच्या अंत्यसंस्कारासाठी भाडोत्री माणसं आणावी लागली तिथे इस्टेटीला वारस मिळालाच नाही. केवढे हे दुर्भाग्य की सदाशिवच्या एकूण वागणुकीचे फलित? त्याच्या शेवटच्या क्षणी त्याच्याजवळ कुणीच नसावं? त्याला वासनांकित जीवनात साथ देताना की मामी-भाचा अशी नाती गादीवर नेणारी प्रभा... ही... ही कशाची द्योतक आहेत?' विचारांच्या गर्तेत अडकलेल्या नयनने वर पाहिलं... एका मोठ्या पिंजऱ्यामध्ये नयन अडकली होती. आणि... आणि... बाप रे केवढाले नाग तिच्याभोवती धावत होते...
'धावाऽ वाचवाऽ वाचवा...' असा आक्रोश करणाऱ्या नयनला हास्याचा गडगडाट ऐकू आला. तिने आवाजाच्या दिशेने पाहिले. मदतीच्या आशेने तिने धावा केला. परंतु ती सारी चेहरे तिच्याकडे पाहत जोरजोराने हसत होती. कुणीही तिला वाचविण्याचा प्रयत्न करीत नव्हते. ती त्यांची प्रार्थना, मनधरणी करू लागली पण व्यर्थ... तितक्यात तिच्या सर्वांगातून कळ निघाली. त्या वेदनेने तळमळत ती पायाकडे पाहू लागली. एक अजस्त्र नाग तिला दंश करून वेगाने परतत होता. पुन्हा माघारी फिरून त्याने पुन्हा दंश केला... पुन्हा तोच प्रकार त्या असंख्य दंशाबरोबर तिच्या वेदना वाढत होत्या. अवतीभोवतीचे चेहरे तिला मदत करावयाचे सोडून जोरजोराने हसत होते. संपलं सार... मी मरणार मरणार प.. पण हे काय... असंख्य दंश होऊनही मी जिवंत कशी? नयनने पुन्हा खाली पाहिले तिला आश्चर्य वाटले कारण तिला दंश करणारे ते अजस्त्र धूड एका पाठोपाठ एक गलितगात्र होऊन नयनच्या पायाशी लोळण घेत होते. दुसरीकडे तिच्या असहाय्यतेवर हास्याची फुलबाजी उडविणारे चेहरेही उदासवाणे भासत होते...
'टण....टण.... टण.....' भाईजीने दिलेल्या घंटेमुळे नयनने डोळे उघडले. खुर्चीवर मान टेकवलेल्या अवस्थेत तिने पाहिले... छतावरचा पंखा त्याच्या गतीने फिरत होता जणू जीवनचक्र!
पर्स उचलून नयन... ती जणू मरणगंधा... शापित सौभाग्यवती बाहेर आली. आश्चर्य म्हणजे सकाळपासून बरसणाऱ्या सरी थांबल्या होत्या...
(पूर्णतः काल्पनीक) समाप्त...
0000