प्रारब्ध भाग ६ Vrishali Gotkhindikar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रारब्ध भाग ६



आतल्या खोलीत गेल्यावर सुमनला दिसले की इथे पण खुप छान फर्निचर होते.
एक डायनिंग टेबल , टेबलाशेजारी एक छोटी आधुनिक सेटी होती बसण्यासाठी .
चमकता फ्रीज ,ग्यास शेगडी ,किचन कट्ट्यावर छान काचेची कपाटे होती .
पण सध्या मात्र ती रिकामीच दिसत होती .
जवळच एक मोठे कपाट दिसत होते कपड्याचे .
दरवाज्याबाहेर बाल्कनी दिसत होती .
सुमन बाल्कनीत जाऊन आली .
बाल्कनीत एक टेबल ,पुस्तके ठेवलेले छोटे कपाट व एक छोटा बेड पण होता .

सुमन म्हणाली ,”स्मिता ताई मी करू का चहा ?’
स्मिता हसली ,“उद्यापासुन तुझ्याच ताब्यात आहे किचन ...
आणि मला ताई वगैरे नको स्मिता म्हण फक्त ..आपण मैत्रिणी आहोत आता .
सोबत आणलेले सामोसे, वेफर्स, बर्फी वगैरे स्मिताने सर्वांना डिश मध्ये दिले .
आता संध्याकाळ झाली होती .
चहा खाणे थोड्या गप्पा झाल्यावर स्मिताने देवापुढे दिवा लावला,व म्हणाली
“सुमन जा आता फ्रेश होऊन आवरून ये..
सुमनने बाहेरची तिची सुटकेस आत आणली व त्यातील दुसरी साडी इतर कपडे बाहेर काढले.
स्वयंपाकघरात असलेल्या बाथरूममध्ये ती गेली .
बाथरूम लहान होती पण आतच संडास पण होता ,थोडी मोकळी कोरडी जागा होती कपडे बदलायला .
समोर एक मोठा आरसा पण होता .
सुमनला गावी अगदी मोठ्या न्हाणीघराची सवय होती ,इथे तिला थोडी अडचण भासली .
मग तिने तेथल्या सुवासिक साबणाने हात तोंड स्वच्छ धुतले .
समोरच आरशाजवळ पावडर होती ,कंगवा होता .
केस विंचरून परत छान वेणी घातली ,पावडर लावली आणि सोबतच्या पर्स मधील काजळ आणि कुंकू
काढुन लावले आणि तेथेच ठेवले .
वेगळी नवी साडी नेसल्यावर तिला फ्रेश वाटू लागले .
तिथल्या साबणाचे आणि पावडरचे वास तिच्यासाठी नवीन होते .
ती आवरून बाहेर आली .
“परेश जा रे आवरून तयार हो “स्मिताने परेशला हाक दिली .
परेश पण आपले कपडे घेऊन बाथरूम मध्ये शिरला .
सुमनने पाहिले स्मिताने एका डब्यातुन तांदूळ काढले होते आणि सोबत आणलेल्या एका मापट्यात ओतले होते
ओवाळायची पण तयारी झाली होती.
बाहेर आलेल्या सुमनला पाहिल्यावर स्मिता म्हणाली ,
“ वाहवा केस केव्हढे सुंदर आहेत ग तुझे
काय छान दिसतेस..साडी पण छान आहे ..’
“हो सासुबाईनी ही साडी दिली जाताना..”सुमन म्हणाली .
हे काय करता आहात तुम्ही ?
“स्मिता हसली अग तुझा गृहप्रवेश करायचा आहे तु राहायला आलीस न आता इथे .
परेशची खुप इच्छा होती गावच्या पद्धतीने व्हायला हवी अशी म्हणून ही सगळी तयारी ..”
तोवर परेश पण आवरून बाहेर आला .
पांढरा झब्बा आणि लेंगा घातलेला परेश देखणा दिसत होता .
बाहेरच्या दरवाज्यात एक मोठा खण अंथरून ते माप स्मिताने त्यावर ठेवले .
मग परेश आणि सुमन दोघांना दाराबाहेरच थांबायला सांगितले .
सुमनला हळदी कुंकू आणि परेशला उभे गंध लावुन स्मिताने दोघांना ओवाळले .
मग सुमन ते माप ओलांडून आत आली पाठोपाठ परेश पण आत आला .
या सगळ्या कार्यक्रमाचे संतोष मोबाईलवर फोटो घेत होता .
दोघांना पेढा भरवून स्मिता आणि संतोषने त्यांचे तोंड गोड केले .
परेश संतोष आणि स्मिताने जोरात टाळ्या वाजवल्या आणि तिघे एकसुरात ओरडले
“वेलकम टू मुंबई मिसेस सुमन ....!”
हे सगळे बघुन सुमन हर्षित झाली .
मग त्या दोघांनी देवाला नमस्कार केला, देवापुढे पेढे ठेवले.
“संतोष स्मिता तुमचे आभार कसे मानायचे ?छान केले सगळे तुम्ही ..परेश म्हणाला
“ए गप रे आभार मानून आम्हाला काय परके करतोस की काय ..?
स्मिता म्हणाली ..
“अरे आपण दोघे मित्र तशीच आता एक स्मितालाही मैत्रीण मिळाली सुमनच्या रुपात
हो ना सुमन ?”संतोष म्हणाला
“हो भाउजी आता आम्ही पण दोघी मैत्रिणी होऊ ..सुमन हसून म्हणाली .
“ए ते तसले भाउजी वगैरे नको हं ..सरळ नावाने बोलाव ..असे संतोष म्हणाल्यावर
“अरे अजुन नवीन आहे ती ...लहान गावातुन आलीय हळूहळू येईल एकेरीवर
लगेच नाही जमणार तिला ..”परेश उत्तरला .
सुमनला पण हायसे वाटले आणि तिने पण होकारार्थी मन हलवली .
“चल रे संतोष आता जोडीला एकटे सोडूया असे म्हणत स्मिता संतोषला निघायचा आग्रह करू लागली
“का हो स्मिताताई थांबा न थोडा वेळ ..सुमनने आग्रह केला .
“नको आता बराच उशीर झालाय निघतो आम्ही ..
मला स्वयंपाक पण करायचा आहे घरी जाऊन ...
थोड्या वेळाने आमच्या शेजारच्या पिंटू सोबत तुम्हाला पण डबा पाठवते
बाहेर कुठे जाऊ नका बरे जेवायला परेश ...”स्मिता म्हणाली
“ आता कंटाळा आलाय कुठे जायचा ..बरे झाले तुझा डबा येतोय ते ..”
परेश खुष होऊन म्हणाला ..
“परेश ती गुलाबी पिशवी पाहिलीस का ....सोफ्यावर ठेवलेली पिशवी दाखवुन संतोष म्हणाला
त्यात खास सुगंधी फुले आहेत बर का ...तुमची रात्र गुलाबी करायसाठी ..
त्याचा उपयोग करा ...नाहीतर गडबड कराल आणि फुले तशीच राहतील ‘..
संतोष खट्याळपणे बोलला ..
परेश जोरजोराने हसायला लागला ..
सुमन ते ऐकुन लाजेने लाल लाल झाली ..
स्मिताने पण तिला हलकेच चिमटा घेतला ...आणि हसून ती संतोषसोबत बाहेर पडली .
थोडा वेळ दोघे सोफ्यात बसून राहिले आज काढलेले फोटो बघत .
मग संतोषने टीव्ही ऑन केला ..एकमेकांना खेटून दोघे टीव्हीच्या गाण्यांचा आनंद घेऊ लागली .
असाच तास दीड तास गेला आणि बेल वाजली .
शेजारचा पिंटू डबा घेऊन आला होता .
लगेच स्मिताचा फोन आला तिला सुमनशी बोलायचे होते .
परेशने फोन सुमनला दिला ..
फोनवर स्मिता म्हणाली ..”निवांत जेवा बर का सुमन फार गडबड नका करू
अख्खी रात्र आहे तुमच्यासाठी ..आणि गुलाबजाम दिलेत डब्यात ..ते गोड लागतात का बघा “
“ताई तुमचे आपले काहीतरीच हं ...थ्यांक्स..डबा दिलात ते ..सुमन म्हणाली .
थोड्या वेळात सुमन डबा घेऊन आत गेली .
ताटे वाट्या घेऊन तिने सगळे अन्न वाढून घेतले पाणी घेतले आणि परेशला जेवायला बोलावले .
दोघांनी पोटभर जेऊन घेतले .
स्मिताने छान केला होता स्वयंपाक .
सुमनला मात्र गावाकडच्या स्वयंपाकापेक्षा थोडा अळणी वाटला स्वयंपाक .
“भांडी तशीच ठेव सिंक मध्ये, मी शेजारच्या काकूंना संगीतले आहे त्यांच्याकडची भांडी घासणारी बाई
उद्यापासून पाठवा असे ...”परेश म्हणाला .
सुमनने सगळी झाकपाक करून बाकीचे अन्न फ्रीजला ठेवले .
टेबल स्वच्छ पुसून ती हात धुऊन बाहेर आली .
बघते तर काय परेशने सगळ्या बेडवर संतोषने आणलेली फुले पसरली होती .
सगळ्या खोलीभर चाफा ,मोगरा अशा सुगंधी फुलांचा वास पसरला होता .
“ ये न इकडे ..सगळी तयारी पुरी झालीय बघ ..परेश सुमनला बोलावू लागला .
“थांबा कपडे बदलुन येते ..असे सुमन म्हणताच परेश चटकन बेडवरून उतरला .
आणि त्याने सुमनला जवळ ओढले
“आता कपडे बदलायचे नाही ..मी ते काढणार आहे असे म्हणून त्याने सुमनला उचलुन बेडवर ठेवले
आणि तिच्या ओठात ओठ घातले ...
सुमनला काहीही बोलू न देता त्याने ..शेजारचा लाईटचा स्वीच बंद केला ..
आणि मग बघता बघता दोन शरीरे एकत्र झाली
आणि उष्ण श्वासात आणि हुंकारात रात्र तरुण आणि गुलाबी होऊन गेली

क्रमशः