प्रारब्ध भाग ८ Vrishali Gotkhindikar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रारब्ध भाग ८

प्रारब्ध भाग ८

सकाळी नेहेमीप्रमाणे जाग येताच परेशने शेजारी पाहिले .
सुमन गाढ झोपेत होती ..त्याने कूस बदलुन तिच्याकडे तोंड केले
काल रात्रीची आठवण येऊन परेश सुखावला .
त्याच्या हालचालीने अचानक सुमनला जाग आली .
आपल्याकडे परेश बघत आहे असे दिसल्यावर ती एकदम सावध झाली .
“किती वाजले हो ..आज जायचे आहे न कामावर तुम्हाला ..
असे म्हणत ती लगबगीने उठू लागली .
तोपर्यंत परेशने तीच हात धरून तिला परत आपल्या कुशीत ओढले .
“जाईन ग मी... कशाला इतकी गडबड करतेस ..
पुन्हा पाच दहा मिनिटे प्रणय चालू राहिला .
मग मात्र दोघेही उठले आणि तयारीला लागले .
सुमनने ब्रश करून चहा टाकला ..
चहा घेऊन लगेच परेश अंघोळीला पळाला
सुमनने उप्पीट करायला घेतले
परेशचे सर्व आवरल्यावर तो टेबलवर आला ,त्याच्यापुढे बशी ठेऊन
“परत चहा हवाय का तुम्हाला ..असे सुमनने विचारले ..
“नको परत चहा ,उप्पीट मस्त झालेय तुही घे ना माझ्यासोबत.
“काहीतरीच काय मी अंघोळ झाल्याशिवाय काही खात नाही माहित आहे न ?
सुमनने प्रश्न केला ..
“बर बुवा मी गेलो की निवांत कर अंघोळ आणि खाऊन घे आणि आराम कर .”
“हो मी नंतर भाजी आणायला जाणार आहे स्मिता वहिनींच्या सोबत.
इकडे तिकडे फिरुन येऊ आम्ही ..
आज जेवायला तिकडेच आहे मी “सुमन म्हणाली
“अरे वा मजा आहे तुमची ,नवरे लोकांना ऑफिसला पाठवून चैन करताय ..
परेश हसत म्हणाला ...बोलता बोलता ब्यागेत पास ,रुमाल वगैरे साहित्य भरून
त्याने बूट घालायला घेतले .
तिच्या हातात ५०० च्या नोटांचे एक पुडके देऊन परेश म्हणाला ,
“हे घे पैसे १०००० रुपये ठेव तुझ्याजवळ ..
काही हवे असेल तर यातुन कर खर्च.
आज तुझ्या नवीन पर्स चे “उद्घाटन” होऊ देत “
सुमन खुष झाली ,कधीतरी गावात छोट्या पर्समध्ये बसला जायला यायला मामाने दिलेले
चाळीस पन्नास रुपये असत ..आणि आता हे मोठ्या पर्स मध्ये भरपूर पैसे ..
तिने हसून ते पैसे आत जाऊन पर्समध्ये ठेवले व बाहेर आली .
त्याला निरोप द्यायला आलेल्या सुमनला त्याने जाता जाता जवळ ओढुन तिचे एक जोरदार
चुंबन घेतले ...
“अहो सोडा ..हे काय करताय असे म्हणे पर्यंत ..बाय बाय भेटू संध्याकाळी ..
असे म्हणत परेश बाहेर पडला .
परेश गेल्यावर सुमनने दरवाजा लावून घेतला आणि निवांत आवरून खाऊन घेतले .
थोड्या वेळात ती नवीन कपडे घालून पर्स घेऊन बाहेर पडली आणि स्मिताकडे गेली .
सोबत तिने स्मिताने दिलेले कापड घेतले होते .
त्या दोघी शिंप्याकडे जाणार होत्या .
तिला नवीन पद्धतीचे दोन तीन ब्लाउज पण शिवायचे होते लग्नात मिळालेल्या काही नवीन साड्यांवर
ते सर्व साहित्य एका पिशवीत घालून तिने घेतले होते
तिला पाहून स्मिता चकित झाली ..
“वाव..! काय दिसते आहेस तु ..कडक एकदम ..
“अहो काल हे मला खरेदीला घेऊन गेले होते ,तिकडे दोन तीन ड्रेस घेतले ,एक पर्स
दोन फ्रॉक सुद्धा ..आणि बरेच काही ...हे बघा .. “
वा वा ..परेश आहेच खुप हौशी मस्त घेतलाय ड्रेस आणि तुला स्लीवलेस शोभून दिसते .
दोघींनी मिळुन कॉफी घेतली आणि बाहेर पडल्या .
स्मिताने तिच्या शिंप्याची ओळख करून दिली .
सुमनने अगदी लेटेस्ट असे ब्लाउज शिवायला माप दिले .
शिवाय पंजाबी पण छान टाईट फिटिंग चा शिवायला सांगितला .
जवळच्या एका महिला प्रसाधनाच्या दुकानात गेल्यावर सुमनने महागडे असे मेकअप साहित्य विकत घेतले
तसेच काही इमिटेशन ज्वेलरी पण घेतली .
सर्व काही ब्रान्डेड घेतले होते .
जवळ जवळ चार हजार रुपये बिल तेथेच झाले ..
एकंदर तिची खरेदी पाहता ...
स्मिताच्या लक्षात आले सुमन खेड्यातली जरी असली तरी खुप चिकित्सक आणि खर्चिक दिसते.
परेशने आपल्याला खर्चाला पैसे दिलेत असेही ती बोलून गेली .
खरेदी झाल्यावर स्मिताने तिला भाजी मार्केट दाखवले .
सुमनच्या घरच्या मागील बाजूलाच होते ते .
दोघींनी लागणारी भाजी इतर काही किराणा खरेदी केली व स्मिताच्या घरी परत आल्या .
संतोष रोज डबा घेऊन ऑफिसला जात असे त्यामुळे स्मिताचा स्वयंपाक तयार होताच .
तिच्याकडे ओव्हन होता ,तिने त्यात भाजी आमटी गरम केले,व दोघी जेवायला बसल्या .
स्मिताने दोन तीन प्रकार केले होते ढोकळा,गाजर हलवा ,बाहेरून जिलबी पण आणली होती .
सुमन स्मिताच्या स्वयंपाकाची तारीफ करीत चवीने जेवली .
जेऊन दोघी टीव्ही पाहत बसल्या .
स्मिताचा टीव्ही पण मोठा होता ,एक छान पिक्चर दोघी पाहत बसल्या .
मोठा हॉल ,मोठा टीवी सुमनला अगदी मज्जा वाटली .
जाताना तिने ओव्हनची सर्व माहिती विचारून घेतली.
दोघींनी परत भेटायचे ठरवून सुमन घरी परतली .
घरी आल्यावर सुमनने मस्त ताणून दिली .
पाच वाजता उठून तिने चहा करून प्यायला आणि सहा वाजता स्वयंपाकाला लागली .
सात वाजेपर्यंत परेशने येतो असे सांगितले होते .
तिच्या घरी एका वेळेस पाच सहा माणसांचा स्वयंपाक ती आरामात करीत असे .
मग हा तर लुटुपुटीचा स्वयंपाक होता तिच्यासाठी .
भाजी आमटी भात जरा वेगळे म्हणून पाटवड्या असा बेत केला तिने .
पोळ्या फक्त गरम गरम करायच्या तिने ठरवल्या .
मग तिने निवांतपणे स्वतचे आवरले .
आजच्या मेकअप बॉक्सचे ओपनिंग केले .
नवीन पंजाबी घालून केसात दुपारी आणलेला भरघोस सुवासिक गजरा माळून तय्यार बसली.
साडेसातला परेश घरी आला .
दार उघडताच मोगर्याचा घमघमाट आला आणि दारात उभ्या असलेल्या देखण्या सुमनला बघताच
त्याचा दिवसभराचा शीण नाहीसा झाला .
“थांब आलोच अंघोळ करून असे म्हणून तो हातातली ब्याग सोफ्यावर ठेवून आत गेला .
दमट हवा आणि चिकचिक असल्याने मुंबईच्या प्रत्येक चाकरमान्यासारखी त्यालाही सकाळ संध्याकाळी
अंघोळ करायची सवय होती .
“तुमचे झाले असेल तर वाढू का ?..गरम पोळ्या करून वाढते तुम्हाला .
असे सुमनने विचारल्यावर तो लगेच टेबलवर येऊन बसला जेवायला .
सुमनच्या हातचा चविष्ट स्वयंपाक जेवताना तो अगदी संतुष्ट झाला .
सुमन खरोखर सुगरण होती .
बाजारातून येताना काहीतरी गोड म्हणून तिने काजू बर्फी आणली होती .
शेवटी त्याचे दोन तुकडे खाल्ल्यावर तर पूर्ण तृप्ती झाली त्याची ..
त्याच्यानंतर सुमन बसली जेवायला ..दुपारी भरपूर जेवण झाल्याने फारशी भूक नव्हतीच तिला .
“सुमन उद्यापासून असे नाही चालणार बर का संध्याकाळी आपण दोघे सोबतच जेवायचे “
सुमन हसली आणि आवराआवर करायला लागली .
नंतर गप्पा मारताना तिने अगदी उत्साहाने दिवसभराचा वृत्तांत सांगितला .
काय काय खरेदी केली हेही सांगितले .
तिचा आनंद पाहुन त्यालाही बरे वाटले .
मग त्याने सांगितले त्याच्या मोबाईलवर मामांचा फोन आला होता,सुमनच्या चौकशीचा ..
त्यानेच मग मामांना फोन लावुन दिला .
मामांनी तिची चौकशी केली ,ठीक आहे न विचारले ..
मामी आणि चिंटू पिंटू पण बोलले तिच्याशी .
त्यानंतर परेशने त्याच्या घरी पण फोन लावला .
आई बाबांशी बोलला ,त्यांना सुमनसोबत बोलायला दिले .
त्यांनीही सुमनला काळजी घे नीट राहा असे सांगितले .
परेशच्या मनात आले सुमनसाठी एक फोन घ्यायला हवा .
मुंबईच्या आयुष्यासाठी ती खरोखर एक आवश्यक गोष्ट आहे .
ती रात्र मोगऱ्याच्या सुवासात “धुंद” होऊन गेली.

क्रमशः