Prarambh - 3 books and stories free download online pdf in Marathi

प्रारब्ध भाग ३

प्रारब्ध भाग ३

यानंतर आलेले सर्व लोक नवरा नवरीला भेटायला येऊन त्यांना आहेर ,शुभेच्छा देऊ लागले .
परेशचे मित्र,गावातल्या सुमनच्या मैत्रिणी ,मिनू ही सगळी दोघांची मस्करी करू लागली.
आलेल्या लोकांच्या एकमेकात गप्पा गोष्टी ,हास्यविनोद सुरु झाले .
इकडे जेवणाची पण गडबड सुरु झाली .
शेजारीच असलेल्या सोसायटीच्या हॉलमध्ये जेवायला टेबल खुर्च्या लावल्या होत्या .
तालुक्याच्या गावातुन नेहेमीचे आचारी आले होते .
गावातले दीडएकशे लोक जेवायला होते .
शिवाय परेशच्या गावातले पण पन्नासभर लोक बोलावले होतेच .
लोकांच्या पंगती बसु लागल्या .
जिलेबी,मठ्ठा,मसालेभात हा बेत होता सोबत भजी ,पुऱ्या, कुर्मा असे पदार्थ होते .
परेशच्या मामा मामींनी लग्नाचा अगदी थाटमाट केला होता.
जेवण अतिशय चवदार आहे असे सर्व लोक जेवण झाल्यावर सांगुन जात होते .
त्या लहान गावात इतके भरपूर असे पदार्थ आणि उत्तम जेवण मिळाल्याने लोक संतुष्ट होती .
परेशने खर्चात अजिबात हात आखडता घेतला नव्हता .
मुळात प्रत्येक गोष्ट उत्तम असावी याकडे त्याचा नेहेमीच कल असे .
थोडी गर्दी कमी झाल्यावर परेश आणि सुमनला एकमेकांशी बोलायला जमले .
“सुमन आवडली का साडी आणि दागिने ..?परेशने विचारले
“हो खुप छान आहेत ..एक प्रेमाचा कटाक्ष त्याच्याकडे टाकून सुमनने कबुली दिली.
यापुढे जास्त काहीच बोलता येत नव्हते कारण आजूबाजूला आता बरीच माणसे जमा झाली होती.
नंतर जेवणाचा कार्यक्रम पार पडला .
आमंत्रित सर्व जेऊन गेल्याने आताच्या पंगतीला घरची माणसे ,सुमन परेशचे मित्र मैत्रिणी इतकेच लोक होते .
त्यामुळे हास्य विनोदाला बहर आला होता.
परेशचे मित्र दोघांची एवढी चेष्टा करीत होती की सुमनचा चेहेरा लाजून लाल झाला होता
आणि ती आणखीनच सुंदर दिसत होती .
एकमेकांना आग्रहाने घास भरवताना दोघेही अगदी आनंदी झाले होते .
तिच्या नाजुक हातांनी भरवलेला जिलबीचा घास खाताना परेशच्या अंगावर रोमांच उभे राहिले .
अगदी तशीच अवस्था सुमनची झाली होती .
इतके छान जेवण असुन सुमनचे जेवणात लक्षच नव्हते .
तिच्या डोळ्यासमोर पुढची मुंबईची चित्रे दिसत होती .
आता लग्नघरात आवराआवरी सुरु झाली .
थोड्याच वेळात परेश ,सुमन आणि त्याच्या घरचे सर्वजण त्यांच्या गावाला जायला निघणार होते .
उद्या परेशकडे लग्नानंतर केली जाणारी सत्यनारायण पूजा होती .
नंतर घरच्या देवाला जाऊन यायचे होते ..
मधल्या काळात परेशने त्याच्या साहेबांना फोन करून आणखी दोन तीन दिवस रजा वाढवुन घेतली होती .
असे अचानक परेशचे लग्न झाले समजल्यावर साहेबांनी पण आनंदाने राजा वाढवुन दिली होती.
सामानाची बांधाबांध झाल्यावर परेशच्या एका मित्राच्या जीप मधून परेश ,त्याचे आईवडील ,दोन तीन मित्र आणि सुमन असे निघाले .
जाताना सुमन मामीच्या गळ्यात पडून खुप रडली .
चिंटू पिंटू पण ताईला बिलगले होते .
मामा मामींना पण अश्रू आवरेनात ..
आजपर्यंत कधीच ते एकमेकाला सोडुन राहिले नव्हते .
आत्तापर्यंत लेकी सारख्या वाढवलेल्या सुमनला आता लग्नानंतर एव्हढ्या लांब जायचे होते .
चांगले स्थळ मिळाले हा आनंद होताच .पण विरहाचे दुखःही होते .
तरी बरे उद्या पुन्हा सुमन भेटणार होती
कारण परेशकडच्या सत्यनारायण पूजेसाठी मामा मामी आणि मुलांना पण बोलावले होते .
सुमनने परत सांगितले मामी चिंटू पिंटूला सुद्धा घेउन ये ग ..

परेशचे गाव जवळच होते
अर्ध्या तासात सर्व घरी पोचले
परेशचे घर खेड्यात असते तशा प्रकारचे जुने पण मोठे होते .
आजुबाजुला भरपूर जागा,तिथे भरपुर फुला फळांची झाडे
..बाहेर सोप्यात हौसेने एक झोपाळा पण बांधला होता .
परेश मुंबईत रहात असल्याने व चांगला पगारदार असल्याने
घरात बऱ्याच अद्ययावत सोयी करून घेतल्या होत्या .
स्वयंपाक कट्टा ,डायनिंग टेबल ,एक छोटा फ्रीज ,चकचकीत स्टीलची भांडी
बाहेरच्या मोठ्या हॉलमध्ये चांगले फर्निचर ,बसायला आरामशीर खुर्च्या .
सुमन कौतुकाने हे पाहत असता तीची सासु म्हणाली
“किती काय काय आमच्या परेशने घेतले आहे बघ...
नको नको म्हणले तरी मुंबईतून सामान पाठवत असतो
लई हौस आहे सगळ्या गोष्टींची त्याला..
मुंबईच्या घरात तर यापेक्षा छान काय काय आहे बघ .. !!!
सुमन हसली ..तेवढ्यात परेश आत आला ..
काय आवडले का आमचे हे साधे घर ?असे त्याने विचारले..
“याला काय साधे म्हणतात का ....केवढ्या काय काय वस्तु आहेत इथे .”सुमन उत्तरली
अशा वस्तु सुमनने तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिल्या होत्या .
तालुक्याला मिनूच्या घरी सुद्धा एवढ्या गोष्टी नव्हत्या .
तेव्हढ्यात गावातल्या शेजारच्या बायका सुमनला भेटायला, पहायला आल्या .
त्या लग्नाला आल्या होत्या ,पण निवांत बोलायला मिळाले नव्ह्ते त्या ठिकाणी
म्हणून नववधुला पाहायला आल्या होत्या .
दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा पार पडली .
कार्यक्रम घरगुतीच होता ,फक्त परेशचे मित्र आणि सुमनचे मामा मामी एवढीच माणसे होती.
पूजा झाल्यावर जेवण होताच लगेच परेशचे मित्र त्यांच्या गाडीने मुंबईला निघून गेले .
सुमनच्या सासुबाईंनी मामींना सुमनसोबत पाठराखण मुंबईला जाणार का असे विचारले .
पण सध्यातरी मामीला तिकडे जाता येत नव्हते .
त्यामुळे थोडे दिवसांनी ते दोघे मुंबईला जाऊन सुमनला माहेरपणासाठी आणतील असे ठरले .
सुमनचे सासू सासरे पण आत्ता जाणार नव्हते त्यामुळे सध्यातरी देवदर्शन झाल्यावर नवविवाहित
जोडीच फक्त मुंबईला जायची होती .
मामा मामी आणि मुले सुमनचा निरोप घेऊन आता आपल्या घरी निघाले .
‘निट जा ग सुमे ,आम्ही येऊ थोडे दिवसांनी मुंबईत बर का “
असे म्हणून मामीने सुमनला जवळ घेतली .
आता खरोखर निरोपाचा क्षण आला होता .
चिंटू,पिंटू पण ताईला बिलगून हुंदके देऊ लागले .
त्यांची समजुत काढत परेश म्हणाला ..
“अरे रडता कशाला ...तिला भेटायला येणार आहे न तुम्ही मुंबईला ..
थोडे दिवसाचा तर प्रश्न आहे ...”
परेशने पण मामा मामींना सांगितले
“सुमनची अजिबात काळजी करू नका ..
मी तिला अगदी सुखात ठेवेन ..बघा थोडे दिवसांनी माहेरी यायला पण नको म्हणेल ती
बर का सुमन ऐकलेस ना ...”
असे म्हणल्यावर सुमन रडता रडता हसु लागली ..
मग सगळेच हसु लागले.
आणि सुमनच्या सासरचा निरोप घेऊन निघाले.
नंतरच्या दिवशी देवदर्शन व्यवस्थित पार पडले .
सुमनच्या हातुन देवाची रीतसर ओटी भरून घेतली तिच्या सासुबाईंनी .
देवाला साकडे घातले देवा दोघांना सुखी ठेव .
लवकरच दोघांचे तिघे होऊ दे आणि पुन्हा दर्शनाला येऊ दे ..
दोन दिवसांची सर्व गडबड आता संपली होती .
कपडे ,सामान आवरणे सुरु झाले .
उद्या सकाळी दोघेही बसने मुंबईला जायला निघणार होते .
सासुबाईंनी खुप गोष्टी आठवणीने बांधुन दिल्या .
काही मसाले ,इतर थोडी पीठे ,खायचे पदार्थ वगैरे ..
परेश मुंबईत डबा लाऊन जेवत असल्याने त्याच्या स्वयंपाकघरात किरकोळ भांडीकुंडी सोडता
काहीच नव्हते .
कधी एकदोन दिवसासाठी परेशचे आई वडील जरी मुंबईला गेले तरी तेही डब्यात जेवत असत.
घरची शेती इतर कामे घरच्या गाई म्हशी सोडुन त्यांना दोन दिवसपेक्षा जास्त मुंबईत राहता येत नसे .
तशात कोणी नातेवाईक पण नव्हते मुंबईत त्यामुळे जास्त राहायचे कारण नसायचे .
आता गेल्या गेल्या बाहेर जाऊन काही आणायला लागु नये म्हणून ही सारी तयारी दिली होती.
सध्यातरी सुमनने आपले दागिने सासुबाईंकडेच ठेवले .
अजुन मुंबईत नवीन असल्याने एकटी राहताना जोखीम नको असे तिला वाटले.
मी पुढच्या वेळेस येईन तेव्हा घेऊन जाईन असे सांगितले .
फक्त एक लहान मंगळसूत्र आणि दोन बांगड्या,कानातले इतकेच ठेवले अंगावर.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED