प्रारब्ध भाग ४ Vrishali Gotkhindikar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रारब्ध भाग ४



सासु सासऱ्यांचा प्रेमळ निरोप घेऊन व त्यांचा आशीर्वाद घेऊन सुमन आणि परेश
आपल्या सर्व सामानासहीत निघाले .
सुमनला सासुचा स्वभाव खुप चांगला वाटला ..
अगदी आपल्या मुलीसारखे ती सुमनला वागवत होती .
निरोप देताना परेशला पण त्यांनी बजावून सांगितले होते की सुमनला जप,तिला त्रास होऊ देऊ नको .
परेशने पण त्यांना तसा “शब्द” दिला होता .
त्यामुळे सुमन सुखावली होती ..
त्या गावातून तालुक्याला बस होती .
आणि तिथून मुंबईची गाडी पकडायची होती .
इथे आरक्षण वगैरे प्रकार नव्हता .
बस इथुन जिल्ह्याच्या गावाला पोचल्यावर पुर्ण भरून जात असे .
या दोघांना मात्र छान जागा मिळाली .
परेशने सर्व सामान व्यवस्थित ठेवले आणि खिडकीची जागा धरून बसलेल्या,आणि बाहेर
बघत असलेल्या सुमनच्या शेजारी बसला .
त्याच्याकडे बघत सुमन म्हणाली ..
“अहो कधी पोचेल ही बस मुंबईला
आणि मुंबईत कुठे आहे आपले घर .?
“हे बघ इथुन जिल्ह्याला गेल्यावर नऊ वाजता तिकडून सुटायची वेळ आहे .
बरोबर वेळेत जर सुटली तर तीन वाजेपर्यंत पोचू मुंबईत
तिथुन मात्र आपल्याला रिक्षाने दहा मिनिटात घरी पोचता येईल
मुंबईत डोंबिवली भागात राहतो आपण ”
“अरे बाप रे इतका वेळ या बसमध्ये बसायचे.?.कंटाळा येईल न मला “
“कुठला कंटाळा ?
आता बस रस्त्याला लागली की आजुबाजुची गावे बघण्यात मजा येईल तुला .
बस पुण्यात पोचली की तिथे जेवण करण्यासाठी थोडा वेळ थांबतात .
नंतर मग पुणे मुंबई प्रवास तर अगदी “प्रेक्षणीय” आहे बर का !!.
मी मात्र थोड्या वेळात मस्त झोपून जाणार आहे ..”
“ का हो तुम्हाला नाही का मजा पहायची सगळी ..?
“अग मी तर नेहेमीच पहातो ..मला आता इतकी नाही मजा वाटत ..”
“तुम्हाला सांगू का मी तर इतका मोठा प्रवास पहिल्यांदा करते आहे .
जिल्ह्याच्या गावी सुद्धा मला कधीच जायचा प्रसंग नाही आला ..
कॉलेजसाठी तालुक्याला मात्र रोज जात होते मी ..”सुमन म्हणाली
“हो माहित आहे मला ..तुला पाहताच तुझी सगळी माहिती काढली होती मी “
सुमन त्याच्याकडे पाहुन हसल्यावर तो हलकेच तिच्या आणखी जवळ सरकला
आणि त्याने आपला हात मागल्या बाजुने तिच्या कमरेवर टाकला ..
सुमन एकदम संकोचली आणि तिने अंग आकसून घेतले ..
“आता असे दूर होऊन कसे चालेल अजुन खुप जवळ यायचे आहे आपल्याला “
असे तिच्या कानात परेश कुजबुजला ..
तिचे गाल लाजेने लाल झाले ..”इश्श्य असे म्हणून तिने एक मुरका मारला.
ते पाहून परेश एकदम खुष होऊन गेला ...आणि मुंबईला गेल्यावर काय काय करायचे या विचारात दंग झाला .
सुमनच्या अंगाचा मऊ मुलायम स्पर्श त्याला रोमांचित करीत होता .
गाडीने वेग पकडला आणि सुमनचे डोके त्याच्या खांद्यावर आले .
वाऱ्याने तिचा डोळा लागला होता.
गेले आठवडाभर चालेल्या गडबडीने दमलेली असणार ती .. !!
तिच्या अंगाचा मोहक गंध ,तिच्या पावडरचा सुवास ,केसांच्या तेलाचा मंद वास...
सगळा आसपास गंधमय झाला होता .!
एक सैलशी वेणी घातलेल्या तिच्या मऊ मुलायम लांब केसांच्या काही बटा तिच्या कपाळावर लहरत होत्या तर काही परेशच्या खांद्यावर येत होत्या .
तिच्या नुसत्या जवळीकीने त्याला सुखद वाटत होते .

आता हिच्या सहवासात आपल्याला सुखच मिळेल ..हिच्या पण सर्व इच्छा आपण पूर्ण करायच्या .
हे आत्ता साधेसे असणारे हीचे रूप मुंबईत गेल्यावर अगदी आधुनिक करून टाकायचे .
पंजाबी ड्रेस ,.वेस्टर्न कपड्यात हीचे रूप अगदी खुलून येईल .
आता अशी ही काकुबाई टाईप साडी हीला नेसू नाही द्यायची .
देखणी तर आहेच ही आता मित्र मंडळीच्या आणि मुंबईतील चटपटीत बायकात पण शोभून दिसली पाहिजे .
बारावी नंतर जिल्ह्याच्या गावी आय टी आय पूर्ण करून तिथे नोकरीचा थोडा अनुभव घेऊन आपण
मुंबईत आलो तेव्हा आपणही असेच साधे ...थोडे बावळट होतोच की .
पण नंतर मात्र आपण आपल्यात खुप बदल करून घेतला .

परेशला त्याचे पुर्वीचे दिवस आठवले .
आय टी आय उत्तम मार्कांनी पास होऊनसुद्धा त्याच्या खेड्यात प्रगती व्हायची शक्यता नव्हतीच ..
मग त्याने नोकरीसाठी एका मित्रासोबत मुंबई गाठली .
मुंबईत जागेची फार अडचण होती ....
पहिल्यांदा काही दिवस तर फुटपाथवर काढायची पाळी आली होती .
इतर लोकांप्रमाणे वडा पाव खाऊन दिवस ढकलायला लागले होते .
नंतर तीन चार महिन्यात एका छोट्या कंपनीत जॉब मिळाला .
तिथेच रात्री झोपायची पण सोय झाली .
एक वर्षभर तिकडे काम केल्यावर त्या अनुभवावर आणि मेहेनती स्वभावावर दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळाली .
दिवसा काम आणि रात्री झोपायला इथे जागा मिळाली.
आता वडा पाव मात्र सुटला आणि दोन वेळेस डबेवाल्याकडे डबा लावण्याइतकी ऐपत आली .
इथेच त्याला संतोष भेटला तो उत्तर प्रदेशातून मुंबईला आलाहोता .
हळूहळू ते दोघे अगदी घट्ट मित्र झाले.
एका कंपनीत असल्याने मैत्री आणखीन वाढली आणि मग दोघांनी मिळुन
एक रूम शेअर करायचे ठरवले .
ही भाड्याची रूम चाळीत होती पण कंपनीच्या जवळ आणि चांगली मोठी होती.
मुंबई पद्धतीसारखे संडास बाथरूम कॉमन असलेले हे घर त्यांच्या मालकाच्या ओळखीने मिळाले होते .
चांगला पगार आणि नोकरीत स्थैर्य आल्याने आता त्यांच्या आयुष्याला थोडा अर्थ आला .
ही त्यांची कंपनी मोठी होती .
मुंबईत दोन तीन ठिकाणी त्यांची वर्कशॉप होती .
संतोष पदवीधर असल्याने लिपिक पदावर होता आणि परेश फिटर होता .
दोघेही मेहेनती असल्याने हळूहळू प्रमोशन घेत पुढील पदावर पोचले .
संतोष व्यवस्थापक पदावर पोचला आणि परेश सुपरवायजर झाला .
दोन वर्षापूर्वी संतोषचे स्मिताशी लग्न झाले, ती पण त्याच्याच गावची उत्तर प्रदेशची होती .
त्याने जवळच एक तीन खोल्याचा सेल्फकंटेंड ब्लॉक नुकताच घेऊन ठेवला होता .
काही महिने परेश एकटाच राहिला पण नंतर संतोषने आग्रह करून त्याला पण त्याच सोसायटीच्या
समोरच्या सोसायटीत एक ब्लॉक घ्यायला लावला .

ती चारमजली सोसायटी तशी थोडी जुनी होती .
पण खोल्या दोनच असल्या तरीही मोठ्या होत्या ,शिवाय मागील बाजूस एक बाल्कनी पण होती .
आत एकत्रित असलेले संडास बाथरूम पण थोडे मोठे होते .
परेशला आता पगार चांगला होताच शिवाय मालकाने आपल्या ओळखीने त्याची कर्जाची सोय पण करून दिली .
कर्ज जास्ती मुदतीचे असल्याने हप्ताही सुलभ होता.
आता डोंबिवलीसारख्या चांगल्या ठिकाणी त्याचे घर झाले होते .
नंतर हळूहळू संतोषच्या बायकोने ,स्मिताने त्याला घरात फ्रीज ,टीवी डायनिंग टेबल ,सोफासेट वगैरे गोष्टी थोड्या थोड्या हप्त्यावर घ्यायला लावल्या होत्या.
हो पुढेमागे लग्न ठरले तर घरात सगळे लागणारच होते .
स्मिता स्वभावाने खुप चांगली होती ,आपल्या भावासारखे मानत असे ती परेशला !
गेल्या एक दीड वर्षात स्मितामुळे त्याला बरेचदा घरगुती जेवण मिळत होते .
सुटी असली की तो संतोषकडेच जेवायला जात असे.
शिवाय त्यांचे इतर काही मित्र आणि त्यांच्या बायका मिळुन एखाद गेट टुगेदर ठरवत असत .
सगळ्या आपापल्या घरून काही पदार्थ आणत असत.
मग पार्टी कधी परेशच्या घरी पण केली जात असे .
कधी कधी सगळे मिळुन एखादा चांगला पिक्चर पाहायला जात,कधी चौपाटीवर भेळ खायला जात .
एकंदर सध्या खुप मस्त चालले होते ,त्यात आता अशी सुंदर बायको त्याला लाभली होती .
कधीतरी हे सगळे निवांत सुमनला सांगायला हवे असा विचार करीत त्याने झोपलेल्या सुमनकडे पाहिले
तिला आणखी जरा जवळ ओढुन घेत तो सुखावला ..

क्रमशः