Chahul - First love ... Part - 1 books and stories free download online pdf in Marathi

चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - १)

शाळा सुटण्याची घंटा झाली. मुग्धा अगदी पळतच घराच्या दिशेने निघाली. रोज मैत्रिणींसोबत गप्पागोष्टी करत घरी जाणारी मुग्धा आज अचानक कोणालाही काहीच न सांगता निघाली म्हणून सगळ्या मैत्रिणी तिच्यावर खूप रागावल्या होत्या. पण मुग्धाने आज कोणाचाही विचार केला नाही, त्याला कारणही तसेच होते... मासिक पाळी !!!

चौदा वर्षांची मुग्धा नववीमध्येच होती. कोवळंच वय ते ! इतिहासाचा तास सुरूच होता आणि अचानक तिला अस्वस्थ वाटू लागले. आपल्यासोबत पहिल्यांदाच असे काहीतरी होत आहे, असे तिला जाणवू लागले. त्यामुळे जशी शेवटच्या तासाची घंटा झाली तशी तिने धूम ठोकली. घरी पोहचल्यावर तिने घडलेला सारा प्रकार आईला सांगितला. आईने मागून पुढून मुग्धाला अगदी नीट न्याहाळले. तिला फार काही जाणवलं नाही म्हणून तिने मुग्धाला बाथरूमध्ये जाऊन कपडे बदलायला सांगितले.

आई गं ! आई गं ! वाचव मला ! असा आवाज बाथरूम मधून येताच आई अगदी घाबरतच मुग्धाकडे धावली. "काय गं मुग्धा, काय झाले तुला ? " आई धापा टाकत म्हणाली.

"आई, हे बघ काय... रक्तं !!! " आपल्या कपड्यांवर लागलेले लाल लाल रक्ताचे डाग दाखवत मुग्धा रडवेल्या स्वरातच म्हणाली.

आईला कळून चुकले होते की, आपली शंका खरी ठरली आहे. तिच्या मनात आनंदाच्या उफळ्या फुटू लागल्या. तिने लगेच मुग्धाला मिठीत घेतले आणि तिच्या कपाळावर आनंदाने चुंबनाचा वर्षाव केला. "अंग बाळा , ही तर आनंदाची बातमी आहे. आज तुझ्या जीवनातला अत्यंत महत्वाचा दिवस ! चल लवकर, कपडे बदलून घे. " असे म्हणत आई आजीला सांगायला देवघरात गेली. आनंदाची बातमी ऐकून मुग्धाची आजी सुद्धा प्रसन्न झाली आणि देवाचे तिने आभार मानले. मुग्धाने कपडे बदलताच आईने तिच्याकडे असलेलं पॅड मुग्धाला आणून दिले. त्याचा कसा वापर करावा हे तिला नीट सांगितले.

मुग्धा मात्र अजूनही बुचकळ्यातच पडली होती. आपल्यासोबत असा विचित्र प्रकार घडलेला असूनही सगळेजण खूप आनंदात आहेत म्हणून ती नाराज होती. थोड्याच वेळात आई आजूबाजूच्या स्त्रियांना संध्याकाळच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देऊन आली. आई फोनवर मावशीला मुग्धाच्या मासिक पाळीच्या सोहळ्याचे सांगत असताना मुग्धा तिच्याजवळ येऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांत पडते.

"मुग्धा, काय गं वेडाबाई, काय झाले ?" आई लडिवाळपणे मुग्धाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली.

"आई , मला आज खूप अस्वस्थ वाटत आहे. हात पाय अगदी गळून पडल्यासारखे वाटत आहेत. कंबर आणि पोट सुद्धा दुखत आहे. असं वाटतंय मला अशक्तपणा आला आहे." मुग्धा केविलवाण्या स्वरात म्हणाली.

"बाळा, तुझी ही पाहिलीच वेळ आहे ना म्हणून तुला अस्वस्थ वाटत आहे. " आई म्हणाली.

"आई, मला इतका त्रास होत आहे तरी आनंदाने तू सगळ्यांना माझ्या मासिक पाळी बद्दल का सांगत होतीस? मासिक पाळी म्हणजे काय असतं गं ? " मुग्धा प्रश्नार्थक नजरेने आईकडे पाहत म्हणाली.

आई मुग्धाला प्रेमाने कुशीत घेत म्हणाली, "मुग्धा, आज की नाही मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. तू मला नेहमी विचारायचीस ना की, आई पॅड का वापरतात? तुला दर महिन्याला हा कसला त्रास होतो? आज मी तुला सांगणार आहे. अगदी सगळं !"

मुग्धा आईकडे टक लावून पाहत होती. आई पुढे सांगू लागली...

स्त्री म्हणजे समाजव्यवस्थेचा जणू कणाच ! आणि तिची मासिक पाळी म्हणजे प्राकृतिक सृजनशीलता. मासिक पाळी ही एक सहजसोपी नैसर्गिक प्रक्रिया आहे. स्त्रीत्व जपणारी, मातृत्व देण्यासाठी असणारी स्त्री आरोग्याचा मूलभूत घटक असणारी महत्त्वाची कडी. जेव्हा एखादी मुलगी तारुण्यात पदार्पण करते तेव्हा तिचे शरीर वेगाने परिपक्व होते आणि शरीरात खूप बदल होत असतात. प्रमुख शारीरिक बदल म्हणजे स्तनांचा विकास, जननांगावर लव येणे आणि सर्वात महत्वाचे मासिक पाळी सुरु होणे. प्रत्येक मुलीची मासिक पाळी वय वर्षे १२ ते १६ ह्या कालावधीत सुरु होते, तथापि ती सुरु होण्याचा अचूक कालावधी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो. ही क्रिया प्रत्येक महिन्याला सरासरी ३-५ दिवसांपर्यंत सुरु राहते. ह्या कालावधीत स्त्रीच्या शरीरातून रक्त आणि ऊतक (टिश्यू) बाहेर पडतात. बऱ्याचशा स्त्रियांमध्ये काही लक्षणे दिसतात जसे की ओटीपोटात दुखणे, पाठदुखी, पाय दुखणे. मनःस्थितीत बदल, स्तनाना सूज येऊन दुखणे इत्यादी. ह्या काळात स्त्रीला खूप थकवा जाणवतो. ऊर्जा आणि उत्साह कमी पडतो.

आपल्या समाजात बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की, मासिक पाळी आल्यास शास्त्रानुसार स्त्रीला पाच दिवस कोणतेही धार्मिक कार्य न करणे , जेवण न करणे, मंदिरात न जाणे, घराबाहेर न जाणे या सगळ्या कामांपासून वंचित राहावे लागते कारण ती त्या काळात शुद्ध नसते. पण बाळा, मी हे सगळं अजिबात मनात नाही. खरंतर या सगळ्या गोष्टी मानायच्या कि नाही हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. एकविसाव्या शतकात विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे आणि तरीही आपण या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा म्हणून पाळत राहिलो तर आपले मागासलेले विचार आपल्याला कधीच पुढे जाऊन देणार नाहीत. उलट या काळात स्त्रियांना प्रचंड प्रमाणात थकवा जाणवत असतो म्हणून त्यांना जास्तीत जास्त अराम करण्याची गरज असते असे मला वाटते. तरीही काळाची गरज म्हणून अनेक स्त्रिया अशा अवस्थेतसुद्धा अपार कष्ट करत असतात. म्हणूनच कुटुंबव्यवस्थेचा रथ आजतागायत सुरळीत सुरु आहे.

आई माहिती सांगण्यात एवढी गर्क झाली होती, की मुग्धा कधी झोपून गेली तिला कळलेच नाही .

संध्याकाळी झाली आणि सगळ्या आजूबाजूच्या स्त्रिया घरी यायला लागल्या. सगळी तयारी कशी अगदी छान झाली होती. चोहीकडून रेखाटलेल्या रांगोळीच्या पाटावर मुग्धाला बसवले. त्यानंतर तिला चंदनाचे सुंगंधीत उटणे लावून तिला सगळ्यांनी मिळून न्हाऊ घातले. नवीन कपडे परिधान केल्यानंतर तिला ओवाळले. तिला गोडधोड खाऊ घातले. सगळ्यांनी तिला भेटवस्तू दिल्या. हसत नाचत आणि आनंदाने गाणे गात कार्यक्रम पार पडला.

खरंतर कालचा दिवस मुग्धासाठी खूप महत्वाचा होता. पण अशा अवस्थेत तिची दगदग सुद्धा खूप झाली. तिला आपल्या शरीरात होणारे बदल प्रखरतेने जाणवू लागले. तिच्यासाठी हा अनुभव जरी नवीन असला तरी तिला या सगळ्या गोष्टींचा तिटकारा मात्र अजिबात नव्हता. ती आनंदाने आपल्यातील हा बदल स्वीकारत होती.

हळूहळू दिवस जाऊ लागले. आता मुग्धामध्ये परिपक्वता दिसून येत होती. तिची पूर्ण वाढ होऊ लागली. वाईट स्पर्श, चांगला स्पर्श या सगळ्याची जाणीव तिला व्हायला लागली. कोवळ्या वयातून तारुण्यात पदार्पण करताना मुग्धा आपल्या अभ्यासाकडे सुद्धा नीट लक्ष केंद्रित करत होती. अभ्यासात तर ती हुशार होतीच पण वयात आल्यामुळे ती अधिकच रेखीव आणि सुंदर दिसू लागली. शाळेतील मुलांमध्ये तर चर्चा होतीच पण वर्गातील मुलींना सुद्धा तिच्या सौंदर्यावर ईर्षा होत होती.

नवरात्र सुरु झाली. दरवर्षीप्रमाणे मुग्धा आपल्या मैत्रिणींसोबत आजही गरबा खेळण्यासाठी नवरात्रौस्तोवाच्या कार्यक्रमात सामील झाली. मुग्धासहित साऱ्या मैत्रिणी छान नटून थाटून साडी नेसून आल्या होत्या. प्रत्येक मुलगी जणू नवदुर्गाच भासत होती. संगीत सुरु होताच सगळ्यांनी ताल धरला. प्रत्येकजण आपली वेगवेगळी अदा दाखवत लटकत मुरडत होत्या. मुग्धाने ताल धरताच ती नाचण्यामध्ये इतकी तल्लीन झाली की आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचे तिला भानच उरले नव्हते. तिची प्रत्येक अदा सगळ्यांचे मन वेधून घेत होती. सगळ्यांचे लक्ष तिच्यावर केन्द्रित झाले. मुग्धाचा सुंदर गरबा बघून अनेकजण तिच्यासोबत नाचण्यासाठी आतुर झाले होते. तिथे जमलेल्या मुलांचे तर भानच हरपले. सगळेजण मुग्धाचे कौतुक करत होते. अखेर आजची सर्वोत्कृष्ट गरबा नर्तकी म्हणून मुग्धाला तिथल्या आयोजकांकडून प्रथम पारितोषिक सुद्धा मिळाले. मुग्धा खूप खुश झाली. कार्यक्रम संपला. ती आपल्या मैत्रिणींसोबत घरी जायला निघाली तेवढ्यात तिच्या हातून तिचा रुमाल खाली पडला. ती रुमाल उचलण्यासाठी खाली वाकताच समोरून एक तरुण आला आणि त्याने तिला रुमाल उचलून दिला. मुग्धाने त्याच्याकडे पाहून स्मित केले आणि धन्यवाद बोलून ती निघून गेली.

दिवस सरले आणि प्रथमसत्र परीक्षा तोंडावर आली. मुग्धा जोमाने अभ्यास करू लागली. एक दिवस ती ग्रंथालयात अभ्यास करत बसली असताना अचानक एक तरुण तिच्यासोमर येऊन बसला. मुग्धाचे त्याच्याकडे लक्ष जाताच तिला कळले की तो तिच्याकडेच बघत आहे. त्याला बघताच तिला अचानक आठवले कि आपण याला कुठेतरी पाहिले आहे. पण नक्की कुठे ? तिला आठवत नव्हते. तेवढ्यात घंटा वाजते आणि ती बाहेर निघून जाते.

दिवाळीची लगबग सुरु होते. मुग्धा आपल्या आईसोबत घरातली साफसफाई करून झाल्यावर फराळाचे सामान घेण्यासाठी घराजवळील किराणा दुकानात जाते. तिला अचानक तिथे तो तरुण पुन्हा दिसतो. तिला आठवते की हा तोच मुलगा आहे जो नवरात्रीमध्ये तिला भेटला होता. शिवाय तिने त्याला शाळेमध्ये सुद्धा पाहिले आहे. हा मुलगा आपला पाठलाग तर करत नाही ना ? असा विचार मुग्धाच्या मनात येताच ती त्याच्याकडे रागाने बघते. तिची तीक्ष्ण नजर पाहताच तो तरुण मान खाली घालून तिथून निघून जातो. त्यानंतर दिवाळीमध्ये सुद्धा मुग्धाने त्या तरुणाला आपल्या घराच्या आजूबाजूला फिरताना बऱ्याच वेळा पाहिलेले असते. आता मात्र तिची शंका खात्रीमध्ये परिवर्तित होते. ती सुरुवातीपासूनचे सगळे दिवस आठवते. तो मुलगा जेव्हा जेव्हा तिला दिसतो तो नेहमी तिलाच न्याहाळत असल्याचे तिला जाणवते. पण आजर्पयंत त्या मुलाने तिच्याशी कधीही बोलण्याचा प्रयत्न केला नाही किंवा तिला त्रासही दिला नाही याचे तिला नवल वाटते.

क्रमशः

(टिप : या कथेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती कु. प्रियांका कुंभार यांची असून , या कथेचे सर्व अधिकार फक्त कु. प्रियांका कुंभार यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कथा ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी ही नम्रविनंती. )

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED