That night - 1 books and stories free download online pdf in Marathi

ती रात्र - 1

भाग १

"Hello, तु कुठे आहे"
हो हा मानसीचा आवाज होता ,
मी अर्ध्या झोपेत होतो. मानसी असं कधीच मला कॉल वैगरे करत नाही, बोलणं झालाच तर व्हॉटसअप वर ते पण गरजेनुसार.
आज तिने मला २-३ महिन्यानंतर कॉल केला असावा, रात्रीचे जवळपास ९ वाजले होते.
मी दमलो होतो, ऑफिस च काम खूप असतं, त्यात तो टकल्या बॉस माझा, त्याच्या डोक्यावर केस नाही आणि आमच्या डोक्याला फेस आणतो.
रूमवर मी आणि ईशांत आम्ही दोघेच होतो, तसा तो निशाचर प्राणी, रात्री जागरण करून काय करतो ते मला पण माहिती नाही आणि २ वाजता झोपणारा हा, सकाळी कसा लवकर उठणार ?
तसे आम्ही ४ लोक राहतो पण जोडून सुट्टी आल्यामुळे दोघे संध्याकाळीच घरी गेले.
मानसीच्या आवाजामुळे गळून पडलेलो मी ताडकन उभा राहिलो, डोळ्यांना थोडा दिलासा मिळाला होता तोच नशिबाने घात केला आणि थकलेल्या शरीराला आणि आसुसलेल्या डोळ्यांना त्यांच्या झोपेचं दान करावं लागलं त्या तिच्यात अडकलेल्या हृदयासाठी.
तिने पुन्हा विचारले,
“कुठे आहे तू ?”
मी “कुठे नाही रूम वर, का काय झालं ?”
ती “काही नाही, तुमच्या रूम वर किती लोक असतात, म्हणजे जागा असेल का रहायल ?”
मला वाटल एखाद्या मित्रासाठी विचारत असणार,
मी “नाही, का कुणाला पाहिजे, तुझा कुणी मित्र आहे का ?”
ती “नाही, माझ्यासाठी हवी होती”
आमच्या रूमवर मुलीचे फोटो नसतात, सर्व ब्रँड मुलांचे असतात, आणि ही direct रूमवर येणार,
मी “मग माझी एक मैत्रीण आहे तिच्याकडे तुला जागा करून देतो”
ती “का, तुमच्या रूम वर मुली नाही राहू शकत का ?, मला फक्त आजसाठीच राहायचं आहे”
मी “मला चालेल पण तुला चालेल का ?”
ती “पण मी एकटी नाही , माझी एक फ्रेंड पण आहे सोबत”
मी ” काही काळजी करू नको आमच्याकडे आहे जागा तशी”
ती “मग ये लवकर घ्यायला आम्हाला, मी बस स्टँड ला आहे”
मला धक्काच बसला, ही काय अचानक आली.
आणि रूमला राहायचं म्हणते.
तेव्हा बाहेर हलकासा पाऊस सुरू होता, मी गाडी काढली आणि तिला घ्यायला निघालो,
रस्त्यात जात असताना मला एका दुकानात ” बाई वाड्यावर या ” हे गाणं ऐकू येऊ लागलं, गाणं ऐकता क्षणी मला “गावात नवीन पाखरू आलंय” हा संवाद आठवला आणि मी भूतकाळात गेलो,
कॉलेजचं नवीन वर्ष सुरू झालं होत, सर्व जण मस्त मजा मस्ती करत होते, lecture
सुरू होण्यासाठी अजुन वेळ होता, कॉलेज ला असलो तरी दिल तो बच्चा है ना म्हणत सर्व एक दुसऱ्याला कागदाचे विमान मारून फेकत होते.
विमान कुणाच्या खांद्याला , कुणाच्या डोक्याला लागत होत, कुणी आपले डोळे वाचवत होते मुली आपले केस. मी पण एक विमान बनवले आणि हवेत जोरात दरवाज्याच्या दिशेने फेकले. हवेत डुलक्या देत देत ते विमान खाली येत होत आणि त्याच्या बाजूला एक पाय चालत आला, हळू हळू माझी नजर वर जात होती, चेहऱ्यापर्यंत गेली तोपर्यंत माझं विमान क्रॅश झालं होत, त्याच वाईट वाटत नव्हतं मला पण माझं मन मात्र हवेत उडत होत, तिथे एक मुलगी होती आणि मुली मागे आमचे शिक्षक.
अचानक वर्गात शांतता पसरली होती आणि सर्व आपली आपली जागा पकडून निष्पाप असल्यासारखे शांत बसले होते, ती हळु हळु मुलीच्या डेस्क च्या दिशेने चालत होती, आणि तिच्या पायाच्या साखळ्या त्यांनी पार गोंधळ घातला होता, त्या क्षणी तो आवाज खर तर जंगलातल्या झऱ्यातून पडणाऱ्या पाण्यालही लाजवणारा होता. ती जाऊन बसली आणि शिक्षकांनी कान उखडणी सुरू केली त्यामुळे माझे कान बंद होते. ते संपल्यावर त्यांनी तिला उभे केले आणि तिची ओळख करून दिली, “मानसी”
आणि कुणीतरी मागून ओरडले
“गावात नवीन पाखरू आलंय”
सर्व जण माझ्याकडे पाहायला लागले,
मी मागे पाहिले तर मला समजले की मी सर्वात शेवटी बसलो आहे, मागे कुणीच नाही मग कोण बोललं. तेव्हा मला वर्गाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला मी बाहेर जात होतो, तिच्याकडे एक नजर फिरवली तर तीच तेच जे मुली करतात वाकड तोंड.
ते पाहत असताना मी पुढे चालत होतो आणि अचानक मला दरवाजा लागला.
मी गाडीचा break दाबला होता, मी बस स्टँड वर पोहचलो, तिला कॉल केला , ती सांगितलेल्या ठिकाणी आली, अजूनही पाऊस तसाच बरसत होता.
मी मानसी कडे पाहून हसलो आणि ती पण हसली, तिच्या हसण्याकडे पाहून माझ्या जीवनाचं सार्थ झालं.
तिची मैत्रीण पण माझ्याकडे पाहून हसू लागली.
मी तिला ignore केलं, हो मी पहिल्यांदा अस केलं असणार, माझा तिच्यावर राग नाही पण आता गुलाबाचे फुल समोर असताना कोण कश्याला झेंडू बघेल, तसच काही झालं माझं.
मी गाडी वळवली आणि त्या दोघांना बसण्याचा इशारा केला, माझ्या मागे मानसी बसली आणि तिच्या मागे तिची मैत्रीण.
तिची बॅग मी पुढे घेतली होती माझ्या, म्हणून त्या दोघी काडी पेहलवान असल्यामुळे बरोबर बसल्या , गाडी सुरू केली.
गाडी आरामात चालली होती अचानक एक खड्डा आला आणि तिने माझ्यावर भार दिला, तीचा एक हात नकळत माझ्या खांद्यावर आणि दुसरा माझ्या मांडीवर आला.
मला तर समजले नाही काय घडलं ते, पण कदाचित पावसामुळे मला खड्डा समजला नसणार. पण आता त्याच खड्यासमोर नारळ फोडून दुसरा खड्डा करावासा वाटतो. पुढे गेल्यावर तिने मला विचारलं “तुला गाडी येते म्हणजे, मला वाटलं अजुन पण पायीच फिरतो तू”
मला हे ऐकुन खूप आनंद झाला,
माझ्या एका मित्राच्या वाढदिवसाची पार्टी होती आणि ती झाल्यावर त्या दिवशी मी पायी चालत जात होतो, रात्रीचे १० – १०:३० वाजले होते.
रस्त्याच्या वळणावर चालत असताना मला ती दिसली, ती एकटीच होती. मी विचार केला कुठे फिरते आहे इतक्या रात्री ही, त्या दिवशीचा राग गेला नसणार म्हणून मी पण तिच्याकडे लक्ष दिले नाही. पण काहीही झाले तरी तिची मला गरज होतीच, ती नक्कीच हॉस्टेल ला जात असणार अजुन एक कि.मी. चालावं लागणार होत. एक मुलगी एकटी कशी जाणार म्हणून मी तिच्या मागे मागे जात होतो, तिने आधीच पाहिले होते असे मला वाटले. ती मागे वळून पाहत नव्हती, सरळ चालली होती.
रस्त्यात दोन कुत्रे होते, ती त्यांच्या समोरून पुढे जात होती, ते शांत बसले होते. तीच्यानंतर मी चाललो होतो त्यांच्याकडे पाहून हळु हळु मी पुढे निघणार तोच एकाला काय झालं कुणास ठाऊक त्याने माझ्यावर भुंकायला सुरुवात केली. आता कुत्र्यांना जरी मी आवडत असलो तरी कुत्रे मला नक्कीच आवडत नव्हते. मी थोडा चालण्याचा वेग वाढवला पण घाबरलो नाही अजुन, आता दोन्ही भूंकायला लागले, मी घाबरलो नाही. मी आता चालण्याची गती आणि पळण्याची गती यामध्ये कुठेतरी होतो, आता मी आणि ती एका रांगेत चालत होतो. दोन्ही कुत्रे जवळ यायला लागले, मी अजुनही घाबरलो नव्हतो. पण आता ते अगदीच जवळ आले पण आता मात्र मी घाबरलो आणि तिच्या मागे लपण्याचा प्रयत्न केला, ती ही इकडे तिकडे पाहू लागली. त्या कुत्र्यांच्या दिशेने तिने एक नजर फिरवली आणि मला म्हणाली शांत उभा रहा, मी थरथरत होतो. ती चिडून म्हणाली की शांत उभा राहा, काही नाही करणार ते आणि मी डोळे मिटले होते. मला तिच्या केसांचा सुवास येत होता, मी कुठल्यातरी शांत ठिकाणी असल्याची जाणीव मला झाली. कुत्रे शांत झाले होते. मी डोळे उघडले तर माझा एक हात तिच्या खांद्यावर होता मी पटकन हात बाजूला सारला. ती म्हणाली “गेले ते”,
मी आजूबाजूला पहिले ” हो”
ती पुन्हा म्हणाली “गेले ते”
मी “हो , खरंच गेले”
नंतर तिने अलगद माझा हात उचलला अस मला वाटल, पण मी तिचा हात पकडला होता आणि तिला तो सोडवायचा होता. मी लगेच हात सोडला.
त्या क्षणी मी तिला सहारा देईन असं समजणारा तिनेच मला सहारा दिला, प्रत्येक वेळी मुलं नाही मदत करत मुली पण करतात आणि त्यांना कुणाच्या मदतीची गरज नसते कधीच, फक्त कुणीतरी प्रोत्साहन देणार हवं.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED