सुवर्णमती - 6 Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सुवर्णमती - 6

6

यथावकाश भोजन झाले. चंद्रनाग आपल्या सहज शैलीने, सर्वांना विलायतेतील गमती सांगत राहिला, सुवर्णमती मोठे मोठे डोळे करत, मोठ्या उत्सुकतेने ते ऐकत राहिली. चंद्रनाग स्वत:वर खुश होत राहिला. सूर्यनाग अधिकाधिक स्वत:च्या कोषात गुरफटत राहिला. शेवटी दिवस कलला. सर्वजण आपापल्या कक्षात विश्रांतीसाठी जाऊ लागले. सुवर्णमतीही आपल्या कक्षात निघाली. वाटेतच सूर्यनागाचा कक्ष होता. तो अजून बाहेरच उभा दिसला. लांबूनच त्याची उंच आकृती दिसताच तिची पावले थबकली. सुवर्णमती क्षणभर घुटमळली. 'बोलावे की तसेच पुढे जावे?' मग थांबून म्हणाली "काही हवे होते का आपणास? सेवक कुठे दिसत नाहीत, पाठवून देते कोणास लगेच," तेव्हा सूर्यनाग म्हणाला, "नाही, त्याची आवश्यकता नाही, मीच पाठवून दिले सर्वांस. मला विशेष सेवकांची गरज भासत नाही. " सुवर्णमतीने त्यावर स्मित करत म्हटले, "आपल्या सादगीबद्दल बरंच ऐकलं होतं, पण आपण तर त्याहूनही साधे आहात. शास्त्र सांगते सादगी हे उत्तम चारित्र्याचे लक्षण. आमच्या राज्यावर झालेल्या आक्रमणादरम्यान आपण जो न्यायाच्या बाजूने पवित्रा घेतलात, आपल्या मनातील स्त्रीयांविषयीचा आदर पाहून आमच्या मनातील आपल्याविषयीचा आदर अधिकच दुणावला. आपले आभार कसे मानावेत हेच आम्हास कळत नाही. आपले राज्यकारभारातील कर्तुत्व सर्वज्ञात आहे, आणि न्यायशास्त्रातील आपले ज्ञान सर्वश्रुत आहे. आपणामुखे प्रत्यक्ष त्याविषयी काही ऐकावयास मिळेल अशी आशा धरून होतो आम्ही."

सूर्यनाग सुखदाश्चर्याने पाहतच राहिला. याची अजिबातच अपेक्षा नसल्याने, आणि तरुण स्त्रीशी फारसा संबंध न आल्याने काय बोलावे ते न सुचून तो पुरता गोंधळून गेला. पण मग एकदम गडबडून जात सुवर्णमती खाली मान घालून म्हणाली, "आम्हाला त्यातले फारसे काही कळते असे नव्हे, पण ऐकावयास आवडते. माफी असावी, आपण प्रवासाने आधीच शीणला असाल, दोन घटिका स्वस्थ स्वत:बरोबर घालवायच्या असाव्यात आपणास, आम्ही मात्र काहीतरी पोरकट वक्तव्य करीत बसलो. निघतो आम्ही."

आता अधिकच गोंधळून गडबडून जात सूर्यनाग म्हणाला "राजकुमारी आपणच मला माफ करा. आपल्या सारख्या सुंदरीला, .... "असे म्हणून तो अधिकच गडबडला, काय बोलावे हे न कळून गोंधळला, मग सावरून घेत म्हणाला, "म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपल्या वयाच्या राजकुवारीला याविषयांमधे रस असेल असे वाटले नव्हते. म्हणून आश्चर्य वाटले एवढेच. आता बराच उशीर झाला, उद्या आपणासोबत याविषयी चर्चा करण्यास आम्हास नक्की आवडेल." यावर सुवर्णमतीने अतिशय गोड असे स्मित करत मान हलवून संमती दर्शवली आणि निरोप घेऊन ती निघाली, पण सूर्यनागाच्या मनात कायमचे घर करूनच. उद्या राजकुवारीकडे संपूर्ण लक्ष पुरवण्याचे त्याने ठरवले.

दुसऱ्या दिवशी वनभोजनाचा कार्यक्रम ठरवला होता. त्यानिमित्ताने राज्याचा फेरफटकाही होईल आणि काही घटका निसर्गाच्या सानिध्यात चांगल्या व्यतीत होतील असा बेत होता. आज मात्र सुवर्णमतीने पूर्ण पुरुषी पोषाख केला. तयार होऊन ती बाहेर आली तेव्हा सर्वांचीच नजर तिच्यावर खिळून राहिली. मग वातावरण हलके करण्याच्या दृष्टीने ती म्हणाली “आम्ही तिघे, काही सख्या आणि सैनिक मिळून घोड्यावरून पुढे जाऊ. आपण चौघांनी मोटरगाडीने यावे. त्या योगे आमचाही घोडसवारीचा सराव होईल.” दोन्ही राजांनी संमती दर्शविली.

सूर्यनागास हे कोडे उलगडत नव्हते. घटकेत लाजरी बुजरी, क्वचित एखादाच शब्द बोलणारी नाजूक राजकन्या, तर घटकेत आपल्या राज्यकारभाराची सरळ तारीफ करत चर्चेस आमंत्रित करणारी विदुषी, आणि आता निर्भीडपणे सर्वांसाठी निर्णय घेऊन मोकळी होणारी आणि तो निर्विवादपणे योग्यच वाटावयास लावणारी, पुरुषी पेहेरावातही सर्वांच्याच नजरा खिळवून ठेवणारी ही सुवर्णमती, यातली नेमकी खरी कोणती? पण हिची सर्वच रुपे लोभस आहेत एवढं मात्र खरं.

त्याच्या मनात हे असे विचार चालू असताना चंद्रनाग तिच्याशी बोलू लागला. अगदी खाजगी आवाजात ती किती सुंदर दिसत आहे याचे कौतुक त्याने केले. सूर्यनागाकडे तिने एक कटाक्ष टाकला. तो आपल्याच विचारात मग्न दिसताच, तिचे मन थोडे खटटू झाले. तेवढ्यात सूर्यनागाची नजर यांच्याकडे वळल्यावर मात्र तिने चंद्रनागाशी हसून बोलायला सुरवात केली. प्रथम त्याने केलेल्या तारीफेने आपण अगदी अवघड़ून गेलो आहोत असे किंचित लाजत तिने सांगितले. मग त्याच्याबरोबर बोलत ती महालातून बाहेर आली. हे पाहून सूर्यनागाच्या ह्रदयात एक बारीक कळ आली. ‘हिच्याबरोबरचे आयुष्य हे नेहमीच उत्कंठावर्धक असेल. चंद्रनाग भाग्यवान आहे मोठा.’

‘आपण चूक तर नाही ना केली चंद्रनागास इथे आणून?’ शेषनागाना राहून राहून वाटत होते. पण गंगानगरीचे राज्य इतर कोणाच्याही अधिपत्याखाली जाणे शेषनागाच्या राज्याला धोकादायक होते. गंगानगरीच्या पलीकडच्याच राज्यात परकीय येऊन ठेपले होते. गंगानगरीसारख्या लहानशा राज्याला धाक दाखवून पटकन आपल्या कह्यात करणे त्यांना सहज शक्य होते. पण शेषनागांचे राज्य आणि गंगानगरी यांच्या सीमा जोडल्या गेल्या तर ताकद वाढणार होती. चंद्रनगरीची सीमा आधीच जोडली गेलेली होती.

परकीयांबरोबर सरळ वैर पत्करणे अवघडच, परंतु शक्य होईल तोपर्यंत त्यांना मित्रत्वाच्या सीमेत रोखणे हेच धोरणी ठरणार होते.

उद्या या विषयावर सुरजप्रतापसिंह , शेषनाग, आणि सूर्यनाग यांच्यात, ही गुप्त चर्चा ठरलीच होती. चंद्रनाग परदेशात राहून आल्याने तिथले रीतीरिवाज , भाषा उत्तम प्रकारे जाणत होता. सूर्यनागानेही, ही परदेशी भाषा अवगत केली होती. ही काळाची गरज त्याने ओळखली होती. पण सुवर्णमतीनेही ती गरज ओळखून परदेशी भाषा आणि संस्कृतीचा अभ्यास केला असल्याचे त्याला माहित नव्हते.